Buddha Life Story-Part 19 :सिद्धार्थच्या कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण यशोदराची साथ..?

शाक्य संघाची सभा संपवून सिद्धार्थ गौतम घरी आला होता, पण सिद्धार्थ घरी येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत कुटुंबाला समजला होता. असित मुनीने वर्तवलेले भविष्य आणि महामायेला पडलेल्या स्वप्नाचा जो अन्वयार्थ होता ‘तो म्हणजे एक तर हा मुलगा संन्यासी होऊन जगाला मार्गदर्शन करेल किंवा तो चक्रवर्ती सम्राट होईल.’ यातील पहिला अर्थ (सिद्धार्थ संन्यासी होईल) हा खरा होतो की काय ? याचीच चिंता शुद्धोदनाला आणि महाप्रजापतीला म्हणजे गौतमीला लागली होती. दोघेही चिंतातूर झाले होते.

सिद्धार्थ घरी आला. घरात पाऊल टाकताच त्याला माता- पित्याचा आक्रोश कानावर आला. माता पित्याची रडारड चालू होती. पत्नी यशोदा आपल्या महालात होती. शुद्धोदन आपले अश्रू आवरत म्हणाला,

“तुमची चर्चा या थराला जाईल असे आम्हाला कधीच वाटले नाही”

यावर सि‌द्धार्थ म्हणाला,

“मला सुद्धा चर्चा या थराला पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेसाठी आणि युद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी मी माझा युक्तिवाद केला होता, पण संघाच्या सदस्यांची मने वळवण्यास मी अयशस्वी झालो. सेनापतीने लोकांना उत्तेजित करण्यास आणि युद्धधसाठी लोकांना तयार होण्यास खतपाणी घातले. त्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा सेनापतीचे म्हणणे अधिक पटले; पण मी सत्य आणि न्याय यासाठी मागे हटलो नाही. मी न्यायाचा पुरस्कार केला. संघाने बहुमताने जो निर्णय घेतला, तो मला मान्य नव्हता म्हणून मी अखेपर्यंत विरोध केला. संघाच्या विरोधी गेल्यामुळे जी काही शिक्षा दिली ती मी माझ्यावरच घेतली .ती शिक्षा मी स्वतः एकटा भोगणार आहे.”

सिद्धार्थ गौतमाच्या या बोलण्यावर राजा शुद्धोदन अजिबात समाधानी झाला नाही. दुःखीकष्टी अवस्थेतच तो सिद्‌धार्थला म्ह‌णाला,

“आमचे काय होणार याचा विचार केलास का ?”

यावर सिद्धार्थ म्ह‌णाला,

“शाक्य संघाने जमीन जप्त केली असती आणि कुटुंबाला वाळीत टाकले असते तर आपल्या सर्वांनाच खूप यातना झाल्या असत्या म्हणूनच मी हा निर्णय घेतला.”

त्यावर शुद्धोदन म्हणाला,

” तुझ्याशिवाय आम्हाला जमीन काय उपयोगाची?त्यापेक्षा सगळ्या कुटुंबानेच हा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये?”

गौतमी आपले हुंद‌के आवरत म्हणाली,
सिद्धार्थ, तुझे पिताजी बोलतात; तेच बरोबर आहे. आम्हाला अशा स्थितीत टाकून तू एकटा कसा जाऊ शकतोस ?”

सिद्‌घार्थ म्हणाला,
“आई, तूच मला कितीतरी म्ह‌णालीस की मी क्षेत्रीय माता आहे. आणि तू क्षात्रपुत्र आहेस. मग तूच धैर्य धरले पाहिजेस. मी रणांगणावर लढता लढता मेलो असतो तर तू काय केले असतेस ? तू रडत बसली असतीस काय ?”

आई म्हणाली
“नाही. ते मरण क्षत्रियांना साजेसे असे असते. तू आता अरण्यात जात आहेस. मग आम्ही इथे आनंदात कसे बरे राहू ? म्हणून आम्ही सगळे वनात जाऊ. तू आमच्याबरोबर असशील, आम्ही तुझ्याबरोबर असू.”

सिद्‌धार्थ म्हणाला,
” मी तुम्हाला माझ्याबरोबर कसा नेऊ? राहूल एक वर्षाचा आहे. नंदही अजून लहान आहे. (राहूल हा सिद्धार्थ गौतमाचा पुत्र; तर नंद हा गौतमीचा पुत्र) यशोदरा आणि या दोन बाळांना सोडून तुम्ही कसे काय येऊ शकता ?”

आई म्हणाली,
“मग आपण सगळेच हा देश सोडून दुसऱ्या देशात राहायला जाऊ मग. तुला संन्यासही घ्यावा लागणार नाही अणि आम्ही सगळे तुझ्याबरोबर असू.”

मग सिद्धार्थ म्हणाला,
“आई, पण हा देशद्रोह नाही का? आणि माझ्या परिव्रजेचे कारण कोशल नरेशला समजले तर या आपल्या राज्याला त्याचा त्रास होणार नाही का? आणि तुमच्या सगळ्यांबरोबर असताना माझी परिव्रज्या कशी पूर्ण होणार ? त्यामुळे मी एकटाच वनात जावून राहणे हेच सर्वांच्या हिताचे आहे !!

“कदाचित युद्ध सुरु होणारच नाही. मग परिव्रजेला घाई का ? तुझा निर्णय पुढे ढकल.” आई म्हणाली .

यावर सिद्धार्थ म्हणाला,
“मी परिव्रज्येचे संघाला वचन दिले त्यामुळेच तर युद्ध‌ काही काळ थांबले आहे. आणि ते कायमचे थांबले तर त्यात कपिलवस्तूचेच हित आहे. मी वचन दिले आहे. त्यामुळे मी वचनाला बांधील आहे. वचनभंगाचे परिणाम आपणाला आणि शाक्य संघालाही भोगावे लागतील. आई आता माझ्या मार्गाच्या आड येऊ नकोस. मला आशीर्वाद दे आणि वनात जाण्याची आज्ञा दे. यावर गौतमी आणि शुद्धोदन स्तब्धच झाले. आता सिद्धार्थला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे यशोदरा होय. असे त्यांना वाटले आणि त्यांनी सि‌द्धार्थला यशोदरेच्या महाला पाठवले.

यशोदरेची अवस्था काय झाली असेल ? तिने कोणती भूमिका घेतली? हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील भाग क्रमांक 20 वाचा.

Leave a comment