Buddha Life Story-Part 15 :सि‌द्धार्थचा शाक्य संघात प्रवेश

इ.स. पूर्व सहाव्या शतकात आणि त्यापूर्वी आणि त्यानंतरही सुद्धा शाक्यांचा एक संघ होता. संघ ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेनुसार वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर शाक्य युवकाला संघाची दीक्षा दिली जाते.ती सर्वांना मिळत होती, असे नाही. या संघाचे सभासद होण्यासाठी सिद्धार्थ गौतमालाही वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाक्य संघात प्रवेश करणे अनिवार्य वाटत होते. शाक्यांचे एक सभागृह पण असायचे. या सभागृहाला ‘संथागार’ असे नाव होते. कपिलवस्तू नगरातही एक संथागार होते. शाक्यांच्या सर्व सभा या संथागारमध्येच होत असत.

शुद्धोद‌नाने सि‌द्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा ‌द्यायची होती म्हणून त्याने शाक्यांच्या महामंत्र्याला सांगून सभा बोलावली. या सभेला सिद्धार्थ गौतम उपस्थित होता. शुद्धोदनही उपस्थित होता . सभा सुरु झाल्यावर पुरोहिताने म्हणजेच महामंत्र्याने सि‌द्धार्थला शाक्य संघाचा सभासद करून घेण्याचा ठराव मांडला. तेव्हा शाक्यांचा सेनापती जाग्यावरून उठला आणि त्याने सभागृहाला उद्‌दे‌शून भाषण केले. ते पुढील प्रमाणे –

” सभाजनहो शाक्य वंशातील शुद्‌धोद‌नाच्या कुळात जन्माला आलेला सिद्धार्थ गौतम हा शाक्य संघाचा सभासद होऊ इच्छितो. त्याचे वय वीस असून तो सर्व दृष्टीने संघाचा सभासद होण्यास पात्र आहे. तरी आपण सर्वांनी त्याला सभासद करून घ्यावे असे मी सुचवत आहे. माझी अशी विनंती आहे, की प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे”

या प्रस्तावाच्या विरुद्ध कोणीही बोलले नाही. सेनापतीने तीन वेळा पुकारले की, प्रस्तावाच्या विरुद्ध कुणाला बोलायचे अलेल तर त्याने बोलावे. तरीही कोणीच प्रस्तावाच्या विरुद्ध बोलले नाही.संघाची अशी परंपरा होती की तीन वेळा प्रस्ताव बिन‌विरोध संमत झाल्याशिवाय संघाचे सभासदत्व मिळत नाही. त्यानंतर घोषणा केली की सिद्धार्थला शाक्य संघाचे सभासद करून घेतले आहे. शाक्य संघात असलेली ही उच्च पराकोटीची लोकशाही कौतुकास्पद अशीच होती. त्यानंतर शाक्यांच्या पुरोहिताने सिद्धार्थला जागा उठून उभे राहण्यास सांगितले. त्याने सिद्धार्थला प्रश्न विचारला की सिद्धार्थ तुला संघाचा सभासद करून घेऊन तुझा बहुमान केला आहे, असे तुला वाटते का?

त्यावर सिद्धार्थ म्हणाला, “होय महाराज” पुरोहिताने दुसरा प्रश्न विचारला, संघाच्या सभासदत्वाची बंधने तुला माहित आहेत का ?” तुला संघाची कर्तव्ये माहीत आहेत का ? ही कर्तव्ये मी तुला सांगतो—-

1 तू संघाच्या हितसंबंधाचे रक्षण तन मन धन अर्पून केले पाहिजेस.

2 संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहायचे नाहीस.

3 कोणत्याही शाक्याच्या ठिकाणी दिसून आलेले दोष तू कोणतीही भीती न बाळगता निर्भिडपणे बोलून दाखवले पाहिजेस.

4 तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नये. त्यात तू अपराधी असशील तर तसे कबूल केले पाहिजेस. किंवा तू निरपराधी असशील तर तसेही सांगितले पाहिजेस.

आता तू संघाच्या सभासदत्वाला अपात्र केव्हा ठरु शकतोस हेही मी तुला सांगतो” असे पुरोहित म्हणाला आणि पुढे सांगू लागला.

1 तू बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाहीस.

2 तू कुणाचा तर खून केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.

3 तू चोरी केल्यास संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.

4 खोटी साक्ष दिल्यास तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस.

यावर सिद्‌घार्थ म्हणाला,

“महाराज मला शाक्य संघाचे नियम व शिस्तपालन याबद्दल ‌जे सांगितले ते मला मान्य आहे. मी सर्वांचा कृतज्ञ आहे नियमांचे पालन करण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन अशी खात्री देतो”

शाक्य संघात असलेली शिस्त, लोकशाही, नियम सर्वच आद‌र्शवत होते. निकोप शोकशाहीसाठी ते पोषक होते. आजच्या आधुनिक काळातील लोकशाहीत ही आदर्शवत मूल्ये आहेत का? असा प्रश्न पडतो तेव्हा समाधानकारक उत्तर मिळत नाही.

Leave a comment