Buddha Life Story-Part 22 :राजपुत्र सिद्‌धार्थ आणि सेवक यांचा हृदयस्पर्शी संवाद

भारद्वाज ऋषीच्या आश्रमातून सिद्धार्थला फक्त एकट्याला पुढचा प्रवास करायचा होता; पण सेवक छन्न याचा आग्रह सिद्धार्थला मोडता आला नाही. त्यामुळे कंटक घोडा, सेवक छन्न आणि सि‌द्धार्थ गौतम हे तिघे अनोघा नदीच्या तीरापर्यंत पुढे चालू लागले. अर्थात सेवकाच्या इच्छेखातर राजपुत्र सिद्धार्थ कंटक घोड्यावर बसला होता. राजपुत्राचा हा शेवटचा कंटकावर बसून केलेला प्रवास ठरणार होता. सिद्धार्थ गौतम चालता चालता छन्नला म्हणाला,

“मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावर खूप भक्ती आहे हे मला समजलेच; पण त्याच बरोबर तू माझ्यावर दाखवलेल्या निष्ठेमुळे माझे हृदय तू जिंकले आहेस. तुला कोणत्याही प्रकारचे बक्षीस देण्यासाठी आता माझ्याकडे काहीही उरलेले नाही. तुझ्या उदात्त भावनांनी माझे अंतःकरण भरून आले आहे. ज्याच्याकडे देण्यासारखे काहीही नसते, त्याच्याकडे लोक पाठच फिरवतात. दैव फिरले की माणसेही फिरतात. मात्र तू त्याला अपवाद ठरला आहेस. आता तुझी परत जाण्याची वेळ झाली आहे.”

राजपुत्र सिद्धार्थचे बोलणे ऐकूण सेवक छन्न याचा कंठ दाटून आला. त्याला काय बोलावे हेच सुचेना. त्याला उद्‌देशून सि‌द्धार्थ म्हणाला,

” महाराजांची काय अवस्था झाली असेल याची मला कल्पना आहे, पण त्यांना जाऊन सांग की मी काही स्वर्ग प्राप्तीसाठी घर सोडून निघालेलो नाही. कुणावरही माझा राग नाही. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा वारसाहक्क सांगणारे खूप लोक असतात, पण सद्‌गुणांचे वारस जगात सापडत नाहीत. खरे तर या वयात त्यांना माझ्या सहवासाची गरज लागणार. सेवेची गरज लागणार, यशोदरेच्या शब्दाने माझे मन हलके झाले आहे. यशोदरा माझी उणीव भासू देणार नाही. माझ्या मातेलाही समजावून सांग की तू थोर माता आहेस, माझी आठवण काढत रडत बसू नकोस.”

पुढे सेवक म्हणाला,

“स्वामी, चिखलाने भरलेल्या नाहीत हत्ती रुतून बसावा, तशी तुमच्या आप्तांची अवस्था झाली आहे . त्यांना होत असलेल्या वेद‌ना कशा बरे जातील ? कितीही कठोर अंतःकरण असले तरी त्याचे मन प्रेमाने उचंबळेल असा तुमचा स्वभाव आहे. मग मातापित्यांची काय स्थिती झाली असेल ? प्रासादात रमलेला राजपुत्र वनात आपले कसे जीवन व्यतीत करणार ? प्रेमळ, वत्सल मातापिता, तपस्वी ,त्यागिनी पत्नीला आणि छोट्या राहुलला सोडून तुम्ही वनात कसे काय राहू शकणार? धर्मनिष्ट आणि कीर्तिवंत असा राजपुत्र अशी तुझी ख्याती आहे. मग आई, वडील, पत्नी, पुत्र यांच्याप्रती तुझा धर्म कुठे गेला? माझेही अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून जात आहे. मग मी तरी तुझ्याशिवाय परत कसा फिरु ? तुझ्याशिवाय नगरात परतल्यावर लोक मला काय म्हणतील ? राजा, राणी, पत्नी यांना असं काही तरी सांग की माझा त्यांना तिटकारी येईल? मी असं कसं सांगू शकेन? आणि घरच्यांना हे असे सांगितले तर पटणारे आहे का ? आणि त्यातूनही मी असे काही बोललो तर माझी जीभ टाळ्याला चिकटेल, म्हणून हे राजपुत्रा तू मागे फिर.आपण राजवाड्यात जाऊ. सगळ्यांचेच दुःख नाहीसे होईल.”

अशा प्रकारे छन्नाने सिद्धार्थला खूप विनवणी केली. त्यावर राजपुत्र सि‌द्धार्थ म्हणाला,

” छन्ना, सावर स्वतःला. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी असं काहीही करू शकत नाही. मी संघाला तसे वचन दिले आहे. मी कितीही जवळ राहिलो तरी एक ना एक दिवस वियोग ठरलेलाच आहे. कुणाचा कधी मृत्यू येईल हे सांगता येते का? माझी जन्मदात्री आई तरी आहे का या जगात ? तिचा वियोग मागे टाकून आपण जीवन जगतोच ना ! पक्षी निवाऱ्यासाठी झाडावर बसतात आणि नंतर दूरदूर निघून जातात. ढग जसे जवळ येतात आणि लगेच दूर निघून जातात, तसेच प्राणिमात्रांचा सहवास असतो. तो क्षणिक असतो. निसर्गचक्र कुणासाठी थांबत नाहीं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आई, वडील, पत्नी, कपिलवस्तूच्या नागरिकांना समजावून सांग की सिद्धा‌र्थला तुम्ही सगळेजण विसरा. तो आपल्या आयुष्यात नाही, असे समजा. त्याचा मार्ग वेगळा आहे, आपला मार्ग वेगळा आहे. ”

राजपुत्र सिद्धार्थ आणि छन्न सेवक यांचा संवाद जणू कंठक घोडा ऐकत होता. संवाद संपल्यावर त्याने सिद्धार्थ गौतमाचे पाय चाटले. आपल्या धन्याप्रती आदर व्यक्त केला. गौतमाने त्याची पाठ थोपटली आणि म्हणाला,

“अश्रू ढाळू नकोल कंठका. स्वतःला आवर ” छन्नानेही गौतमाला नमस्कार केला आणि तो कंटक घोड्यासह जड पावलांनी खाली मान घालून कपिलवस्तूच्या दिशेने चालू लागला.

Leave a comment