दहा महिन्यांच्या बाळाकडं गोविंदराव टक लावून पाहात होते. ‘कटगुण’ या छोट्याशा गावात उपचाराअभावी बाळाची आई देवाघरी गेली होती. गोविंदरावांचे डोळे पाणावले होते. नकळतच
त्यांच्या तोडातून शब्द बाहेर पडले-
“आता या लेकराचा सांभाळ कसा करू?”
“दादा, कशाला काळजी करतोस? मी हाय नव्ह”
“सगुणा, लहान बाळ सांभाळायचं हाय.”
मी करीन ते काम. पोटच्या पोरासारखं सांभाळीन ज्योतीला.”
सगुणा ही ज्योतीची मावस बहीण. जशी बोलली तशी वागली. तिने ज्योतीवर आईची माया लावली. ज्योती सगुणाआऊच्या छायेत वाढू लागला.
‘कटगुण’ या छोट्याशा गावात आठ-दहा माणसांचं पोट भरायचं कसं? या चिंतेत गोविंदराव होते. पुण्यात फुलांचा धंदा चांगला चालतोय हे गोविंदरावांनी कर्णोपकर्णी ऐकलं होतं. त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली आणि पुण्याची वाट धरली. पुण्यात फुलांच्या धंद्यात चांगलाच जम बसला.
ज्योतीचं आता शाळेत जायचं वय झालं होतं. सगुणाचं जॉन साहेबांच्या घरी कामाला जाणं आणि शेजारचं सुशिक्षित मुस्लिम कुटुंब. यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोविंदरावांनी ज्योतीला शाळेत धाडलं. ज्योती अंगापिंडानं धडधाकट होता. तो लहुजी वस्तादच्या तालमीतही जाऊ लागला. ज्योती शाळेत जसा चमकू लागला; तसा कुस्तीच्या फडातही गाजू लागला
एक दिवस ज्योती घरात कारकुनी करणाऱ्या कृष्णाजीपंताचा हिशेष डोकावून पाहू लागला. कृष्णाजीच्या मनात वेगळीच पाल चुकचुकली. त्याने गोविंदरावांचे कान भरले आणि ज्योतीची शाळा बंद झाली.
“ज्योती, तुझी शाळा बंद झाली ते बरंच झालं. उद्यापासून चल मळ्यात. “राजाराम म्हणाला.
“दादा, मी येतो तुला मदत करायला; पण माझ मन मळ्यात रमायचं नाही?”
“मग इचार काय हाय तुझा?”
“मला परत शाळेत जायचंय. खूप शिकायचंय.”
“ते माझ्या हातात न्हाय गड्या. तू बाबांशी बोल.”
रात्रीचे आठ वाजले होते. राजाराम,पार्वती मळ्यातून आले होते. सगुणाही घरी होती. बोलता बोलता सगुणाने विषय काढला.
“दादा, ज्योती शाळा शिकायचं म्हणतोय तर जाऊदे ना.”
राजारामही तेच बोलला. गोविंदराव विचारात पडले; पण शेवटी झालं ज्योतीच्या मनासारखं. ज्योती आता स्कॉटिश मिशन शाळेत शिकू लागला.
१८४० साल उजाडलं. वयाच्या तेराव्या वर्षी ज्योतीचा विवाह नऊ वर्षाच्या सावित्रीशी झाला. लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधीच ज्योती संसाराच्या बेडीत अडकून पडला. हसतखेळत, भांडत सावित्री-ज्योतीचा संसार सुरु झाला.
ज्योती इंग्रजी शाळेत चांगलाच चमकू लागला. त्याची प्रगती पाहून मिचेल सर खूश झाले.ते एक दिवस हातात पुस्तक घेऊन आले. आणि ज्योतीला म्हणाले,
“ज्योती, तू आता खूप हुशार झाला आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. मला खूप आनंद झाला आहे. म्हणूनच मी तुला हे पुस्तक भेट देत आहे.”
“धन्यवाद सर”. ज्योती आनंदाने बोलला.
ज्योतीला दिलेल्या थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या पुस्तकाने ज्योतीच्या जीवनात क्रातिकारी बदल झाला. सावित्रीला शिकवण्याची प्रेरणा मिळाली.
त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे पाप समजलं जाई. मुली शिकल्या तर बिघडतील, त्यांना शिक्षणाची गरज नाही. चूल आणि मूल हेच त्यांचं आयुष्य.अशा परिस्थितीत कर्मठ लोकांचा विरोध सहन करून सावित्रीला शिकवायचं होतं.
एके दिवशी त्याने सावित्रीजवळ पाटी ठेवली.
“सावित्री, तुला शिकायचं आहे. “सावित्री एकदम दचकलीच!
“मी? कसं शक्य आहे? घरात ढीगभर कामं. त्यात लोक हसतील मला.”
“सावित्री, लोकांचं काम हसणं, आपल काम शिकणं.”
ज्योतीच्या सानिध्यात नाही व्हय करत सावित्री शिकू लागली. ज्योती अक्षरांची ओळख करून देत होता. सावित्री री ओढत होती. ‘क’, ‘ख’, ‘ग’…
सुट्टीचा दिवस होता. ज्योती ओटीवर पुस्तक वाचत होता. इतक्यात राजारामने हाक दिली.
“ज्योती, चल देवळात फुले घेऊन जाऊया. आज जरा जास्तच फुले आहेत.”
“दादा, एवढी फुले कशाला? देवळात काही कार्यक्रम आहे का?”
“आरं, तुला माहीत नाही का? गोपाळराव देशमुख मोठी परीक्षा पास झालाय. पुण्यात पयल्यांदाच असं घडलंय. त्याचा सत्कार ठेवलाय गंगाधरपंतांनी.”
“होय का? मग मी आवर्जून येतो.”
बघताबघता मंदिर सजले. लोक जमा झाले. गोपाळरावांचा गंगाधरपंतांच्या हस्ते सत्कार केला. ज्योतीनेही गोपाळरावांचे अभिनंदन केले. ज्योतीचे तेथे वावरणे गंगाधरपंतांना रुचले नाही. ते कुत्सितपणे म्हणाले,
“ये ज्योत्या, सातवी इंग्रजी परीक्षा पास होणं एवढं सोपं नाही. कुणाचंही काम नव्हे ते. चल हो बाजूला!” पैलवानी बाण्याच्या ज्योतीला हे रुचले नाही. त्याच ठिकाणी ज्योतीने बोलून दाखवले ,
“मी सुद्धा सातवी इंग्रजी परीक्षा पास होणार! तीही अव्वल गुणांनी!”
ज्योतीच्या या तडफदार उत्तराने गोपाळराव सुखावले; पण गंगाधरपंतांचा चेहरा मात्र पडला.
दिवसामागून दिवस सरत होते. ज्योतीची परीक्षा जवळ येत होती. ज्योतीने डोळ्यांत तेल घालून अभ्यास केला. परीक्षा संपली निकालाचा दिवस उघडला.
“मोरो, चल लवकर आपल्याला निकाल बघायचाय.”
“होय. मलाही तुझ्या निकालाची उत्सुकता आहे!”
ज्योती, मोरों, सदाशिव शाळेत पोहोचले. बघतात तर काय! शाळेच्या प्रमुख फलकावर ज्योतीचे अभिनंदन झळकले होते. ज्योती, मोरो, सदाशिव सगळ्यांनाच आनंद झाला. १८४७ साली ज्योती सातवी इंग्रजीची परीक्षा अव्वल गुणांनी पास झाला. बघताबघता ही बातमी पुण्यात पसरली. पुण्यात दुसऱ्यांदा असे घडले.
एक दिवस ज्योतीराव सावित्रीला म्हणाले,
“सावित्री, तुला अक्षरओळख झाली. आता जबाबदारी वाढली
“मग मी काय करायला पाहिजे?”
“तुला पंतोजी व्हावं लागेल, तरच पुण्यातील मुली शिकतील”
“आवं, काय तरी काय बोलता? आपल्या देशात असं कुठे घडलंय तरी का?”
“घडले नाही. म्हणूनच आपल्याला घडवायचं आहे.”
“मला जमेल का?”
“न जमायला काय झाले? त्यासाठी तुला चौथी पास व्हावं लागेल आणि शिक्षक होण्याचे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण करावं लागेल”
“तुमची इच्छा तीच माझी. मी करेन सारं”
सावित्री तिसरी पास झाली. चौथी पास झाली. शिक्षक होण्याचं प्रशिक्षणही पूर्ण केले. ज्योतिरावांनी आपला मनसुबा घरी बोलून दाखवला.
“बाबा, मी आणि सावित्री मुलींची शाळा सुरु करतोय.”
“काय? हे आणि नवीन खूळ काय म्हणायचं? लोक काय म्हणतील ? पुण्यात जगू देतील का आम्हाला ?”
“बाबा, आमचं ठरलंय. सावित्री पंतोजी म्हणून काम करणार!”
“ज्योती, लोक आम्हाला वाळीत टाकतील,” राजारामाचा पारा चढला होता.
“दादा, तसं काही होणार नाही.” ज्योती म्हणाला.
“दादा, ज्योती शाळा काढतोय नव्हं मग काढू दे ना! कशाला विरोध करतोस? सगुणा बोलली.
“सगुणा दिसतंय तेवढं सोपं नाही हे”
“मला माहीत आहे बाबा; पण आमचा निर्णय पक्का झालाय.”
घरातील वातावरण सुन्न झाले होते. पण ज्योतीरावांनी शाळेसाठी जागा शोधायला सुरु केले; दारोदार हिंडून मुलींना शाळेत येण्यास विनंती करु लागले. पण सगळीकडे नकारघंटाच! पण दोघांनीही जिद्द सोडली नाही. शेवटी तात्यासाहेब भिडे ज्योतीरावांना म्हणाले,
“ज्योतीराव, शाळेसाठी जागा मिळाली का?”
ज्योतीरावांनी नाराजीच्या सूरात उत्तर
“नाही अजून.”
“ज्योतीराव काळजी करू नका. मी देईन माझा वाडा”
“काय सांगता?” ज्योतीरावांचा चेहरा एकदम खुलला.
“होय, पण नाममात्र भाडे द्यावे लागेल.”
“तात्यासाहेब सगळे कबूल. धन्य झालो आम्ही.”
शाळेला जागा मिळाली. आटापिटा करून आठ मुली मिळाल्या. ज्योतीराव लगबगीने घरी आले. सावित्रीला ही आनंदाची बातमी सांगितली. सावित्रीचा चेहरा खुलला. ज्ञानक्रांतीचे पहिलं पाऊल सावित्रीच्या रुपानं आता भिडेवाड्यात पडणार होते.
सावित्रीच्या रुपाने पुढे अखंड भारतातील स्त्रियांचा उद्धार होणार होता. तो दिवस आला. शाळा सुरु झाली.
“सावित्री, आज पुन्हा तुझ्या अंगावर शेण फेकले वाटते? आणि हे काय? कपाळाला जखम कसली?”
“अहो, आता मला सवय झालीय, शेण काय, दगडगोटे काय, सारखेच. आणि हे बघा, हे शेण नाही. ते आपल्या शाळेच्या रोपट्याला लागलेलं खत आहे. आज हे लोक आपल्यावर शेण फेकत आहेत; पण उद्या त्यांच्याच मुली शिकून शहाण्या होतील.!”
ज्योतीराव काही क्षण शांत राहिले. आपल्यासमोर उभी असलेली सावित्री दीपस्तंभासारखी वाटत होती. वादळातही नं विझणारी ज्योत. सावित्रीचा आत्मविश्वास पाहून ज्योतीराव मनोमन सुखावले होते.
भारतातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई आणि ज्योतीराव यांनी सुरु केली. ही शाळा सुरु व्हायला १८४८ साल उजाडले. यासाठी दोघांना अपार कष्ट सोसावे लागले. यातना सहन कराव्या लागल्या. आपलं राहते घर सोडावं लागलं. सनातन्यांचा छळ सहन करावा लागला. सावित्रीबाईंना तर सगळयांचे टोमणे सहन करावे लागले. रोजचा शेणाचा मारा तो वेगळाच. तेव्हा कुठे ज्ञानक्रांतीचे पहिले पाऊल सावित्रीच्या रुपाने उमटले.
“सावित्री, आता मुलींची संख्या वाढत आहे.”
“होय, माझ्या लक्षात आलंय ते.”
“आता आपल्याला नवीन शाळा काढाव्या लागतील.”
“बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्याचं काय झालं?” सावित्रीने विचारले.
“चिपळूणकर तयार आहेत.”
“आणि रास्ता पेठेचं?”
“तेथेही शाळा सुरु होणार!”
सावित्रीबाई आता मनोमन सुखावल्या होत्या. फतिमा शेखही आता सावित्रीच्या जोडीला आल्या. सावित्रीबाई आता मुख्याध्यापिका झाल्या.बघताबघता शाळेतील मुलींची संख्या आठवरून दोनशे पंच्याहत्तर झाली. ज्योतीराव आणि सावित्रीबाई यांच्या कार्याचा डंका आता पुण्यातच काय, पुण्याबाहेरही वाजू लागला.
“सावित्री, आपण मुलींची परीक्षा घ्यायला सुरुवात केली हे चांगलंच झालं.”
“होय. त्यामुळे अभ्यासात कोण मागं आहे हे आपल्याला कळू लागलं.”
“आता आपल्या शाळेतील मुलींची सार्वजनिक परीक्षा होणार आहे.”
“मग होऊ द्या की. आपण मुलींची आणखी तयारी करून घेऊ.”
“१२ फेब्रुवारी १८५३ रोजी ही परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी पुण्यातील नामवंत परीक्षक आहेत.”
“मग काय बरंच झालं. आपल्या मुलींची तयारी तरी चांगली होईल.”
तो दिवस उजाडला. एक आगळावेगळा दिवस. सावित्रीबाई ज्योतीरावांनी सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची परीक्षा पाहण्यासाठी सुमारे तीन हजार लोक जमले होते! लोकाना प्रचंड उत्सुकता होती. परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षकांनी शेरा मारला, ‘पुण्यातील सरकारी शाळांपेक्षा ज्योतीरावांच्या शाळेची प्रगती वाखाणण्यासारखी आहे.’
ही बातमी संपूर्ण भारतभर वाऱ्यासारखी पसरली. ज्योतीरावांना लोक आता तात्यासाहेब म्हणू लागले. त्यांचे सगळीकडे कौतुक होऊ लागले. भिडेवाड्यात लावलेल्या ज्ञानक्रांतीच्या छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झाला होता. ज्योतीरावांच्या अपार कष्टातून, त्यागातून मुलींच्या शिक्षणाचा उगम झाला होता. ज्या जनसमुहासाठी तात्यासाहेब झिजले, त्याच जनसमुहाने त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी देऊन गौरव केला.
ज्योतीराव फुल्यांचे महान कार्य पाहून महात्मा गांधीजी एकदा म्हणाले होते, “खरे महात्मा जोतिबा आहेत!”
*तात्पर्य: उच्च ध्येयासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि जिद्द यामुळे कोणत्याही विरोधावर मात करून परिवर्तन घडवता येते.
संदर्भ:
१) महात्मा जोतीराव फुले – धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृ.क्र. १,१०,१४,१७,१८,३९,४०,५३,७८,८१.
२) महात्मा- डॉ. रवींद्र ठाकूर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
पृ.क्र. ५,३८,३९,४२,५०,५७,८२.
लेखक परिचय:
संभाजी गोविंद पाटील मु.पो. सावर्डे (पाटण) ता. राधानगरी, जि, कोल्हापूर.
फोन: 9049870674, पिन: 416212
पुरस्कार : शिक्षकांना मिळणारा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार.
हस्ते – प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती भारत सरकार (2016)
प्रकाशित पुस्तके:-
1) भ्रमंती गड किल्ल्यांची
2) ओळख थोर नेत्यांची
3) वैदिक गणित
4) मराठी व्याकरण – ८ वी ते १० वी
5) मराठी व्याकरण-५वी ते ७वी
6) नोबेल पारितोषिक विजेते.
7) ग्रेट स्पीचेस
8) सफर ऐतिहासिक किल्ल्यांची
प्रकाशक : रिया पब्लिकेशन, कोल्हापूर .(अजब डिस्ट्रीब्युटर कोल्हापूर