पांडवगड: Pandavgad Fort

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला परिसर होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला असला तरी तिने एलिफंट हेड कड्याच्या जवळील कड्यावरून म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या कड्यावरून खाली वयगाव-जोर गावशिवाराच्या हद्दीतील दरीत उडी घेतली आहे. वयगाव, जोर, बलकवडी हे कृष्णा नदीचे प्रारंभिक खोरे होय, विस्तीर्ण कृष्णेचे लहान रूप कसे असेल, ते पाहण्यासाठी या निसर्गरम्य परिसराला आवश्य भेट द्यावी असेच हे खोरे आहे.

कृष्णेच्या या प्रारंभिक खोऱ्यातील वाईपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या धोम धरणाच्या उत्तरेला आणि कृष्णा खोऱ्याच्या डाव्या डोंगररांगेवर पांडवगड विसावलेला आहे. या पांडवगडाची आता आपण माहिती घेऊया-

गडाचे नाव : पांडवगड, थंड हवेचे ठिकाण.

पर्वत रांग : सहयाद्री, महाबळेश्वर

समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 1273 मीटर (4180 फूट)

ठिकाण : पांडवगड, ता.वाई, जिल्हा: सातारा

चढाईची श्रेणी : मध्यम

साताऱ्याहून अंतर : 40 किलोमीटर.
जवळचे ठिकाण: वाई, जिल्हा: सातारा
सध्याची स्थिती चांगली,

पांडवगडला कसे जाल ? How to go Pandavgad?

रायरेश्वर कमळगड, कृष्णा नदीचे, खोरे, भोर, मांढरदेव, वाई अशा अनेक प्रसि‌द्ध ठिकाणांच्या विळख्यात पांडवगड विसावलेला असल्याने पांडवगडाला भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे.

* वाई म्हणजे पूर्वीची विराटनगरी. या वाईपासून पांडवगड अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे.

* सातारा या जिल्ह्याच्या ठिकाणाहून पांडवगड 40 किमी दूर आहे. साताऱ्याहून एक तासात पांडवगडाला पोहोचता येते.

* भोर या संस्थानचे महत्त्वाचे ठिकाण आहे मांढरदेव.या मांढरदेवासून वेडीवाकडी वळणे घेत पांडवगडला रस्ता जातो.मांढरदेव ते पांडवगड अंतर 12 किलोमीटर आहे.

* पाचगणी ते पांडवगड हवाई अंतर केवळ 8 किलोमीटर असेल. पाचगणीहून वाईमार्ग पांडवगडला जावे लागते. त्यामुळे पाचगणी ते पांडवगड अंतर 22 किलोमीटर होते..

* पुण्याहून वाई मार्गे पांडवगड 75 किलोमीटर अंतरावर आहे.

पांडवगडचा इतिहास : History of Pandavgad:

आधी वाळवा नंतर पन्हाळगड ही राजधानी असलेला शिलाहार राजा भोज (दुसरा) हा मोठा पराक्रमी राजा होता.या राजा भोज (दुसरा) च्या काळात महाराष्ट्रातील बहुतांश किल्ले होते. इ.स. बाराव्या शतकात राजा भोज सत्तेवर होता. नववे शतक ते बारावे शतक अशी चारशे वर्षे शिलाहार घराण्याची कोल्हापूर-पन्हाळा संस्थानवर सत्ता होती. याच काळात त्यांनी अनेक किल्ले बांधलेत. पांडवगड हा किल्ला राजा भोज यानेच बांधला आहे. पांडवगड या नावावरून हा किल्ला पांडवांनी बांधला असल्याच्या अनेक दंतकथा आहेत; पण या सर्व दंतकथा चुकीच्या आहेत.

शिवकाळात पांडवगड विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिपात्री महाराजांनी इ.स. 1673 मध्ये स्वराज्यात हा गड सामील करून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची वाताहात झाली. यावेळी पांडवगड मुघलांच्या ताब्यात गेला. इ.स. 1701 मध्ये महाराणी ताराबाईनी चंदन नंदन किल्ल्या बरोबरच पांडवगड सुद्धा स्वराज्यात घेतला.

औरंगजेबच्या मृत्यूनंतर राणी येसूबाई आणि पुत्र शाहू यांची सुटका झाली.महाराणी ताराबाई आणि छत्र‌पती शाहू यांच्यात गृहकलह सुरु झाला. या संघर्षात छत्रपती शाहूंनी पांडवगड आपल्याकडे ठेवला.

इ.स. 1817 मध्ये त्रिंबकजी डोंगळे आणि ब्रिटिश यांच्यात लढाई झाली.
या लढाईत त्रिंबकजी डोंगळ्यांनी ब्रिटिशांचा पराभव करून गड ताब्यात ठेवला; पण पुढे 1818 मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांचा पूर्ण पराभव केल्यामुळे पांडवगड सुद्धा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

सध्या गडाची स्थिती पाहिली तर येथील बरीचशी जमीन एका पारशी व्यक्तीने खरेदी केलेली आहे. गडावरील जुन्या इमारतींचे बुरुजांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. येथे या पारशी व्यक्तीने बंगला बांधला

गडावरील प्रेक्षणीय स्थळे : Spectacular Places of Pandavgad Fort:-

गडाचे प्रवेशद्वार:

गडाच्या उध्वस्त अवस्थेतील पायऱ्या चढून वर गेल्यावर प्रवेशद्वाराच्या पाऊलखुणा दिसतात;पण प्रवेशद्वार पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे त्याच्या केवळ पायाचे अवशेष पाहायला मिळतात.

गडाची माची:

पांडवगड काही ऐतिहासिक वारसा म्हणून नोंद पुरातत्त्व विभागाकडे झालेली आहे,असे वाटत नाही. गडाच्या माचीवरील काही भाग एका पारशी व्यक्तीने खरेदी करून तेथे आपला बंगला बांधला आहे. त्याने आपल्या बंगल्याभोवती कुंपण लावलेले आहे. या पारशी व्यक्तीने गडावर काही वृक्षलागवड केली आहे. गडाच्या पावित्र्याच्या दृष्टीने पाट्या सुद्धा लावल्या आहेत. धुम्रपान करू नये, प्लॅस्टिक कचरा टाकू नये अशा पाट्या पाहायला मिळतात.

पाण्याच्या टाक्याः

गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या आढळतात. किमान डझनभर तरी पाण्याच्या टाक्या गडावर असतील. उन्हाळ्यात या टाक्या रिकाम्याच असतात. सध्या कोणत्याही ऋतूत या टाक्यांतील पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत.

गडावरील बुरुज :

गडावर बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना एक बुरुज लागतो. या बुरुजाचे नाव काही समजले नाही; पण अजूनही हा अनामिक बुरुज सुस्थितीत आहे.

मारुती मंदिर :

गडावर एक जुनाट छोटेसे मारुती मंदिर आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती दगडावर कोरलेली आहे. मारूतीचा एक हात कमरेवर व एक हात वर उचललेला आहे.

चुन्याचा घाणाः

अनेक गडावर चुन्याच्या घाण्याचे अवशेष पहायला मिळतात. प्रतापगडावरही पाहा‌यला मिळतात. पांडवगडावर मारूतीच्या मंदिराजवळच चुन्याचा घाणा आहे. गडाचे बांधकाम करण्यासाठी हा चुन्याचा बाणा वापरला जात असे.

पांडजाई मंदिर :

गडावरील पांडजाई मंदिर अवशेष स्वरुपातच पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची बरीच झीज झालेली आहे. मंदिर परिसरात शिवलिंग, नंदी, पादुका पाहायला मिळतात. त्यामुळे येथे महादेवाचे मंदिर कोणे एके काळी असावे असे वाटते.

गडावर राहण्याची सोय :

गडावर पावसाळ्यात, हिवाळ्यात मुक्काम करणे शक्य नाही; पण स्वतःचा Tent घेऊन गेल्यास उन्हाळ्यात एखादा मुक्काम करणे शक्य आहे.

Leave a comment