संगमेश्वर ते तुळापूर प्रवास
छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर संगमेश्वर पासून त्यांना तुळापूरला नेताना कोणीच मराठी सरदारांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? काय झाले नेमके त्यावेळी? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
1686 ते 1689 हा काळ दुष्काळाचा
छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला अनेक लढायात पराभूत केले होते. त्याची कुठेच डाळ शिजू दिली नव्हती. औरंगजेब हताश झाला होता. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज कुठे सापडतो का यासाठी त्याच्या अनेक योजना होत्या. तो काळ मोठा धामधुमीचा होता. दुष्काळाने तर सगळीकडे हाहाकार माजला होता. अशा परिस्थितीतही छत्रपती संभाजी महाराज यांनी आपले लष्करी पाठबळ टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. दुष्काळाचे सावट सगळीकडे पसरले असताना सुद्धा स्वराज्याच्या छत्रपतींनी धीर न सोडता औरंगजेबची दोन हात करायला चालू ठेवले होते.
सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू
संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता स्थापन करण्याच्या लालसेपोटी औरंगजेबने दक्षिणेची मोहीम हाती घेतली होती. त्याला उत्तरेत कोणीच शत्रू शिल्लक राहिला नव्हता. औरंगजेबचा पुत्र अकबर याने बंड केले होते. तो दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता. या गोष्टीचाही राग औरंगजेबला होता. आपण मराठ्यांचा पराभव केल्याशिवाय आणि त्यांचे स्वराज्य नष्ट केल्याशिवाय सर्व सत्ताधीश होणार नाही याची औरंगजेबला जाणीव होती. म्हणूनच तो महाराष्ट्रात आला. जवळजवळ 26 वर्ष आपले दिल्लीचे तक्त सोडून तो महाराष्ट्रात मुक्काम करून राहिला; पण त्याला मराठ्यांचे स्वराज्य बुडवता आले नाही. उलट औरंगजेबच्या मृत्यूनंतर मोघलांची दिल्लीतील सत्ता खिळखिळी झाली. आणि मराठ्यांची सत्ता सर्वत्र पसरली.
औरंगजेबशी दोन हात करताना मराठ्यांचा अपराजित सरसेनापती हंबीरराव मोहिते याचे आणि सर्जाखान यांची वाई या ठिकाणी तुंबळ लढाई झाली. या लढाईत सर्जाखानचा दारुण पराभव झाला.; पण लढाईच्या अंतिम टप्प्यात तोफेतून निघालेला एक दारू गोळा थेट हंबीरराव यांच्यावर येऊन आदळला. त्यामुळे मराठ्यांचा सरदार धारातीर्थी पडला. 16 डिसेंबर 1687 रोजी सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचा वाईच्या लढाईत लढता लढता मृत्यू झाला. या लढाईमुळे मराठ्यांची ताकद क्षीण झाली. छत्रपती संभाजी महाराज यांचा उजवा हात कमकुवत झाला. स्वराज्याचे खूप मोठे नुकसान झाले.
मराठे सरदार औरंगजेबला मिळाले
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मृत्यूनंतर आणि त्यापूर्वीही औरंगजेब महाराष्ट्रात आल्या आल्या अनेक पळपुटे मराठे सरदार लालसेपोटी आणि भीतीपोटी औरंगजेबला मिळाले. त्यामुळे स्वराज्याची ताकद थोडी क्षीण झाली असली तरी छत्रपती संभाजी महाराज यांनी नऊ वर्षे औरंगजेबला मेटाकुटीला आणले होते. प्रचंड आत्मविश्वास, धाडस आणि उघड्या मैदानात लढण्याचे कौशल्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे कितीतरी पटीने अधिक होते. त्यामुळे हंबीरराव मोहिते यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज दुःखी कष्टी झाले असले तरी ते लगेच सावरले आणि स्वराज्याला नवीन सरसेनापती नेमला.
स्वराज्याचा नवा सरसेनापती मालोजी घोरपडे
छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात औरंगजेबला सळोकी पळो करून सोडणाऱ्या संताजी घोरपडे यांचे वडील म्हणजे मालोजी घोरपडे होय. मालोजी घोरपडे जितके शूर होते त्याहूनही ते अधिक स्वराज्याचे निष्ठावंत पाईक होते. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या नव्या सरसेनापतीपदी मालोजी घोरपडे यांची नियुक्ती केली.
संगमेश्वरात संभाजी महाराज कसे सापडले?
स्वराज्याचे कुलमुखत्यारपद असलेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणजे कवी कलश होय. कवी कलश यांची निष्ठा स्वराज्यावर आणि स्वराज्याच्या छत्रपतींवर होती. स्वराज्यातील त्यांचे वाढते महत्त्व लक्षात घेता त्यांच्या विषयी द्वेष निर्माण करणारेही निर्माण झाले. शिर्के आणि कवी कलश यांच्यात वारंवार खटके उडत असत. कवी कलश आणि शिर्के यांच्यात वादातून लढाई झाली होती. शिर्के यांनी कवी कलश यांचा पराभव केला होता. ही गोष्ट छत्रपती संभाजी महाराज यांना समजताच त्यांनी खेळणा म्हणजेच विशाळगड किल्ल्यावरून शृंगारपूरला जाण्याचा बेत घातला. त्यावेळी पन्हाळगडा जवळ मुकर्रब खान होता. तो संभाजी महाराज यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून होता. त्याने पन्हाळगड परिसरात अनेक गुप्तहेर पेरले होते. हे गुप्तहेर संभाजी महाराज यांच्या हालचालीची इत्यंभूत माहिती देत होते. संभाजी महाराज खेळणा किल्ल्यावरून श्रृंगारपूरला निवडक सैन्यांसह जात असल्याची बातमी मुकर्रब खानाला लागली. मुकर्रब खानाने ही निवडक पाच हजार सैन्यांनिशी संभाजी महाराज यांचा पाठलाग सुरू केला. पन्हाळगड ते संगमेश्वर असा प्रवास त्याने सुरू केला. संभाजी महाराजांनी शिर्के यांचा पराभव करून पुढे संगमेश्वरला न्यायनिवाडा करण्यासाठी गेल्याची बातमी ही मुकर्रबखानाला लागली होती. त्यामुळे तो वेगाने हालचाल करून संगमेश्वरला जाण्यास निघाला. इकडे संगमेश्वर मुक्कामी संभाजी महाराज यांनी निवडक 400 ते 500 सैन्य ठेवून बाकीचे सैन्य रायगडला पाठवले.
1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज विशाळगडावरून संगमेश्वरला जायला निघाले. साधारणतः तीन ते चार फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराज आणि मुकर्रबखानाचे सैन्य यांच्यात चकमक झाली. अत्यंत कमी सैन्य असल्यामुळे पराभव पुढे दिसत असतानाही संभाजी महाराज यांनी काही निवडक सैन्य मुकर्रब खानाशी लढत ठेवून आपण स्वतः रायगडाकडे प्रयाण केले असते तर असा दुर्दैवी प्रसंग आलाच नसता. पण इतिहासाला जर तर च्या गोष्टी मान्य नसतात. जे घडले ते स्वराज्याच्या दृष्टीने खूप नुकसान कारक घडले. संगमेश्वर येथे स्वराज्याचे स्वतः छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ अशी विश्वासू माणसे होती. अचानक हल्ल्याने सगळेच भांबावून गेले. सैन्य उध्वस्त झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्याच आदेशाने आपण स्वतः पकडले जाणार याची जाणीव झाल्यावर संताजी घोरपडे यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. संताजी घोरपडे ही बातमी घेऊन रायगडावर पोहोचला. पण तो सैन्याची जमवाजमाव करायला अयशस्वी झाला. संगमेश्वरपासून शृंगारपूर अगदी पंधरा-सोळा किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराज शृंगारपुरी जाऊन नुकतेच शिर्क्यांचा पराभव करून आले होते. त्याचा राग संभाजी महाराजांवर होताच. कदाचित त्यामुळेच मुकर्रबखानाची चाहूल लागूनही शिर्के यांनी स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्याचा काडीचाही प्रयत्न केला नसल्याचे दिसून येते.
मुकर्रबखानाच्या हालचाली
छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना आणि कवी कलश यांना कैद करून खान आणि त्याचे सैन्य वेगाने बहादूरगडाच्या दिशेने चालू लागले. मुकर्रब खानाला माहित होते की बहादूरगडावर औरंगजेब आहे. तेथे औरंगजेबचा तळ असल्याने सैन्य मुबलक होते. मराठे बहादूरगडावर हल्ला करू शकत नव्हते.
संगमेश्वर ते बहाद्दूरगड प्रवास
संगमेश्वर ते बहादूर गड हे अंतर सुमारे 120 किलोमीटर आहे. हा प्रवास या जलदरीतीने आणि दडपणाखाली केला की मराठे सरदार यांना बातमी लागण्यापूर्वीच मुकर्रबखान बहादूर गडावर पोहोचला. खरे तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो की संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर तेथून पुढे तुळापूरला नेईपर्यंत मराठी सरदार कुठे गेले होते? संभाजी महाराज यांना वाचवायला कोणीच का आले नाही? असा सवाल सर्वसामान्य मराठी माणसाला पडतो. आणि ते साहजिकच आहे.
छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी असताना मराठ्यांच्या छावण्या पन्हाळगड, विशाळगड, मलकापूर, कोकण अशा विविध भागात वसलेल्या होत्या. कोकणातील छावणी सुद्धा संभाजी महाराज यांना मदत करू शकली नाही, कारण या छावणीला कळण्यापूर्वीच मुकर्रबखानाने आंबा घाट चढून पुढचा प्रवास चालू ठेवला होता. संताजी घोरपडे धावत रायगडावर गेला पण सैन्यांची जमवाजमव करण्यापूर्वीच मुकर्रबखान बहादूरगडावर पोहोचला होता. घाट माथा हे मराठ्यांचे प्रभावक्षेत्र होते. आणि घाट माथा सोडून पूर्वेकडील भाग मोघलांच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे संभाजी महाराज यांना पकडण्याचा प्रयत्न घाटमाथ्यावरच होणे आवश्यक होता. पण हा प्रवास मुकर्रबखानाने इतक्या जलद गतीने केला की घाटमाथ्यावर बातमी लागण्यापूर्वीच संभाजी महाराज यांना घेऊन खान वेगाने बहादूर गडाच्या दिशेने गेला.
मुकर्रबखानाचा संगमेश्वर-आंबा घाट-कराड-वडूज-दहिवडी-फलटण-बारामती प्रवास
मुकर्रबखानाने संगमेश्वरहून जलद हालचाल करून आंबा घाट ओलांडून कराड मार्गे वडूज, दहिवडी ,फलटण, बारामती असा प्रवास करत बहादूर गडाच्या दिशेने कूच केली. वाटेत कुणालाच प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही, हे मराठ्यांचे दुर्दैव होते. संभाजी महाराज यांचा विश्वासू सहकारी रायाप्पा महार याने आंबा घाट ते बारामतीच्या दरम्यान कुठेतरी मुकर्रबखानावर हल्ला केला होता. यात रायाप्पा महार व त्याचे सर्व सैन्य मरण पावले. अशा काही ऐतिहासिक घटना सांगितल्या जातात. त्याला कागदोपत्री ठोस पुरावा नाही.
छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडाने कैद करून बहादूरगडावर औरंगजेबच्या समोर आणल्यावर औरंगजेबच्या सैन्यात आणि औरंगजेबच्या गोटात काय वातावरण झाले असेल याचा सर्वांना अंदाज आहेच. त्याचे वर्णन मी येथे करू शकत नाही. माझी लेखणी त्यासाठी उचलत नाही. औरंगजेबने बहादूरगड सोडून पुढचा प्रवास सुरू केला.
बहादूरगड ते तुळापूर
मुकर्रबखानाने 15 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेब समोर हजर केले. बहादूरगडावर औरंगजेबची बाजू भक्कम होती. स्वतः औरंगजेबजवळ मुबलक सैन्य होते. मुकर्रबखानाने पन्हाळगडाची तुकडी बहादूरगडाच्या दिशेने येण्यास सूचना दिली होती. त्यामुळे बहादूरगड भक्कम झाला होता. या गडावर हल्ला करण्यास आणि छत्रपती संभाजी महाराज यांना सोडवून आणण्यास मराठे सरदार निश्चितच कमी पडले असते. तरीसुद्धा मराठे वारंवार हल्ला करतील आणि आणि आपल्या सैन्याच्या गोटात भीती निर्माण होईल ,या हेतूने औरंगजेबने बहादुरगड सोडला आणि तुळापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला.
तुळापुरात काय घडले ?
स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तुळापुरात आणल्यानंतर अक्षरशः तुळापूर वढू कोरेगाव परिसरात या दोघांची विदूषकाची कपडे घालून विटंबना करत दिंड काढली. औरंगजेबला मराठ्यांच्या राज्याचा अपमान करायचा होता. मराठ्यांच्या मध्ये भीती निर्माण करायची होती. छत्रपती संभाजी महाराज यांनी गेल्या नऊ वर्षात जो अतोनात त्रास दिला. लढा दिला. औरंगजेबला आणि त्याच्या सेनेला जेरीस आणले, त्याचा राग व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची अक्षरशः धिंड काढली. त्यांना तळापुरात साखळदंडात बांधले आणि औरंगजेबने आपला विश्वासू सरदार नजीदखानाला संभाजी महाराज यांच्याबरोबर बोलणी करायला पाठवले. स्वराज्याचा खजिना कुठे आहे? तो आमच्या स्वाधीन कर. स्वराज्याला मुघलांकडून कोण कोण मदत करते, याची नावे सांग. असे प्रस्ताव औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज यांच्यापुढे ठेवले. अनेक जण असा तर्क करतात की, संभाजी महाराज यांच्यापुढे मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. औरंगजेब असला प्रस्ताव ठेवणार नाही .कारण संभाजी महाराज असल्या प्रस्तावाला भीक घालणार नाही हे औरंगजेबला चांगलेच माहीत होते. म्हणून वरील दोन प्रस्ताव संभाजी महाराजांनी मान्य केल्यास त्यांना जीवदान द्यायचे व त्या बदली संभाजी महाराज यांनी आयुष्यभर औरंगजेबच्या कैदेत राहायचे. पण संभाजी महाराज यांनी हे दोन्हीही प्रस्ताव नाकारले. त्यांना माहीत होते की औरंगजेब आपणास जीवे सोडणार नाही. म्हणून मोठ्या धाडसाने औरंगजेबच्या त्रासाला आणि छळाला संभाजी महाराज सामोरे गेले. त्यांचा अतोनात छळ केला. अंगावर जखमा केल्या. मिठाचे पाणी ओतले. सरते शेवटी त्यांचे डोळे काढले. त्यांचे शीर धडा वेगळे केले. शिराची तुळापूर ,वढू, कोरेगाव परिसरातून धिंड काढली. आणि त्यांचे शीर तुळापुरात एका काठीला अडकून ठेवले. तर धडाचे तुकडे करून वढू परिसरात फेकले. एवढ्या अमानुषपणे आणि क्रूरपणे एका राजाला वागणूक देणारा औरंगजेब हा जगाच्या इतिहासातील पहिलाच राक्षसी प्रवृत्तीचा सताधीश होता. छत्रपती संभाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांच्यामध्ये स्वराज्यातीलच काही फितूर लोकही होते. त्यांच्या सल्ल्यानेच औरंगजेबने इतक्या क्रूरपणे स्वराज्याच्या राजाची अशी विटंबना केली होती. पण त्याचा उलटा परिणाम झाला. स्वराज्यातील संताजी धनाजी या शूर सेनापतींनी औरंगजेबला संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर जेरीस आणले. महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबला तर खूपच बेरीज आणले. स्वराज्य टिकून ठेवण्यास महाराणी ताराबाई यांचा मोलाचा वाटा आहे.