किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात आणि वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदारात महत्वाचे स्थान असणारा निसर्गसौंदर्याने नटलेला एक सुंदर आणि देखणा किल्ला म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय.

महाराष्ट्राचे आद्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे ‘किल्ले पन्हाळगड’ होय.

किल्ल्याचे नाव : पन्हाळगड

समुद्रसपाटीपासून उंची : 4040 फूट

जिल्हा : कोल्हापूर

कोल्हापासून अंतर: 21 किमी

प्रकार: गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : सोपी

सध्याची अवस्था : सुस्थितीत

जवळचे गाव : केर्ले

तालुका : पन्हाळा.

पन्हाळगडाचा इतिहास :(History Of Panhala Fort)

पन्हाळगडाची उभारणी होण्यापूर्वी हा भाग ‘ब्रह्मगिरी’ नावाने ओळखला जात असे. कोल्हापूरच्या पश्चिमेला उंच पठारावर पन्हाळगड मोठ्या दिमाखात उभा आहे. उन्हाळ्यात अत्यंत आल्हाददायक वातावरण, पावसाळ्यात दाट धुक्यांनी आच्छादून जाणारा पन्हाळगड पर्यटकांना नेहमीच मोहिनी घालत आला आहे.

प्राचीन तपस्वी मुनी पराशर यांनी तपः साधनेसाठी ‘ब्रह्मगिरी’ची निवड केली. त्यांची पत्नी सत्यवती त्यांच्यासमवेत होती. त्या वेळी ब्रह्मगिरीवर नागवंशी लोकांचे वर्चस्व होते. त्यांनी सुरूवातीला ऋषींच्या तपश्चर्येला विरोध करायला सुरुवात केली; परंतु पराशर ऋषींनी आपल्या तपः साधनेने नाग लोकांची मने जिंकली आणि सर्व जण शांततेने राहू लागले. पन्हाळगडावर प्रसिद्ध असलेली ‘पराशर ऋषींची गुहा आणि ‘नागझरी’ ही ठिकाणे त्यांच्या वास्तव्याची साक्षच देतात. नाग लोकांच्या बस्तीमुळे पन्हाळगडाला ‘पन्नगालय’ असेही म्हटले जात असे.

पन्हाळगडाची विविध नावे :(Different Names Of Panhala Fort)

पन्हाळगडाला खूप मोठा प्राचीन इतिहास आहे. ब्रह्मगिरी, पन्नगालय (पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर), पराशराश्रम, पराशरगड, पद्यालय, पद्मनाल, पर्णालपर्वत, पन्हाळदुर्ग, पनालपर्वत अशा कितीतरी नावांनी पन्हाळगड कालमानानुसार ओळखला जात असे.

राष्ट्रकूट काळात राष्ट्रकूट राजा चंद्रराज याचा मुलगा दुसरा जतिज याच्या एका ताम्रपटात तो स्वतःला ‘पनालदुर्ग आद्रिसिंह’ म्हणवून घेत असे. यावरून राष्ट्रकूट काळातही या गडाचे नाव ‘पनाला’ असे होते हे सिद्ध होते.

शिवकालीन कागदपत्रातही ‘पनालगड’ असा उल्लेख आहे. आदिलशाही राजवटीत या गडाचे नाव ‘शहानबी दुर्ग’ असे ठेवले होते; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. 1659 साली हा गड जिंकून स्वराज्यात घेतल्यावर पुन्हा जुने नाव ‘पनालगड’ कायम केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने पन्हाळगड जिंकून त्याला ‘नबीशहागड’ असे नाव ठेवले होते; परंतु हे नाव फार काळ टिकले नाही.

इ. स. 1827साली इंग्रज अधिकारी कर्नल वेल्श याने पन्हाळगडाला ‘Watery Mountain’ तर पावनगडाला ‘Windy Mountain’ असे संबोधले.

पन्हाळगड कोणी बांधला ?(Who has Built the Fort Panhala)

पन्हाळगड कोणी बांधला याचा नामोल्लेख स्पष्टपणे मिळत नसला तरी येथील तटबंदी इ. स. पूर्व 200 ते 300 या काळातील असावी असे वाटते. राष्ट्रकूट काळात ‘पन्हाळदुर्ग’ चांगलाच नावारूपाला आला होता. एक सुरक्षित आणि भक्कम किल्ला म्हणून या गडाची ख्याती सर्वत्र पसरली होती.

महाराष्ट्रात अनेक राजवटी होऊन गेल्या. शिलाहार ही एक नावारूपाला आलेली राजवट होती. या घराण्यातील महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) हा दुर्ग बांधणारा अधिपती म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने इ. स. 1187 मध्ये शिलाहार घराण्याची राजधानी वाळव्याहून कोल्हापूरला आणली. नंतर लगेच तीन वर्षांनी पन्हाळगडावर नेली. त्याने या परिसरात पंधराहून अधिक मजबूत किल्ले बांधले. याच राजाला पनालदुर्गाची तटबंदी बांधल्याचे श्रेय दिले जाते. इ. स. 1209 मध्ये देवगिरीच्या यादव घराण्यातील शूर राजा सिंघनदेव याने पन्हाळगड जिंकून घेतला व शिलाहार घराण्याची सत्ता संपुष्टात आणली.

इ. स. 1318 साली देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता अल्लाउद्दीन खिलजीने संपुष्टात आणली. इ. स. 1453 मध्ये बहामनी सुलतानाचा सरदार मलिक अत्तुजार याने शिर्क्यांचा पराभव करून पन्हाळगड जिंकून घेतला. त्याच वेळी खेळणा किल्ला जिंकण्यासाठी आक्रमण केले; परंतु शिर्क्यांनी मलिक अत्तुजारसह त्याच्या सात हजार सैनिकांची कत्तल केली आणि पन्हाळागड व खेळणा (विशाळगड) किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

इ. स. 1469 मध्ये बहमनी सुलतानाचा पराक्रमी सरदार महम्मद गवान याने पन्हाळागड व विशाळगड हे दोन्ही किल्ले जिंकून ताब्यात घेतले.

इ. स. 1538 मध्ये बहमनी राजवटीची निजामशाही, आदिलशाही, इमादशाही, कुतबशाही, बरीदशाही अशी शकले पडली. पन्हाळगड विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात गेला. आदिलशाहीच्या काळातच पन्हाळागडावर तीन दरवाजा, कलावंतिणीचा सज्जा, चार दरवाजा, अंधारबाव, धर्मकोठी इत्यादी इमारतींचे बांधकाम करण्यात आले.

छत्रपती शिवराय आणि पन्हाळगड :(Chatrapati Shivaji Maharaj and Panhala Fort)

छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील रयतेची विजापूरच्या आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघलशाही, पोर्तुगीज यांच्या जुलमी सत्तेतून मुक्त करण्याचा विडा उचलला होता. मजबूत स्वराज्यनिर्मितीसाठी किल्ल्यामागून किल्ले जिंकून घेण्यास सुरुवात केली होती. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझलखानाचा वध करून ते पन्हाळगडावर आले. 28 नोव्हेंबर 1659 रोजी रात्रीच्या वेळी शिवराय पन्हाळगडावर पोहोचले.

अफझलखानाच्या वधामुळे आदिलशाही खचली होती. शिवरायांबद्दल घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी सुद्धा शिवराय पन्हाळगडावर आल्याचे कळताच आदिलशहाने आणि बडी बेगमसाबाने शिवरायांवर सिद्दी जौहर, फाजलखान (अफझलखानाचा मुलगा) सिद्दी मसूद इत्यादी नामवंत आणि क्रूर सरदारांना पाठवले. त्यांनी पन्हाळागडला वेढा दिला. मजबूत वेढ्यामुळे शिवरायांनी पन्हाळगडावर शांत राहणेच पसंत केले. परंतु सहा महिने झाले पावसाळा आला तरी वेढा हलण्यास तयार नाही. मग मात्र शिवरायांनी वेढ्यातून निसटण्याच्या हालचाली सुरू केल्या.

सैन्यबळ कमी असूनही छत्रपती शिवराय युद्धशास्त्र, दूरदृष्टीपणा, कल्पकता, शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे यात अजोड होते. सिद्दी जौहरला ‘आम्ही शरण येत आहोत’ असा निरोप धाडून ते स्वतः 12 जुलै 1660 रोजी रात्रीच्या वेळी धो-धो पावसातून राजदिंडी नामक चोरदरवाजातून निवडक सहाशे मावळ्यानिशी पन्हाळगडावरून बाहेर पडले आणि विशाळगडाकडे दौडू लागले. इकडे शिवरायांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीदला पालखीत बसवत खानाच्या भेटीस पाठवले. शत्रुसैन्याने ‘शिवाजी महाराज’ नाही ते हे ओळखले. सिद्दी जौहरने वीर शिवा काशीदला ठार मारले. त्याने स्वराज्यासाठी बलिदान दिले. त्याचे बलिदान व्यर्थ गेले नाही.

इकडे विशाळगडाच्या दिशेने कूच करणाऱ्या शिवरायांचा सिद्दी मसूद घोडदळासह पाठलाग करू लागला.महाराजांच्या साथीला बांदलांचे सहाशे मावळे होते.त्याचे नेतृत्व रायाजी बांदल करत होते.रात्रभर घोडदौड करून शिवराय आणि मावळे पांढरपाणी येथे पोहोचले. गनीम जवळ येत होता. शिवरायांनी आपल्याजवळील सैनिकांचे दोन भाग केले. रायाजी बांदल, संभाजी जाधव (सरसेनापती धनाजी जाधव यांचे आजोबा), हैबतराव बांदल, विठोजी काटे,बाजीप्रभू यासारख्या पराक्रमी साथीदारांना पांढरपाणी येथे ठेवले.अर्थात रायाजीनेच पांढरपाणी येथे आपण स्वतःच थांबण्याचा हट्ट धरला होता.शिवराय 300 मावळ्यांसह विशाळगडाकडे धावू लागले. घोडखिंडीतून शिवराय पुढे सरकत होते. पुढे जाण्याचा एकच मार्ग होता. रायाजी बांदल आणि त्यांच्या साथीदारांची येथेच सिद्दी मसूदच्या सैन्याशी जोरदार लढाई झाली. तीन ते चार तासांच्या धुमश्चक्रीत रायाजी बांदल,विसोजी काटे संभाजी जाधव,बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांना वीरमरण आले. एवढ्या कालावधीत शिवराय विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते.

इकडे विशाळगडाला जसवंत दळवी, सूर्यराव सुर्वे यांनी वेढा घातला होता. शिवरायांनी हा वेढा फोडला आणि गडावर सुखरूप पोहोचले. तोफांचा आवाज झाला. घोडखिंडीत अनेक मावळे धारातीर्थी पडले होते. उरलेसुरले ते जंगलात गायब झाले. सिद्दी मसूदच्या सैन्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्याचे सैन्य विशाळगडाच्या पायथ्याला भिडले; परंतु शिवरायांच्या ताज्या दमाच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. शिवरायांनी घोडखिंडीला ‘पावनखिंड’ असे नाव दिले. शिवरायांची पन्हाळगडावरून सुटका आणि रायाजी बांदल व त्यांच्या साथीदारांचा पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच आहे.सर्व काही शांत झाल्यावर शिवराय स्वतः बांदलांच्या घरी गेले आणि बांदल कुटुंबियांचे सांत्वन केले.

पन्हाळगडावरून सुटका करून घेतल्यावर शिवरायांनी आदिलशहाशी तह करून तो किल्ला आदिलशहाच्या ताब्यात दिला. इ. स. 1666 मध्ये मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने महाराष्ट्रावर मोठे संकट आले होते. त्यांच्याशी झालेल्या तहाप्रमाणे शिवराय पन्हाळगडावर चाल करून गेले; पण त्यात शिवरायांचा पराभव झाला. स्वराज्याला 1500 मावळे गमवावे लागले.

पुन्हा पन्हाळगड जिंकला :

इ. स. 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद या शूर सरदाराने अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन पन्हाळगडावर हल्ला केला व आदिलशाही सैन्याचा दारुण पराभव करून पन्हाळगड ताब्यात घेतला.

औरंगजेबचा पन्हाळगडाला वेढा :

इ. स. 2मार्च 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्यात मोठी पोकळी निर्माण झाली; परंतु रणरागिणी महाराणी ताराबाई यांनी स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.

9 मार्च 1701मध्ये औरंगजेबने स्वतः एक लाख सैन्यानिशी वेढा दिला. मराठ्यांनी सर्व शक्तीनिशी वेढा मोडण्यासाठी प्रयत्न केला. औरंगजेबच्या सैन्याचे अतोनात नुकसान होत होते. शेवटी रसद संपत आल्यावर किल्लेदार त्र्यंबकजी महाडकर यांनी मोठी रक्कम घेऊन 26 मे 1701 मध्ये गड मोगलांच्या हवाली केला.

औरंगजेब 27 वर्षे तख्त सोडून महाराष्ट्रात राहिला. त्याला मराठ्यांचे राज्य बुडवायचे होते; पण तोच स्वतः या मातीत बुडला. 20 फेब्रुवारी 1707 मध्ये अहमदनगरजवळील खुल्दाबाद येथे औरंगजेब मरण पावला.

भाऊबंदकी :

औरंगजेबने आपल्या मृत्यूपूर्वी कैदेत असलेल्या राणी येसूबाई व शाहू यांची सुटका केली. शाहूने मराठी सत्तेचा खरा वारस म्हणून स्वतःला घोषित केले. महाराणी ताराबाईंना हे मान्य नसल्यामुळे यांच्यात तेढ निर्माण झाले. शाहू व ताराबाई यांच्यात अनेक वेळा संघर्ष व युद्धेही झाली. शेवटी त्यांच्यात तह होऊन गादीचे विभाजन झाले. सातारची गादी शाहू महाराज सांभाळत तर पन्हाळगडची गादी महाराणी ताराबाई सांभाळत असे.

पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, स्मारके :(Historical buildings, temples, monuments at Panhalgad)

पन्हाळगडाची तटबंदी :(Fortification of Panhalgad)

पन्हाळगडाची तटबंदी शिलाहार, राष्ट्रकूट घराण्याच्या काळात बांधली असावी, असे काही इतिहासकारांचे मत आहे. ही तटबंदी अतिशय मजबूत असून चिरेबंदी आहे. तटबंदी सुरक्षित राहण्यासाठी तटावर गवत, झाडे उगवू दिली जात नसत. वेळोवेळी तटाची डागडुजी केली जात असे.

तटबंदीतील कोठार :(A barn in the fort)

तटबंदीमध्ये शस्त्रास्त्रे, धान्य, दारूगोळा लपवण्यासाठी खास व्यवस्था केलेली आढळते. कैदी ठेवण्यासाठीही खोल्या बांधलेल्या होत्या. अंधारबावीतून तटबंदीला असलेले भुयार आजही पाहायला मिळते.

शिवा काशिद स्मारक :(Shiva Kashid Memorial)

पन्हाळगडावर प्रवेश करताच शिवा काशिदचा पुतळा दृष्टीस पडतो. शिवरायांच्या चमत्कारिक इतिहासातील शिवा काशिद ही एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे.

सिद्दी जौहरच्या वेढ्याच्या वेळी सुटका करून घेण्यासाठी शिवरायांनी सिद्दीला ‘आम्ही तुम्हास भेटावयास येत आहोत’ असा निरोप धाडून सिद्दीच्या वेढ्याला गाफील ठेवले होते. त्यामुळे वेढा ढिला होण्यास मदत झाली.

12 जुलै 1660 रोजी पौर्णिमेच्या रात्री गडावरून दोन पालख्या निघाल्या. एक शिवरायांची आणि दुसरी शिवा काशिदची… शिवरायांची पालखी विशाळगडाच्या दिशेने जात होती; तर शिवा काशिदला ओळखायला सिद्दीला दोन तासांचा अवधी लागला होता. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी विशाळगडाच्या दिशेने कूच केले होते. इकडे सिद्दीच्या छावणीतच शिवा काशीदची ओळख पटताच त्याच्या पोटात तलवार खुपसून त्याला मारले गेले.स्वराज्यासाठी शिवा काशीदचे बलिदान अनमोल ठरले.

पडकोट (परकोट):(Padkot)

काली बुरुजाच्या बाजूस पन्हाळगडाची बाजू कमकुवत आहे हे लक्षात घेऊन या बाजूसच पन्हाळगडाचा जोडकिल्ला पावनगड आहे. पावनगडावरूनही तोफांचा मारा होऊ शकतो. म्हणूनच ही बाजू दुहेरी तटबंदी बांधून मजबूत केलेली दिसून येते. यालाच पडकोट किंवा परकोट असे म्हणतात. तोफांच्या माऱ्याने एक तटबंदी ढासळली तरी दुसऱ्या तटबंदीने संरक्षण करता येत होते. या तटबंदीतून परकोटात जाण्यासाठी दक्षिणेच्या दिशेस एक दरवाजा आहे. या दरवाजाच्या कमानीला नागशिल्पे कोरली आहेत. म्हणून या दरवाजाला ‘नागफणी दरवाजा म्हटले जात असे.

सज्जाकोठीजवळचा पडकोट :

कालीबुरुजाच्या बाजूस जसा पडकोट आहे ,तसाच पडकोट सज्जाकोठीच्या उजव्या बाजूस आहे. या पडकोटामुळे पूर्वेकडील परिसराची टेहळणी करणे सोपे जात असे. शत्रूच्या हालचालीवर लांबूनच लक्ष ठेवणे शक्य होत असे. पन्हाळगडाच्या पूर्व बाजूची तटबंदी सोडली तर सर्व दिशांना आजही चोरदरवाजे अस्तित्वात आहेत. शत्रूच्या हल्ल्यात तो उद्ध्वस्त झाला असावा असे वाटते.

गडावरचे बुरूज :(Towers on the fort)

पन्हाळगडावर जवळजवळ 48 बुरूज आहेत. सर्व बुरूज अगदी मोक्याच्या ठिकाणी बांधलेले आहेत. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी आणि लढाईच्या म्हणजे आणीबाणीच्या प्रसंगी तोफांचा मारा करण्यासाठी या बुरुजांचा वापर होत असे. आज अनेक बुरूज ढासळलेल्या अवस्थेत आहेत. इ. स. 1701 मध्ये औरंगजेबने पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्या वेळी मोगलांच्या बाजूने लढणारा छत्रसाल राठोडचा मुलगा हत्तीसिंग पन्हाळ्याच्या मोहरा बुरुजासमोर ठार झाला होता. बुरुजाला बोलीभाषेत ‘हुडा’ असे म्हणत असत.

काळा टॉवर:(Black Tower)

पन्हाळगडाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या या बुरुजावरून पन्हाळा व पानवगडाच्या मधून जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवता येत असे. या बुरुजावर तोफ होती. तोफेची दिशा फिरवण्याची तेथे खंदक पाडून सोय केली होती. त्यामुळे येथील तोफ काटकोनात वळवता येत असे. बुरुजावर असलेल्या कालीमातेच्या मंदिरावरून या बुरुजाला ‘काली बुरूज’ असे नाव पडले गेले.

* उत्तर बुरूज :(North Tower)

सज्जाकोठीच्या उत्तर दिशेला हा एक बळकट बुरूज आहे. या बुरुजावरून पन्हाळगडाच्या उत्तरेकडील भूप्रदेशावर नजर ठेवता येते. हा बुरूज अत्यंत संरक्षक आणि मोक्याच्या ठिकाणी असून वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक इतिजापैकी एक आहे. या बुरुजाच्या समोरील एक बुरूज आताच्या व्हॅली व्ह्यू हटेिलच्या ताब्यात आहे.

दुतोंडी बुरुज:(Dutondi Tower)

सध्या पन्हाळगडावर काही ठरावीकच बुरूज अस्तित्वात आहेत. जे बलदंड आणि मजबूत आहेत ते टिकले आहेत. त्यापैकी एक बुरूज म्हणजे “दुतोंडी बुरूज’ होय. या बुरुजावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या आहेत. म्हणून या बुरुजास ‘दुतोंडी बुरूज’ या नावाने ओळखले जाते. या बुरुजाच्या शेजारी ‘दौलती बुरूज’ आहे.

पुसाटी बुरूज :(Pusati tower)

पन्हाळगडाची माची ज्या ठिकाणी संपते त्या टोकाला एका मागे एक असे दोन बलदंड बुरूज बांधले आहेत. या बुरुजाच्या समोरच मसाईचे पठार आहे. एका बुरुजाकडून दुसऱ्या बुरुजाकडे जाण्यासाठी खंदक खणून वाट केलेली आहे. दोन बुरुजांकडे ये-जा करण्यासाठी असलेला दरवाजा आज पूर्णतः नामशेष झाला आहे.

अशा प्रकारे पन्हाळगडावर एकूण अट्ठेचाळीस बुरूज आहेत. त्यातील अनेक बुरूज काळाच्या ओघात नामशेष झालेले आहेत.

• पन्हाळगडावरील दरवाजे :(Doors on the panhala fort )

चार दरवाजे:(Four doors)

सध्या पन्हाळगडावर ज्या रस्त्याने वाहने जातात, त्या रस्त्याने गडावर प्रवेश केल्या केल्याच चार दरवाजाचे अवशेष दिसून येतात. पूर्व दिशेला तोंड करून दोन बलदंड बुरुजांमध्ये पहिला दरवाजा होता. त्यानंतर लगेचच दुसरा दरवाजा. चक्राकार तटाभोवती फिरल्यानंतर तिसरा दरवाजा लागतो. तेथून पुढे गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. इ. स. 1844 साली इंग्रजांनी हे चार दरवाजे उद्ध्वस्त केल्यामुळे या चार दरवाजांचे केवळ अंदाज बांधू शकतो. शत्रूला गडावर सहजासहजी प्रवेश करता येऊ नये ,या उद्देशाने एकामागे एक असे चार दरवाजे बांधलेले होते.संरक्षक आणि मोक्याच्या ठिकाणी असून वाघ दरवाजाच्या प्रमुख संरक्षक इतिजापैकी एक आहे. या बुरुजाच्या समोरील एक बुरूज आताच्या व्हॅली व्ह्यू हटेिलच्या ताब्यात आहे. या बुरुजाला सध्या ‘बाजीप्रभू बुरूज’ म्हणून ओळखले जाते.

तीन दरवाजे:(Three doors)

पन्हाळगडाच्या पश्चिमेस आजही सुरक्षित स्थितीत ‘तीन दरवाजा’ के ठिकाण आहे. या दरवाजाला ‘कोकणी दरवाजा’ असेही संबोधले जाते. या ठिकाणी एकापाठोपाठ एक असे तीन दरवाजे आहेत. सध्या येथे केवळ दगडी मळसूत्रे शिल्लक असली तरी ती सुस्थितीत आहेत.

इ. स. 1673 मध्ये कोंडाजी फर्जंटने पन्हाळगड जिंकल्यावर याच तीन दरवाजाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवरायांचे ‘सुवर्णपुष्प’ उधळून स्वागत पदस्पर्शाने पावन झाला आदिलशहाच्या कालावधीत या तीन दरवाजांचा जीर्णोद्धार झाला होता.

वाघ दरवाजा :(Tiger door)

गडाच्या उत्तर बाजूस असणारा हा दरवाजा अत्यंत मजबूत बांधणीचा होता. येथे सापडलेला शत्रू सहसा सुटू शकत नाही. म्हणूनच या दरवाजाला ‘वाघ दरवाजा’ असे नाव पडले आहे.

चोर दरवाजे:(Thief Door)

‘आपत्कालीन दरवाजे’ या नावानेही हे दरवाजे ओळखले जातात. शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी किंवा शत्रूला कचाट्यात पकडण्यासाठी या दरवाजांचा उपयोग केला जात असे. त्यापैकीच एक आजही पन्हाळगडावर अस्तित्वात आहे. तो दरवाजा ‘अंधार बाव’ या नावाने ओळखला जातो.

राजदिंडी:(Rajdindi)

पन्हाळगडावर असलेला आणखी एक आपत्कालीन दरवाजा म्हणजे ‘राजदिंडी’ होय. या दरवाजातूनच शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले होते.

गडावरील जलसंपत्ती:(Water resources on the fort Panhala)

कर्पूर बाव:(Karpur Bav)

कर्पूर बावीलाच ‘अश्वलायन तीर्थ’ असे म्हटले जाते. गडावरील एस.टी.स्टँड शेजारीच आजही ही बाव आहे. तिचे पाणी पिण्यासाठी आजही वापरले जाते.

अंधार बाव :(Dark Well)

अंधार बावीलाच ‘शृंगारबाव’ असेही म्हटले जाते. ही एक विहीर नसून दोन मजली इमारतच आहे. याच इमारतीतून गडाबाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. आजही अंधारबावीत पाणी आढळते.

जलतीर्थ:

तीन दरवाजातून आत आल्यानंतर पाण्याचे एक कुंड लागते. येथे बारमाही पाणी असते.

नागझरी :

स्वच्छ व बारमाही पाणी असलेले हे ठिकाण ‘नागझरी’ या नावाने प्रसिद्ध आहे. येथील पाणी लोहयुक्त आणि थंड आहे. प्राचीन नागवंशीय लोकांच्या वस्तीवरून या झऱ्याला ‘नागझरी’ असे नाव पडले आहे.

पन्हाळगडावरील इमारती :

पन्हाळगडावर आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊ.

अंबरखाना :

पन्हाळगडावरील सर्वांत मोठी, सुसज्ज आणि भक्कम इमारत म्हणजे ‘अंबरखाना’ होय. अंबरखान्यालाच ‘बालेकिल्ला’ असे म्हटले जाते. धान्य, गवत, कपडालत्ता, शस्त्रे, दारूगोळा यांची साठवण करून ठेवण्यासाठी या इमारतींचा उपयोग केला जात असे. इ. स. 1673 मध्ये कोंडाजी फर्जंदने गड जिंकल्यावर छत्रपती शिवरायांनी अंबरखान्याची पाहणी केली होती.

या अंबरखान्यात तीन मोठ्या कोठ्या होत्या. गंगा, यमुना, सिंधू अशी त्यांची नावे होती. या तिन्ही कोठ्यांत सुमारे 2500 खंडी धान्य मावत असे. गंगा कोठी 10200 चौरस फूट होती. सिंधू कोठी 152′ x 40′ x 18′ आकाराची होती, तर यमुना कोठी 88′ x 35′ x 30′ आकाराची होती. आजही ही इमारत सुस्थितीत पाहायला मिळते.

राजवाडा:(Palace)

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राणी येसूबाई व त्यांचा पुत्र शाहू यांना औरंगजेबने अटक केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामाची सूत्रे महाराणी ताराबाई पन्हाळगडावरून हलवत असत. त्यांनीच पन्हाळगडाला राजधानीचा दर्जा दिला व येथे राज्यकारभार पाहण्यासाठी राजवाडा बांधून घेतला. हा राजवाडा अत्यंत सुंदर व साध्या पद्धतीचा आहे. या राजवाड्यात देवघर व तुळशीवृंदावन आहे. देवघरातील चौकोनी दगडावर छत्रपती घराण्यातील पूर्वजांच्या पादुका कोरल्या आहेत.

सज्जाकोटी:

सज्जाकोठीलाच सदर-ई-महाल असेही म्हटले आहे. ही इमारत आदिलशाहीच्या कारकीर्दीत बांधली आहे. इमारतीची लांबी 36 फूट फूट व उंची 72 आहे. शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेरखान रुंदी 36 पठाणाकडून सोडवून आणल्यानंतर याच वास्तूत पिता-पुत्रांची भेट झाली. संभाजीराजांना पन्हाळा सुभ्याचा कारभार सोपवन शिवाजी महाराज रायगडला गेले. स्वराज्याचा कारभार सांभाळत शिवाजी महाराज रायगडला गेले आणि लगेच 3 एप्रिल 1680 रोजी त्याच महानिर्वाण झाले.

कलावंतीण सज्जा :

सज्जाकोठीसारखीच ही इमारत आहे. या इमारतीला नायकिणीचा सज्जा असेही म्हणतात. आज इमारतीची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे परंतु एके काळी ही इमारत अत्यंत प्रेक्षणीय अशी होती. 1844 साली इंग्रजांच्या तोफांच्या माऱ्यात ही इमारत नष्ट झाली.

रेडेमहाल :

रेडेमहाल म्हणजे वास्तुशास्त्राचा एक सुरेख नमुना होय. या इमारतीत जनावरे, रेडे बांधत असत. म्हणून या वास्तूला ‘रेडेमहाल’ असे म्हटले जात असे. शिवकाळात धान्य, कापड-चोपड ठेवण्यासाठी या इमारतींचा उपयोग केला जात असे.

धर्मकोठी:

सध्या पोलीस स्टेशन असणारी इमारत म्हणजे ‘धर्मकोठी’ होय. पूर्वी या ठिकाणी न्यायदान करण्याचे काम केले जात असे.

इतर काही महत्त्वाची स्थळे :(Important Places on Panhala Fort)

रणवीर बाजीप्रभू यांचा पुतळा :(Statue of Bajiprabhu)

पन्हाळगडावर प्रवेश करताच डाव्या बाजूला काही अंतर गेल्यावर रणवीर बाजीप्रभूचा पुतळा लागतो. हातात दोन नंग्या तलवारी घेऊन लढाईच्या आवेशात उभा असलेला हा पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पुतळा पाहताच बाजीप्रभूने पावनखिंडीत गाजवलेला पराक्रम आठवतो. पन्हाळगडावरून निसटल्यानंतर शिवराय बाजीप्रभू, संभाजी जाधव, रायाजी बांदल, विठोजी काटे फुलाजी प्रभू यासारख्या पराक्रमी सहकाऱ्यांसोबत विशाळगडावर जात असताना वाटेत पांढरे पाणी’ या ठिकाणी सिद्दी मसूदच्या सैन्याने गाठले. शिवरायांकडे सैन्याचे विभाजन करून एक तुकडी रायाजी बांदल यांच्या स्वाधीन करून पुढे जाण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. बांदलांनी शर्थीने खिंड लढवली. दोन-तीन तास शत्रूला रोखून धरले. त्यात त्यांना सर्वांना वीरमरण आले.

तबक उद्यान:(Tabak Udyan)

पन्हाळगडावरील उत्तरेकडील वाघ दरवाजा उतरून खाली गेल्यावर ‘तबक उद्यान’ लागते. हे पन्हाळगडावरील अतिशय थंड आणि निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथे सर्पोद्यान होते. आज ते नामशेष होत आहे. उद्यानात पन्हाळगडाची प्रतिकृती बनवलेली आहे. त्यामुळे पन्हाळगडावरील विविध ठिकाणांची दिशा समजण्यास मदत होते.

येथील उद्यानात झाडांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत. गडावर सहलीसाठी आलेले लोक, पर्यटक, विद्यार्थी आपल्याबरोबर बांधून आणलेल्या भोजनावर येथेच ताव मारतात.

पन्हाळा वस्तुसंग्रहालय :(Panhala museum)

शिवकालीन शस्त्रास्त्रे, नाणी, दगडी मूर्ती, काही महत्त्वाचे दस्त येथे पाहायला मिळतात. अनेक दुर्मीळ ऐतिहासिक वस्तू येथे पाहायला मिळतात.

संभाजी देवालय :

महाराणी ताराबाई यांनी आपली सवत राजसबाई यांचा पुत्र संभाजी यास गादीवर बसवून पन्हाळगडावरून राज्यकारभार चालू ठेवला होता. इ. स. 1714 ते 1760 ही त्यांची कारकीर्द होय. संभाजीराजे खूप लोकप्रिय होते. लोकांना त्यांचे रोज दर्शन घडावे म्हणूनच त्यांचे पन्हाळगडावर मंदिर बांधले. 90′ x 56′ x 55′ या आकारमानाचे हे मंदिर उभारले आहे.

पन्हाळगडावरील राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था :

गडावर राहण्यासाठी सध्या भरपूर हॉटेल्स आहेत. याशिवाय कोल्हापुरात मुक्काम करूनही काही पर्यटक पन्हाळगड पाहण्यासाठी जातात. त्यामुळे पर्यटकांची राहण्याची व खाण्यापिण्याची गैरसोय होत नाही.

Leave a comment