कोल्हापूर जिल्ह्यातच काय संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातही तरुण आहे नशेमध्ये गुंग होताना दिसत आहे. वाढती बेकारी, महागाई आणि आर्थिक चणचण या गोष्टीचा ताण कमी करण्यासाठी तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, ड्रग्स अशा अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असलेल्या गांजाची नशा तरुणाईला लागलेली आहे. यातील वाढत्या अर्थकारणामुळे आणि तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळे गांजाची नशा वाढत आहे. त्याचबरोबर पैशाचा धूरही निघत आहे .अगदी चौदा पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलांपासून ते 40-50 पर्यंतच्या सर्व लोकांच्या मध्ये गांजाचे व्यसन लागल्याचे दिसत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे गांजा पुरवणारी एक टोळीच निर्माण झाली आहे.
*हायड्रोफोनिक गांजाचा धोका*
शेतात पिकवल्या जाणाऱ्या खसखशीच्या पिकांपासून निर्माण केलेल्या गांजापेक्षा हायड्रोफोनिक गांजाचा धोका मानवी शरीराला खूप मोठ्या प्रमाणात होतो. अलीकडे हायड्रोफोनिक गांजा खूप लोकप्रिय झाला आहे. कारण त्याची नशा खूप असते. त्यामुळे तरुणाईला हा गांजा आवडू लागला आहे. खरे तर या गांजामुळे आपल्या शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो.