Buddha: Life, work, Dhamma:- part 2

गौतम बुद्ध: जीवन, कार्य,धम्म :- भाग 2

बुद्धाचे कुळ: Buddha’s clan

गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पूर्व 563 मध्ये झाला. गौतम बुद्धाचा जन्म होऊन जवळ जवळ 2600 वर्षे होत आहेत. 2024 साली 2587 वर्षे पूर्ण झाली. बुद्ध हा राजपुत्र होता.हे सर्वांना माहिती आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती? हेही समजणे आवश्यक आहे. ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात भारतात एकच असे सार्वभौम राज्य नव्हते. अर्थात रामायण, महाभारत, बळीवंश कालावधी, सुलतान‌शाही मुघलशाहीतही भारतावर सार्वभौम अशी कुणाचीच सत्ता नव्हती . गौतम बुद्धाचा जन्म झाला त्यावेळीही अशीच परिस्थिती होती.

बुद्ध काळात भारत हा देश लहानमोठ्या राज्यात,गणराज्यात विभागला होता. राजांची सत्ता असलेली सोळा राज्ये होती. पांचाळ, गांधार, काशी, मल्ल, मगध, अंग, कोशल वज्जी, वत्स, कंबोज, मत्स्य, चेदी, कुरु, अवंती, अश्मक आणि सौरसेन अशी ही सोळा राज्ये होत.या सोळा राज्यात कोशल आणि मगध ही प्रबळ राज्ये होती. या राज्यांना जनपद असे म्हणत.

बुद्ध काळात गणराज्य पद्धतही अस्तित्वात होती. गणराज्य पद्धतीला संघराज्ये असेही म्हणत .या राज्यपद्धतीत एकच राजा सर्व सत्ताधीश नसे. संघाचे सदस्य असणारे सदस्य पुढील राजा कोण होणार हे ठरवत असत. या संघराज्यात प्रामुख्याने कपिलवस्तूचे शाक्य, मिथिलेचे विदेह, वैशालीचे लिच्छवी, पावा व कुशिनारा येथील मल्ल, अल्कपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलनाचे मौर्य सिसुमारगिरीचे भग्ग ही ती तत्कालीन गणराज्ये होत. गौतम बुद्ध ज्या गणराज्यात जन्माला आला, त्या गणराज्याचे नाव कपिलवस्तू असे होते. तर बुद्धाच्या राजघराण्याचे नाव शाक्य असे होते. कपिल‌वस्तू हे राज्य गणतंत्र असलेले किंवा संघराज्य असलेले असे होते. या गणराज्यांत एकाच राजघराण्याची कायम स्वरुपाची अशी सत्ता नव्हती .शाक्य राजवंशात आळीपाळीने सत्ता बदल होत होता. योगायोगाने गौतम बुद्धाचा जन्म झाला, तेव्हा कपिलवस्तूचा राजा शुद्धोदन झाला होता. यामुळेच गौतम बुद्धाला कपिलवस्तुचा उत्तराधिकारी म्ह‌णून शुद्धोदन राजाने घोषित केले होते. विद्‌धार्थ गौतमाकडे कपिलवस्तुचे लोक भावी राजा म्हणून पाहत होते. शाक्य राज्य भारताच्या ईशान्य दिशेला होते. शाक्यांच्या जवळच प्रबळ राजसत्ता असलेले कोशल हे राज्य होते. पुढे कालांतराने या कपिलवस्तुचे गणराज्य कोशलच्या अधिपत्याखाली गेले होते. गौतम बुद्धाच्या काळात कपिलवस्तु कपिल पूर्णतः कोशल राज्यसत्तेच्या अधिपत्याखाली नव्हते. मगधचा राजा बिंबिसार आणि कोशलचा राजा प्रसेनजित हे राजे गौतमबुद्ध समकालीन होते.

Leave a comment