महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणासाठी आणि मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी 19 व्या शतकाच्या मध्यात खूप मोठा लढा दिला. त्यावेळी समाजात खूप मोठी दरी होती. पुण्यात तर सनातनी लोकांचे प्राबल्य होते. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची अनिष्ट प्रथा होती. विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मुलींच्या आणि मागास वर्गीय मुलांच्या शिक्षणास बंदी होती. सनातन्यांनी अनेक अनिष्ट प्रथांनी बहुजन समाजाला जखडून ठेवले होते. अशा वेळी महात्मा फुले यांनी इंग्रजांचे अंतर्गत सहकार्य घेऊन मुलींची पहिली शाळा [The first school of Girls] सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया—-
ठिकाणाचे नाव : भिडे वाडा
ठिकाण कोठे आहे : बुधवार पेठ. स्थापना. :पुणे 1848
ठिकाणाचा प्रकार : शैक्षणिक
कोणी स्थापन केले: महात्मा फुले सध्याची अवस्था – नाही
प्रस्तावित फुले स्मारक: स्वारगेट पासून अंतर 2.5 किमी,
कुठे जायचे भिडेवाडा पाहायला? How to go to see Bhide wada.?
भिडेवाडा पुण्यातील बुधवार पेठेत आहे. स्वारगेट पासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेटपासून 2.5 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आपण चालत किंवा कॅबचा वापर करु शकतो.
* पुण्याचा लालमहाल, शनिवारवाडा, भिडेवाडा, दगडूशेठ ही चार ठिकाणे एकाच वेळी पाहता येतात. २ किमी परिसरात ही सर्व ठिकाणे आहेत.
मुलींची पहिली शाळा कोणी स्थापन केली ? केव्हा? Who established the first Girl’s School’? When?
महात्मा जोतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा स्थापन केली.महात्मा जोतिराव फुले यांना शिक्षण घेताना खूप अडचणी आल्या. पावलोपावली सनातन्यांचा अपमान सहन करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सावित्री ही त्यांची पत्नी . तिला शाळेत जाता आले नसल्यामुळे सावित्रीबाईंना फुल्यांनी घरीच शिकवले. आणि मुलींना शिकवण्यास प्रवृत्त केले..
1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्री बाई फुले यांना ही शाळा चालवण्यास सांगितले. भिडे नावाचे गृहस्थ हे ज्योतिराव फुले यांचे चांगले मित्र होते. त्यांनी सनातन्यांना न जुमानता मुलींची शाळा चालवण्यासाठी आपला वाडा फुल्यांना दिला . त्यामुळे हा वाडा भिडेवाडा या नावाने ओळखला जातो. पुढे काही दिवसांतच फतिमा शेख या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून शिकवायला तयार झाल्या. फतिमा शेख या सुद्धा भिडे वाड्यात मुलींना शिकवायला येऊ लागल्या. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या, तर फतिमा शेख या भारतातील दुसऱ्या स्त्री शिक्षिका ठरल्या.
मुलींची पहिली शाळा भारतात कोठे सुरु झाली ?Where was the first school for girls Started in India?
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी सुरु केली. सावित्रीबाई फुले आणि फतिमा शेख या दोघींनी मुलींना शिकवण्याचे काम केले. बहुजन समाज अनिष्ट प्रथा, परंपरा यांतून मुक्त व्हावा. या समाजातील स्त्रिया शिकाव्या, शहाण्या व्हाव्यात, त्यांनी अंधश्रद्धेची बंधने झुगारुन द्यावीत. या उद्देशांनी फुले दाम्पत्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. पुढे त्यांनी मागासवर्गीय मुलांसाठी शाळा सुरु केली.
पुण्यातील भिडेवाडा. Bhidewada in Pune:
महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांचा मित्र भिडे यांनी मुलींच्या शाळेसाठी आपला वाडा दिला. तो भिडेवाडा या नावाने प्रसिद्ध आहे. पुण्यातील बुधवार पेठेत असलेला हा ऐतिहासिक भिडेवाडा न्यायालयीन प्रक्रियेमुळे चांगलाच गाजला होता. अनेक वर्षांपासून भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे अशी महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती; पण या वाड्यात घुसलेल्या भाडेकरूंनी वाडा सोडण्यास नकार दिल्याने ही बाब न्यायप्रविष्ट झाली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने भिडेवाडा महानगरपालिकेच्या ताब्यात मिळाला.भाडेकरूंनी या जागेचा ताबा सोडल्यानंतर रीतसर पुणे महानगरपालिकेने 5 डिसेंबर 2023 रोजी एका रात्रीत वाडा जमीनदोस्त केला. याच ठिकाणी आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु होत आहे. महाराष्ट्र शासनाने काही रक्कम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकासाठी मंजूर केली आहे. लवकरच महाराष्ट्रातील जनतेच्या मनासारखे स्मारक उभा राहील आणि ते लोकांना पाहायला मिळेल अशी आशा आहे.
महात्मा फुल्यांचा मुलींच्या शिक्षणासाठी संघर्षः Mahatma Phule’s Struggle for Girl’s school.
महात्मा फुल्यांनी समाजातील अंधश्रद्धा, स्त्रियांची पिळवणूक जवळून पाहिली होती. त्यांना स्वतःलाही खूप कटू अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी कुटुंबातील स्त्री शहाणी झाली, चांगली शिकली तर कुटुंब सुधारेल असे वाटत होते. हळूहळू समाज सुधारेल म्हणूनच त्यांनी इंग्रजांच्या सहकार्यातून मुलींची शाळा आणि नंतर मागासवर्गीय मुलांसाठी शाळा सुरु केल्या . या शाळा चालू करताना त्यांना सनातन्यांचा प्रचंड विरोध झाला. कुटुंबाने घराबाहेर काढले. सासू- सासऱ्याने संबंध तोडले; पण फुले दाम्पत्य मागे हटले नाही, त्यांनी आपले कार्य नेटाने पुढे चालू ठेवले, फुल्यांवर हल्ला झाला. त्यांच्यावर मारेकरी पाठवले.सावित्री बाईंनाही तसेच अनुभव आले. शाळेकडे जाताना यांच्यावर दगडफेक झाली. चिखलफेक झाली. शेणफेक झाली. सावित्रीबाई सुद्धा मागे हटल्या नाहीत. त्या नियमित शाळेला जाऊ लागल्या. त्यांच्या जोडीला फतिमा शेख होत्या त्यांनाही विरोध झाला, पण फतिमा शेख सुद्धा मागे हटल्या माहीत पुढे फुल्यांनी अनाथालय काढले. अनेक विधवा स्त्रियांना आश्रय दिला. त्या विधवा असूनही गरोदर होत्या. समाजाचेच ते पाप; पण ते पाप निस्तरण्याची जबाबदारी फुले दाम्पत्यांनी घेतली. अनेक स्त्रियांची बाळंतपणे सुखरुप पार पाडली. त्याच अनाथालयातील एका विधवेपोटी जन्मलेल्या मुलाला फुले दाम्पत्याने दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले .
हंटर कमिशन आणि फुले Hunter Commission and Mahatma Phule:
हंटर कमिशन हे हंटर शिक्षण कमिशन या नावाने ओळखले जाते. भारतातील शिक्षण पद्धतीत कोणता बदल करावा किंवा भारतातील शिक्षण सुधारण्यासाठी काय केले पाहिजे ? याबद्दल 1882 साली हंटर कमिशनची निर्मिती केली होती. महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला आपण सुरु केलेल्या शाळांचा अहवाल तयार करून पाठवला होता. आपण शाळा सुरु करताना आणि सुरु झाल्यावर आलेल्या अडचणी सविस्तर मांडल्या होत्या. शिक्षणात सुधारणा करण्याचे उपाय सुचवले होते. त्यात एक मुद्दा असा होता की शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनांच शिक्षक म्हणून नोकरी दयावी.असे महात्मा फुल्यांनी हंटर कमिशनला पत्राद्वारे सविस्तर कळवले होते.