कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय शहर आहे. या शहराला खूप प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आहे. जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे. राजर्षी महाराजांच्या राजधानीचे शहर आहे. या शहरात पाहण्यासाठी खूप ठिकाणे आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत.

कोल्हापूरला कसे जाल ? How to go to Kolhapur?

कोल्हापूरला गारगोटी, राधानगरी, निपाणी, कागल, जयसिंगपूर, सांगली, कराड, पन्हाळा, रत्नागिरी इत्यादी शहरांतून बसने जाता येते.

* सांगलीहून कोल्हापूर 47 किलोमीटर अंतरावर आहे.

* कराडपासून कोल्हापूर 70 किलोमीटर अंतरावर आहे. •
गारगोटी ते कोल्हापूर अंतर 55 किलोमीटर आहे.

* निपाणीतून कोल्हापूर 39 किलोमीटर अंतरावर आहे.

पन्हाळगड ते कोल्हापूर 23 किलोमीटर अंतर आहे.

राधानगरीहून गैबी मार्गे कोल्हापूर 50 किमी अंतरावर आहे.

कागल शह‌रापासून कोल्हापूर 16 किमी अंतरावर आहे.

* मुदाळ तिठा ते कोल्हापूर अंतर 38 किमी आहे.

कोल्हापुरात काय पाहाल? What to see in Kolhapur?

श्री अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, न्यू पॅलेस म्युझिअम,रंकाळा तलाव, टाऊन हॉल, बिनखांबी गणेश मंदिर, शिवाजी वि‌द्यापीठ, दसरा चौक, शाहुपुरी व्यापारी पेठ इत्यादी अनेक ठिकाणे कोल्हापुरात पाहण्यासारखी आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या ठिकाणांची आपण ओळख करुन घेऊया——

1. श्री अंबाबाई मंदिर :Shri Ambabai Temple.

श्री अंबाबाई ही कोल्हापुरची ग्रामदैवत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे आराध्यदैवत आहे. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरची अंबाबाई भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे:

कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तश्रृंगी माता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आहेत.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईची ख्याती संपूर्ण भारतभर आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून (2017) भाविकांची आणि पर्यटकांची कोल्हापूरला गर्दी वाढत आहे. श्री अंबाबाईचे मंदिर हे प्राचीन मंदिर असून सातव्या शतकात इ.स 664 मध्ये चालुक्यवंशीय राजा कर्ण याने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली, असे मानले जाते. इ.स नवव्या शतकात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यापूर्वी सु‌द्धा याच ठिकाणी अंबाबाईचे मंदिर होते.हे मंदिर खूप छोटे असावे. म्हणून त्याठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले. इ.स. अठराव्या शतकात कोल्हापूरच्या तत्कालीन छत्रपतींनी मंदिराचे शिखर बांधून घेतले आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या छत्रपतींनी गरुडमंडप बांधून घेतला आहे.

हेमाडपंथी बांधकामाचा उदय बाराव्या शतकात झाला असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराची रचना हेमाडपंथी ढाचणीची वाटते. त्यामुळे बाराव्या शतकात मंदिराची पुनर्बांधणी केली असल्याची शक्यता अधिक वाटते.

दसऱ्याच्या सणात श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अलीकडे सुरु झालेल्या
प्रथेनुसार अंबाबाईला नऊ दिवस नऊ रंगाची साडी नेसवली जाते. कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या आज्ञापत्रानुसार चैत्र महिन्यात अंबाबाईचा रथोत्सव सुरु झाला. चैत्र महिन्यात यात्रेनिमित्त श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. अर्थात त्याच वेळी भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात. जोतिबा आणि अंबाबाई यांच्यात बहीण भावाचे नाते मानले जाते. कोल्हापूरचा उपद्रव वाढल्यामुळे त्याच्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी जोतिबा अंबाबाईच्या मद‌तीला धावून आला होता. अशी दंतकथा प्रचलित आहे. अंबाबाई हे सती पार्वतीचे प्रतिकात्मक रूप आहे. असेही मानले जाते.

मंदिराची स्थापत्य कला:

मंदिराच्या सभोवती बाहेरील भिंतीवर अप्रतिम कोरीव काम आणि शिल्पकला पाहायला मिळते. वीणावाद‌क, टाळकरी, विविध मृदंग वाजवणाऱ्या नर्तकी, मदनिका यांच्या कलाकृती साकारलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात पारंपरिक दीपमाळा आहेत. मंदिराच्या पश्चिमाभिमुख दरवाजाजवळ सटवाईदेवीची मूर्ती आहे. आपला जन्म झाल्यावर सटवाईदेवी पाचव्या दिवशी आपल्या कपाळावर आपले भविष्य लिहून जाते, अशी दंतकथा आहे. तीच ही सटवाई देवी होय.

नवरात्रौत्सवातील शिवपार्वती रुपातील अंबाबाईची पूजा:

परंपरेप्रमाणे दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाईची शिवपार्वती रुपात पूजा केली जाते. ही परंपरागत पूजा बरेच काही सांगून जाते. अंबाबाई ही पार्वतीचेच प्रतिकात्मक रूप असल्याचे ही परंपरा सांगत. शिव, पार्वती आणि गणेश, यांची सालंकृत मांडणी करून पूजा केली जाते. रात्री पालखी सोहळा असतो. पालखी सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी असते.

किरणोत्सव :

भारतात अनेक मंदिरांच्या ठिकाणी किरणोत्सवाची परंपरा आहे. श्री अंबाबाईची मूर्ती पश्चिमाभिमुख असल्याने सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी हा किरणोत्सव साजरा केला जातो.सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होत असताना किरणोत्सव होत असतो. श्री अंबाबाईच्या मंदिरात नोव्हेंबर महिन्यात 9,10,11 नोव्हेंबरला किरणोत्सव होतो. याशिवाय 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी या दि‌वशी सुद्धा किरणोत्सव होतो. स्वच्छ, निरभ्र आकाश असेल तर किरणोत्सव पाहायला मिळतो. किरणोत्सवात सूर्याची किरणे देवीच्या पायापासून मुखापर्यंत पोहोचतात. सूर्य देवीला किरणांचा अभिषेक घालत आहे, अशी कल्पना केली जाते.

नवग्रह मंदिर:

अंबाबाईच्या मंदिर परिसरात घाटी दरवाजाकडे जाताना तेथे एक चतुष्खांबी प्राचीन मंदिर आहे. हेच नवग्रह मंदिर होय. मंडपाचे छत नऊ खणात विभागलेले आहे. या नऊ खणात विविध देवतांचे शिल्प आहे. पुराणातील कथांवरून हे शिल्प अवतरलेले आहे. या मंदिराचे शिल्पवैभव अनमोल असेच आहे. पुराणात काही कल्पित कथाही यथाकाल घुसवल्या आहेत. त्याची सत्यता तपासणे खूप कठीण होऊन बसले आहे.

श्री अंबाबाईला तोफेची सलामी:

दरवर्षी अंबाबाईला तोफेची सलामी दिली जाते. यासाठी बुंदुकीतील दारू आणि नारळाची शेंडी वापरली जाते. वर्षातून 40 ते 50 वेळा देवीला तोफेची सलामी दिली जाते. नवरात्रौत्सवात, चैत्रउत्सवात आणि अन्य प्रासंगिक उत्सवाच्या वेळी तोफेची सलामी देण्याची प्रथा खूप जुनी आहे. ही प्रथा अद्याप सुरु आहे. सुमारे 100 किलो वजनाची ही तोफ असून किमान 400 ते 500 वर्षांची जुनी असल्याची जाणवते.

कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी नव्हे.

कोल्हापूरकर आपली परंपरा जपण्यात जागरुक असतात. श्री अंबाबाईला काहींचा महालक्ष्मी करण्याचा प्रयत्न चालू होता;पण तो जागरुक कोल्हापूरकरांनी हाणून पाडला.श्री अंबाबाई ही पार्वतीचे प्रतिकात्मक रूप आहे. म्हणूनच नवरात्रौत्सवात अंबाबाईची शिव-पार्वती रुपात पूजा केली जाते. लक्ष्मी ही नारायणाची पत्नी आहे. लक्ष्मी आणि पार्वती या दोन वेगवेगळ्या देवता आहेत. त्यामुळे पार्वतीला लक्ष्मी कसे म्हणून चालेल?

प्रत्येक वर्तमानपत्राच्या अंबाबाई संदर्भातील बातमीत कधीही महालक्ष्मी असा उल्लेख नसतो.अंबाबाई असाच असतो.आपणही अंबाबाई असाच उल्लेख करूया आणि कोल्हापूरची परंपरा जपूया.

या लेखाद्वारे कोल्हापूरच्या अंबाबाईला शंभर तोफांची सलामी!

‘कोल्हापूरातील आणखी महत्त्वाच्या ठिकाणांचा परिचय पुढील लेखात करून देत आहे.

वर्जून वाचावे असे काही

1. किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

2.विशाळगड/ Vishalgad Fort

3. भुदरगड किल्ला/Bhudargad Fort Information In Marathi

 

Leave a comment