Buddha Life Story-Part 25 :सिद्धार्थ गौतमाचे मगध देशात आगमन

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने मगध राज्याची राजधानी राजगृ‌हाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर सुमारे 600 किमी होते. हे सर्व अंतर सिद्धार्थ गौतम पायीच जाणार होता.

त्यावेळी मगधचा राजा बिंबिसार होता. बिंबिसार हा विचारवंत राजा होता. त्याच्याकडे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यावेळी विचारवंतांचे निवासस्थान राजगृह झाले होते. सिद्धार्थ गौतमाने गंगेचे वाहते पात्र ओलांडून मगध राज्यात प्रवेश केला.

प्रवास करत असताना सिद्धार्थ वाटत साकी नावाच्या योगिनीच्या आश्रमात थांबला. नंतर पद्मा नावाच्या दुसऱ्या एका योगिनीच्या आश्रमात थांबला. पुढे पुढे चालत असताना रेवत नावाच्या ऋषीचा आश्रम लागला. तेथेही सिद्धार्थ थांबला. सर्वांनी सिद्धार्थचे चांगले आदरातिथ्य केले. तत्त्वज्ञानावर चर्चा झाली.

सिद्धार्थ गौतमाचे मगध देशात आगमन झाल्यावर लोक त्याच्याकडे कौतुकाने पाहत असत. आकर्षक तेजःपुंज व्यक्तिमत्त्व, विलोभनीय सौंदर्य लाभलेल्या कपिलवस्तुच्या राजपुत्राने संन्यासाचे कपडे घातलेले पाहून लोक आश्चर्य करू लागले. सिद्धार्थ वाटेतून चालत असताना लोक त्याच्याकडे पाहतच राहत; पण या सर्व गोष्टींचा सि‌द्धार्थच्या मनावर काहीही परिणाम होत नसे.

सिद्धार्थ गल्लीतून जात असताना अनेक लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत. बघता बघता संपूर्ण मगध राज्यात सिद्धार्थ गौतमाच्या आगमनाची बातमी पसरली. सिद्धार्थ समोर येताच रंगीबेरंगी कपडे घालणाऱ्या पुरुषांना त्यांची त्यांनाच लाज वाटे. गप्पा मारणारे लोक थबकत. त्याला पाहिल्यावर कुणाच्याही मनात वाईट विचार येत नसे. त्याची चालण्याची ढब, त्याचे सौंदर्य आणि चेहऱ्यावर असलेली निश्चलता, स्थितप्रज्ञता लोक पाहतच राहत.

दीर्घ आणि 400 मैलांचा खडतर प्रवास करून सिद्धार्थचे मगधची राजधानी राजगृहात आगमन झाले. पाच टेकड्यांनी वेढलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या तसेच अनेक पवित्र स्थळांनी व्यापलेल्या राजगृहात सिद्धार्थ येऊन पोहोचला. तेथे पोहोचल्यावर सिद्धार्थने पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा निवडली. तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक पर्णकुटी तयार केली. दुसऱ्या दिवशी संन्यस्त व्रताप्रमाणे सिद्धार्थ राजगृहात भिक्षा मागणार होता.

Leave a comment