‘मल्हारगड’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वांत शेवटी बांधलेला हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यात असलेल्या या गडाची आता आपण माहिती घेणार आहोत.
गडाचे नाव : मल्हारगड
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 3000 मीटर.
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : सोनोरी, ता. वेल्हे
जिल्हा : पुणे
डोंगररांग : भुलेश्वर, सह्याद्री
पुण्याहून अंतर : 35 किलोमीटर
स्थापना : 1757
सध्याची स्थिती चांगली.
मल्हारगडला कसे जाल ?How to go to malhargad?
पुणे-सासवड रस्त्यावर दिवेघाट संपल्यावर काही वेळाने झेंडेवाडी फाटा येतो. झेंडेवाडी फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर झेंडेवाडी हे गाव आहे. हे गाव पार करून पुढे खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर मल्हारगडचे दर्शन व्हायला सुरुवात होते. पुढे गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचा डोंगर दिसतो. झेंडेवाडी फाट्यापासून साधारणतः दीड तासांचा कालावधी लागतो. खिंडीतून गडावर जाण्यास 30ते 40 मिनिटे लागतात.
सासवडपासून 6 किलोमीटर अंतरावर ‘सोनोरी’ हे गाव आहे. सासवडहून सोनोरीला एस.टी. बस सुविधा आहे. ‘सोनोरी’ हे गाव गडाच्या पायथ्याशीच आहे. गडाकडे जाण्यापूर्वी सोनोरी गावात सहा बुरूज असलेला पानसे यांचा वाडा पाहायला मिळतो. या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावाची पाहणी करूनच पुढे गडावर जावे. गावातून गडावर जाण्यास साधारणतः 30 ते 40 मिनिटे लागतात.
मल्हारगडाचा इतिहासःHistory of Malhargad:
मल्हारगडाचे बांधकाम पेशव्यांचे सरदार पानसे यांनी करून घेतले. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. इ. स. 1757 साली किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. इ. स. 1760 साली किल्ला बांधून पूर्ण झाला.
इ. स. 1771/72 मध्ये थोरले माधवराव पेशवे गडावर येऊन गडाची पाहणी करून गेल्याची ऐतिहासिक कागदपत्रे आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.
मल्हारगडावरील स्थळे :Places at Malhargad
मल्हारगड खूप छोटा किल्ला आहे. त्यामुळे गड पाहण्यास अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. हा गड त्रिकोणी आकाराचा आहे. गडाच्या आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरूज यांची काही ठिकाणी पडझड झाली आहे. अन्य ठिकाणी तटबंदी शाबूत असल्याचे दिसते.
गडाच्या पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने काही अंतर पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या तटाच्या अगोदर एका वाडयाचे अवशेष दिसतात. या अवशेषाच्या बाजूलाच एक विहीर आहे; परंतु विहिरीत पाणी नाही आणि ती वापरातही नाही.
पुढे बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिण तटाला लागून हे तळे आहे. तळ्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी असते. उन्हाळ्यात मात्र तळे कोरडे ठणठणीत पडलेले असते.
काही अंतर पुढे गेल्यावर किल्ल्याच्या टोकावर असणा-या बुरुजाकडे जाताना वाटेत एक विहीर लागते. या विहिरीलाही पाणी आहे. या टोकाच्या बुरुजांच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आणखी एक लहान दरवाजा दिसतो.
झेंडेवाडी गावातून गडावर येताना याच दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर तेथे दोन मंदिरे दिसतात. मंदिरांना शिख आहे. त्यातील एक मोठे मंदिर आहे ते महादेवाचे आहे आणि दुसरे मंदिर खंडोबाचे आहे. येथील खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड असे नाव दिले असावे. महादेवाच्या मंदिरात शंकराची पिंड आहे.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
मल्हारगडावर विशेष अशी मोठी वास्तू नसल्याने आणि मनुष्यवस्ती नसल्याने येथे मुक्काम करणे धोकादायक ठरू शकते, गड पाहण्यासाठी जाताना बरोबर पाणी घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच काहीतरी नाश्ता किंवा जेवण बनवून घेऊन गेल्यास गडावर जाऊन मोकळ्या हवेत जेवणावर ताव मारता येईल.