केंद्र शाळा ओलवण-दाजीपूर येथे एके काळी माझ्याकडे सहावी सातवीचे शिक्षण घेणारी मंगल म्हाकू कोकरे ही विद्यार्थिनी मुंबई पोलीस झाली.ही गोष्ट मंगल, तिचे आईवडील, तिला आजवर भेटलेले गुरूजन,नातेवाईक, आप्तेष्ट या सर्वांनाच अभिमानास्पद आहे. डिगस या छोट्याशा गावात (सध्याची लोकवस्ती सुमारे पन्नास) जन्मलेल्या मंगलचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे.
पहिलीचे शिक्षण डिगस या छोट्या गावी घेतल्यानंतर (वर्गशिक्षक:विजय पाटील) मंगल विद्या मंदिर दाजीपूर शाळेत दुसरीला दाखल झाली.सुरेखा पोवार आणि प्रशांत तानावडे यांच्या हाताखाली दुसरी ते पाचवीचे शिक्षण घेऊन केंद्र शाळा ओलवण-दाजीपूर येथे दाखल झाली. चारपाच मुलगे सोडले तर बाकीच्या बारा-तेरा मुलीच होत्या.त्यांतीलच मंगल एक.सहावी-सातवीचे शिक्षण मंगलने माझ्याकडे घेतले.
जंगल में मंगल म्हणण्याचे कारण म्हणजे डिगस ते दाजीपूर हे आठ किलोमीटरचे अंतर मंगल कधी चालत तर कधी बसने पार करत शाळेत यायची.संपूर्ण प्रवास जंगलाचा. जंगलात गवे, बिबट्या यांचा वावर असूनही मंगलसह डिगसची मुलं बऱ्याच वेळा चालत यायची.मंगलने चालत यायला कधीच कुरकुर केली नाही.सर्वांत शांत आणि चेहरा गरीब अशी ही मंगल वर्गात सर्वांत उंच होती.आज ती पावणे सहा फूट उंच झाली आहे.
डिगस या दाजीपूर जंगलातील गावात कसलाही उत्पन्नाचा स्रोत नसताना मंगलच्या आईवडीललांनी जिद्दीने तिला शिक्षण दिले. कामासाठी घरी कधी ठेवून घेतले नाही.
प्राथमिक शाळेत एका चांगल्या बॅचमध्ये तिचे शिक्षण झाले.या बॅचसाठी मी अनेक उपक्रम घेतले.शाळेत प्रयोगशाळा नाही म्हणून आम्ही थांबलो नाही.दाजीपूर पासून 50 किलोमीटर अंतरावरील खोराटे हायस्कूल मध्ये नेऊन तिथल्या शिक्षकांकरवी अनेक प्रयोग दाखवले.एका सामाजिक संस्थेमार्फत मुलांना तीन दिवस मोफत कोल्हापूर दर्शन घडवून आणले.मुलांना मोफत रेनकोट, मोफत दप्तर, वह्या अशा अनेक सुविधा निर्माण करून दिल्या.जिथे कधीच घडला नाही असा मुलातर्फे आठवडी बाजार भरवला.यांतून मुलांना चिक्कार नफा मिळाला.मुलांना व्यवहार ज्ञान कळाले.जंगल पर्यटनातून औषधी वनस्पतींची ओळख करून दिली.पाठ्यपुस्तकातील QR CODE समजण्यासाठी दीड किलोमीटर चालत जाऊन इंटरनेटचा वापर करून QR CODE चे महत्त्व पटवून दिले.यां सर्व उपक्रमातून मुलांना अनेक प्रेरणा मिळाल्या.त्यांतीलच एक मंगल…याबाबतीत मंगल नशिबवान ठरली. पुढे आठवी बोंबाडे हायस्कूल, दाजीपूर येथे, तर नववी दहावी बावड्याला झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मंगलने घरी न बसता एकलव्य ॲकॅडमीत ॲडमिशन घेतले.आणि मंगलचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.माझी एक दाजीपूर अभयारण्यातील मुलगी पोलीस झाली याचा मला सार्थ अभिमान आहे.डिगस या गावातील शासकीय सेवेत रुजू होणारी पहिलीच मुलगी होय. गावाने जंगी मिरवणूक काढून मंगलचा सत्कार केला.
मला मंगलचा तिच्या घरी जाऊन सत्कार करायचा होता.आज तो योग आला.सत्कार करताना मंगल हर्षभरीत झाली. सर,तुम्ही इतक्या लांबून माझ्यासाठी आलात.मला खूप समाधान वाटले. अशी नकळत मंगल बोलून गेली.
मंगलला जे यश मिळाले आहे,ते अतुलनीय आहेच ,पण एवढ्यावर मंगल थांबणार नाही.खात्या अंतर्गत परीक्षा देऊन मंगल नक्कीच PSI होणार, याची मला खात्री आहे.मंगल तू PSI म्हणून खुर्चीवर बसलेली मला बघायचे आहे.यावर मंगल म्हणाली,”सर, तुमची ही इच्छा मी नक्कीच पूर्ण करीन.” मंगल गुणवत्ता यादीत खूप वरच्या क्रमांकावर आहे. मंगल निश्चितच अजून पुढची झेप घेऊन आपले आयुष्य मंगलमय करेल,अशी मला खात्री आहे.
मंगलला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित
माजी शिक्षण विस्तार अधिकारी