योग हा आपल्या जीवनात नवचैतन्य निर्माण करतो. उत्साही, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योग हा सर्वांत उत्तम मार्ग आहे. उत्तम आरोग्य प्राप्त करणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. आणि हा हक्क मिळवण्यासाठी त्या व्यक्तीलाच योगाची विद्या शिकता आली पाहिजे. आपले आरोग्य जसे योगामुळे उत्तम, आनंदी आणि निरोगी राहते, तसेच त्यावर म्हणजे आपल्या आरोग्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत, ते म्हणजे पर्यावरण, सामाजिक घटक होय. योग सामर्थ्याने आपण आपल्या शरीरात अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती आणि आत्मबल वाढवण्याचे काम होते.
संपूर्ण जगात लोकप्रिय असलेला हा योग सर्वांत शक्तीशाली औषधाविना उपचार आहे. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. म्हणूनच योग सामर्थ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्धपणे अभ्यास केला पाहिजे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी योग सामर्थ्य वाढवणे आवश्यक आहे. योग हा एक आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनाच्या सुरुवात योग उपासनेने केली पाहिजे. शालेय जीवनापासूनच सातत्याने योगाची उपासना केल्यास त्याचा खूप मोठा फायदा दिसून येतो. शिव हा योगाचा आद्य जनक मानला जातो, तर कृष्ण हा योग सामर्थ्याने सुमारे 200 वर्षे जगला होता. असे मानले जाते.
योगामुळे शारीरिक पातळीवर शक्ती प्राप्त होते. तग धरण्याची क्षमता निर्माण होते, अंगी सहनशीलता येते. जिद्द, चिकाटी निर्माण होते. मानसिक आणि शारीरिक पातळीवर उत्तम, पद्धतीने विकास होण्यासाठी योग हाच सर्वांत उत्तम मार्ग आहे. योगाची सुरुवात कोणत्याही वयात करता येते. आपल्याला निरोगी, उत्तम असे दीर्घायुष्य लाभायचे असेल तर नियमित योग करा. तुमचे जीवन आनंदमय होईल.