गडांचा गड : किल्ले रायगड (Fort Raigad)
गडांचा गड, दुर्गाचा दुर्ग असे ज्या गडाला समजले जाते, तो गड म्हणजे ‘Raigad fort’ होय. छत्रपती शिवरायांनी 1656 मध्ये ‘रायरी’ जिंकून स्वराज्यात आणली. पुढे याच रायरीचे रायगडात रूपांतर झाले आणि स्वराज्याची राजधानी बनली. याच रायगडाबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत.
गडाचे नाव : रायगड
समुद्रसपाटीपासून उंची : 820 मी.
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : रायगड
जिल्हा : रायगड
जवळचे गाव : महाड
महाडपासून अंतर : 24 कि.मी.
डोंगररांग : सह्याद्री
सध्याची अवस्था : व्यवस्थित, डागडुजी चालू आहे.
स्थापना: 1030
रायगडावर कसे जायचे? (How to go to raigad?)
कोल्हापूरहून रायगडला जायचे झाल्यास कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा लागतो. साताऱ्याहून महाडमार्गे रायगडला जाता येते. सातारा ते रायगड135 कि.मी. अंतर आहे.
●पुण्याहून लवळेमार्गे रायगडला जाता येते. पुणे-रायगड अंतर 131 किमी आहे.
● वाईहून महाबळेश्वर महामार्गै रायगडला जाता येते. वाई ते रायगड114 किमी आहे.
●मुंबई-गोवा मार्गावर महाड बसस्थानक लागते.महाडहून रायगड 24 किमी अंतरावर आहे.
●रायगडच्या पायथ्यापाशी वाहने जातात तेथे चित् दरवाजापासून गडावर चढण्याच्या पायर्या सुरू होतात .सध्या येथे चित् दरवाजा नाही.
●रायगडाच्या पायथ्याशी गेल्यावर गडावर ‘रोप वे’ ने सुद्धा जाता येते. शैक्षणिक सहलीसाठी विशेष सवलत असते.
● रायगडावरील इतिहास
रायगड किल्ल्याचे भौगोलिक स्थान ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला स्वराज्याच्या राजधानीचे स्वरूप दिले.
रायगडचे प्राचीन नाव ‘रायरी’ असे होते. युरोपीय लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. अत्यंत निसर्गरम्य आणि दुर्गम, अजिंक्य असा हा गड आहे. साडेपाचशे वर्षांपूर्वी रायगडाला गडाचे स्वरूप नव्हते. तेव्हा त्यास विटा’, ‘तणस’ अशी नावे होती. रायगड खूप उंचावर असल्यामुळे सभोवतालचा प्रदेश,दऱ्या येथून दिसतात. म्हणून या गडाला ‘नंदादीप’ असेही नाव पडले होते. निजामशाहीच्या काळात रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात असे.
जावळी खोऱ्यात शिवरायांचा दबदबा :
शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या वेळी जावळी खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचे वर्चस्व होते. जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे थेट विजापूरच्या आदिलशाहीशी संबंध होते. अफझलखानाच्या पाठिंब्यामुळे तो माजोर झाला होता. मावळ भागांतील देशमुखांना शिवरायांविरुद्ध फितवण्याचे काम तो करत होता. स्वराज्याच्या निर्मितीत जावळी अडथळा ठरत होती. शिवरायांनी सामोपचाराने चंद्रराव मोऱ्यांना पत्र पाठवून स्वराज्यात सामील होण्यास सांगितले; पण चंद्रराव मोरे ऐकत नव्हता. शेवटी शिवरायांनी हल्ला केला. फुशारकी मारणारा चंद्रराव तग धरूशकला नाही. युद्ध पंधरा दिवस चालले. अखेर जानेवारी 1656 मध्ये शिवरायांच्या ताब्यात जावळी आली. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे (चंद्रराव हा आदिलशहाने दिलेला किताब होता) रायरीला पळून गेला; तर प्रतापराव मोरे विजापूरला पळाला.
6 एप्रिल 1656 मध्ये शिवरायांनी रायरीस वेढा दिला. मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आली. यशवंतराव मोरे यांना ठार केले. त्याच्या दोन्ही पुत्रांना पकडले आणि कैद केले. तरी सुद्धा त्यांची आदिलशाहीवरील असलेली निष्ठा कमी झाली नाही. सापांना सोडण्यापेक्षा शिवरायांनी ठेचून काढले. या घटनेमुळे जावळी खोऱ्यात शिवरायांचा दबदबा वाढला. फितुरांच्यात भीती निर्माण झाली. वतनदारांच्यातही खळबळ उडाली. अनेक वतनदार शिवरायांना मिळाले…
कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे चालल्याची बातमी शिवरायांना लागली. शिवरायांनी खजिना हस्तगत करून रायगडावर आणला आणि तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला.
रायगड हा मावळ खोरे, कोकण भागावर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त होता. बखरकार म्हणतात, ‘दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा; पण दौलताबादच्या दशगुणी उंच रायगड. तक्तास जागा हाच गड करावा.’
रायगड किल्ला विविध 15 नावांनी ओळखला जात असे. रायरी, इस्लामगड, नंदादीप, तणस, राशिवटा, रायगिरी, राजगिरी, शिवलंका, रायगड ही त्यातील काही नावे आहेत.
शिवराज्याभिषेक :
6 जून 1674 हा दिवस भारताच्या इतिहासातील अपूर्व असा दिवस होता. याच दिवशी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता.
19 मे 1674 रोजी शिवरायांनी प्रतापगडावरील भवानी मातेचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजे 56,000रुपये किंमतीचे (त्या वेळचे दर) छत्र देवीला अर्पण केले.
6 जून 1674 रोजी रायगडावरील राज्यसभेत ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवारी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. याच दिवसापासून शिवशक सुरू झाले. राज्याभिषेकासाठी काशीहून गागाभट्ट आले होते.
राज्याभिषेकासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले होते. गागाभट्ट यांनी 100 छिद्रे पाडलेल्या सोन्याच्या घागरीतून गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृयांती नर्मदा, कावेरी या सात नद्यांच्या पाण्याने मस्तकाभिषेक घातला. महाराज सोन्याच्या चौरंगावर बसले होते. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर महाराज शुभ मुहूर्तावर सिंहासनाच्या बसले. शेजारी युवराज संभाजीराजे व महाराणी बसल्या. अष्टप्रधान मंडळ बाजूला बसले. गागाभट्टांनी सोन्या-मोत्यांचे छत्र महाराजांच्या डोक्यावर घरले व मोठ्याने म्हणाले, “क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो” शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
24 सप्टेंबर 1674 रोजी महाराजांनी रयतेच्या समाधानासाठी स्वतःचा राज्याभिषेक तांत्रिक[शाक्त]पद्धतीने पूर्ण करून घेतला. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला.
इ. स. 1675 मध्ये 4 फेब्रुवारीला युवराज संभाजीराजे यांची मुंज रायगडावर झाली. 7 मार्च 1680 रोजी राजाराम महाराज यांची मुंज रायगडावर झाली व लगेच आठ दिवसांनी त्यांचे लग्न प्रतापराव गुर्जर यांच्या मुलीशी झाले.
3 एप्रिल 1680. हा रायगडावरील काळा दिवस होय. याच दिवशी शिवरायांचा मृत्यू झाला. त्या वेळी संभाजी महाराज पन्हाळा प्रांताचे कामकाज पाहात होते. इकडे रायगडावर बरीच उलथापालथ झाली होती. महाराणी सोयराबाईंना हाताशी धरून अण्णाजी दत्तोसारख्या अष्टप्रधान मंडळातील काही मंत्र्यांनी राजाराम महाराजांचा घाईघाईने राज्याभिषेक करून राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. संभाजी महाराज यांना अटक करण्यास सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना पाठविले होते; पण हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांच्या बाजूने ठाम राहिले. त्यांनी आणि संभाजी महाराजांनी कारभारी मंडळींचा डाव उलथून टाकला आणि 16फेब्रुवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा विधिपूर्वक राज्यारोहण सोहळा पार पाडला गेला.
इ. स. 1684 मध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीनखान चाळीस हजार सैन्यासह रायगडावर चालून आला. शहाबुद्दीन खानने रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाला आग लावली (1685). लुटालूट केली आणि माघारी फिरला.
औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा झुल्फिकारखान यास मोठे सैन्य देऊन रायगड सर करण्यास पाठवले. संभाजी महाराजांना कपटाने (फितुरीने) पकडून ठार केल्यानंतर मराठ्यांचे राज्य औरंगजेबाला उद्ध्वस्त करायचे होते. म्हणून त्याने झुल्फिकारखानाला रायगडावर चाल करण्यास पाठवले होते. त्या वेळी राजाराम महाराज मराठ्यांचे छत्रपती झाले होते.
25मार्च 1689 रोजी झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिला होता. 5 एप्रिल 1689 मध्ये राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता; पण खानाला गड जिंकता आला नाही.
3नोव्हेंबर 1689 मध्ये सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला झुल्फिकारखानाच्या ताब्यात गेला. सूर्याजी पिसाळला वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवले होते. रायगड जिंकल्यावर औरंगजेबाने इतिकादखानला ‘झुल्फिकारखान’ हा किताब देऊन गौरव केला. रायगडचे नामकरण ‘इस्लामगड’ असे केले.
5 जून 1733 मध्ये शाहू महाराजांच्या कारकीर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांच्या सत्तेत आला. उत्तर पेशवाईत रायगडकडे साफ दुर्लक्ष झाले. कैद्यांना बंदिवान बनवण्याची जागा म्हणजे रायगड झाली.
दुसरा बाजीराव व नाना फडणवीस यांनी पडत्या काळात रायगडचा आश्रय घेतला होता. नाना फडणवीस यांनी रायगडावरील अनेक इमारतींची दुरुस्ती केली होती.
कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने रायगड जिंकून घेतला. 10 मे 1818 रोजी रायगडावरील मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर शिवरायांचे कार्य झाकोळले गेले होते. शिवजयंती रयतेला माहीत नव्हती. काही समाजघटकांनी जाणीवपूर्वक शिवरायांचे कार्य झाकण्याचा प्रयत्न केला होता. महात्मा फुलेंनी 1869 मध्ये रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली होती. 19 फेब्रुवारी 1869 मध्ये समाधीवरील धूळ झाडून फुल्यांनी प्रथम शिवजयंती साजरी केली.
पुढे लोकमान्य टिळकांनी शिवजयंती तिथीवार सुरू करून 1895पासून शिवजयंतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे (Sights of the fort)
पाचाडचा वाडा:(Wada Pachad)
राजमाता जिजाबाई यांना गडावरील थंड हवा मानवत नसे. म्हणून गडाच्या पायथ्याशीच 2 कि.मी. अंतरावर पाचाड गावी महाराजांनी जिजामातेसाठी राजवाडा बांधून घेतला, वाड्याची व्यवस्था करण्यासाठी काही अधिकारी व शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पिण्याच्या पाण्याची विहीर व जिजाबाईंना बसण्यासाठी दगडी आसन महाराजांनी बनवून घेतले होते.
गन्स ऑफ पाचाड :(Guns Of Pachad)
पाचाड खिंडीतून वर आले की गुहा लागते. हिलाच ‘गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणतात. येथील थंडगार हवा सारा थकवा घालवते. अश्मयुग काळात इथे मनुष्यवस्ती असावी असा अंदाज आहे.
खुबलढा बुरूज :(Khubladha Buruj)
रायगडाच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी जवळजवळ 1345 पायऱ्या लागतात. गड चढताना सुरुवातीलाच ‘खुबलढा बुरूज’ लागतो. या बुरुजाशेजारी एक दरवाजा होता त्याला ‘चित्दरवाजा’ असे नाव होते. आता तेथे फक्त उद्ध्वस्त अवशेष शिल्लक आहेत.
नाना दरवाजा:(Nana Darwaja)
नाना दरवाजा म्हणजे लहान दरवाजा. शिवराज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत.
मदार मोर्चा:
चित्दरवाजा ओलांडून नागमोडी वळणे घेत गडावर चढत असताना एक सपाट भाग लागतो. तेथे मोकळ्या जागेवर दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक धान्याचे कोठार होते, तर दुसरी इमारत पहारेकऱ्यांसाठी होती. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. येथे एक तोफही आहे.
महादरवाजा :(Maha Darwaja)
गडावर चढताना अंतिम टप्प्यात आजही सुस्थितीत असलेला दरवाजा लागतो. हाच तो ‘महादरवाजा’ होय. दरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही गडावर चढताना अंतिम टप्प्यात आजही सुस्थितीत असलेला दरवाजाबाजूस कमळाकृती कोरलेल्या आहेत. या कमळांचा अर्थ लक्ष्मी आणि सरस्वती. गडावर लक्ष्मी आणि सरस्वती नांदत आहेत. या अर्थाने ही दोन कमळे कोरलेली आहेत.
महादरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन बुरूज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीवर शत्रूवर मारा करण्यासाठी व टेहळणी करण्यासाठी उतरती भोके ठेवली आहेत. महादरवाजातून आत गेल्यास पहारेकऱ्यांच्या देवड्या लागतात. महादरवाजापासून उजवीकडे (उत्तरेकडे) टकमक टोकापर्यंत व डावीकडे (दक्षिणेकडे) हिरकणी बुरुजापर्यंत तटबंदी आहे.
चोर दिंडी :(Chordindi)
महादरवाजापासून टकमक टोकापर्यंत तटबंदी गेली आहे. तटबंदी संपण्यापूर्वी अलीकडे बुरुजात चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
हत्ती तलाव :(Hatti Lake)
महादरजावापासून थोड्यात अंतरावर हा ‘हत्ती तलाव’ आहे. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी व पिण्यासाठी हा तलाव वापरला जात असे.
गंगासागर तलाव:(Ganga Sagar Tank)
हत्ती तलावाच्या जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती आहेत. त्या इमारतींच्या जवळपासच ‘गंगासागर तलाव’ आहे. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व सप्तनद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात विसर्जित केली गेली. म्हणूनच या तलावाला ‘गंगासागर तलाव’ असे नाव पडले.
स्तंभ :
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत. त्यांनाच स्तंभ असे म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये या स्तंभांचा उल्लेख आहे. हे स्तंभ द्वादशकोनी आहेत.
पालखी दरवाजा :(Palkhi Darwaja)
स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या पायऱ्या चढून गेल्यावर पालखी दरवाजा लागतो. या दरवाजातून आपल्याला बालेकिल्ल्यात जाता येते.
मेणा दरवाजा :(Mena Darwaja)
पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ-उताराचा एक सरळ मार्ग लागतो. हा मार्ग मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.
राणी महाल :(Rani Mahal Raigad)
मेना गेटजवळ दिसणारे सात अवशेष म्हणजे राणी महाल. येथून बाले किल्ल्यावर जाता येते.
दोरी मार्ग बिंदू:[Rope Way]
गडावर रोप वे ने आल्यावर प्रथम राणी महालाजवळच येतो. रोप वे पॉईंटपासून राणी महाल जवळच आहेत.
राजभवन:(Raj Bhavan)
राणी महाल, दास-दासींचे मकान आणि राजभवन जवळजवळच आहेत. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. आज राजभवन अवशेष स्वरूपातच आहे.
रत्नशाळा :
राजभवनाजवळच स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या एका मोकळ्या जागेत तळघर आहे. तीच ही रत्नशाळा होय. या तळघराचा उपयोग ‘खलबतखाना’ म्हणून केला जात असावा असेही वाटते.
* रायगडावरील सिंहासन:(Raigad Sinhasan)
रायगडावरील सर्वात सन्मानाचे स्थान म्हणजे शिवरायांचे ‘सिंहासन’ होय. राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांनी 32 मण सोने, हिरे, माणके यांच्यापासून बनवून घेतले होते. आज ते सिंहासन कोठे आहे कुणालाही माहीत नाही. मोगलांच्या आक्रमणाच्या वेळी ते गायब झाले असावे किंवा इंग्रजांच्या काळात ते लंपास झाले असावे असा अंदाज आहे. येथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मेघडंबरी आहे. मेघडंबरी कांस्य धातूपासून बनवलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने ही मेघडंबरी बनवून घेतली आहे.
राज्यसभा:
महाराजांचा राज्याभिषेक झाला तीच ही जागा. सिंहासनासमोरच राजसभा भरत असे.राज्यसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे.
नगारखाना :
सिंहासनासमोर जे भब्य प्रवेशद्वार दिसते, तोच ‘नगारखाना’ होय, हे बालेकिल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे, नगारखान्याच्या खाली उभे राहून कितीही हळू आवाजात बोलले तरी सिंहासनावर बसलेल्या महाराजांना ऐकू जात असे, कुठल्याही तंत्रज्ञानाशिवाय विकसित केलेली ही ध्वनिक्षेपक यंत्र प्रणाली रायगडावर आजही अनुभवास येते. अशी तंत्रप्रणाली जगातल्या काही निवडक गडांवरच विकसित केलेली होती. हिरोजी इंदुलकरने गड बांधला, त्याचे श्रेय निश्चितच त्याला जाते.
रायगडावरील कचेऱ्या :
नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर मोकळी जागा दिसते तिला ‘होळीचा माळ’ म्हणतात, तेथेच शिवछत्रपतींचा पुतळा आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात त्याच शिवकाळातील कचेऱ्या होत, प्रत्येक रांगेत बावीस कचेन्या आहेत. पूर्वी ही बाजारपेठ असावी असा अंदाज बांधला होता. पण अलीकडील संशोधनानुसार त्या कचेऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिकाई देऊळ:रायगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच ‘शिकाई देऊळ’ आहे. शिकाई ही गडाची मुख्य देवता आहे.
* रायगडावरील जगदीश्वर मंदिर:(Jagdishwar temple Raigad)
कचेऱ्या पाहून पुढे गेल्यानंतर एक भव्य मंदिर दिसते. हेच ते ‘जगदीश्वराचे मंदिर’. जगदीश्वर म्हणजेच महादेव. मंदिराच्या समोरच भव्य व सुबक नंदी आहे. सध्या हा नंदी भग्न अवस्थेत आहे. मंदिरात प्रवेश करताच भव्य सभामंडप लागतो. सभामंडपात कासव आहे.
रायगडाची उभारणी करताना हिरोजी इंदूलकरने महाराजांच्या आज्ञेवरून जगदीश्वराचे मंदिरही उभारले. मंदिराच्या पायरीवर त्याचे नाव कोरलेले आहे. गडावर असताना महाराज जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत असत.
शिवाजी महाराजांची समाधी :
मंदिरापासून थोड्या अंतरावर महाराजांची समाधी आहे. समाधीचा चौथरा अष्टकोनी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचा मृत्यू रायगडावर झाला.होता. शिवरायांच्या रक्षेचा अंश या समाधीत स्थित केलेला आहे. येथे आल्यानंतर आपण आपोआप नतमस्तक होतो.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे ही समाधी धूळ खात पडली होती. महात्मा फुल्यांनी 1869 मध्ये गडावर जाऊन समाधीची साफसफाई करून गडावरच पहिली शिवजयंती साजरी केली होती.
कुशावर्त तलाव:
होळीच्या माळाच्या पुढे गेल्यास कुशावर्त तलाव लागतो. तलावाजवळच महादेवाचे छोटेसे देऊळ आहे. येथील नंदीही फुटलेल्या अवस्थेत आहे.
वाघ दरवाजा :रायगड(Wagh Darwaja Raigad)
कुशावर्त तलावाच्या जवळूनच घळीतून उतरून वाघ दरवाजाकडे जाण्यासाठी वाट आहे. या दरवाजातून गडावर येणे अशक्यप्राय आहे. परंतु दोर लावून खाली उतरता येते. झुल्फिकारखानाने रायगडाला वेढा दिला होता. त्यावेळी राजाराम महाराज याच दरवाजातून निसटून गेले होते.
टकमक टोक :रायगड(Tak mak tok Raigad)
कचेरीपासून पुढे टकमक टोकाकडे जाता येते. टकमक टोकाकडे खूप निमुळता होत गेला आहे. येथे दरीतून प्रचंड वारा येतो. येथे थोडा वेळ थांबणे सुद्धा थरारक असते. या टोकाच्या उजव्या हाताला जवळजवळ 2600 फूट उंचीचा तुटलेला कडा आहे. रोमांचकारी अनुभव घेण्यासाठी टकमक टोक पाहणे आवश्यक आहे. पण सावधगिरी बाळगावी लागते.
हिरकणीचा बुरूज :(Hirkani Buruj)
महादरवाजातून गडावर चढत असताना आपल्या उजव्या हाताला ‘हिरकणीचा बुरूज’ लागतो. गडावर दूध विकण्यासाठी आलेली हिरकणी गवळण सायंकाळ झाल्यामुळे गडाचे दरवाजे बंद झाले आणि गडावरच ती अडकली. पण तिचे घरी असलेले तान्हे बाळ तिला स्वस्थ बसू देत नव्हते. ती या बुरुजाजवळच्याच केड्यावरून गडाखाली उतरली आणि आपल्या तान्ह्या बाळाला भेटली. महाराजांनी तिला बोलावून साडी-चोळी देऊन सत्कार केला व तिची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून तेथे बुरूज बांधला. हाच तो हिरकणीचा बुरूज, सध्या बुरुज ढासळत चालला आहे.
..रायगडच काय महाराष्ट्रातील सर्वच गडांची डागडुजी करणे आवश्यक आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा हा अनमोल ठेवा आपण जपून ठेवला पाहिजे. तो चिरकाल टिकला पाहिजे. कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. गडकोटांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनीच हाती घेतले आहे. त्यांच्या कार्याला भारत सरकार, राज्य सरकार हातभार लावत आहेत. जनतेनेही हातभार लावला तर नक्कीच त्याला अधिक बळकटी येईल.
* रायगडावरील राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
रायगडावर राहण्याची सोय आहे. गडावर धर्मशाळा आहे. तेथे राहता येते. पाचाड गावीही काही पर्यटक मुक्काम करतात. रायगडापासून 24 कि.मी. अंतरावर असलेल्या महाड गावी सुद्धा राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.
गडावर रमतगमत चढण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. गड पाहण्यासाठी दोन-अडीच तास लागतात. स्थानिक लोक तासाभरातच गडावर चढतात.आम्ही हा गड चालत सव्वा तासात सर केला होता.
गडावर पिण्याच्या पाण्याची बारमाही सोय आहे. गोपाळ चांदोरकर यांनी ‘श्रीमद् रायगिरी’ नावाच्या पुस्तकातून रायगडाबद्दलच्या अनेक नव्या गोष्टी उजेडात आणल्या आहेत. त्यांचे हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे.