Buddha: Life Story Part 13 :सि‌द्धार्थाला विषयसुखाकडे वळवण्यासाठी महामंत्र्याचा आटापिटा

सिद्धार्थ गौतमाला कामवासनेत म्हणजेच विषय सुखात बुडवण्यासाठी कपिलवस्तू नगरातील आणि नगराच्या बाहेरीलही सौंद‌र्यवतींना तीन महालात आणि त्या महालांच्या आवारातील उद्यानात आणून ठेवले होते. पण या सर्व सौंदर्यवतींना सिद्धार्थला जिंकण्यास अपयश आले होते. त्यांच्या अंगविक्षेपाने सिद्धार्थाची स्थितप्रज्ञता भंग पावली नाही.

शेवटी राजपुरोहित अर्थात महामंत्र्याने स्वतः सिद्धार्थला या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी आणि सिद्घार्थाशी संवाद साधण्याचा निश्चय केला. राजा शुद्धोदनाच्या आज्ञेवरून उदयीन सिद्धार्थाकडे निघाला. त्या तीन महालात आल्यावर राजकारणात अतिशय चतुर असलेल्या उदयीनने आपल्या गोड भाषेत सिद्धार्थावर मायाजाल पसरण्यास सुरुवात केली. उ‌दयीन म्हणाला,

” हे राजपुत्र, तुझा एक अनुरूप मित्र या नात्याने मी तुझ्याशी बोलत आहे.

1) जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे.

2) जे हितकारक आहे ते करण्यास प्रोत्साहन देणे.

3) संकटाच्या वेळी सोडून न जाणे.

ही उत्तम मित्राची तीन लक्षणे आहेत. मी माझ्या प्रिय मित्रालाही पुरुषार्थापासून परावृत्त झालेला कसा पाहू ? म्हणून मी स्वतः तुला या पुरुषार्थाची जाणीव करून ‌द्यायला आलो आहे.”

“स्त्रीला वश करणे हा पुरुषार्थच आहे. मग कपटाने का असेना त्याने वश केले तरी तो पुरुषार्थच झाला. तुझ्या तर अवतीभवती अनेक सुंदर युवती वावरत आहेत. त्या स्वतःहून तुला वश झाल्या आहेत. पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे संधी चालून आली आहे. या संधीचा तू पुरेपूर लाभ घेतला पाहिजेस.”

“आद‌र‌पूर्वक वश झालेल्या स्त्रीची इच्छा पूर्ण करणे यातच तुझा पुरुषार्थ आहे. यातूनच तिला आणि तुलाही स्वर्गीय सुख मिळणार आहे.
या सर्व स्त्रियांना प्रसन्न कर”

“हे विशाल हृदयाच्या राजपूत्रा,या सर्व स्त्रियांना प्रसन्न करण्यातच तुझे हित आहे. हे सर्व सुख तुझ्या पायाशी लोळण घालत आहे. तुझ्याकडे चालून आलेले सुख तू ठोकरून घालवू नकोस. तुला माहीत असेलच, प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिच्याशी काम संबंध ठेवले होते. अगस्ती ऋषीने सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी प्रणयक्रीडा केली. लोपामुद्रेचेही तेच झाले. इंद्राने तिलाही भोगले”

” हे राजपुत्र, तुला आणखी किती कथा सांगू? बृहस्पतीने मरुताची कन्या म्हणजेच औतथ्याची पत्नी हिला भोगून भारद्वाजला जन्म दिला.”

“तुला पराशर ऋषीची कथा सांगतो ऐक. कामातूर झालेल्या पराशर ऋषीने यमुना नदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी हिच्याशी सहवास केला. कामातूर वशिष्ट ऋषींनी खालच्या जातीतील हीन स्त्रीला भोगले त्या स्त्रीपासून वशिष्ट ऋषीला कपिगलाद पुत्र झाला.”

“ययाती या राजाच्या विषयासक्त आणि कामवासनेच्या कथा कितीतरी आहेत . वार्धक्याने जर्जर झालेल्या ययातीला कामवासना जडली होती. त्याने तर अनेक स्त्रियांशी, तसेच विश्वाकी अप्सरे बरोबर कामवासना करण्यात कितीतरी वर्षे घालवली.”

“पंडू राजाची कथा तर तुला माहीत आहेच. आपल्या पत्नीशी संभोग केल्याने आपल्याला मृत्यू येणार हे माहीत असतानाही पत्नीशी संभोग करून मरणाला कवटाळले .मृत्यू येणार हे माहीत असूनही त्याने माद्रीशी संभोग केला.

“अशा अनेक ऋषीमुनीनी, राजांनी निंद‌नीय ठरलेल्या कामवासना केल्या. तुला तर प्रशंसनीय अशा रती स्वतःहून कामातूर होऊन तुला अर्पण करत आहेत .मग अशा प्रशंसनीय गोष्टी, सुख तू का बरे टाळतोस? तू शक्तिवान आहेस. तू वीर्यवान आहेस. तू तरुण आहेस. तुझे रुप राजबिंडे आहे. या सर्व सुखावर तुझाच हक्क असताना तू हे सुख लाथाळू नकोस, तुझा तो हक्क आहे.”

राजपुरोहिताने म्हणजेच महामंत्र्याने उत्तेजित करणारा सल्ला दिल्यानंतर गौतम बुद्धाची अवस्था काय झाली असेल ? त्याने आपल्या महामंत्र्याला काय उत्तर दिले असेल ? ते सविस्तर पुढील भागात पाहू…..

Leave a comment