कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे /Places to visit in kolhapur

कोल्हापूर शहराला खूप मोठी परंपरा आहे. शिलाहार राजघराण्यातील राजा भोज यांच्यापासून ते महाराणी ताराबाई आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे खूप मोठे योगदान आहे. येथे पाह‌ण्यासारखी आणि भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यांतील काही ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत.

1. रंकाळा तलाव : Rankala Lake:

 

कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची शान आणि कोल्हापूरची चौपाटी अशी ओळख असलेल्या रंकाळा तलावाची आपण माहिती करून घेणार आहोत. या रंकाळा तलावाला कोल्हापूरचे मरीन ड्राइव्ह सुद्धा म्हणतात. अकराव्या- बाराव्या शतकात चालुक्य राजघराण्याच्या काळात आणि शिलाहार राजघराण्यांच्या काळात अनेक किल्ले, वास्तू मंदिरे बांधली गेली. कोल्हापुरात बांधल्या गेलेल्या मंदिरांसाठी कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागात मोठी खाण काढली. या खाणीतील द‌गडांचा वापर मंदिरे, वास्तू बांधण्यासाठी केला. पुढे या खाणीचे रुपांतर भव्य तलावात झाले.

चालुक्य- शिलाहार राजघराण्यांच्या काळातच तलाव बंदिस्त स्वरुपात करून बांधकाम केले गेले. कोल्हापूरचे छत्रपती राहर्षी शाहू महाराज यांनी रंकाळा तलावाची पुनर्बाधणी करून सुशोभीकरण केले.सध्या जो सौंदर्यसंपन्न आणि सुशोभित रंकाळा तलाव दिसतो, तो राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृ‌ष्टीतून साकारलेला आहे. या रंकाळा तलावाचा परीघ (घेर) सुमारे 2.5 मैल म्हणजे 4.00 किलोमीटर आहे. रंकाळ्याची खोली काही ठिकाणी 35 फुटांपर्यंत आहे. या रंकाळा तलावाच्या काठावर भव्य शालिनी पॅलेस उभा आहे. एके काळी या तलावाचा उपयोग मोठ्या प्रमाणात कपडे धुण्यासाठी केला जात असे. 1980 च्या दशकात आम्ही या रंकाळा तलावात किती तरी वेळा पोहलो आहे. पोहताना नदीतील पाण्यापेक्षा या तलावातील पाणी जड जाणवत होते. 2000 सालापासून रंकाळ्याला केंदाळने घेरायला सुरुवात केली होती. ज्यादा झालेले किंवा खराब झालेले पाणी मोरीवाटे सोडण्याची सोय होती; परंतु ही मोरी बुजून गेल्यामुळे रंकाळ्याचा out let बंद झाला आहे. आज रंकाळा केंदाळ‌मुक्त आहे; पण पाण्याची शु‌द्धता कमीच आहे.

सुमारे 200 हेक्टर क्षेत्रात वसलेला हा रंकाळा तलाव सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांनी गजबजलेला असतो.

सायंकाळी भेळ, पाणीपुरी असे चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले‌ले असतात. सायंकाळी खवय्यांनी रंकाळा परिसर गजबजलेला असतो.

2. शालिनी पॅलेस : Shalini Palace.

कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या काठावरच 1930 ते 1934 या कालखंडात एक सुंदर आणि देखणा राजवाडा बांधलेला आहे. कोल्हापूरचे दुसरे शहाजीराजे छत्रपती आणि महाराणी प्रमिलाराजे यांची कन्या म्हणजे शालिनी राजे होय. छत्रपती शहाजीराजे (दुसरे) आणि प्रमिलाराजे यांनी या राजवाड्याला शालिनी पॅलेस असे आपल्या कन्येचे नाव दिले.राजर्षी शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरचे छत्रपती राजाराम (तिसरे) यांनी हा पॅलेस बांधून घेतला असून या पॅलेसच्या बांधकामासाठी इटालियन संगमरवर आणि काळा बेसाॅल्ट वापर‌लेला आहे. त्यावेळी हा शालिनी पॅलेस बांधण्यासाठी 8,00,000 रुपये खर्च आला होता. राजवाड्याची इमारत मध्ययुगीन काळातील वास्तुशिल्पाप्रमाणे असून ती दुमजली आहे. इमारतीच्या चारी कोपऱ्यावर चार मनोरे असून त्या मनोऱ्यांवर घुमट आहेत.त्यामुळे इमारत अधिकच सुशोभित दिसते. राजवाड्यातील आतील दालने म्हणजे कलात्मकतेचा उत्तम नमुनाच पाहायला मिळतो. राजवाड्यासमोरील मोकळ्या जागेत सुंदर आणि रेखीव बाग आहे. या राजवाड्यामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलले आहे.

1887 साली या राजवाड्याचे 3 star हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले होते. त्यावेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या राजवाड्यात झाले होते.मोठ्या नुकसानीमुळे 2014 पासून हा राजवाडा बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूरचे तत्कालीन छत्रपती (1922 से 1940) राजाराम तिसरे यांनी आपल्या काळात बांधलेला हा राजवाडा अर्थात शालिमी पॅलेस आज रंकाळ्यावर डौलाने उभा आहे. राजाराम तिसरे हे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र होय.

3. न्यू पॅलेस म्युझिअम New Palace Museum:

कोल्हापूरच्या छत्रपतींचे सध्याचे निवासस्थान म्हणून न्यू पॅलेसची ओळख आहे. सध्या या पॅलेसमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, त्यांचे दोन पुत्र युवराज संभाजीराजे व युवराज मालोजीराजे आणि सर्व कुटुंबीय राहतात (2024/25). याच पॅलेसच्या एका बाजूला म्युझिअम आहे. कोल्हापूरची जनताही छत्रपती राजघराण्याला मान देणारी आहे.

न्यू पॅलेसचे बांधकाम इ.स. 1877 ते 1884 या कालावधीत झाले असून या काळात कोल्हापूरच्या गादीवर सहावे शिवाजी छत्रपती नारायणराव हे आरुढ झाले होते. अहिल्या राणीसाहे‌बांनी ही इमारत बांधून घेतल्याचा उल्लेख आहे. या राजवाड्याचा आराखडा ब्रिटिश वास्तुविशारद मेजर मँट याने बनवला होता.इमारतीच्या मध्यभागी अष्टकोनी मनोरा असून या मनोऱ्यावर मोठे घड्याळ बसवले आहे. त्यामुळे या मनोऱ्याला घड्याळाचा मनोरा असे म्हटले जाते.

26 जून 1974 या शाहू महाराज जयंतीपासून राजवाड्याच्या पहिल्या मजल्याच्या पूर्वेकडील भागात ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय केले आहे. हे संग्रहालय पाहण्यासाठी अनेक शाळांच्या सह‌ली येतात. देश-विदे‌शातील पर्यटक येतात.

या संग्रहालयातील राजर्षी शाहू दरबार हॉल अप्रतिम आहे. लढाईत वापरली गेलेली विविध शस्त्रास्त्रे आहेत.तलवारी,ढाली, दांडपट्‌टा बंदुका, अशी कितीतरी शस्त्रे आहेत. भिंतीवर राजघराण्यातील राजे महाराजे, राण्या यांचे फोटो आहेत. कोल्हापुरातील राजघराण्याची अधिकृत वंशाव‌ळ आहे. उंच घोडे (कापूस भरलेले) लक्ष वेधून घेतात. पालखी, मेणा, राजचिन्हें ,फर्निचर राजपरिवारातील पोशाख, दागिने, भांडी, धातूच्या वस्तू आहेत. साठमारी कशी केली जाते याचे बोलके चित्र, साठमारीची हत्यारे आहेत. शिकार केलेले विविध प्राणी (वाघ, अस्वल, गेंडा, हरिण, सांबर काळवीट इत्यादी कापूस, कोंडा भरून ठेवलेले आहेत. काही पक्षी आहेत. राजवाड्याच्या परिसरात अंगणात सांबर,भेकर, काळवीट बागडताना दिसतात.

न्यू पॅलेस वस्तुसंग्रहालय (म्युझिअम) सेंट्रल बस स्टेशन (CBS) कोल्हापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. म्युझिअम पाहणाऱ्यांसाठी नाममात्र फी आकारली जाते.

4. भवानी मंडप (जुना राजवाडा) : Bhavani Mandap. Kolhapur

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पूर्वेला लागूनच जुना राजवाडा (भवानी मंडप) आहे. 1813 साली जुना राजवाड्याचे काही बांधकाम झाले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर तिसरे संभाजी छत्रपती होते. 1857 च्या उठावात जुना राजवाडा उठावाचे केंद्रबिंदू बनले होते. तत्कालीन छत्रपती चिमासाहेब महाराज यांनी क्रांतिकारकांना सक्रीय मदत केली होती.

येथे राजवाड्यात छत्रपती घराण्याची कुलदेवता भवानीमातेची प्रतिष्ठापना केलेली आहे. राजवाड्यासमोरच राजर्षी शाहू महाराज यांनी 1918 साली मंडप बांधून घेतला आहे. हा मंडप त्यांची कन्या आक्कासाहेब महाराज यांच्या लग्नानिमित्त (1916) बांधला होता. यावरुनच या परिसराला भवानी मंडप असे नाव पडले आहे. या राजवाड्यातूनच करवीर संस्थानचा राज्यकार‌भार चालत असे.

या राजवाड्यात शाहू महाराजांचा भव्य पुतळा आहे. याशिवाय येथील व्हरांड्यात गवा, वाघ, सांबर (कापूस, भुसा भरलेले) पाहायला मिळतात.

5. दसरा चौक: Dasara Chauk, Kolhapur.

कोल्हापूरची शान म्हणजे दसरा चौक होय. सेंट्रल बस स्टेशम (CBS) पासून 1 किलोमीटर अंतरावर पश्चिमेला दसरा चौक आहे. या चौकात राजर्षी शाहू छत्रपतींचा भव्य उभा पुतळा पूर्वाभिमुख आहे. दरवर्षी या चौकात कोल्हापूरच्या छत्रपतींच्या हस्ते सीम्मोलंघनाचा कार्यक्रम पार पडला जातो. यावेळी राजघराण्यातील छत्रपती, युवराज पारंपरिक वेशभूषेत येतात. दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी कोल्हापूरकर येथे मोठ्या प्रमाणात जमा होतात. सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला जातो. येथे जवळच शाहू स्मारक भवन आहे. तेथे दरवर्षी प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली जातात. छोट्या दालनात वस्तुसंग्रहालय, पुस्तक संग्रहालय, कला संग्रहालय भरत असते.

येथेच दरवर्षी मानाचा शाहू पुरस्कार दिला जातो.

6. राजर्षी शाहू महाराज:

कोल्हापूरची ओळख राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर अशी केली जाते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला, 2 एप्रिल 1894 मध्ये ते कोल्हापूच्या गादीवर बसले.ते पुरोगामी विचाराचे होते. 28 वर्षाच्या कारकीर्दीत राधानगरी धरण, कळंबा तलाव, प्राथमिक शिक्षण सक्तीचे, विविध जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत 23 वसतिगृहे, विविध ठिकाणी शाळा, आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत, वृक्ष लागवड, मोफत शिक्षण, जाती निर्मूलन, तळागाळातील लोकांना मदत, कुस्तीचे मैदान असे चौफेर काम करून राजर्षी शाहू महाराज अजरामर झाले.

कोल्हापुरातील आणखी प्रसिद्‌ध ठिकाणांची माहिती पुढील लेखात पाहायला मिळेल.

आवर्जून वाचावे असे काही

  1. महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism
  2. दुबई दर्शन…. एक अविस्मरणीय प्रवास /Dubai Tourism
  3. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज : बाणेदार छत्रपती/Chhatrapati Sambhaji Maharaj

Leave a comment