कोल्हापूर जिल्ह्याला इतिहासाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील गड, किल्ले, राजवाडे, मंदिरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असाच एक किल्ला कोल्हापूरच्या पश्चिमेला आहे. तो किल्ला म्हणजे ‘किल्ले विशाळगड’ होय. पूर्वी हा किल्ला ‘खेळणा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध होता. याच किल्ल्याची आपण ओळख करून घेणार आहोत.
समुद्रसपाटीपासून उंची : 1130 मी.
डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री
तालुका : शाहूवाडी
जिल्हा : कोल्हापूर
कोल्हापूरपासून : 76 किमी
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम, सोपी.
सध्याची अवस्था : चांगली.
स्थापना : इ. स. 1058. शिलाहार राजा मारसिंह
विशाळगडाला कसे जाल ?How to go to Vishalgad?
कोल्हापूरहून 76 किमी अंतरावर असलेल्या विशाळगडावर कोल्हापूरहून जाता येते. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाने मलकापूर येथे जायचे. मलकापुरातून पावनखिंडमार्गे विशाळगडला जाता येते. जातेवेळी पावनखिंडीला अवश्य भेट द्यावी. थंडगार वारा आणि गर्द राईतून जाताना मन प्रफुल्लित होते.
पन्हाळगडावरून विशाळगडाला पायी जाणारे अनेक हौशी पर्यटक आहेत. ही ऐतिहासिक वाट मसाईच्या पठारावरून जाते. पन्हाळगड ते विशाळगड अंतर सुमारे 50 किमी आहे.
विशाळगडाचा इतिहास :History of Vishalgad
विशाळगडाची उभारणी शिलाहार राजा मारसिंह याने इ. स. 1058 मध्ये केली. पन्हाळगडावर शिलाहार, राष्ट्रकूट राजघराण्यांची सत्ता होती. त्याप्रमाणे विशाळगडावरही होती. देवगिरीच्या यादव घराण्यानेही या गडावर आधिपत्य गाजवले आहे. यावरून विशाळगडाला खूप प्राचीन इतिहास आहे हे लक्षात येते.
देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ‘बहमनी’ ही इस्लामिक सत्ता फोफावली होती. या सत्तेचा विस्तार दक्षिण महाराष्ट्रात अधिक वाढला होता. बहमनी सुलतान अल्लाउद्दीनशाह याने इ. स. 1453 मध्ये आपला सेनापती मलिक उतुजार याला कोकणातील किल्ले घेण्यासाठी पाठवले होते. मलिक उतुजार हा हुशार आणि कर्तबगार सेनापती होता. प्रथम तो प्रचितगडावर चालून आला. प्रचितगड त्या वेळी शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उतुजारने प्रचितगडावर हल्ला चढवून गड ताब्यात घेतला. शिर्क्यांना शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ते मलिक उतुजारला शरण गेले.
मलिक उतुजार जसा धूर्त आणि कपटी होता, तसा तो कडवा मुसलमान होता. त्याने शिर्क्यांना मुसलमान धर्म स्वीकारण्याची अट घातली. शिर्क्यांना या गोष्टीचा खूप राग आला; पण त्यानी आपला राग गिळून खेळणा किल्ल्यावर आधिपत्य असलेल्या मोऱ्यांचा पराभव करून त्यांना प्रथम मुसलमान करावे.अशी अट घातली. मोऱ्यांचा पराभव करण्यासाठी मीही तुमच्याबरोबर असेन .असा प्रस्ताव शिर्क्यांनी ठेवला होता. मलिक उतुजारला शिर्क्यांची कल्पना आवडली. मोरेही मुसलमान धर्म स्वीकारतील व खेळणा किल्ला आपल्या ताब्यात येईल, या इराद्याने त्याने शिर्क्यांना घेऊन खेळणा किल्ला सर करण्याची योजना आखली.
शिर्के आणि मलिक उतुजार आपापले सैन्य घेऊन खेळणा किल्ल्याकडे जाणारी अति बिकट वाट तुडवू लागले. अतिदुर्गम भाग, गर्द राई, जंगलातून- काट्याकुट्यातून वाट काढणे बिकट होते. तोफा-दारूगोळा नेणे त्याहून अवघड होते. दोघांनी तीन दिवस खेळण्याच्या दिशेने वाटचाल केली. या तीन दिवसांत मलिक उतुजार व त्याच्या सैन्याचे अतोनात हाल झाले. अपरिचित भाग आणि तेथील हवामान मलिक उतुजारच्या सैन्याला मानवले नाही. मलिक उतुजारला तर हगवण लागली होती.
शिर्क्यांचे उभे आयुष्य या परिसरातच गेल्यामुळे त्यांचे सैन्य ताजेतवाने होते. आता नामी संधी आली आहे हे शिर्क्यांनी ओळखले होते. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा बेत शिर्क्यांनी आखला होता.
खेळणा किल्ल्यावर हल्ला करण्यापेक्षा प्रथम बोलणी करून मार्ग निघतो का पाहावे असे शिर्क्यांनी सुचवले होते. मलिक उतुजारने ते मान्य केले. त्याला खेळणा किल्ल्याच्या घनदाट अरण्यात सोडून शिर्के गडावर बोलणी करण्यासाठी गेले. गडावर येताच शिर्के आणि मोरे यांच्यात गुफ्तगू झाले. दोघांनी मिळून शत्रूचा फडशा पाडायचा असे ठरले.
रात्रीच्या वेळी अचानक थकून भागून पहुडलेल्या मलिक उतुजारच्या सैन्यावर शिर्क्यांनी आणि मोऱ्यांनी हल्ला चढवला. बहमनी फौजेची दाणादाण उडाली. प्रतिकार करण्याची त्यांना संधीच मिळाली नाही. शिर्के आणि मोऱ्यांनी मलिक उतुजारची संपूर्ण फौज कापून काढली. त्यात मलिक उतुजारही चुकला नाही. त्यालाही यमसदनास पाठवले. या घटनेमुळे बहमनी सत्ता हादरून गेली.
मलिक उतुजार आणि त्याच्या सैन्याचा मोरे-शिर्क्यांनी फडशा पाडला असला तरी बहमनी सत्ता या घटनेतून सावरली होती. महमदशाहच्या काळात खेळण्यावर पुन्हा हल्ला करण्याचा बेत आखला गेला.
इ. स. 1469 साली महम्मद गवानने सेनापती मलिक रेहान याच्या मदतीने खेळण्याला वेढा दिला. सलग नऊ महिने निकराची झुंज देऊन अखेर किल्ला सर केला. विशाळगडावर (खेळण्यावर) आजही मलिक रेहानच्या सत्तेच्या पाऊलखुणा आहेत. गडावर मलिक रेहानचा दर्गा आहे. या फारशी भाषेतील शिलालेखात मलिक रेहान म्हणतो
‘हिंदू राजा भोज याची सत्ता असलेला हा किल्ला मला सहा वेळा प्रयत्न करूनही जिंकता आला नाही. सातव्यांदा वेढा घालून हा किल्ला जिंकून मी माझ्या ताब्यात घेतला.’
मलिक रेहानच्या दर्ग्यातील शिलालेखामुळे भूतकाळातील इतिहास समजायला सोपे झाले. विशाळगडाबद्दलही अधिक माहिती मिळाली. त्यानंतर जवळजवळ पावणेतीनशे वर्षे किल्ला बहमनी सत्ता आणि या सत्तेची फाळणी झाल्यानंतर आदिलशाही सत्तेच्या ताब्यात राहिला.
छत्रपती शिवरायांनी 1659 साली अफझलखानाचा वध केला आणि पन्हाळगड ताब्यात घेतला. पन्हाळगडापाठोपाठ विशाळगडही जिंकून घेतल्यामुळे आदिलशाही हादरली. त्या वेळी आदिलशाहीचा कारभार बडी बेगमसाहिबा चालवत होत्या. त्यांनी सिद्दी जौहरच्या रूपाने स्वराज्यावर मोठे संकट पाठवले होते; पण त्यालाही अपयश आले. शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले आणि विशाळगडाकडे रवाना झाले. आदिलशाहीला सामील असलेले शृंगारपूरचे सुर्वे आणि जयवंतराव दळवी यांनी विशाळगडाची वाट अडवली होती. शिवरायांनी त्यांचा बीमोड करून विशाळगड ताब्यात घेतला.
इ.स. 1666 मध्ये मिर्झाराजे जयसिंगाच्या रूपाने स्वराज्यावर मोठे संकट आले होते. मिर्झाराजे यांच्याशी झालेल्या तहानुसार शिवरायांनी पन्हाळगड आदिलशाहीकडून जिंकून देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे शिवरायांनी पन्हाळगडावर हल्ला केला; पण त्यात शिवरायांचे मोठे नुकसान झाले. पराभवाला सामोरे जावे लागले.
या हल्ल्याच्या वेळी ‘प्रतिशिवाजी’ म्हणून ओळखला जाणारा नेतोजी पालकर विशाळगडावर होता. तो वेळेवर शिवरायांच्या मदतीला आला नाही. त्यामुळे शिवराय आणि नेतोजी पालकर यांच्यात गैरसमजातून मतभेद निर्माण झाले. नेतोजी रागाने आदिलशहाला जाऊन मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शंभूराजे यांचे काही काळ गडावर वास्तव्य होते. त्यांनी गडाची दुरुस्ती करून गड भक्कम करण्याचा प्रयत्न केला होता.
नैसर्गिक तटबंदी लाभलेला हा गड गजापूरची खिंड सोडली तर तिन्ही बाजूंनी कातळकडा आहे म्हणूनच शिवरायांनी या गडाचे नाव ‘विशाळगड’ असे ठेवले. आजही हा गड ‘विशाळगड’ या नावानेच ओळखला जातो.
विशाळगडावरील ऐतिहासिक स्थळे :Historical places at Vishalgad
विशाळगडावर जाण्यासाठी दोनच दरवाजे आहेत. एक म्हणजे गजापूरच्या पूर्वेच्या बाजूला असणारा ‘मुंढा दरवाजा’ आणि दुसरा म्हणजे त्याच्या मागील बाजूस असणारा किरबेटकडील ‘काळ दरवाजा’. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटल्यावर शिवराय मुंढा दरवाजातूनच विशाळगडावर पोहोचले होते.
कोकणाकडील काळदरवाजाच्या बाजूची परिस्थिती वेगळी आहे. माचाळच्या विशाल पठारानंतर किरबेटची अरुंद फट लागते. माचाळ आणि गड यांच्यामध्ये असलेल्या या अरुंद पायवाटेने कसरत करत गडावर जाता येते. थोडे अंतर गेल्यावर काळ दरवाजा लागतो.
वाघजाई देवीचे मंदिर :Vaghjai devi temple
काळ दरवाजाच्या जवळच श्री वाघजाई देवीचे मंदिर आहे. वाघजाई देवीचे मंदिर म्हणजे गडकरी लोकांचे श्रद्धास्थान होय.
रामेश्वर शिवालय :Rameshwar Shivalay
गडावर असलेले आणखी एक मंदिर म्हणजे ‘रामेश्वर शिवालय’ होय. शिवालयाजवळच उंच असा टकमक कडा आहे. या कड्यावरून गुन्हेगार लोकांना कडेलोटाची शिक्षा दिली जायची. डोळे भिरभिरतात असा हा कडा आहे.
हजरत मलिक रिहान दर्गा :
गजापूरमार्गे विशाळगडावर जाताना वाहनतळावरून गडावर जाताना एकच वाट आहे. वाटेतील लोखंडी पूल ओलांडल्यानंतर पायऱ्यांची चढण लागते. अर्ध्या तासातच आपण गडावर पोहोचतो. गडावर पोहोचताच. ‘हजरत मलिक रिहानचा’ दर्गा लागतो. दर वर्षी येथे हजारो भाविक येतात.
बाजीप्रभू व फुलाजी प्रभू यांच्या समाध्या :
गजापूरच्या खिंडीत स्वराज्यासाठी लढता लढता या लढ्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते रायाजी बांदल, विठोजी काटे, संभाजी जाधव बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी इत्यादी तीनशे मावळ्यांना वीरमरण आले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाध्या गडावर आहेत; पण संभाजी जाधव, रायाजी बांदल, विठोजी काटे या प्रमुख मंडळींच्या समाध्या मात्र कोठेही आढळल्या नाहीत,याहून दुर्देव ते कोणते…
पंतप्रतिनिधींचा वाडा :
वेताळ टेकडीच्या जवळच पंतप्रतिनिधींचा वाडा लागतो. हा वाडा म्हणजे केवळ भग्न अवशेष होय. या वाड्याचे जोते आजही पाहायला मिळतात. गडावरील अत्यंत सुरक्षित ठिकाणी हा वाडा होता. 1935 साली याच वाड्यावर सुरक्षित इमारत बांधली होती; पण तीही इमारत कोसळली.
भूपाळ तळे : Bhupal tale
विशाळगडावरील आणखी एक पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे ‘भूपाळ तळे’ होय. या तळ्याला बारमाही पाणी नसते. उन्हाळ्यात हे तळे ठणठणीत कोरडे पडलेले असते. तळ्याच्या बांधणीवरून ते शिलाहार काळातील असावे असे वाटते. शिलाहार राजा स्वतःला ‘भोज भूपाल’ म्हणवून घेत असे. त्यावरूनच त्या तळ्याला ‘भूपाळ तळे’ असे नाव पडले.
रणमंडल :
‘रणमंडल’ हे गडावरील सर्वांत उंच ठिकाण होय. रणमंडलावरून गडाच्या दूरदूरचा प्रदेश दिसतो. या टेकडीवरून मुंढा दरवाजाकडे जाता येते.
गडावरील इतर मंदिरे :
अमृत महादेव मंदिर पंतप्रतिनिधींनी बांधले. अठराव्या शतकातील हे मंदिर आहे. या मंदिराशेजारीच पाण्याचा ओहोळ आहे. त्याच्याखाली दगडी हौद बांधला आहे. शिवालयाचा परिसर अतिशय शांत वाटतो.
बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाधीजवळच हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराशेजारीच गुहा आहे. कदाचित दारूगोळा ठेवण्यासाठी या गुहेचा उपयोग केला जात असावा.
शिवगड प्रतिकृती :
विशाळगडावर आणखी एक महत्त्वाचे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे शिवगडाबद्दल माहिती सांगणारे म्युझियम. हा शिवगड राधानगरी अभयारण्यात असून दाजीपूरपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे. शिवगड म्हणजे अत्यंत निसर्गरम्य व नयनरम्य ठिकाण होय. अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे वळल्यास शिवगडाला जाणारा कच्चा रस्ता लागतो. एक-दीड किलोमीटर गेल्यावर शिवगड लागतो. अलीकडच्या टेकडीवरून शिवगड पाहता येतो. गडावर जायचे म्हणजे शिवगडावर जाण्यासाठी अभयारण्याचे तिकीट काढावे लागत नाही.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
गडावर ‘मलिक रेहान’ नामक दर्गा आहे. येथे हिंदू-मुस्लीम भाविक दर्याला भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांना, भाविकांना निवासासाठी खोल्या उपलब्ध होतात.
गडावर मलिक रेहान दर्याच्या परिसरात अनेक छोट्या-मोठ्या खाणावळींची सोय आहे. त्यामुळे गडावर गेल्यावर खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज भासत नाही. काही लोक विशाळगडाच्या पायथ्याशीच राहणे पसंत करतात.