गौरी गणपतीचा सण…Ganesh Festival

गौरी गणपतीच्या सणाला गणेशोत्सव असेही म्हणतात. हा सण भारतात विविध राज्यात साजरा करत असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात गौरी-गणपतीचा सण सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील सर्व चाकरमाने गौरी गणपतीच्या सणाला आपल्या स्वगृही येतात आणि आपापल्या घरी, गावी गणेशोत्सव साजरा करतात. मुंबई पुणे, कोल्हापूर या शहरांत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, गोवा या राज्यांतही गौरी-गणपतीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

गौरी-गणपतीचा सण केव्हा येतो?

संपूर्ण देशात एकाच वेळीं गौरी-गणपतीच्या सणाला सुरुवात होत असली तरी हा सण साजरा करण्याची पद्धत प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या सणाची सुरुवात होते; तर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला गौरी-गणपती सणाची सांगता होते. आता आपण गोष्टी-गणपतीचा सण कसा साजरा करतात ते पाहूया…..

गणेश चतुर्थीः

गौरी-गणपती सणाचा पहिला दिवस म्हणजे गणेश चतुर्थी होय. काही ठिकाणी या सणाला गणेश चतुर्थी असेही म्हणतात; तर काही ठिकाणी गणेशोत्सव म्हणतात.

गौरी-गणपतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला घरोघरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. पूर्वीच्या काळी मातीच्या मूर्ती बनवत असत. आज प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवतात. सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी POP च्या मूर्तीवर बंदी घातली आहे; पण त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही आहे. पण आम्ही दरवर्षी घरी मातीच्याच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो आणि त्याचे कुंडीत विसर्जन करतो. सर्वानीच असे केले तर जलप्रदूषण रोखता येईल.

सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा गणेश चतुर्थीलाच होते.

गौरी-गणपतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी गणपतीला उकडीच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी खीर सुद्धा बनवतात.

माहेरवाशीणींचा सण : गौरी-गणपती.

गौरी-गणपतीच्या सणाच्या दोन-चार दिवस अगोदरच माहेरची शिदोरी लग्न झालेल्या मुलींच्या घरी पोहोच होते. मुलगी कितीही वयाने मोठी झाली तरी अनेक ठिकाणी दरवर्षी शिदोरी दिली जातेच. नवीन लग्न झालेल्या मुली दरवर्षी माहेरला हमखास येतात. तांदळाची भाकरी आणि अळूच्या वड्या ही पारंपरिक शिदोरीची प्रथा होती .प्रत्येक स्त्री दरवर्षी गौरी-गणपतीच्या शिदोरीची वाट पाहात असते. आता शिदोरीचे स्वरूप बदलले आहे .लाडू, जिलेब्या, खाजे अशा गोड पदार्थांचे स्टॉल गौरीच्या सणात उघडले जातात. भाऊ येथूनच शिदोरी घेऊन जातो. काही ठिकाणी मात्र पारंपरिक शिदोरी दिली जाते. या शिदोरीत मायेचा ओलावा असतो. गौरी गणपतीच्या सणात स्त्रिया नटून थटून नऊवारी साडीत विविध कार्यक्रमात भाग घेतात.

गौरीची गाणी / झिम्मा फुगडी :

 

गौरी गणपतीच्या सणात मंगळा गौरीची गाणी स्त्रिया गातात.

1) ये गं गौराबाई सुख लेवून जाई।

2) घागर घुमू दे ,घुमू दे, कृष्णा पवा वाजू रे।

४) रुणु झुणू त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा ।

4) गौरी गणपती सण आलाय, माहेरी आली बाय ।
5) गौराई आली दारी, माझे साजणे गं बाई.

6) चल ग सई, चल ग सई, गौराई आली पहाटेच्या पारी।

अशा कितीतरी अवीट गाण्यांच्या मैफलीत माहेरवाशीणी रंगून जातात. झिम्मा फुगडी हा तर गौरी-गणपती सणातील आवडता खेळ. या खेळाचा मुली, माहेरवाशीणी,सर्वच महिला आनंद लुटतात.झिम्मा फुगडीच्या खेळात वयाची मर्यादा नसते.

दीड दिवसांचा गणपती:

काही ठिकाणी घरगुती गणपती दीड दिवसांचाच असतो. गणेश चतुर्थी दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करतात. आणि दुसर्‍या दिवशी दुपारी तरी गणपतीचे विसर्जन करतात. या प्रथेला दीड दिवसांचा गणपती असे म्हणतात.

गौरी आवाहन / ज्येष्ठा गौरी आवाहन:

गौरी गणपतीच्या सणातील ज्येष्ठा गौरी आवाहन हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. गौरीला म्हणजे पार्वतीला आपल्या पुत्राच्या भेटीसाठी यायला आवाहन केले जाते. या दिवशी गावातील सर्व मुली, माहेरवाशीणी गावाशेजारील डोंगरावर जातात. विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तोडून त्या कलशात भरतात. त्या वनस्पतींना फुले आलेली असतात. या वनस्पतींना गौरीची वनस्पती असे म्हटले जाते.

सगळेजण एकत्र जमतात आणि वाजत-गाजत गौरीला कलशात घालून वनस्पतीच्या रुपात घरी आणतात. या दिवशी गौरीची प्रतिष्ठापना गणपती शेजारीच केली जाते. काही ठिकाणी गौरीच्या मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली जाते. सगळीकडे घरात आनंद‌दायी वातावरण असते.

ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद शुद्‌ध सप्तमीला केले जाते. दररोज सकाळ- संध्याकाळ आरती केली जाते.

ज्येष्ठा गौरी पूजन / शंकराचे आगमन :

भाद्रपद शुद्‌ध अष्टमीला सकाळी मुली, माहेरवाशीणी डोंगर‌माळावर जाऊन भारंगीची वनस्पती आणतात. या वनस्पतीलाच लोक शंकर किंवा शकरूबा असे म्हणतात. या वनस्पतीला यावेळी फुलोरा आलेला असतो. भारंगीचे डहाळे कलशात घालून शंकराला वाजत-गाजत आणले जाते. संध्याकाळी पूजन केले जाते. गौरीचे शंकराचे मूर्तीच्या रुपात प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. रात्री जागरण असते. मुली, माहेरवाशीणी, सासुरवाशीणी मंगळागौरीची गाणी म्हणतात. फेर धरून टाळ्यांच्या आवाजात नाचत- गात गाणी म्हणतात. सर्वांचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत असतो.

घरगुती गौरी-गणपती विसर्जन :

भाद्रपद शुद्ध नवमीला किंवा भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात मूळ नक्षत्र असते, त्या दिवशी घरगुती गौरी- गणपतीचे विसर्जन होते. काही गावात सामुहिकरित्या वाजत- गाजत नेऊन गौरी-गणपतीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. सध्या मोठ्या प्रमाणात POP च्या मूर्ती वापरतात. त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. सर्व नागरिकांनी चिखलाचे गणपती आणावेत. ते रंगीत नसतील तर नदीत किंवा तलावात विसर्जित करण्यास हरकत नाही; पण POP च्या मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन करणे चुकीचे आहे.

आम्ही दरवर्षी चिखलाचे गणपती आणतो आणि परसदारातच कुंडात विसर्जन करतो. त्यामुळे प्रदूषण होत नाही. सर्वांनीच हा आदर्श घ्यावा आणि जलसंपत्तीचे रक्षण करावे.

सार्वजनिक गणेशोत्सव :

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुणे, मुंबई कोल्हापूर या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. मुंबईतील लालबागचा गणपती सर्वश्रुत आहेच. पुण्यातील दगडूशेट गणपती प्रसिद्ध आहे.

कोल्हापुरातील अनेक गणेशोत्सव मंडळे विविध प्रकारचे ऐतिहासिक, पौराणिक तसेच प्रबोधनात्मक देखावे करतात. काही मंडळे साधेपणाने, प्रदूषण न करता सांस्कृतिक वारसा जपतात. काही मंडळे सोंगी भजनांचे आयोजन करतात.काही मंडळे मैदानी, मर्दानी खेळांचे आयोजन करतात.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होते. या दिवशी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात व अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशाचे विसर्जन होते.
अनंत चतुर्दशीला शहरांमध्ये खूप गर्दी होते. सर्व मंडळे ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात गणेशाचे विसर्जन करतात.

गौरी-गणपतीचा सण : एक सांस्कृतिक वारसा..

प्राचीन काळापासून शंकर, पार्वती आणि गणेश यांनी सार्वजनिक जीवनात आपले खूप मोठे स्थान निर्माण केले आहे. शंकर आणि पार्वतीने दोन भिन्न संस्कृतीचा मिलाप घडवून आणला आहे.

शंकराने पार्वतीच्या पुत्राला स्वीकारून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. भारतीय जनतेच्या हितासाठी शंकर,पार्वती आणि गणेशाने केलेल्या कार्याची दखल सर्व भारतीय समाजाने घेतली आहे. त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे. प्रत्येक प्रदेशात गणेश चतुर्थीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आहेत. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

सर्वांना गौरी-गणपतीच्या सणाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….!

Leave a comment