मित्रहो ,आपला भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आज आपण 76 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला आणि संपूर्ण भारतवासीयांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा केला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताला प्रजासत्ताक गणराज्य स्थापन करावयाचे होते आणि असे प्रजासत्ताक गणराज्य स्थापन करण्यासाठी 299 सदस्य असलेली संविधान सभा काम करत होती. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या संविधान सभेत डॉ. बी एन. राव, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, सरोजिनी नायडू, मौलाना ओझाद असे कितीतरी बॅरिस्टर आणि नामवंत लोक होते. या संविधान सभेत प्रत्येक भूप्रदेशातील लोक सदस्य होते. कोल्हापूर जिल्ह्यातीलही एक प्रतिनिधी होते. कोण होते ते प्रतिनिधी ? तुम्हाला माहीत आहे का ? ते होते रत्नापाण्णा कुंभार. अशा प्रकारे संविधान सभेने अहोरात्र कार्य करून भारताचे संविधान पूर्ण केले. या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरु झाली. म्हणूनच या दिवसापासून भारत देश प्रजासत्ताक बनला. हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी भारत सरकार तर्फे भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनासमोर भारताचा राष्ट्रध्वज फडकावतात.
भारताच्या संविधानाने भारताला लोकशाहीप्रधान देश बनवले. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क आहेत आणि समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारताच्या पंतप्रधानांना कोणत्याही निवडणुकीत एकच मतदान करण्याचा अधिकार आहे. तसा सर्वसामान्य माणसालाही एकच मतदान करण्याचा हक्क आहे.
मित्रहो, आज मी तुमच्यासमोर माझे विचार सांगत, आहे, ते मला संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच ! भारत सरकारच्या कोणत्याही धोरणाबाबत आपले मत व्यक्त करण्याचा किंवा सरकाच्या चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिला आहे. भारताचे संविधान हा भारतीय लोकशाहीचा आणि प्रजासत्ताक गणराज्याचा आत्मा आहे. म्हणूनच संविधानाला कोणी धक्का लावत असेल तर त्याला कडाडून विरोध केला पाहिजे.
मित्रहो, आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन साजरे करतो, पण भारत खरंच प्रजासत्ताक आहे का ? भारतात लोकशाही नांदत आहे का ? भारतातील प्रत्येक व्यक्ती आपले विचार भयमुक्त वातावरणात मांडते का ? भारतातील स्त्रिया भयमुक्त वातावरणात कुठेही फिरू शकतात का ? स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार वाढतच आहेत. त्यांचे शोषण वाढतच आहे. संविधानाने भारत धर्मनिरपेक्ष गणराज्य घोषित केले. पण अलीकडे कधी नव्हे इतकी धर्माधर्मामध्ये द्वेषभावना पसरत चालली आहे. धर्मांधता वाढतच चालली आहे. हे कशाचे द्योतक आहे ? प्रगतीचे ? की धर्मांधतेचे ? असे अनेक प्रश्न भारताच्या नव तरुणांसमोर येत आहेत. या सर्व प्रश्नांना खंबीरपणे सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला संविधानाने दिली आहे. त्या संविधानाला आपण जपूया…हीच या प्रजासत्ताक दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करून मी माझे मनोगत थांबवत आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र!