सज्जनगड / Sajjangad

‘दासबोध’कार समर्थ रामदास यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘Sajjangad’ हा महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध किल्ला ! ‘परळीचा किल्ला’ या नावाने ओळखला जाणाऱ्या सज्जनगडाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : सज्जनगड

समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1100 मी. (3350 फूट)

गडाचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

ठिकाण : साताऱ्याजवळ, जिल्हा : सातारा

जवळचे गाव : परळी, कारी, गजवाडी.

डोंगररांग : सातारा, सह्याद्री

सध्याची अवस्था : चांगली.

साताऱ्यापासून अंतर : 15 किमी

स्थापना : 12 वे शतक

सज्जनगडला कसे जाल ?How to go to sajjangad?

सज्जनगड परिसरात पूर्वी अस्वलांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती म्हणूनच या गडाला ‘अस्वलगड’ असेही नाव होते.

साताऱ्याहून परळी 10-12 किमी अंतर आहे. परळी हे सज्जनगडाच्या पायथ्याचे गाव. परळीहूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. येथून पुढे गडाच्या दिशेने गेल्यावर सुमारे 600 पायऱ्या चढल्यानंतर गडाचा दरवाजा लागतो. परळीहून गडावर पोहोचण्यास किमान एक तास लागतो.

सातारा-परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे गजवाडी नावाचे गाव आहे. हे गाव परळीच्या अलीकडे 3 किमी अंतरावर आहे. तेथून थेट गडाच्या कातळमाथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे 100 पायऱ्या चढले की गडाचा दरवाजा लागतो. रस्त्यावरून गडावर जाण्यास 20 मिनिटे लागतात.

सज्जनगडचा इतिहास :History of Sajjangad

सातारा शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे 15 किमी अंतरावर उरमोडी आणि उर्वशी नदीच्या खोऱ्यात ‘सज्जनगड’ विसावला आहे. सज्जनगड आणि समर्थ रामदास यांचा वेगळाच ऋणानुबंध आहे. सज्जनगड हे समर्थ रामदासांचे आवडते ठिकाण. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ सज्जनगडावर घालवला आहे.

प्राचीन काळी सज्जनगडाच्या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे या गडाला आश्वालायन गड असे नाव प्राप्त झाले. पुढे हा गड ‘अस्वलगड’ या नावानेही ओळखला जात असे.

सज्जनगडाची स्थापना शिलाहार राजा भोज याने 12 व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी हे गाव आहे. त्यावरून या गडाला ‘परळीचा किल्ला’ असेही नाव पडले.

बहमनी सत्तेच्या काळात सज्जनगड बहमनी सत्तेच्या आधिपत्याखाली होता. पुढे बहमनी सत्तेचे विभाजन झाले आणि हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 एप्रिल 1673 मध्ये सज्जनगड जिंकून स्वराज्यात आणला. आणि या गडाचे नामकरण सज्जनगड झाले.

संभाजीराजे कौटुंबिक कलहाला त्रासले होते. त्यांच्यावर अष्टप्रधान मंडळातील धूर्त मंत्र्यांकडून खोटे आरोप पसरवण्याचे कट-कारस्थाने केले जात असे. संभाजीराजे यांची मानसिकता बिघडवण्याचे काम चालू होते. म्हणूनच छत्रपती शिवरायांनी 3 नोव्हेंबर 1678 रोजी शंभूराजांना सज्जनगडावर पाठवले होते. महिन्याभरातच तेथून ते दिलेरखानाला जाऊन मिळाले. शिवरायांनी त्यांची समजूत काढून स्वराज्यात परत आणले.

18 जानेवारी 1682 मध्ये समर्थ रामदासांनी गडावर राममूर्तीची स्थापना केली. 22 जानेवारी 1682 रोजी समर्थ रामदासांचे गडावर निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले होते. गडाची व्यवस्था भानजी व रामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. दिवाकर गोसावी आणि भानजी गोसावी यांच्यात हक्कावरून भांडणतंटा सुरू झाला. हे भांडण विकोपाला जाऊ नये म्हणून समर्थ रामदासांनी दिलेल्या सूचनेनुसार तेथील कारभार पाहावा अशा आशयाचे पत्र संभाजीराजे यांनी सज्जनगडावर धाडले.

21 एप्रिल 1700 मध्ये फत्तेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा दिला. 6 जून 1700 मध्ये गड मोंगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबने या गडाचे ‘नौरससातारा’ असे नामकरण केले. इ. स. 1709 मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा गड आपल्या ताब्यात घेतला. पुढे 1818 मध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये इंग्रजांनी महाराष्ट्रातील मराठ्यांची सत्ता संपुष्टात आणली होती.

• गडावरील प्रेक्षणीय स्थळे :Spectacular Places of Sajjangad

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार :

सज्जनगडावर प्रवेश करतानाच लागणारे हे प्रवेशद्वार होय. हे प्रवेशद्वार आग्नेय दिशेस आहे. आजही हा दरवाजा सुस्थितीत असला तरी डागडुजी करणे आवश्यक आहे.

समर्थद्वार :

गडाला दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. हा दरवाजा ‘समर्थद्वार’ म्हणून ओळखला जातो. आजही रात्री दहानंतर गडाचे दरवाजे बंद होतात. शिवकाळात सूर्य मावळल्यानंतर गडाचे दरवाजे बंद होत असत.

समर्थद्वारातून आत जाताच समोरच एक शिलालेख आढळतो. त्या शिलालेखावर असलेल्या मजकुराचा मराठीत अर्थ पुढीलप्रमाणे :

१) ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.

२) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.

३) तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस, परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे.

४) तुझ्यापासून सर्व विवंचना मुक्त होतात.

रामघळ :

गडावर चढताना अगदी शेवटी पायऱ्या संपण्यापूर्वी उजवीकडे एक वाट गेलेली आहे. या वाटेतून पाच मिनिटांच्या अंतरावर ‘रामघळ’ आहे. समर्थ रामदास एकांतात या ठिकाणी बसत असत.

घोडाळे तळे :

गडावर प्रवेश करताच डावीकडे जी वाट जाते ती घोडाळे तळ्याच्या दिशेने. घोड्यांना पाणी पिण्यासाठी या तळ्याचा वापर केला जात असे. म्हणून या तळ्याला ‘घोडाळे तळे’ असे नाव पडले.

आंग्लाई देवीचे मंदिर :

आंग्लाई देवीची मूर्ती अंगापूरच्या डोहात सापडली. त्यावरून तिचे नाव ‘आंग्लाई देवी’ असे पडले.

धर्मशाळा :

मंदिराच्या वाटेने पुढे आल्यावर धर्मशाळा लागते. उपाहारगृह लागते.

धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे लागते. या तळ्याचे पाणी पिण्यासाठी वापरतात.

इतर काही ठिकाणे :

सोनाळे तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटिका आहे. येथेच मारुतीचे मंदिर आहे. राम मंदिर, समर्थांचा मठ, शेजघर आहे. समर्थ वापरत असलेल्या वस्तू येथे ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून गेल्यावर ब्रह्मपिसा मंदिर लागते.

गडावरील सर्व ठिकाणे पाहण्यास किमान दोन तास लागतात.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

सज्जनगड साताऱ्याजवळ असल्याने अनेक लोक साताऱ्यात मुक्काम करून सकाळी गड पाहायला जातात. साताऱ्यात मुक्कामासाठी व जेवणासाठी भरपूर हॉटेल्स, खाणावळी आहेत. लॉज आहेत.

गडावर समर्थ सेवा मंडळ, धर्मशाळा, सज्जनगड सेवा मंडळ येथे राहण्यासाठी खोल्या मिळतात. गडावर जेवणाची व पिण्याच्या पाण्याचीही सोय असल्याने गडावर मुक्काम करण्याचा आनंद लुटता येतो.

आवर्जून वाचावे असे काही

  1. रायरेश्वर-Raireshwar
  2. पांडवगड: Pandavgad Fort

Leave a comment