सिंगापोर हे भारताच्या आग्नेय दिशेला असलेले एक छोटेसे राष्ट्र आहे. सिंगापोर देशाचे क्षेत्रफळ सुमारे 700 चौरस किमी असून ते आशिया खंडातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास आहे. सिंगापोर या देशाची लोकसंख्या 2016 च्या जनगणनेनुसार सुमारे 56,00,000 आहे. सिंगापोर हा देश छोटा असला तरी पर्यटक आणि भारतातील सिनेसृष्टीतील कलाकार यांचे आकर्षक पर्यटन केंद्र बनले आहे. A Heaven Holiday, Kolhapur यांच्या सौजन्याने आम्ही 19 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट असा तब्बल बारा दिवसांचा परदेश दौरा केला. त्यांतील तीन दिवस सिंगापोरदर्शन केले. त्या सिंगापोर दौऱ्याविषयी आपण माहिती घेऊया.
सिंगापोर म्हणजे काय ?What is Singapore?
भारतीय संस्कृती आणि सिंगापोरची संस्कृती यांच्यात भाषिक साम्य आहे. सिंगा म्हणजे सिंघा. म्हणजेच सिंह. सिंगांचे अस्तित्व असलेले वसतिस्थान म्हणजे सिंगापोर होय. सिंगापोर हे पूर्वी मासेमारी बेट होते. सर थॉमस स्टेमफर्ड रॅफल्सने सिंगापोर शहराची स्थापना केली.
मलेशियावर एकेकाळी ब्रिटिशांची सत्ता होती आणि सिंगापोर हा मलेरियाचा भाग होता. 9 ऑगस्ट 1965 साली सिंगापोर मलेशियापासून स्वतंत्र झाला आणि ली कुआन यू हे सिंगापोरचे पहिले पंतप्रधान झाले. सिंगापोर हीच सिंगापोर देशाची राजधानी झाली.
सिंगापोरचे धर्म आणि भाषा:Religions and Languages of Singapore:
गौतम बुद्धांनी नव्या विचारांचा कर्मकांड विरहित नवा धर्म स्थापन केला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारून संपूर्ण देश बुद्धमय केला. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार भारताबाहेरही केला. चीन, श्रीलंका, मलेशिया, सिंगापोर, थायलंड इंडोनेशिया या देशात बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात आहे. सिंगापोरात बौद्ध धर्मीय लोक सुमारे 40% असून ते बहुतांश चीनमधून स्थलांतरित होऊन सिंगापोरात स्थायिक झाले आहेत. सिंगापोरच्या लोकसंख्येत सुमारे 75% चिनी लोक आहेत; तर 16% लोक स्थानिक मलाय आहेत. 8% लोक भारतीय आहेत.बौद्ध, मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, ताओवादी इत्यादी धर्माचे लोक सिंगापोरात समाधानाने आणि एकोप्याने राहतात. यांच्यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक तेढ नाही. म्हणूनच सिंगापोर हे शांतताप्रिय राष्ट्र मानले जाते.
2020 च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार सिंगापोरात 31% बौद्ध, 20% निधर्मवादी, 16% मुस्लिम 11% खिश्चन, 7%, कॅथॉलिक, 5% हिंदू तर 0.6% शीख धर्मीय लोक राहतात.
सिंगापोरची भाषाःSingapore languages
सिंगापोरात स्थानिक मलाय भाषा बोलली जातेच. याशिवाय इंग्लिश, चिनी, तमिळी इत्यादी भाषा बोलल्या जातात. या सर्व भाषा प्रमाणित असून इंग्लिश भाषेच्या उच्चारात मलाय भाषेचा संगम झाला आहे. तरी सुद्धा सिंगापुरी इंग्लिश भाषा समजेल अशी आहे. त्यामुळे इंग्लिश भाषेचे ज्ञान असलेल्या व्यकीला सिंगापोरात कोणतीही अडचण येत नाही.
सिंगापोरातील प्रेक्षणीय स्थळे :Sightseeing in Singapore
सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी अगदी रक्षाबंधनाच्या दिवशी आमचा सिंगापोर प्रवास कोल्हापूर मधून सकाळी ठीक 6:30 वाजल्यापासून सुरु झाला. आमचे एकूण 84 लोकांचे दोन ग्रुप होते. काही कराड, सातारा, पुणे, मुंबई येथून ग्रुपमध्ये सामील झाले. सायंकाळी 5:00 वाजता आम्ही पुण्याहून विस्तारा विमानाने (UK) दिल्लीला रवाना झालो. आमच्या सोबत A Heaven Holiday च्या वतीने स्वतः वर्षा बुगडे आणि त्यांची कन्या प्रणिता बुगडे या दोघी मायलेकी होत्या. दिल्लीत पोहोचल्यावर रात्री 12:30 वाजता आम्ही सिंगापोरला रवाना झालो. प्रवासासाठी विस्तारा (UK) हेच विमान होते. 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:15 च्या दरम्यान आम्ही सिंगापोरच्या चांगी विमानतळावर पोहोचलो.
चांगी विमानतळ: (Changi Airport]
सिंगापोरच्या चांगी विमानतळाचे नाव कोणा व्यक्तीच्या नावावरून पडलेले नाही;तर चांगी ही सिंगोपोरची प्रसिद्ध आणि आवडती वनस्पती आहे. याच वनस्पतीच्या नावावरून चांगी विमानतळ [Changi Airpor] असे नामकरण करण्यात आले.चांगी विमानतळ सुंदर नीटनेटके आणि भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे .या विमानतळावर सुमारे तीन तास वेटिंग केल्यानंतर पॅटरिशा आणि आय. व्ही या दोन हसतमुख, दिलखुलास विनोदी महिला गाइडनी आमचे सिंगापोरात स्वागत केले. आणि आम्ही हॉटेल बॉस [ Hotel Boss] च्या दिशेने सिफ्ट होण्यासाठी जाऊ लागलो. Boss Hotel मध्ये आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि मिळालेल्या रुम्समध्ये विश्रांतीसाठी गेलो.रुम्स कल्पनेपेक्षा छोट्या होत्या; पण स्वच्छ आणि टापटीप होत्या. सिंगापोर हे महागडे शहर असल्याने येथे खोलीभाडे पण जास्त आहे.
Mother River of Singapore:
20 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता दोन बसेसमधून आम्ही नाईट सफारी साठी चाललो.सोबत पॅटरिशा आणि आय. व्ही या दोन महिला गाइड होत्या.आमच्या बसमध्ये पटरिशा होती. तिने Bus चा उच्चार Bas असा केला. सुरुवातीला आम्हाला काहीच कळले नाही .नंतर लक्षात आले की येथे सिंगापुरी मलाय भाषेत Bus चा उच्चार Bas असा करतात.
बसमधून आम्ही सिंगापूर दर्शन करत होतो.पॅटरिशा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती देत होती. वाटेत Singapore River लागली. या नदीला Mother river of Singapur समजले जाते..या नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात.
विशेष म्हणजे ही नदी कॅनॉलसारखी बांधीव आहे, काही ठिकाणी नैसर्गिक आहे. थोडक्यात भारतीय भाषेत ही नदी म्हणजे सिंगापोरची गंगा होय.पण या नदीत गंगास्नान करण्यास बंदी आहे. भारतात कुंभमेळयाच्यावेळी आपण गंगास्नान पाहतोच पाहतोच आहे.
या नदीत उतरण्यास, पोहण्यास मच्छिमारी करण्यास, हातपाय धुण्यास, कचरा टाकण्यास कायद्याने मनाई आहे. म्हणूनच ही नदी स्वच्छ आणि सुंदर आहे. सिंगापोर सरकारने जागोजागी पर्यटनस्थळी स्वच्छतागृहांसोबत मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सिंगापोरात शुद्ध पाणी विकत घेण्याची गरज भासत नाही.
Night Safari [वन्यजीव पार्क ]:
20 ऑगस्टला सायंकाळी सात वाजता आम्ही वन्यजीव पार्कमध्ये पोहोचलो.साधारणतः आठ वाजता आमची Night Safari सुरु झाली. मंडई येथे वसलेले हे जगातील पहिले निशाचर प्राणिसंग्रहालय [Nocturnal Zoo] आहे. या प्राणिसंग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या Zoo चे स्वरूप नैसर्गिक जंगलासारखेच असल्यामुळे आपण जंगलातून सफारी करत प्राणी पाहात आहोत, असे वाटते. हे एक छोटेसे जंगलच वसवलेले आहे. आम्ही या जंगलाची सफारी ट्राममधून केली.ट्राम चारही बाजूने उघडी होती. रात्रीच्या अंधारात चंद्रप्रकाशासारखी सौम्य विद्युत रोषणाई केली होती. त्यामुळे प्राणी सहज पाहता येत होते.
आम्ही ट्राममधूनच पण अगदी जवळून म्हणजे सुमारे 15 ते 50 फुटावरून वाघ, सिंह, कोल्हे, हत्ती, लकडबग्गी, नीलगाय, सांबर, जिराफ, चिनी पांडा(जगातील सर्वांत मोठ्या आकाराचा पांडा),फ्लेमिंगो पक्षी, गवे, साळिंदर असे कितीतरी प्राणी-पक्षी समुहाने आणि थव्याने वावरत असलेले पाहिले. इतके हिंस्र प्राणी इतक्या जवळून आम्ही प्रथमच पाहत होतो. सर्व प्रकारचे प्राणी पाहून आमच्या डोळयांचे पारणे फिटले.सुमारे अर्धा तास आम्ही या जंगल सफारीचा आनंद लुटला आणि परतीच्या प्रवासाला म्हणजेच होटेल बॉसकडे रवाना झालो.
Creatures of the Night show:
वन्यजीव पार्क पाहिल्यानंतर Night Safari चाच एक भाग म्हणून Creatures of the Night Show (निशाचर प्राणी शो) पाहायला आम्ही गेलो. या ठिकाणी काही निशाचर प्राणी आणि पक्षी शिकवलेले होते. त्यांच्याकडून काही कृती करून घेतल्या.घुबड या पक्ष्याची मान 270 अंशाच्या कोनात वळते. हे आम्हाला हा नाइट शो पाहिल्यानंतर कळले. 270° पेक्षा जास्त अंशात अन्य कोणत्याही प्राण्याची किंवा पक्ष्याची मान वळत नाही. हा खेळ आकर्षक वाटला. प्रत्यक्ष अनुभूतीतून प्राण्यांची ओळख झाली. हाच उद्देश या नाइट शो चा होता.
सिटी दूर सिंगापूर:(City Tour Singapore)
सिंगापोरातील पहिला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही सिंगापूर सिटी दूर पाहण्यासाठी सकाळी दहा वाजता सुरुवात केली. आमच्या सोबत पॅटरिशा आणि आय. व्ही. या दोघी गाइड होत्याच.
मर्लिअन पार्क / मर्लिन पार्क : (Merlion Park) सिंगापूर:
मर्लिअन पार्क हा सिंगापोर बिझनेस स्टेटच्या जवळच आहे. या पार्कला मर्लिअन पार्क हे नाव पडण्याचे कारण म्हणजे येथे असलेला मर्लिअनचा पुतळा होय. मर्लिन हा एक सिंगापूरच्या पौराणिक कथेतील काल्पनिक प्राणी आहे. या प्राण्याचे शरीर माशाचे आहे; तर डोके सिंहाचे आहे. हा प्राणी सिंगापोरचा राष्ट्रीय प्रतीक मानला जातो. या पार्कमध्ये मर्लिनच्या तोंडातून म्हणजे सिंहाचे डोके असलेल्या मर्लिनच्या तोंडातून सतत पाण्याचा फवारा सुरू आहे. त्यामुळे हा पुतळा एक आकर्षक ठरले आहे. मर्लिन पार्क या पार्कमधील परिसर खूप छान आहे.
सिंगापोर फ्लायर: (Singapore Flyer)
मर्लिन पार्कजवळच सिंगापूर फ्लायर आहे. हे पर्यटकांचे खूप आकर्षण ठिकाण आहे. सिंगापोर फ्लायरची उंची 165 मी. असून त्याच्या चाकाचा व्यास 150 मी. आहे. संपूर्ण चाकाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 33700 मीटर असून या फ्लायरला 28 कॅप्सूल आहेत. प्रत्येक कॅप्सूलमध्ये 28 व्यक्ती बसू शकतात. म्हणजेच एका वेळी एकूण 784 व्यक्ती बसू शकतात. एका कॅप्सूलची एक फेरी पूर्ण व्हायला 20 से 25 मिनिटे लागतात. फ्लायरचा वेग खूप संथ असतो. उंचावरून सिंगापोर शहराचा नजारा पाहण्याचा आनंद लुटायचे असेल तर फ्लायरमध्ये बसण्यासाठी 40 सिंगापुरी डॉलरचे तिकिट काढावे लागते, लहान मुलांसाठी (12 वर्षांखालील) तिकीट दर कमी आहे.
मादाम तुसाद वॅक्स म्युझियम : सटोसा : Madamme Tussaud Wax Museum: Sentosa
सिंगापूरमधील सेंटोसा बेटावर 25 ऑक्टोबर, 2014 साली मादाम तुसाद वॅक्स म्युझिअम वसलेले आहे. हे म्युझिअम खूप छान आहे. हे म्युझिअम पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे-मुंबई हाय-वे वर लोणावळा जवळ असलेल्या वॅक्स म्युझिअमची आठवण येते.
मादाम तुसाद वॅक्स म्युझिअमला जाण्यासाठी केबल कारने प्रवास करावा लागतो. हा केबल कारचा थरारक प्रवास नक्कीच अनुभवला पाहिजे.रायगडावरील केबलकारची नक्कीच आठवण येते. पण या केबलकार्स खूप उंचावरून आणि दूर अंतरापर्यंत प्रवास घडवून आणतात.
केबलकारमधून सिंगापूरचे नयनरम्य दर्शन पाहता येते. सुमारे 30 मिनिटांचा केबल कारचा प्रवास करून मादाम तुसाद वॅक्स म्युझिअमवर पोहोचता येते.
एका छान इमारतीत मादाम तुसाद वॅक्स म्युझिअम आहे.येथे जगप्रसिद्ध व्यक्तीचे मेणाचे पुतळे आहेत.बराक ओबामा, नेल्सन मंडेला, महात्मा गांधी यांसारख्या महान व्यक्तींच्या पुतळ्यांबरोबरच करिश्मा,अमिताभ बच्चन, शाहरुख खान , काजल, मायकेल जॅक्सन यांचेही पुतळे आहेत. याशिवाय ब्रुस्ली, सचिन तेंडुलकर, सिंगापूर कसा कसा विकसित होत गेला याचेही चित्र शिल्प पाहायला मिळते. सिंगापोरच्या स्वातंत्र्यलढ्याचे काही फोटोही आहेत. काही छोट्या उद्योगाच्या प्रतिकृती निर्माण केल्या आहेत. सिंगापोर संस्कृतीचे दर्शन घडवणे हा मुख्य हेतू या म्युझियमचा आहे.
संपूर्ण वॅक्स म्युझिअम पाहिल्यानंतर एक 3D शो दाखवतात.हा शो थरारक असा आहेच .शिवाय लहान मुलांना आवडेल असाच आहे. 3D शो पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण सेंटोसा आयलँडकडे निघालो.
सेंटोसा आयलँड : (Sentosa Island)
सिंगापूर येथील सेंटोसा बेटावरील वॅक्स म्युझिअम पाहिल्यानंतर आम्ही सेंटोसा आयलँड पाहायला गेलो. येथे समुद्रकिनारा पाहण्यासाठी मोफत ट्राम बसची सोय आहे.या बसच्या मदतीने अनेक पॉइंट पाहता येतात.
Wings of time show: लेझर शो:
सेंटोसा बेटावरील समुद्र किनाज्यावरील Wings of Time Show या नावाने लेझर शो दाखवला जातो. साधारणतः संध्याकाळी साडेसात वाजता हा शो सुरु होतो. लेसर शो (Laser Show) च्या माध्यमातून एक छान कथानक सादर केले जाते .सुमारे 40 मिनिटांचा हा अद्भुत शो पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. लेझर शो पाहून आम्ही रात्रीचे जेवण केले आणि विश्रांतीसाठी गेलो.
युनिवर्सल स्टुडिओ: [Universal Studio]
गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही सिंगापोर येथील आशियातील पहिले आणि एकमेव हॉलिवुड मुव्ही थीम पार्क (Hollywood Movie Theme Park] युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये पाहायला मिळते.हा स्टुडिओ पाहायला एक दिवस लागतो.
हा स्टुडिओ पाहत असताना भारतातील रामोजी फिल्मसिटी, हैद्राबादची निश्चितच आठवण येते. येथे भरपूर activities आहेत.त्यांतील काही पुढीलप्रमाणे-
1. Battlestar Galactica:
ही एक खूप वेगाने धावणारी duelling roller coaster असून ही activity 60 वर्षाच्या वरील लोकांना करण्यास थोडी धोकादायक आहे, रक्तदाब, शुगर, हृदयविकार असलेल्या लोकांनी ही activity करू नये;पण खरंच हा अनुभव खूप रोमांचकारी आहे. येथील रोलिंग कोस्टर खूप वेगाने धावते.
2.जुरासिक पार्क: Jurassic Park
ज्युरासिक पार्क मध्ये सुद्धा आपण थरारक अनुभव घेऊ शकतो. येथील बोटीतील अनुभव खूपच रोमांचकारी आहे, येथे पूर्णपणे भिजायला होते. त्यामुळे बोलण्यासाठी एक ज्यादाचा ड्रेस आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. गटांगळ्या खात जाणाऱ्या बोटींतील प्रवास निश्चितच चित्तथरारक आहे.
3. Water World stunt Show: [ वॉटर वर्ल्ड स्टंट शो]
युनिव्हर्सल स्टुडिओमधील सर्वात गर्दी खेचणारा हा stunt show आहे. एका रोमांचकारी आणि थरारक कथेचा हा स्टंट शो पाहताना डोळे दिपून जातात .या show मध्ये भाग घेणारे कलाकार खूप चपळ आणि active आहेत. उंचावरून कोसळणे, उंचावरून उड्या टाकणे हे सर्व खूप जिकिरीचे असते. Water world stunt show सर्वांनी पाहावा असाच आहे
4. Dancing show :नृत्यकला
या शोच्या माध्यमातून सिंगापुरी कलाकारांनी सादर केलेली नृत्यकला अप्रतिम होती. वेशभूषा, तंत्रशुद्ध हालचाल, face expression हे सर्व करत कलाकार स्वत: गात होते. गाता गाता नाचणे खूप अवघड असते; पण येथील कलाकारांनी ही कला चांगलीच अवगत केली होती. Dancing show कुणीही miss करु नये असाच आहे.
5. 3D शो:
युनिवर्सल स्टुडिओमध्ये सुद्धा एक 3D शो आहे. 4Dशो च्या माध्यमातून 30 मिनिटांची थरारक कथा पाहायला मिळाली. हा शो सर्वांनी जरूर पाहावा.
6) Mummy Ride Show : मम्मी शो
रोलर कोस्टरवरून थरारक आणि भयानक अनुभव या शोच्या माध्यमातून होता येतो. निश्चितच हा थरारक मम्मी राड्ड शो सर्वांनी अनुभव घ्यावा असा आहे. रोलर कोस्टरचा वेग सुमारे 70 किमी/ प्रति तास असतो.
Universal Studio मध्ये पाहावे तितके थोडेच आहे. एकूण तीन दिवस सिंगापोरची प्रेक्षणीय स्थळे अशा प्रकारे पाहून आम्ही मलेशियाला रवाना झालो.
सिंगापोरचा दौरा यशस्वी करण्यासाठी A heaven Holiday चे संस्थापक राज बुगडे, वर्षा बुगडे, प्रणव बुगडे, प्रणिता बुगडे, स्नेहल, स्वप्नील या टीमचे मोठे सहकार्य लाभले.सिंगापोरच्या सहलीत अनयशा कौलवकर ही सहा वर्षांची छोटी पर्यटक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सिंगापोर प्रवास सुखद होण्यासाठी अनेक पर्यटकांचे सहकार्य लाभले.
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राधानगरी.