मुरारबाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात येतो. सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगेवरील अगदी अंतिम टप्प्यावर हा किल्ला उभा आहे. गडाच्या पूर्वेला सपाट भूप्रदेश आहे. तर पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. आता आपण किल्ले पुरंदरची माहिती घेऊ….
किल्ल्याचे नाव : पुरंदर
समुद्रासपाटीपासून उंची : सुमारे 1500 मी.
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी: सोपी
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र
जवळचे गाव : सासवड, नारायणपूर
पुण्याहून अंतर : 30 किमी
स्थापना: 1350
डॉगररांग: भुलेश्वर, सह्याद्री
पुरंदरला कसे जाल ?
पुण्याच्या आग्नेय दिशेला सुमारे 30 किमी अंतरावर भुलेश्वर डोंगरावर अगदी शेवटच्या टोकावर ‘पुरंदर किल्ला आजही डौलाने उभा आहे. पुण्याहून कात्रज घाट ओलाडल्यानंतर सासवडमार्गे पुरंदरला जाता येते. सासवडला ‘सोपानदेव’ची समाधी आहे. सासवडपासून 10 किमी अंतरावर पुरंदर किल्ला आहे. गडाच्या पूर्वेला भुलेश्वर डोंगररांग संपलेली असलेने सपाट प्रदेश आहे. पश्चिमेला राजगड तर वायव्येला सिंहगड आहे.
पुण्याहून सासवड-भोर किंवा सासवड-नारायणपूर ही गाडी पकडायची. नारायणपूर गावाच्या पुढे ‘पुरंदर घाटमाथा’ नावाचा थांबा आहे. येथून पायवाटेने पाऊण तासात गडावर पोहोचता येते. नारायणापूरहून गाडी रस्त्यानेही पुरंदरला जाता येते.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास:
पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेव मंदिर आहे. यावरून हा किल्ला यादवकालीन असावा असे वाटते. ‘पुरंदर’ म्हणजे इंद्र. हा किल्ला बलाढ्य व मजबूत आहे.
पुराणात या डोंगररांगेला ‘इंद्रनील पर्वत’ असे नाव आहे. बहमनी सत्तेच्या काळात बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी पुरंदरचा किल्ला ताब्यात घेऊन बहमनी सत्ता स्थापन केली. त्यांनी पुरंदर किल्ल्याची दुरुस्ती व पुनर्बाधणी केली. याच घराण्यातील महादजी नीळकंठ याने पुरंदरच्या पुनर्बाधणीचे काम मोठ्या कष्टाने पूर्ण केले.
पुरंदर किल्ल्यावरील शेंदऱ्या बुरूज बांधताना बाहिसाक सोननाक याने आपला पुत्र व सून यांना गाडण्यासाठी दिले, मग हा बुरूज पूर्ण झाला अशी आख्यायिका आहे.
इ. स. 1489 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे हा किल्ला आदिलशाहीत आला.
शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा इ. स. 1645 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी घेतली आणि त्यानंतर तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पाठोपाठ अनेक किल्ले घेतले. त्याच दरम्यान आदिलशहाने शहाजीराजांना अटक केले होते. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास पाठवले होते. एकीकडे वडील कैदेत आणि दुसरीकडे स्वराज्यावर संकट. परिस्थिती खूपच बिकट होती. शिवरायांनी फत्तेखानाला शह देण्यासाठी पुरंदर किल्ला निवडला, त्या वेळी पुरंदर स्वराज्यात नव्हता. महादजी नीळकंठ यांच्या ताब्यात होता. तेथे भावाभावात वाद सुरू होता. त्याचा फायदा घेऊन शिवरायांनी गड ताब्यात घेतला.
पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली. ही लढाई शिवरायांनी जिंकली. शिवरायांनी पहिल्यांदाच मोठी लढाई जिंकली होती.
‘प्रतिशिवाजी’ म्हणून ज्याची ओळख आहे, त्या नेतोजीवर शिवरायांचा खूप जीव होता. इ. स. 1655 मध्ये त्यांनी नेतोजी पालकरला पुरंदर गडाचा सरनोबत म्हणून नेमले. नेतोजी या गडाचा कारभार चोखपणे पाहू लागला.
पुरंदर किल्ल्यावर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. ती घटना म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म. वैशाख शुद्ध 12शके 1579 मध्ये 12 मे 1657 रोजी गुरुवारी संभाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला. संभाजी महाराजांच्या जन्मामुळे हा किल्ला अजरामर झाला.
पुरंदरचा ऐतिहासिक तह :
30 सप्टेंबर इ. स. 1664 ला औरंगजेब बादशहाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त बादशहाने अनेक मोहिमा आखल्या होत्या. त्यातच दक्षिणेची मोहीमही होती. बादशहाने दक्षिण मोहिमेवर मिर्झाराजे जयसिंग याचा पुत्र मानसिंग याला पाठवले होते. तो औरंगजेबचा विश्वासू सेवक होता.
मिर्झाराजे जयसिंगाने मराठी मुलखातील अनेक प्रदेश काबीज केला होता. शेवटी तो पुणे जहागिरीत आला. पुणे जहागिरीतील बराचसा मुलूख त्याने काबीज केला होता.
इ. स. 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी तळ ठोकून होता. त्याला किल्ला काबीज करायचा होता. त्याने दिलेरखानाला किल्ला सर करण्यासाठी पाठवले. पुरंदरला वेढा पडला. दिलेरखान मोठ्या त्वेषाने लढत होता. त्याने गडावर तोफा डागण्यास सुरुवात केली. किल्ला मजबूत होता आणि गडावरील किल्लेदारही शूर होता. मुरारबाजीने मोठ्या नेटाने किल्ला लढवायला सुरुवात केली होती, परंतु अखेर घात झाला. माचीवरचा बुरूज कोसळला. मोगल माचीवर घुसले. दिलेरखानाने माची जिंकली. मराठ्यांनी बालेकिल्ल्याचा आश्रय घेतला. ते लढतच राहिले. हे सर्व दिलेरखान छावणीतून बघत होता.
मुरारबाजीने पाचशे मावळे निवडले. बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला आणि ‘हर हर महादेव’ ची घोषणा देत मावळे मोगलांवर तुटून पडले. भयंकर लढाई झाली. मोगलांचे सैन्य अफाट होते. मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला. मुघल सैनिक माघारी फिरले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग केला. त्याचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले. धुमश्चक्री उडाली. दिलेरखान घाईघाईने अंबारीत बसला. मुरारबाजीचा पराक्रम पाहून दिलेरखान थक्क झाला. त्याने मुरारबाजीला “तू आमच्या बाजूने ये. बादशाह तुला सरदार करतील, जहांगीर देतील, बक्षीस देतील” असे आमिष दाखवले; पण मुरारबाजीने ते ठोकरले. तो त्वेषाने दिलेरखानाच्या अंगावर चालून गेला. दिलेरखानाने एकापाठोपाठ एक असे तीन बाण सोडले. त्यातील एक बाण मुरारबाजीच्या कंठात घुसला. मुरारबाजी धारातीर्थी कोसळला…शिवरायांनी पुढची हानी टाळण्यासाठी लढाई थांबवली आणि तहाची बोलणी सुरू केली.
पुरंदरच्या ऐतिहासिक तहात शिवरायांनी मोगलांना 23 किल्ले दिले. त्यांची नावे : अंकोला, पुरंदर, रुद्रमाळ, कौढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, खिरदुर्ग, मानगड…
शिवरायांनी आग्ऱ्याहून सुटल्यानंतर दिलेले किल्ले पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. 8 मार्च 1670 रोजी निळोपंत मुजुमदाराने पुरंदर किल्ला स्वराज्यात आणला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबने पुरंदर किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ असे ठेवले. पुढे मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. शके 1695 मध्ये छत्रपती शाहू यांनी हा किल्ला पेशव्यांना दिला. शके 1617 मध्ये माधवराव पेशव्यांचा जन्म याच गडावर झाला. इ. स. 1818 मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर तो बराच काळ म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत इंग्रजांच्या ताब्यात राहिला.
पुरंदर गडावरील प्रेक्षणीय स्थळे :
बिनी दरवाजा :
नारायणपूर गावातून पुरंदरला जाताना हा दरवाजा लागतो. बिनी दरवाजातूनच गडावर प्रवेश करावा लागतो. दरवाजातून आत शिरल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या लागतात. पुढे जाताच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाजातून पुढे जाताच आपणास लष्कराच्या बराकी व बंगले दिसतात. पुरंदर माचीची लांबी सुमारे दीड किमी व रुंदी 35 ते 45 मीटर आहे. पुढे उजवीकडे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. ते पुरंदेश्वराचे मंदिर आहे.
पुरंदेश्वर मंदिर :
पुरंदेश्वर मंदिर पुरंदर माचीवर आहे. हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूट उंचीची मूर्ती आहे. हे मंदिर हेमाडपंथी धाटणीचे आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार थोरल्या बाजीरावाने केला होता. हे मंदिर पुरंदरचे कुलदैवत आहे.
वीर मुरारबाजींचा पुतळा :
वीर मुरारबाजी देशपांडेच्या पराक्रमाने पुरंदरच्या इतिहासाची पाने सुवर्णाक्षराने लिहिली गेली. त्याच मुरारबाजीचा पुतळा बिनी दरवाजातून प्रवेश करताच उजवीकडे थोडे अंतर चालत गेल्यावर लागतो. दोन्ही हातात समशेरी असलेला हा आवेशपूर्ण पुतळा सहज नजरेत भरतो.
रामेश्वर मंदिर :
पुरंदेरश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या जवळच पेशव्यांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. बाळाजी विश्वनाथने हा वाडा बांधला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. येथून पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने जाते; तर दुसरी वाट भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर पंधरा मिनिटांतच दिल्ली दरवाजापाशी येता येते.
दिल्ली दरवाजा :
हा दरवाजा उत्तराभिमुख आहे. बिनी दरवाजाच्या मानाने या दरवाजाची अवस्था बिकट झाली आहे. दरवाजाच्या वळणावर श्री लक्ष्मीमातेचे मंदिर आहे. आत गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते.
खंदकडा :
दिल्ली दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे एक कडा पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो ‘खंदकडा’ होय. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहिल्यानंतर पुन्हा मागे यावे. दरवाजापासून उजवीकडच्या वाटेने गेल्यावर पाण्याची टाकी, अंबरखाना, वाडा, पाण्याचे हौद, केदार दरवाजा इत्यादी पॉईंट लागतात.
पद्मावती तळे :
मुरारबाजीच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यानंतर पद्मावती तळे लागते.
शेंदऱ्या बुरूज :
पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस तटबंदीला लागून हा शेंदऱ्या बुरूज आहे.
केदारेश्वर मंदिर :
केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने 15 त 20 मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या सरळ केदारेश्वर मंदिरापर्यंत जातात. पुरंदरचे मूळ दैवत केदारेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या समोरच दीपमाळ आहे. केदारेश्वर मंदिर पुरंदर किल्ल्यावरील सर्वांत उंच भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड इत्यादी किल्ले दिसतात.
पुरंदर माची :
दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या बाटेने थेट पुढे जावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहोचतो.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
पुरंदर किल्ल्यावर स्वतंत्र राहण्याची अशी खास व्यवस्था नसली तरी येथे मिलिटरी बंगले आहेत. या ठिकाणी सोय होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याजवळ आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. येथे एकही खाणावळ किंवा हॉटेल नसल्यामुळे जेवणाची सोय स्वतः करावी लागते. जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य स्वतःजवळ असणे आवश्यक आहे.
पुरंदरजवळचे पर्यटन स्थळ : नारायणपूर
पुणे-जेजुरी मार्गावर पुण्याहून 35 किमी अंतरावर ‘नारायणपूर’ आहे. पूर्वी नारायणपेठ नावाचे गावठाण होते. आता नव्याने ‘नारायणपूर’ असे नामकरण केले आहे. पुरंदरला, जेजुरीला जातेवेळी लागणारे साहित्य येथे खरेदी करता येते. येथे नारायणेश्वराचे मंदिर असून ते यादवकालीन आहे. येथूनच किल्ल्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. शिवकाळात नीलकंठराव सरनाईक यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
बालाजी मंदिर :
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यालाच हे बालाजी मंदिर आहे. हे मंदिर केतकावळे गावाच्या हद्दीत येते. पुण्याजवळ बालाजी मंदिर उभारावे असे ‘व्यंकटेश हॅचरीज’चे संस्थापक स्वर्गीय बी. व्ही. राव यांचे स्वप्न होते. त्यांच्या पश्चात हे मंदिर दहा एकर परिसरात उभारले आहे. अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि निसर्गरम्य शांत परिसरात मन प्रसन्न होते. ज्यांना तिरुपती बालाजीला जाणे शक्य नाही ते या बालाजीला दर्शनासाठी येतात. मंदिराची रचना आणि सजावट अप्रतिम आहे.
सध्या पुरंदर गडावरील पहिल्या टप्प्यात भारतीय लष्करी छावण्या आहेत.त्यामुळे गडावर जाण्यासाठी परवानगी काढावी लागते.