दौलताबादचा किल्ला/देवगिरी/Daulatabad Fort/Devgiri Fort

औरंगाबाद जिल्ह्यातील गड /Fort in Aurangabad district

देवगिरीचा अजिंक्य आणि अभेद्य किल्ला म्हणजे दौलताबादचा एक डोंगरच होय. या किल्ल्याचे मूळ नाव ‘देवगिरी’ असेच आहे. अतिशय सुंदर, देखणा, सुरक्षित, अद्भुत असा हा किल्ला आहे. यादवांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. अशा या डोंगरी आणि भुईकोट यांचा मिलाफ झालेल्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.

किल्ल्याचे नाव: देवगिरी/दौलताबाद

समुद्रसपाटीपासून उंची : 2975 फूट. सुमारे 900 मी.

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग / भुईकोट

डोंगररांग : देवगिरी

जवळचे गाव : औरंगाबाद, दौलताबाद

जिल्हा : औरंगाबाद

औरंगाबादपासून अंतर : 15 किमी

स्थापना : इ. स. 1187

देवगिरीला कसे जाल ?How to go to Devagiri?

औरंगाबाद शहरातून थेट देवगिरीला जाता येते. औरंगाबादमधून बसेस, टॅक्सीने देवगिरीला अगदी अर्ध्या तासात जाता येते. औरंगाबादहून देवगिरी फक्त 15 ते 17 किमी आहे.

धुळ्याहून देवगिरीचा किल्ला पाहण्यासाठी येता येते. धुळ्याहून देवगिरीचा

किल्ला 132 किमी अंतरावर आहे.

जालन्याहूनही देवगिरीला जाता येते. जालना ते देवगिरीचा किल्ला हे अंतर 76 किमी आहे.

अजिंठा लेणी पाहून देवगिरीचा किल्ला पाहता येतो. अजिंठा ते देवगिरीचा किल्ला 103 किमीचे अंतर आहे.

इतिहास: History of Daulatabad.

जनमत चाचणीच्या आधारे महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे दौलताबादचा किल्ला होय. या किल्ल्याचा इतिहास एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. दौलताबादच्या डोंगरावर वसलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव ‘देवगिरी’ असेच आहे.

इतिहासकारांच्या मते, दौलताबादच्या या बुलंद किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा वल्लभ याने इ. स. आठव्या शतकात केली. राष्ट्रकूटांच्या दुबळ्या सत्तेचा फायदा घेऊन कल्याणीच्या चालुक्याची ताबेदारी झुगारून यादव कुळातील पराक्रमी राजा भिल्लम यादव याने या बलाढ्य दुर्गाच्या साहाय्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. यादवांच्या सत्तेचा केंद्रबिंदू हा ‘देवगिरी’ किल्लाच होता.

काही इतिहासकारांच्या मते, यादवांच्या काळातच हा किल्ला उदयास आला. राष्ट्रकूटांच्या काळात अर्धवट राहिलेल्या या किल्ल्याचे पुनरुज्जीवन भिल्लम यादव या पराक्रमी राजाने केले. इ. स. 1187 ते इ. स. 1318 या प्रदीर्घ कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात, कर्नाटकातील काही भागात यादवांचे राज्य होते. नाशिकजवळील सेऊण देशचा राजा पाचवा भिल्लम याने इ. स. 1187 मध्ये हा दुर्ग बांधला. जवळजवळ सव्वाशे वर्षांचा यादवांच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे.

दौलताबादच्या या किल्ल्याला ‘देवगिरी’ हे नाव कसे पडले याचा वेगवेगळा इतिहास सांगितला जातो. यादवकुलीन राजे आपल्या नावापुढे देव ही उपाधी लावून घेत असत. देवांचे अज्ञधिपत्य असलेला गिरी (डोंगर) म्हणजे ‘देवगिरी’ असेही म्हटले जाते; परंतु देवगिरीचा उल्लेख यादवांच्या अगोदरपासून प्रचलित होतज्ञ. त्यामुळे देवगिरीवरूनच यादवांनी ‘देव’ ही उपाधी लावून घेतल्याची शक्यताही आहे.

कित्येक वर्षे अजिंक्य राहिलेल्या या किल्ल्यावर इ. स. 1294 मध्ये दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने स्वारी केली. दिल्लीच्या बादशहाची दक्षिणेकडील ही पहिलीच स्वारी होती. त्या वेळी देवगिरीवर रामदेवराव सभी सत्ता होती. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवरायचा पराभव केला. या लढाईनंतर रामदेोकाय आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात ताह झाला. या तहानुसार देवगिरीचा किल्ला रामदेवरायकडेच राहिला. त्यानंतर कुतुबुद्दीन मुबारक खिलजीन इ. स. 1318 साली देवगिरीवर पुन्हा हाल्ला चढवला. या लढाईत देवगिरीचा गाजा हरपाळदेव बाचा दारुण पराभव झाला. त्याला अमानुषपणे सोलून यर मारण्यात आले.

इ. स. 1318 मध्ये बादवांची सत्ता संपुष्टात आली आणि सुलतानांचे साज्य सुरू झाले. इ. स. 1327 मध्ये महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने दिल्लीची राजधानी मध्यवर्ती ठिकाणी हलवण्याच्या उद्देशाने ती देवमिनीवर आणली. त्यानेच देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’ असे ठेवले. पण ही राजधानी तुघलकाला फार काळ टिकवता आली नाही. नाइलाजाने तुघलकाने राजधानी पुन्हा दिल्लीला हलवली.

इ. स. 1347 पासून दिल्लीच्या सुलतानशाहीत सत्ता-संघर्ष सुरू झाला. हसन गंगू बहमनी याने आपले स्वतःचे राज्य स्थापन केले. हेच ‘बहमनी राज्य होय. बहमनी राजांनी सुमारे दीडशे वर्षे राज्य केल्यानंतर या सत्तेचेही पुढे पाच तुकडे झाले. त्यातीलच एक म्हणजे अहमदनगरची निजामशाही होय. निजामशहाने आपले राज्य दौलताबाद येथे सुरू केले. निजामशाहीचे राज्य सुमारे 135 वर्षे टिकले.

इ. स. 1633 मध्ये दिल्लीचा मुघल बादशाह शाहजहान याने दौलताबादचा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला. पुन्हा शाहजहानला त्याचा पुत्र औरंगजेब याने तुरुंगात ठेवून आपण स्वतः बादशहा बनला. त्याने गादी बळकावण्यासाठी स्वतःच्या भावंडांनाही ठार मारले. त्यानंतर हा किल्ला औरंगजेबच्या ताब्यात आला.

इ. स. 1724 मध्ये दौलताबादचे वैभव हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेले, मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला; पण दौलताबादचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात फार काळ राहिला नाही. इ. स. 1760 मध्ये सदाशिवराव भाऊ पेशवा आणि निजाम यांच्यात उद्‌गीर येथे तुंबळ लढाई झाली. या लढाईत सदाशिवरावभाऊंनी निजामाचा पराभव केला. निजाम आणि सदाशिवराव भाऊ यांच्या झालेल्या तहात निजामाने दौलताबादचा किल्ला मराठ्यांना दिला. पानिपतच्या लढाईच्या पूर्वी मराठ्यांना मिळालेला हा पहिला विजय होता. या विजयानंतर सदाशिवराव भाऊ उत्तरेला निघून गेले. ते उत्तरेला जाताच निजामाने हा किल्ला पुन्हा 1762 मध्ये ताब्यात घेतला. केवळ दोन वर्षेच दौलताबादचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला.

इंग्रजांनी संपूर्ण भारतभर आपली सत्ता निर्माण केली होती. दौलताबादचा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला असला तरी तो किल्ला हैदराबादच्या संस्थानाच्या नावावर 1948 सालापर्यंत राहिला. भारत स्वतंत्र झाल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुमारे 600 संस्थानांचे भारतात विलिनीकरण केले. त्यात हैदराबादचे संस्थानही होते.

भारत सरकारने दौलताबादच्या किल्ल्याला 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

देवगिरी (दौलताबाद) च्या किल्ल्याची वैशिष्ट्ये:

 

देवगिरीचा किल्ला यादवांच्या वैभवशाली घराण्याचा आणि त्यांच्या सत्तेचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो.

देवगिरीवर जनार्दन पंतांसारख्या संतांचे वास्तव्य होते. त्यांची समाधीही देवगिरीवर आहे. याशिवाय ग्रंथकार हेमाद्री, गोपदेव, कवी नरेंद्र यांचेही वास्तव्य या किल्ल्यावर होते. त्यातील हेमाद्रीने हेमाडपंथी मंदिरांचा पाया रचला. महाराष्ट्रात आजही कित्येक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहायला मिळतात. ही मंदिरे अत्यंत मजबूत स्थितीत आहेत.दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने दिल्लीची गादी हलवून देवगिरीला आणली. त्यानेच या ऐश्वर्यसंपन्न किल्ल्याला ‘दौलताबाद’ असे नाव दिले.

दौलताबादच्या या किल्ल्याची उंची जमिनीपासून 200 मीटर आहे. किल्ल्याचा निम्मा भाग सभोवताली तासला आहे. त्यामुळे किल्ल्यावर आक्रमण करणे खूपच अवघड होते.

किल्ल्याच्या सभोवताली खंदक खोदले आहे. तसेच बालेकिल्ल्याच्या सभोवताली पाण्याचे खंदक असल्यामुळे शत्रूला सहजासहजी हा किल्ला जिंकता येत नसे.

दौलताबादच्या किल्ल्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणाजे किल्ल्याच्या सभोवताली तीन महत्त्वाच्या तटबंदी आहेत. या तटबंदीला कोट असे म्हटले जाते. संपूर्ण गावाभोवती एक तट आहे. त्याला अंबरकोट म्हणतात. अंबरकोटातून आत प्रवेश केल्यावर आणखी दोन तटबंद्या पार कराव्या लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच महाकोट तटबंदी लागते. या महाकोटात आठ दरवाजे आहेत. त्यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही. त्यामुळे हत्तीच्या साहाय्याने दरवाजे तोडणे अवघड जात असे.

किल्ल्याच्या आतील तटबंदीला कालाकोटची तटबंदी म्हणतात. किल्ल्त्याचा भुईकोट भाग संपल्यानंतर बालेकिल्ल्यास आरंभ होतो. बालेकिल्ल्याच्या सभोवताली खोल खंदक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण खंदकात पाणी आहे. पूर्वी या खंदकात मगरी सोडलेल्या असायच्या. त्यामुळे पाण्यातून पोहुन बालेकिल्ल्यात जाणे अवघड जायचे.

बालेकिल्ल्यात जाण्यासाठी अंधारी मार्ग लागतो. या अंधारी मार्गातून शत्रूला सहजासहजी बालेकिल्ल्यावर जाणे अशक्य असायचे. अंधारी मार्गात अनेक अडथळे आहेत. अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायचा पराभव केला तो केवळ फितुरीमुळेच! म्हणूनच हा किल्ला अजिंक्य आणि अभेद्य किल्ला असे मानले जाते.

किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर तोफा आहेत. इतक्या मोठ्या तोफा गाडावर नेल्या असतील की गडावरच बनवल्या असतील, याचा उलगडा होत नाही. आजही या तोफा मजबूत आणि सुस्थितीत आहेत.

 

देवगिरी म्हणजेच दौलताबादच्या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला भुईकोट आणि गिरिदुर्ग या दोन्हीही वर्गात येतो.

गडाच्या टोकावर गेल्यानंतर टोकावरून गडाची संपूर्ण रचना कशी आहे, हे दिसते. शिवाय चहुबाजूचा 15-20 कोसचा भूप्रदेश दिसतो. गडावर जाताना दुर्बीण घेऊन गेल्यास सभोवतालचा प्रदेश स्पष्टपणे पाहण्याचा आनंद लुटता येतो.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :Sights of the fort

तटबंदी :

दौलताबादच्या किल्ल्याला तीन मुख्य तटबंदी आहेत. त्यातील पहिली तटबंदी म्हणजे महाकोट तटबंदी होय. या तटबंदीला किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणतात. हे प्रवेशद्वार आजही मजबूत आणि कणखर आहे. या तटबंदीला लाकडी प्रवेशद्वारे असून या प्रवेशद्वारातून एका वेळी सहज दोन हत्ती प्रवेश करतील एवढे रुंद आहे. दरवाजांना मोठाले असे खिळे आहेत. हे टोकदार खिळे आजही सुस्थितीत पाहायला मिळतात. या महाकोटालाच दुसरा एक दरवाजा आहे. तोही सुस्थितीत आहे. दौलताबादच्या परिसरात सापडलेल्या तोफा येथे मांडून ठेवल्या आहेत.किल्ल्याच्या आतील तटबंदीला कालाकोटची तटबंदी म्हणतात.

महाकोटावरील टेहळणी बुरूज :

महाकोटावर टेहळणी बुरूज आहे. हा बुरूज अतिशय मजबूत आहे. या बुरुजावरून दूरचे दिसते. त्यामुळे लांबून येणाऱ्या शत्रूची चाहूल लागते. शत्रूवर मारा करताना लपून बसण्याची सोय पण या बुरुजावर आहे. विशेष म्हणजे या बुरुजावरून घुमटाकार असलेला संपूर्ण किल्ला स्पष्टपणे दिसतो. बुरुजाच्या वरच्या भागात तीन कमानी असलेला सज्जा आहे. या सज्जाचा उपयोग टेहळणीसाठी व शत्रूवर लपून मारा करण्यासाठी होत असे.

किल्ल्यातील विहिरी :

 

दौलताबादच्या किल्ल्यावर इतर गडांप्रमाणेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खणल्या आहेत. विहिरीचे बांधकाम करून घेतले आहे. आजही त्या सुस्थितीत असून त्यांना बारमाही पाणी असते.

गडावर सरस्वती विहीर, कचेरी विहीर, शक्कर बावडी, कडा बावडी या प्रसिद्ध विहिरी आहेत. ‘पायऱ्या असलेल्या विहिरींना त्या काळी बारव किंवा बावडी म्हणत. अंबरकोटच्या जवळ शक्कर बावडी आहे. कचेरीजवळ असलेल्या विहिरीला कचेरी बारव म्हटले जाई. तटाबाहेर कडा बावडी आहे.

हत्ती हौद :

दौलताबादमधील अतिशय भव्य असा हौद म्हणजे ‘हत्ती हौद’ होय. हा हौद भव्य असल्यामुळे त्याला ‘हत्ती हौद’ असे नाव पडले. या हौदाच्या काठावर उभे राहून टाळी वाजवल्यास आपणास प्रतिध्वनी ऐकू येतो. या हौदाची लांबी 47.75 मी., रुंदी 46.75 मी. आणि खोली 6.61 मी. आहे.

भारतमाता मंदिर:

हत्ती हौदाच्या बाजूलाच घुमट असलेले एक प्रचंड व सुंदर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक विशाल प्रांगण लागते. या प्रांगणासमोरच स्तंभ असलेले मंदिर दिसतो. हेच ते ‘भारतमाता मंदिर’ होय.

 

मंदिरात प्रवेश करताच स्तंभाच्या मधोमध भारतमातेची मूर्ती स्पष्टपणे दिसते. मूर्ती अतिशय सुंदर आहे. भारतमातेच्या हातात तलवार, नाग, सुदर्शन चक्र, त्रिशूल इत्यादी शस्त्रे- अस्त्रे आहेत. मंदिरातील शिल्पकला अप्रतिम असून स्तंभ एका सरळ रेषेत आहे. मंदिराच्या प्रांगणात काही स्तंभांचे अवशेष पडलेले दिसतात.

हे मंदिर यादवांच्या काळातच निर्माण झाले असे मानले जाते. मुळात हे जैन मंदिर होते. दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन मुबारक खिलजीने इ. स. 1318 मध्ये या मंदिराचे मशिदीत रूपांतर केले होते.

इ. स. 1948 मध्ये संस्थानांचे विलिनीकरण झाल्यावर मंदिरात भारतमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून हे मंदिर ‘भारतमाता मंदिर’ म्हणून ओळखले जाते.

चांदमिनार :Chand Minar

दौलताबाद किल्ल्याचे वैभव म्हणून चांदमिनारकडे पाहिले जाते. दिल्ली येथे असलेल्या कुतुबमिनारप्रमाणेच हा चांदमिनार शोभिवंत आणि आकर्षक आहे. महाकोट ओलांडताच चांदमिनार दृष्टिक्षेपात येतो. 65 मीटर उंच असलेला हा चांदमिनार किल्ल्याच्या बहुतेक सर्व परिसरातून दिसतो. मिनारचा पायाजवळील परीघ 10 मीटर आहे.

भारतमाता मंदिराच्या उजवीकडील दरवाजातून बाहेर पडताच चांदमिनार लागतो. मिनारचे नक्षीकाम व कोरीवकाम अप्रतिम आहे. मिनारच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत. सध्या मिनारवर जाण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव मनाई केली आहे.

हा मिनार सुलतान अहमदशाह बहमनीने बांधला आहे, असे मानले जाते. इ. स. 1447 मध्ये या मिनारचे बांधकाम पूर्ण झाले.

चिनी महाल :Chini Mahal

या महालाच्या सजावटीसाठी व नक्षीकाम्मासाठी मोठ्या प्रमाणात चिनीमातीच्या टाईल्सचा वापर केलेला आढळतो. त्यावरूनच या महालाचे नाव ‘चिनी महाल’ असे पडले आहे.

त्या काळी या चिनी महालाचा उपयोग कारागृहासाठी केला जात असे. मराठ्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर औरंगजे बने हत्या केल्यानंतर राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कित्येक वर्षे याच महालात कैद करून ठेवले होते. गोवळकोंड्याचा शेवटचा कुतुबशहा अबुल हसन, तानाशहा, विजापूरच्या आदिलशाहीचा शेवटचा बादशहा सिकंदर या सर्वांनाही याच महालात कैद करून ठेवले होते. थोडक्यात हा महाल राजकैद्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी वापरला जात असे.

मेंढा तोफ : Mendha Tope

 

गडावर अतिशय मजबूत आणि सुस्थितीत असलेली तोफ म्हणजे ‘मेंढा तोफ’ होय. या तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे. म्हणूनच या तोफेला ‘मेंढा तोफ’ असे नाव पडले.

चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर ही तोफ आहे. या तोफेवर ‘तोफ किला शिकन’ असे लिहिलेले आहे. तोफ किला शिकन म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ होय. या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ सर्व बाजूंना वळवता येते. तिची लांबी सात मीटर असून ती मिश्रधातूंची बनलेली आहे. तोफेला अद्याप काडीमात्रही गंज चढलेला नाही. या तोफेवर औरंगजेब बादशहाचे व कारागीर महंमद अरब याचे नाव आहे. त्यामुळे ही तोफ औरंगजेबाच्या काळातील मानली जाते. तोफेवर कुराणातील एक वचनही कोरलेले आहे.

निजामशाही राजवाडा :Nijamshahi Rajwada

दौलताबादमध्ये केवळ अवशेष रूपात हा ‘निजामशाही राजवाडा’ उभा आहे. मेंढा तोफेजवळच डावीकडे अंतरावर या वाड्याचे अवशेष आहेत. या राजवाड्यास दोन दरवाजे आहेत. स्थापत्त्यकलेचा आणि सौंदर्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हा राजवाडा होय.

किल्ला संरक्षक खंदक:

दौलताबाद किल्ला अभेद्य आणि अजिंक्य मानला जातो, त्याचे कारण म्हणजे या किल्ल्याच्या सभोवती असणारी दोन खंदके होय. पहिले खंदक हे कोरडे खंदक आहे. हे खंदक पार करणे खूप धोकादायक आहे. दुसरे खंदक पाण्याचे खंदक आहे. या खंदकात मगरी सोडलेल्या असायच्या. त्यामुळे हे खंदक पहिल्या खंदकापेक्षा खतरनाक होते. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पाण्याचे खंदक पार करावे लागते. हे खंदक पार करण्यासाठी पूर्वीचा एक पूल आहे. शत्रूची चाहूल लागताच खंदकात पाणी सोडले जाई. त्यामुळे पूल पाण्याखाली जायचा आणि वाट बंद व्हायची. त्यामुळे पूल कोठे आहे हे शत्रूला कळत नसे.

केवळ फंदफितुरीमुळे हा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला. सध्या पर्यटकांना बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी पुलाची सोय केली आहे. हा पूल 1952 साली बांधला. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

अंधारी व भुलभुलैया मार्ग :

महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी इतका बिकट आणि भुलभुलैयाचा मार्ग नसेल. देवगिरीवर मात्र असा मार्ग आहे. या मार्गाला ‘अंधारी मार्ग’ असे म्हणतात. पाण्याच्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडताच डोंगर पोखरून केलेला हा अंधारी मार्ग सुरू होतो. हा मार्ग वळणावळणाचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा असा आहे. मध्येच खाई लागते. शत्रूने प्रवेश केलाच तर तप्त निखारे अंगावर ओतण्याची सोय होती. हा मार्ग ओलांडण्यासाठी पूर्वी मशालीचा वापर केला जात असे. सध्या अनेक पर्यटक बॅटऱ्या घेऊन जातात.

 

बारादरी:

दौलताबाद किल्ल्यावरील मध्ययुगीन काळातील उत्कृष्ट नमुना म्हणजे ‘बारादरी’ इमारत होय. संपूर्ण किल्ल्यात चांगल्या अवस्थेत असलेली ही इमारत अष्टकोनी असून मुघल सम्राट शाहजहान याच्या काळात बांधलेली आहे.

या इमारतीला बारा कमानी आहेत. म्हणूनच तिला ‘बारादरी’ असे नाव पडले. या इमारतीवरून किल्ला न्याहाळता येतो. तसेच या इमारतीजवळच मोती टाकी आहे. या टाकीचे पाणी आजही पिण्यासाठी वापरतात.

श्री जनार्दन स्वामी यांची ध्यानगुंफा :

संत एकनाथ महाराज यांचे गुरू जनार्दन स्वामी यांनी या किल्ल्यावर कित्येक काळ वास्तव्य केले होते. किल्ल्याच्या अगदी उंचावरील स्थळ म्हणजे जनार्दन स्वामींची ‘ध्यानगुंफा’ होय.

जनार्दन हे चाळीसगावचे देशपांडे. निजामशाहीच्या काळात ते दौलताबादचे किल्लेदार होते. त्यांनी याच गडावर खूप ज्ञानसाधना केली. ते जेथे ज्ञानसाधना करीत होते तेथेच श्री दत्तात्रेय यांनी येऊन दर्शन दिले अशी आख्यायिका आहे. येथे जनार्दन स्वामी आणि श्री दत्तात्रेय यांच्या पादुका आहेत. मार्गशीर्ष वद्य एकादशीला गडावर यात्रा भरते.

कालापहाड तोफ व दुर्गा तोफ :

गडावर अगदी उंच ठिकाणी बालेकिल्ल्यावर असलेल्या या दोन तोफा काळ्या कुळकुळीत असून मिश्र धातूंपासून बनवलेल्या आहेत. त्या कित्येक वर्षांचे ऊन- पाऊस झेलूनही गंजलेल्या नाहीत. अभंग अवस्थेतील या तोफा पाहिल्यानंतर त्या काळात मिश्रधातूंपासून बनवलेल्या या तोफांच्या कारागिरीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.

शाही हमाम: Shahi Hamam

 

किल्ल्याच्या बाहेर असलेल्या महाकोट व अंबरकोट यांच्यामध्ये ही इमारत आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीला कोठेही खिडक्या नाहीत. प्रकाश येण्यासाठी छतावर झरोक्याची सोय आहे. त्या काळी येथे थंड व गरम पाण्याची सोय होती. किल्ल्यातील अशा प्रकारची स्नानगृहे आता नष्ट झाली आहेत. शाही हमामातील स्नानगृह अप्रतिम आहे.

दौलताबादचा म्हणजेच देवगिरीचा अप्रतिम किल्ला व्यवस्थित पाहायचा झाल्यास आणि इतिहास उलगडून घ्यायचा झाल्यास किमान तीन ते चार तास लागतात. तरीही किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला लागल्यावर मन कुठेतरी अतृप्त राहिल्यासारखे जाणवते !

आयुष्यात एकदा तरी दौलताबादचा हा डौलदार किल्ला पाहावाच असा आहे.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

दौलताबादचा हा किल्ला औरंगाबाद शहराला लागूनच सुमारे 15-16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच दौलताबाद नगराच्या जवळच आहे. त्यामुळे पर्यटकांना, इतिहासकारांना हा किल्ला पाहण्यासाठी मुक्काम करायचा झाल्यास औरंगाबाद शहरात किंवा दौलताबादमध्ये ते आरामात राहून सकाळी किल्ला पाहण्याचा आनंद लुटू शकतात.

Leave a comment