भारतीय संस्कृतीला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा सांस्कृतिक वारसा प्राचीन काळापासून आपण सण, उत्सव, समारंभ, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेतून आपण घेतलेला आहे. रक्षाबंधन हा बहीण-भावासाठी महत्त्वाचा असलेला एक सण आहे. या सणाबद्दल आपण अधिक माहिती घेऊया,
रक्षाबंधन हा सण केव्हा येतो?When is the festival of Rakshabandhan?
बहीण-भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण भारतीय चांद्र-सौर वर्षाप्रमाणे श्रावण शुद्ध पौर्णिमेला येतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंतचे सर्व बहीण-भाऊ रक्षाबंधनादिवशी एकत्र येतात. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.
नारळी पौर्णिमा हा सण केव्हा साजरा करतात ?When is the festival of Narli Pournima celebrated?
नारळी पौर्णिमा हा सण भारतीय चांद्र-सौर वर्षाप्रमाणे श्रावण शुद्ध पौर्णिमेला येतो. नारळी पौर्णिमेदिवशीच रक्षाबंधन हा सणही येतो. नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा सण आहे. कोळी बांधव हा सण मोठ्या उत्साहात नाचत गात साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव आपल्या होड्यांची पूजा करतात. समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. काही कोळी बांधव तर सोन्याचा मुलामा असलेला छोटा नारळ समुद्राला अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो.म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या सणाला कोळी बांधवांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते.
रक्षाबंधन हा सण का साजरा करतात ?Why is Rakshabandhan celebrated?
रक्षाबंधन हा सण बहीण भावांच्या जीवनातील आनंदाचा सण आहे. या दिवशी घरातील सर्वमंडळी सकाळी लवकर उठून, स्नानसंध्या करून कुलदैवताचा आणि वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेतात. घरात आनंददायी वातावरण असते.
रक्षाबंधनाच्या सणाच्या चार दिवस आधीपासूनच बहीण भावांच्या आनंदाला उधाण आलेले असते. बहीण भावासाठी सुंदर राखी खरेदी करण्यात गुंतलेली असते. तर भाऊ बहिणीसाठी काही तरी गिफ्ट घेण्यासाठी उतावीळ झालेला असतो. रक्षाबंधन हा सण गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्व घरातील लोक आनंदाने साजरा करतात. लाल धागा, राखी, चांदीची राखी, सोन्याची राखी असे ऐपतीप्रमाणे बहीण भावासाठी राखी खरेदी करते.भाऊ बहिणीसाठी साडीचोळी, वयानुरूप उपयोगी वस्तू, गिफ्ट, सोन्याची वस्तू असे काहीतरी खरेदी करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला आरती करून औक्षण करते आणि भावाच्या हातात राधी बांधते. भाऊ बहिणीसाठी आणलेले गिफ्ट ओवाळणी म्हणून बहिणीला देतो आणि बहिणीच्या रक्षणाची हमी घेतो.बहीण लग्न करून पतीच्या घरी गेली असल्यास भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्याकडून राखी बांधून घेतो.
आधुनिकीकरण आणि धावत्या युगात रक्षाबंधनाच्या दिवशी आणि भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाची भेट होईलच असे नाही. भाऊ अमेरिकेत, तर बहीण भारतात. बहीण जर्मनीमध्ये ,तर भाऊ इंग्लंडमध्ये अशी परिस्थिती अनेक वेळा होते. अशा वेळी बहीण भावाला पोस्टाद्वारे किंवा कुरिअरने राखी पाठवते, भाऊही बहिणीला कुरिअरने गिफ्ट पाठवतो.
बदलता रक्षाबंधनाचा सण:
1950 ते 1990 च्या दशकात भारतात एकत्र कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे अस्तित्वात होती. कुटुंबात दहा-बारा माणसे असायचीत. घर म्हणजे गोकुळच असायचे. सगळे एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हायचे. सण-समारंभ उत्साहाने आणि आनंदाने साजरे होत. जुन्या पिढीतील लोकांचे अनुभव नव्या पिढीकडे आपोआप सुपूर्द होत असत. सख्खी बहीण नसली तरी चुलत बहिणीला तेवढ्याच आत्मियतेने मान मिळत असे. सख्खा भाऊ नसला तर चुलत भावाला राखी बांधली जायची.भेदभाव अजिबात नसायचा. प्रत्येक सण असाच साजरा व्हायचा.
1990 नंतर कुटुंब पद्धतीत क्रांतिकारक बदल झाला. एकत्र कुटुंब पद्धती उद्धस्त झाली. छोटे कुटुब- सुखी कुटुंब’ या बोधवाक्याला तडा गेला. नव्या कुटुंब प्रणालीत बहिणीला भाऊ मिळेना. भावाला बहीण मिळेना. मग मानसकन्या, मानसभाऊ, मानस बहीण या संकल्पना समाजात हळूहळू वाढू लागल्या. अर्थात या नव्या संकल्पनात प्रामाणिकपणा आणि पावित्र्य रुजले तर ही बाब आनंदाचीच होईल. रक्षाबंधनाच्या स्वरुपाला निश्चितच व्यापकता येईल.
रक्षाबंधनाच्या काही ऐतिहासिक / पौराणिक कथा.
1. महाभारतकालीन एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान आजही मार्गदर्शक ठरते. उद्याही ठरेल. बहीण-भावाचे नातेसंबंध दृढ करणारी श्रीकृष्णाची कथा नेहमीच सांगितली जाते.
इंद्रप्रस्थमध्ये धर्मराजाने राजदरबार बोलावला होता. या दरबारात श्रीकृष्ण प्रमुख अतिथी होता. शुशुपाल हा श्रीकृष्णाच्या आत्यांचा पती(मामा) होय. त्याने अपराधाच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्यामुळे श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडून शुशुपालाचा वध केला होता. त्यावेळी सुदर्शन चक्र सोडताना श्रीकृष्णाच्या बोटाला कापले होते. आणि भळभळ रक्त येत होते. द्रौपदीच्या हे लक्षात येताच तिने आपल्या साडीच्या पदराची पट्टी फाडून तीच पट्टी (चिंधी) श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. बहिणीने भावावर असलेले जिवापाड प्रेम भर दरबारात प्रसंगावधानाने व्यक्त केले होते. श्रीकृष्णानेही द्रौपदीला मनोमन बहीण मानली होती. आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. द्रौपदी ही द्रुपद राजाची कन्या होय.ती रक्ताच्या नात्याने श्रीकृष्णाची बहीण नसली, तरी तिच्यावर श्रीकृष्णाचे जिवापाड प्रेम होते. पुढे कौरव सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करताना श्रीकृष्ण धावून आला आणि तिचे रक्षण केले. यावेळी धृतराष्ट्र, भीष्माचार्य कर्ण आदि मंडळींची श्रीकृष्णाने चांगलीच कान उघाडणी केली होती.
2. मेवाडची राणी कर्णावती आणि हुमायून
मेवाडची राणी कर्णावती ही रजपूत राणा प्रताप सिंगाची बहीण होती. एकदा मेवाडवर युद्धाचे संकट आले होते.शत्रुपूढे आपला टिकाव लागणार नाही, हे राणी कर्णावतीने ओळखले होते. या संकटातून आपल्याला केवळ मुघल सम्राट हुमायुनच वाचवू शकतो, हे राणीला माहीत होते. तिने हुमायूनला राखी पाठवून पत्राद्वारे मदतीची याचना केली. राखी हे बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे, हे हुमायूनला माहीत होते, हुमायून तातडीने मेवाडच्या दिशेने धावून आला आणि बहिणीचे राज्य वाचवले. तिचेही रक्षण केले.त्याकाळाळी म्हणजे मध्ययुगीन काळात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात धार्मिक मतभेद नव्हते. याचे हे उत्तम ऐतिहासिक उदाहरण आहे.
अशा रक्षाबंधनाच्या अनेक कथा आहेत या कथांतून रक्षाबंधनाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते.
रक्षाबंधनाचा सण का साजरा करतात ?Why is the festival of Rakshabandhan celebrated?
रक्षाबंधन हा पवित्र सण आहे. बहीण-भावांचा सण आहे. बहीण-भावांचे पवित्र नाते दीर्घकाल टिकावे म्हणून हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. बदलत्या जीवनशैलीत बहीण भावाच्या नात्यात अंतर पडू लागले आहे. हे अगदी वास्तव आहे. रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यातील अंतर कमी करतो. बंधनाचा धागा पवित्र नात्याला घट्ट बांधून ठेवतो. रक्षाबंधन हा सण व्यापक अर्थाने साजरा होणे
ही काळाची गरज बनली आहे. कधीकधी माणूस हा माणूस न राहता तो पशु बनतो
स्त्रिया, मुली यांच्यावर होणारे अत्याचार आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. कधी कधी रक्षाबंधनाचा हा पवित्र धागा उपयोगी पडतो. स्त्रियांचे रक्षण करतो.राखी केवळ बहिणीनेच भावाला बांधावी असे काही नाही. सध्याच्या युगात पत्नी पतीला राखी बांधते.मैत्रीण मित्राला राखी बांधते. विद्यार्थिनी गुरुला राखी बांधतात; पण राख्या बांधताना त्यांतील पवित्रता जपावी हीच अपेक्षा.
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!