Buddha: Life Story-Part-9

गौतम बुद्ध- संपूर्ण परिचय- भाग 9 

भूतदया : देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम

एकदा सि‌द्धार्थ गौतम आपल्या वडिलांच्या शेतात आला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सिद्धार्थ एका झाडाखाली चिंतन करत बसला होता. तो निसर्गाच्या सानिध्यातील शांतता आणि सौंद‌र्याचा आनंद घेत होता. इतक्यात एक पक्षी तडफडत येऊन त्याच्या समोरच पडला. तो पक्षी घायाळ झाला होता. सिद्धार्थने ते दृष्य पाहिले. त्याला बाणाने कोणीतरी मारले होते. त्याच्या शरीरात बाण घुसला होता. त्या पक्ष्याला वाचवण्यास‌ही सि‌द्धार्थ पुढे आला आणि पक्षाच्या शरीरातील बाण त्याने उपटून काढला. त्या ठिकाणी प‌ट्टी बांधली आणि त्या पक्ष्याला सिद्धार्थने थोडे पाणी पाजले. नंतर त्याने त्या पक्ष्याला उचलले आणि वस्त्रात गुंडाळले.थोडी ऊब मिळण्यासाठी त्याला हृद‌याशी धरले. सिद्धार्थला आश्वर्य वाटले की या निष्पाप आणि निरपराध पक्ष्याला कोणी बरे मारले असेल? इतक्यात सिद्धार्थचा आत्येभाऊ तेथे आला आणि त्याला म्हणाला,

” आकाशात उडत असलेल्या पक्षाला मी बाणाने खाली पाडले आहे. तो तडफडत इकडेच कुठेतरी आला आहे. तू त्याला पाहिलास का”यावर सिद्‌धार्थ म्ह‌णाला,

“होय त्या घायाळ पक्ष्याला मी माझ्या जवळ घेतले आहे. याला जखम झाली होती म्हणून मलमपट्टी करून कापडात गुंडाळून ठेवले आहे” देवदत्त म्हणाला, “तो माझा पक्षी आहे. माझ्या स्वाधीन कर.”

सिद्‌धार्थने तो पक्षी द्यायला नकार दिला. जो रक्षण करतो. त्याचा पक्षी असतो. मी या पक्षाचे रक्षण केले आहे. त्यामुळे या पक्ष्यावर माझी मालकी आहे. या वादात कोणीच माघार घेईना. त्यांचा वाद विकोपाला गेला. शेवटी पक्षी कुणाचा? हा वाद मिटवण्यासाठी लवादाकडे गेला. लवादाला (न्याय करणारी व्यवस्था) सिद्‌धार्थचे म्हणणे पटले.त्यांनी तो पक्षी सिद्धार्थच्या मालकीचा असल्याचे घोषित केले. सिद्धार्थने त्या पक्ष्याची जखम ठीक होईपर्यंत तो पक्षी आपल्याकडे ठेवला आणि तो बरा झाल्यावर त्याला सोडून दिले. या घटनेमुळे देवदत्त चांगलाच दुखावला. त्यांच्यात कायमचे वितुष्ट आले. पण सिद्धार्थने नाते संबंध सांभाळण्यापेक्षा निष्पाप जिवाला वाचवणे अधिक पसंत केले.

Leave a comment