Buddha: Life Story Part 12: संयमी राजपुत्रापुढे सौंद‌र्यवतींचे अपयश

पुरोहित उदयीनने दिलेला उपदेश त्या सुंदर ललनांनी चांगलेच मनावर घेतले होते. त्यांनी आपले सामर्थ्य आणि सौंदर्य पणास लावण्याचा निश्चय केला होता. निश्चयी, संयमी, एकाग्र अणि धीरगंभीर राजपुत्राला वश करणे म्हणजे खूप मोठे आव्हान आहे, हे त्या सौंदर्यवतींना माहीत होते. पुरोहिताच्या प्रेरणेने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता.

राजपुत्रासाठी बांधलेल्या वेगवेगळ्या ऋतूंसाठी वेगवेगळ्या तीन महालात सिद्धार्थ ऋतुमानानुसार योग्य त्या महालात राहू लागला. एका पेक्षा एक सुंदर असलेल्या त्या ललना सिद्धार्थला सुंदर अणि प्रफुल्लित उद्यानात फिरण्यासाठी उद्युक्त करत. मुळात सिद्धार्थलाही उद्यानात फेरफटका मारायला खूप आवडत असे. राजपुत्र उद्यानात फेरफटका मारायला गेला की त्या स्त्रियाही कळपाने त्याच्या पाठोपर जात. त्या उद्यानातून जाता-जाता ठेच लागल्याचा बहाणा करून सिद्धार्थाकडे झुकत आणि त्याला घट्ट मिठीत घेत. कामातूर झालेल्या त्या ललना सिद्धार्थाला प्रणयक्रीडेसाठी उद्युक्त करणाचा आटोकाट प्रयत्न करत. काही ललना तर मद्यधुंद अवस्थेत उद्दीपित होऊन सिद्धार्थाला खुणवत.
स्नानासाठी बांधलेल्या कुंडांतून स्नान करून त्या भिजलेल्या अर्धवट वस्त्रांसह सिद्धार्थाच्या समोर येऊन नेत्रकटाक्षाने आणि अंगविक्षेपाने सिद्धार्थाला घायाळ करण्याचा प्रयत्न करत .अंगविक्षेप करुन सिद्धार्थाचे लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत.

काही सुंदर आणि सुडौल शरीराच्या ललना आपल्या पैंजणाचा छुम छम असा आवाज करत तलम वस्त्र परिधान करून सिद्धार्थाच्या समोर येऊन त्याला खुणवत. वस्त्रात झाकलेली अंगे नकळत दाखवत.
तर काही ललना कमल उद्यानातील कमलपुष्पे हातात घेऊन राजपुत्राला वेढा घालत. नेत्रकटाक्षाने आपल्याकडे पुरेपूर लक्ष वेधण्याचा प्रयल करत. त्याच्याशी पैजा लावत. “जमत असेल तर मला पकडून दाखवा” असे आव्हान करत. काहीजणी तर कानातील कुंडलांची विशिष्ट हालचाल करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत. सिद्धार्थाशी वाद घालण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करत. विषयासक्त झालेल्या ललना तर स्वतःकडेच बोट करुन “हे फूल कोणाचे आहे?” असे विचारत.

हा पहा अशोक वृक्ष, तो आमच्या तारूण्याने बेधुंद झालेला आहे. आमच्या सौंदर्याने निसर्गही अधिक खुलून दिसत आहे.

वसंत ऋतूत पक्ष्यांच्यामध्ये जसा उन्माद निर्माण होतो तसाच उन्माद त्यांच्यात अवेळी निर्माण झाला आहे. पक्षीही आमच्या सौंदर्याने वेडेपिसे झालेले आहेत” शेवटी काही स्त्रिया तर सिद्धार्थाच्या समोर विवस्त्रावस्थेत फिरू लागल्या. त्याला उत्तेजित करु लागल्या.

पुरोहित उदयीन याने सांगितल्या प्रमाणे त्या सुंदर स्त्रियांनी सिद्धार्थाला नाना प्रकारे खुणवण्याचा प्रयत्न केला; पण ऐन तारु‌ण्यात असताना सिद्धार्थ ‌ यत्किंचितही ढळला नाही. सर्व ललना अपयशी ठरल्या.तपस्वी विश्वामित्रालाही लाजवेल असा संयम आणि धीरादात्तपणा सिद्धार्थाने ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना दाखवून आपल्यातील आद‌र्शवत विचाराची प्रचिती आणून दिली होती. राजा शुद्धोदन ‌याने टाकलेल्या मोह‌जाळ्यात सिद्धार्थ किंचितही अडकला नाही.

Leave a comment