Elephanta Caves Mumbai-एलिफंटा गुंफा-घारापुरी लेणी

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आणि मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया पासून सुमारे दहा किलोमीटरचा समुद्र प्रवास केल्यानंतर लागणाऱ्या एका सुंदर बेटावर आपल्याला एलिफंटा केव्हज् म्हणजेच घारापुरीची प्रसिद्ध लेणे पाहायला मिळतात.ही लेणी सुमारे पंधराशे वर्षांपूर्वीची असून भगवान शिवाच्या इतिहासाची ओळख या लेण्यांच्या निमित्ताने होते. या लेण्यांविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

*घारापुरी लेणी*

मौर्यकाळात म्हणजे सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी घारापुरीच्या टेकडीमध्ये ही लेणी कोरली गेलेली आहेत. मौर्य काळ हा लेण्यांचा संपन्न काळ मानला जातो. घारापुरी हे नाव गुरव या नावावरून पडले आहे. घारा म्हणजेच गुरव. गुरव म्हणजेच गुरुजी. म्हणजेच शिवाची पूजा करणारा. अशा प्रकारे घारापुरीची लेणी मुख्यतः शिवाच्या जीवन कार्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करणारी आहेत. आणि शिवाचे भक्त म्हणजेच शिवाचे पुजारी यांचे या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेल्या ठिकाणाला घारापुरी म्हणजेच गुरवांची वस्ती किंवा गुरुजींची वस्ती असे नाव पडले आहे. पुढे याच लेण्यांचे नाव एलिफंटा केव्हज असे पडले. ते कसे पडले ते आपण पाहूया.

*एलिफंटा Elephanta*

भारतात इंग्रज येण्यापूर्वी पोर्तुगीज लोक व्यापाराच्या निमित्ताने येऊन स्थायिक झाले होते. गोवा , मुंबई बंदरांच्या ठिकाणी त्यांच्या वखारी स्थापन झाल्या होत्या. पोर्तुगीज जेव्हा या घारापुरी बेटावर गेले, त्यावेळी या घारापुरी लेण्यांच्या समोरील प्रांगणातच एक भव्य हत्तीचे शिल्प त्यांना दिसले. त्या शिल्पावरूनच या परिसराचे नाव पोर्तुगीजांनी एलिफंटा असे ठेवले. आणि तेथून पुढे या परिसराला म्हणजेच घारापुरी लेण्यांना एलिफंटा केव्हज किंवा एलिफंटा असे नाव रूढ झाले. इंग्रजांनी 1909 मध्ये या गुंफा प्राचीन स्मारक संवर्धनाच्या कायद्याखाली संरक्षित करणे त्यासाठी कायदा केला. पुढे 1987 मध्ये एलिफंटा केव्हज जागतिक वारसा यादीत समाविष्ट केला.

महायोगी शिव

एलिफंटा केव्हज् मधील सर्वांत महत्त्वाचे शिल्प म्हणजे महायोगी शिव होय. या शिल्पामध्ये महायोगी शिव पद्मासनात कमल पुष्पावर बसलेले असून त्यांचा चेहरा अंतर्मुख झालेला दिसतो. योग परंपरा ही भारताने जगाला दिलेली देणगी असून त्याची सुरुवात महायोगी शिवापासूनच झालेली आहे. आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी पोसलेली आहे.

नटराज शिव

शिव हा सर्वगुणसंपन्न महापुरुष होता. नृत्याचा अधिपती म्हणून शिवाची खास ओळख आहे. नटराज हे अष्टभुजायुक्त शिल्प शिवाच्या सर्वोत्कृष्ट कलेचे प्रतीक आहे. एलिफंटा गुफा मध्ये हे नटराज अवस्थेतील शिवाचे शिल्प पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

महेशमूर्ती

एलिफंटा येथील सर्वशिल्पांचा आत्मा म्हणजे एलिफंटा गुंफाच्या मध्यावर असलेले महेश मूर्ती हे शिल्प होय. या शिल्पाची खोली तीन पॉईंट दोन मीटर रुंदी 6.55 मीटर तर उंची 5.43 मीटर आहे. या पूर्ण शिल्पाची उंची 8.3 मीटर आहे भिंतीच्या स्तंभांमध्ये द्वारपालाच्या भव्य मूर्ती आहेत. महेश मूर्ती बऱ्यापैकी सुस्थितीत आहे ती 18 फूट उंचीची आहे.शिल्पकलेचा उत्तम नमुना
म्हणजे ही महेश मूर्ती होय. महेश मूर्ती तीन मूर्तींनी बनलेली आहे. महेश मूर्तीच्या पहिल्या चेहऱ्यावर रुद्र भार स्पष्टपणे जाणवतो , तर दुसरा चेहरा शांत निरामय दाखवलेला आहे.यालाच तत्पुरुष महापुरुष म्हणतात. उजवीकडील कोमल आणि प्रसन्न चेहरा पाहून मन हे प्रसन्न होते. अशा प्रकारे महेश मूर्ती ही तीन चेहरे असलेली प्रसिद्ध मूर्ती खूपच विलोभनीय आहे.

अर्धनारी नटेश्वर

महेश मूर्तीच्या डाव्या बाजूला 16 फूट उंचीची शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे. ही एकच मूर्ती असून या मूर्तीला अर्धनारीनटेश्वर असे म्हटले जाते.मूर्तीच्या एका बाजूला शिवाचे चित्र शिल्प आहे, तर मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला पार्वतीचे शिल्प आहे. ही मूर्ती खूप विलोभनीय आणि आकर्षक असून शिवपार्वती एकरूप आहेत हे या मूर्तीतून प्रतिबिंबित होते.

गंगाधर शिव

असे मानले जाते की गंगाही स्वर्गातून अवतरली आणि तिची धार खूप तेजस्वी होती. तिच्या धारेमुळे पृथ्वीचे मोठे नुकसान झाले असते.म्हणून शिवाने गंगेची धार स्वतःच्या जटांवर पेलली आणि तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडला. अशा या काल्पनिक कथेचा आधार घेऊन तो आधार गंगाधर शिव या शिल्पामध्ये उत्तम रीतीने प्रतिबंधित केला असून अत्यंत विलोभनीय दृश्य या गंगाधर शिव शिल्पात पाहायला मिळते.

शिवमंदिर

एलिफंटा गुहेतील शिव मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग असून आतील भिंती सपाट आणि बाहेरील बाजूस अष्टदिक् द्वारपाल दाखवले आहेत. शिवलिंग हे शक्तीचे प्रतीक या ठिकाणी मुख्य भागात आहे.या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटते.

अंधकासूर वध

शिव मंदिराच्या शेजारी अंधकासुराच्या वधाचे उत्तम शिल्प आहे.शिव अंधकासुराचा वध करतो. यादी करतो असे चित्र दाखवले आहे हे चित्र शिवाच्या पराक्रमाचे आणि दुष्ट शक्ती नष्ट करण्याचे प्रतीक आहे.

कल्याण सुंदर शिवमूर्ती (शिवपार्वती विवाह)

अंधकासुर वधाच्या शिल्पाच्या जवळच म्हणजे अगदी विरुद्ध बाजूला शिवपार्वतीच्या विवाहाचे एक सुंदर शिल्प आहे. हे शिल्प म्हणजे त्या काळातील शिव आणि पार्वती यांच्या आंतरजातीय विवाहाचे एक उत्तम प्रतीक आहे. पार्वती ही ब्राह्मण कन्या होती.तर शिव हा आदिम आदिम होता. त्यांचा विवाह जगन्मान्य झाला होता. शिवाने एक नवीन पायंडा जगासमोर ठेवला होता. सर्व मानव हे सारखेच आहेत त्यामध्ये भेदाभेद नसतो. हे प्राचीन काळात शिवाने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले होते.

रावण कैलास पर्वत उचलताना

एलिफंटा गुंफेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी रामायण काळातील एक शिल्प आहे. रामायण काळात रावण कैलास पर्वत उचलत असतानाचे हे शिल्प आहे. अर्थात रावण हा शिवाचा भक्त होता आणि तो शिवाला त्रास देण्यासाठी कैलास पर्वत कसा बरे उचलेल? पण ही एकदंत कथा असून रावणाला तुच्छ लेखण्यासाठी याठिकाणी रावणाने आपल्या शक्तीचा कसा गैरवापर केला हे दाखवण्यासाठी हे शिल्प साकारले असले तरी रावण हा महापराक्रमी होता आणि तो शिवभक्त होता हे विसरून चालणार नाही.

Leave a comment