गुढी पाडवा- चैत्र पाडवा/Gudhi Padwa

भारत हा महान संस्कृती आणि परंपरा जपणारा देश आहे.सण आणि उत्सव हे भारतीय जीवनातील अविभाज्य घटक आहेत. सण-उत्सव साजरे करताना भारतीय माणूस निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आनंद लुटतो. परंपरेचा ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करतो. गुढी पाडवा म्हणजेच चैत्र पाडवा. हा सणही असाच आनंदात आपण साजरा करतो.

गुढीपाडवा दरवर्षी केव्हा येतो?

भारतीय सौर वर्षाचे बारा महिने आहेत.चैत्र हा पहिला महिना होय; तर फाल्गुन हा शेवटचा महिना होय. या प्रत्येक महिन्याचा निसर्गातील बद‌लाशी संबंध आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीय सौर वर्षाचा पहिला दिवस.हाच नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो.नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत गुढ्या उभारून करण्याची प्रथा खूप प्राचीन आहे. चैत्र शु‌द्ध प्रतिपदेला गुढीपाडवा किंवा चैत्र पाडवा येतो.

हवामानातील आणि निसर्गातील बदलाप्रमाणे भारतात सहा ऋतू मानले जातात. त्यांतील वसंत हा पहिला ऋतू येतो. या वसंत ऋतूतच चैत्र पाडवा येतो. निसर्गात वनस्पतींना या काळात नवीन पालवी येते. या पालवीला चैत्रपालवी असे म्हणतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त :

भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्त खूप महत्वाचे मानले जातात.विजयादशमी, दिवाळी पाडवा आणि गुढी पाडवा हे तीन मुहूर्त आणि अक्षय्य तृतीयेचा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त मानले जातात. गुढीपाडवा हा या मुहूर्तांतील पहिला मुहूर्त असून या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जाते; पण या गोष्टी आता मागे पडत गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मुहूर्त पाहून कोणत्याही कामाला सुरुवात करत नसत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी शुभ आहे ,असे शिवराय मानत. त्यामुळेच पुरोगामी विचाराचा वारसा असलेले छत्रपती म्हणून शिवाजी मह‌ाराजांकडे पाहिले जाते.

गुढीपाडव्याची परंपरा :

महाभारतातील खिल पर्वात श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यांसह इंद्राची पर्वा न करता नववर्ष प्रतिपदेला गुढ्या उभा केल्या.श्रीकृष्णाने इंद्राचा नैवेद्यही बंद केला होता.श्रीकृष्णाने प्राचीन परंपरेला छेद देऊन आपले स्वतःचे असे तत्त्वज्ञान मांडले होते. हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनतेला आवडत असे.

रामायण काळात राजा रामाने रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, बिभीषण हे सर्व कुबेराच्या पुष्पक यानातून आयोध्येला आले. आयोध्या वासियांनी गुढ्या उभा करून सर्वांचे स्वागत केले. हा स्वागताचा दिवस म्हणजेच चैत्र शु‌द्ध प्रतिपदा होय. त्यालाच आपण गुढीपाडवा म्हणतो.तेव्हापासून राम राज्य सुरु झाले. नवीन वर्षारंभ झाला असेही मानले जाते.

शालिवाहन शके:

गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव करून आपले नवीन राज्य निर्माण केले. शालिवाहन राजांची राजधानी महाराष्ट्रातील पैठण येथे होती.शालिवाहन राजांची खूप वर्षेपर्यंत परंपरा होती. इ.स. 0078 साली म्हणजे ख्रिस्त जन्मानंतर शालिवाहन शक सुरु झाले. शालिवाहन घराण्यात मातृसत्ताक कुटुंबपद्‌धती होती. गौतमी हे सातकर्णीच्या आईचे नाव. आईच्या नावावरून मुलांची ओळख होत असे. शालिवाहन राजघराण्याचा उद‌य सम्राट अशोकानंतर सुमारे तीनशे वर्षांनी झाला. त्यावेळी संपूर्ण भारतात बौ‌द्ध धर्माच्या विचारांचा प्रभाव होता. शालिवाहन राजांनीही बौद्‌ध लेण्यांची निर्मिती केली होती. काही लेण्यांमध्ये त्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा आढळतात. यावरून शालिवाहन राजे बौद्ध विचाराचा वारसा चालवणारे होते, असे वाटते. शालिवाहन राजांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढी पाडव्याला नवीन शक चालू केले. शक म्हणजे वर्षगणना होय. या शकाला शालिवाहन शक असे म्हटले जाते. . इ.स.2024 ला 1945 वर्षे शालिवाहन शकेने पूर्ण केली आहेत.

विक्रम संवत

विक्रम संवत हे विक्रमादित्य राजाने सुरु केलेले कालगणना वर्ष होय. संवत म्हणते वर्ष. ही कालगणना इ.स.पू. 55/56 साली सुरु झाली.विक्रमादित्य हा बलाढ्य राजा होता.त्याने भारतात पहिली आधुनिक कालगणना निर्माण केली. 2024 साली विक्रम संवत वर्षाला 2080 वर्षे पूर्ण होत आहेत.विक्रमादित्य राजाने ही कालगणना चैत्र शुद्‌ध प्रतिपदेला सुरु केली.

शिवशक:

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राचीन परंपरेला फाटा देऊन शिवराज्याभिषेकापासून नवीन कालगणना सुरु केली. 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक झाला.या दिवसापासून नवीन वर्षारंभाला सुरुवात केली. यालाच शिवशके असे म्हणतात.

गुढी उभा करण्याची प्रथा-परंपरा

 

महाभारतात गुढी हा शब्द आला नसून पताका’ आलेला आहे.. ज्ञानेश्वरीत म्हणजे बाराव्या शतकात गुढीचा उल्लेख पुढील प्रमाणे आलेला आहे-

अधर्माची अवधी तोंडी । दोषांची लिहिली फाडी।।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।
असा उल्लेख झालेला आहे.

संत चोखोबा म्हणतात –

टाळी वाजवावी ।गुढी उभारावी। वाट ही चालावी पंढरीची ।।

संत तुकारामाच्या अभंगात पुढील प्रमाणे उल्लेख आला आहे –

पुढे पाठ‌विले गोविंद‌ गोपाळा ।
देऊन चपळा हाती गुढी ॥

वरील सर्व उदाहर‌णातून गुढी म्हणजेच पताका (ध्वज) उभारणे ,गुढी हातात घेऊन नाचणे या अर्थाने आलेला आहे.

महाराष्ट्रात खेड्यापाड्यात गुढी पाडव्या दिवशी गुढ्या उभा करतात. सकाळी लवकर उरून अंघोळ करून गुढीला स्नान घालतात. तिला गंध, पुष्पे अर्पण करतात आणि तिची पूजा करून पोळीचा नैवेद्य दाखवतात.

महाराष्ट्रात गुढी उभा करताना उलटा तांब्या गुढीच्या टोकाला अडकवतात. तिला साडी-चोळी परिधान करतात. हळदी-कुंकू लावून पूजा करतात. या विधीला इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी विरोध केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूची विटंबना करण्यासाठी तथाकथित दांभिक सनातन्यांनी अशा प्र‌था छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर सुरू केली. या प्रथेचे अनुकरण महाराष्ट्रातील भोळा-भाबडा समाज करत आला आहे.

गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून त्यांचे शिर धडावेगळे करून से काठीत अडकून वढूज परिसरात सगळीकडे फिरवले होते हा उलटा तांब्या किंवा कलश हे ‘शिराचे’ प्रतीक मानून सनातन्यांनी त्यादिवसापासून गुढी पाडव्याला गुढीच्या टोकाला उलटा तांब्या लटकवला आणि उत्सव साजरा केला. आपण त्याचे अनुकरण न करता काठीला पताका किंवा भगवा ध्वज लावून गुढीपाडवा साजरा करावा.

नववर्षाची सुरुवात करताना गुढी उभारू‌न तिला भगवा ध्वज लावावा हीच खरी आपली परंपरा आहे.

गुढीपाडव्याचे व्यारोग्यविषयक महत्त्व/Medicinal importance of Gudhipadva

 

महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारल्यानंतर कडुनिंबाचा पाला,खोबरे, गूळ, हरभरा डाळ यांचे मिश्रण बनवून खातात. हे मिश्रण उष्णतारोधक आहे.पित्तनाशक आहे. शिवाय हे मिश्रण खाल्ल्यामुळे चांगली भूक लागते. गुढी पाडव्यापासून तीव्र उन्हाळा जाणवू लागतो. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे मिश्रण खातात, असे मिश्रण केवळ गुढी पाडव्यादिवशी न खाता उन्ह‌ाळ्यात दररोज खाल्ले पाहिजे.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक
माजी शिक्षण विस्तार अधिकारी ,राधानगरी.

Leave a comment