Surya namaskar-The Best treatment of all diseases सूर्यनमस्कार – अनेक आजारावर एकच उपाय

कोणताही आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे अधिक चांगले. त्यासाठीच सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार मानला जातो. सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार सर्व आजारावर कशी मात करतो ते आपण या लेखातून पाहणार आहोत.

अनेक शारीरिक आणि मानसिक आजारावर सूर्यनमस्काराच्या अभ्यासाचा इष्ट परिणाम होऊ शकतो. या संबंधाने कोणत्याही संदर्भ ग्रंथात विशेष उल्लेख केलेला नाही. मात्र काही विशिष्ठ विकारांच्या रुग्णांना सूर्यनमस्काराचा योग्य पध्दतीने अभ्यास करायला सांगितल्यावर त्यांचे विकार कमी होण्यास किंवा विकारांचा त्रास कमी होण्यास मदत होते, असेही आढळून आलेले आहे. अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणात सूर्यनमस्कारात प्रयोग होण्याची गरज आहे. मात्र असे प्रयोग करण्याकरिता पुढील विचार उपयुक्त ठरू शकतील.

लठ्ठपणा आणि सूर्यनमस्कार :Obesity and Surya namaskar

सूर्यनमस्काराची गती व आवर्तने वाढली की, तो एक सर्वांग सुंदर व्यायाम ठरू शकतो. हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. म्हणून शरीरात वाढलेली चरबी कमी करण्याकरिता जलद गतीने घातलेल्या सूर्यनमस्कारांचा उपयोग होतो. शास्त्रशुद्ध पध्दतीने नमस्कार शिकून घेतल्यावर रोज क्रमाक्रमाने आवर्तनांची संख्या वाढवून 48 ते 60 सूर्यनमस्कार रोज घालण्याचा अभ्यास केला व त्यासोबत अन्य यौगिक प्रक्रियांचा अभ्यास केला तर स्थूलता कमी होते.असे मला अनुभवाला आलेले आहे. शरीराला व्यायाम नसल्यामुळे निर्माण होणारी स्थूलता कमी व्हायला सूर्यनमस्काराचा नित्य अभ्यास फारच उपयुक्त ठरतो. स्थूलता निर्माण व्हायला अनेक कारणे आहेत. अन्य काही कारणांमुळे निर्माण झालेली स्थूलता सूर्यनमस्कारांच्या अभ्यासाने कमी होऊ शकत नाही. ती अन्य यौगिक प्रक्रियांच्या अभ्यासाने कमी होऊ शकते. अशा ठिकाणी सूर्यनमस्कारांचा पूरक उपयोग फायदेशीर ठरतो.

मधुमेह आणि सूर्यनमस्कार: Diabetes and Surya namaskar

मधुमेहाच्या प्रारंभिक अवस्थेत सूर्यनमस्काराच्या अभ्यासाचा चांगला उपयोग होतो. मात्र सूर्यनमस्कार फार जलद न घालता एका मिनिटात एक अशा गतीने रोज साधारणतः 24 ते 48 नमस्कार घातले तर अनुकूल परिणाम दिसून येईल. केवळ नमस्कार घालून मधुमेह पूर्ण बरा होऊ शकत नाही. हे जरी खरे असले तरी मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच फायदा होतो. विविध योग प्रक्रियांच्या अभ्यासाच्या जोडीला अशा नमस्कारांचा अभ्यास उपयुक्त ठरतो.

संधीवात व सूर्यनमस्कार: Arthritis and Surya namaskar

संधीवाताची गंभीर अवस्था नसतांना म्हणजे संधीवात प्राथमिक अवस्थेत असताना सूर्यनमस्काराच्या अभ्यासाचा निश्चित उपयोग होतो. प्रत्यक्ष सांधे दुखत असतांना मात्र या अभ्यासाचा उपयोग होत नाही. सांधे दुखत नसतांना हा अभ्यास चालू ठेवला तर मात्र सांधेदुखीचे प्रमाण कमी होऊ शकते. असा अनुभव आहे. याकरता सूर्यनमस्कार संथ गतीने घालायला हवेत. सूर्यनमस्काराच्या प्रत्येक स्थितीत अर्धा ते पाऊण मिनिट स्थिर राहून संथ श्वसन करावे. पूर्ण नमस्कारांच्या आवर्तनांची संख्या झेपेल इतकीच असावी. एका पासून प्रारंभ करून हळूहळू चोवीसपर्यंत वाढवायला हरकत नाही.

सांध्यांची हालचाल करतांना त्रास होत असेल तर अशा अवस्थेत सूर्यनमस्कारामुळे फायदा न होता त्रास होईल. अशा वेळी सूर्यनमस्काराचा अभ्यास करू नये.

अपचन आणि सूर्यनमस्कार: Indigestion and Surya namaskar

आपल्या आहारविहाराच्या चुकीच्या पध्दतीमुळे निर्माण होणारे अपचन सूर्यनमस्काराच्या अभ्यासामुळे सुधारू शकते. एका मिनिटात तीन ते चार सूर्यनमस्कार या गतीने घातलेले सूर्यनमस्कार अशा वेळी उपयोगी पडतात. अशी 24 ते 36 आवर्तने करायला हरकत नाही. यकृत, स्वादुपिंड किंवा तत्सम ग्रंथीमध्ये बिघाड निर्माण होऊन झालेले अपचन किंवा आतड्यांना आलेल्या सुजेमुळे निर्माण झालेला त्रास सूर्यनमस्कारामुळे कमी होणार नाही. अशा वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सूर्यनमस्कार घालावेत.

दमा आणि सूर्यनमस्कार : Asthma and Surya namaskar

कुटुंबात अनुवंशिक दमा असेल तर आपल्याला होणारा दमा सूर्यनमस्काराच्या नियमित व्यायामाने काही वर्षे आपण तो दमा पुढे ढकलू शकतो.

दम्याच्या प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या रुग्णाला दम्याचा त्रास होत नसतांना हा अभ्यास उपयुक्त ठरतो. त्याकरता सूर्यनमस्काराच्या समंत्र नावाचा स्पष्ट व मोठ्याने केलेला उच्चार, नमस्कारांतर्गत आसने व या आसनांतर्गत असलेला प्राणायाम, दम्याचा त्रास कमी करायला उपयुक्त ठरतात. केवळ नमस्काराच्या अभ्यासाने दमा बरा होईल असे विधान करणे मात्र चूक ठरेल.

आरोग्य व सूर्यनमस्कार: Health and Surya namaskar

काही विकारावर उपचारात्मक परिणाम साधण्याकरता सूर्यनमस्काराच्या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो. हे जरी खरे असले तरी ते काही सूर्यनमस्काराचे साध्य नाही किंवा तो त्याचा उद्देशही नाही.

मंत्रोच्चारातून मिळणारे आत्मिक बल आणि योगासनामुळे येणारी शरीराची बाह्य व आंतरिक समतोल अवस्था, प्राणायामामुळे निर्माण होणारे प्राणशक्तीचे संतुलन व सूर्यशक्तीवरील श्रध्देमुळे मिळणारा वैश्विक शक्तीचा लाभ या सर्व गोष्टी एकत्रित करून योग्य वेळात व श्रमात या गोष्टींची अनुभूती मिळवून देण्याचे प्रभावी कार्य या सूर्यनमस्काराच्या अभ्यासातून मिळते. त्यामुळे उपचारात्मक परिणाम हा गौणच आहे. शरीर व मनाच्या व्याधी निर्माण होऊ नये, अशा पातळीवर शरीर व मनाची स्थिती नेऊन ठेवणे हाच सूर्यनमस्काराचा खरा परिणाम आहे. शरीर-प्रकृती बिघडल्यावर उपचार करण्यापेक्षा ती बिघडू न देण्याकरता सूर्यनमस्काराचा नियमित अभ्यास करणे हाच सूज्ञपणा ठरणार आहे. आयुर्वेदात सांगून ठेवलेलेच आहे की—–

आरोग्यम् धन संपदा

Leave a comment