कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. हौसी पर्यटकांसाठी कोल्हापूर जिल्हा नंदनवनच आहे. यापूर्वी आपण कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध ठिकाणांची दोन लेखांमध्ये माहिती घेतली आहे. याशिवाय जिल्ह्यातील नृसिंहवाडी, खिद्रापूर या ठिकाणांची सविस्तर माहिती लिहिली आहे. आता आपण कणेरीमठ म्युझिअम, बाहुबली (जैन तीर्थक्षेत्र), दोजीपूर अभयारण्याची माहिती घेणार आहोत.
1. कणेरीमठ म्युझिअम :Siddhagiri / Kanerimath Museum:
भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आणि नव्या पिढीसमोर हा आदर्श ठेवण्यासाठी कणेरीमठ म्युझिअमची स्थापना झाली. या म्युझिअमची आणि मठाच्या कार्याची आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत.
* कोल्हापूरपासून दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर कणेरीमठ आहे. येथेच विविध प्रकारचे म्युझिअम आहे.
* कागलहून कणेरीमठ 11 किलोमीटर अंतरावर आहे.
* कोल्हापूर-गारगोटी रोडवरील मुदाळतिठा येथून कणेरी मठ 25 किलोमीटर अंतरावर आहे. कणेरी मठाची ओळख गावच्या टेकडीवर असलेल्या सिद्धगिरी मठाच्या प्रसिद्धीमुळे होते. या मठाची परंपरा 12 व्या शतकापासून आहे. येथील मठाच्या मठाधीशांना परंपरेनुसार काडसिद्धेश्वर स्वामी असे म्हणतात. 1952 साली सिद्धगिरी मठाचे ट्रस्टमध्ये रुपांतर झाले. सध्या जे मठाधीश आहेत, ते 49 वे मठाधीश आहेत. 2006 साली सिद्धगिरी मठाच्या काड सिद्धेश्वर महाराज यांच्या प्रयत्नातून श्री सिद्धगिरी म्युझिअम ऑफ व्हिलेज लाईफ हे ग्रामीण संग्रहालय स्थापन झाले आणि कणेरी मठाची ओळख महाराष्ट्रात पसरली. ही ओळख हळूहळू संपूर्ण भारतभर पसरेल. सुरुवातीला प्राचीन स्वयंपूर्ण, खेडी आणि विविध व्यवसाय हे आताच्या नव्या पिढीला समजावेत या उद्देशाने प्रथम छोटे छोटे व्यवसाय करणारे कारागीर आणि त्यांचा व्यवसाय शिल्परुपाने मांडले गेले. लोहार काम, सुतारकाम, कुंभारकाम, बुरुडकाम, घोंगडी विणणे, चर्मकार, दोऱ्या वळणे, शेतीची कामे करणारे बैलांचे औत, रेड्यांचे औत, कुरीची पेरणी, कुरणावर चरणारी जनावरे, विटीदांडूचा खेळ, खळ्यावरील मळणी, झुली परिधान केलेली बैलगाडीसह बैलजोडी’, कुक्कुटपालन, शेळीपालन, गुंडी उचलणे, मंदिरातील प्रवचने, वासुदेव, पावश्या (डोंबिलबाजा) गारुड्याचा खेळ, लोहाराचा भाता, कापसाच्या गाद्या बनवणे, कापूस पिंजण, पांगुळगाडा (वॉकर), शिंपीकाम, न्हावी काम, यात्रेतील सिनेमादर्शन, बाजारपेठ, जात्यावरचे दळण, मंदिरातील शाळा, कात्र्यांना धार लावणे, चावडी बैठक, सी. सॉ (बैलगाडीच्या जू चा) शेणी वळणे, नारळ सोलणे अशा कितीतरी ग्रामीण जीवनातील छोट्या छोट्या व्यवसायांचे, उद्योगांचे शिल्परुपाने उत्तम पद्धतीने चित्र उभारलेले आहे. यातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात लोप पावलेले आहे. उदा. मोट आता कुठेच पाहायला मिळत नाही. कणेरी मठाच्या वतीने सेंद्रीय शेतीचा प्रयोग यशस्वी पद्धतीने राबवला आहे. गो पालनही आहे. येथे 100% सेंद्रीय उसापासून सेंद्रीय गूळ मिळतो. आधुनिक शेतीत वापरल्या गेलेल्या कीटकनाशक तणनाशकांमुळे माणसाने पुन्हा सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे, हा संदेश देण्यासाठी सेंद्रीय शेतीचा प्रयोग राबविला आहे. याशिवाय कणेरी मठावर व्यावसायिक शिक्षण देणारी आणि मुलांना स्वावलंबी बनवणारी शाळा ट्रस्टच्या वतीने सुरु केली आहे. येथून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी स्वावलंबी बनलेले आहेत. मठामार्फत कमीत खर्चात रोग्यांना वैद्यकीय सुविधा, शस्त्रक्रिया पुरविल्या जातात.
कणेरी मठावर प्रत्यक्ष भेट देऊन ट्रस्टने उभा केलेले म्युझिअम ऑफ व्हिलेज सर्वांनी आवश्य पाहावे असेच आहे.
2. बाहुबलीः जैन तीर्थक्षेत्र :Bahubali, Jain Pilgrimage
कोल्हापूर जिल्ह्यातील जैनांचे पवित्र आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र अशी ओळख बाहुबलीची आहे. हे बाहुबलीचे ठिकाण हातकणंगले तालुक्यात बाहुबली येथे आहे. कोल्हापूरपासून बाहुबली 30 किलोमीटर पूर्वेला आहे. सांगलीतून बाहुबली हे ठिकाण 29 किलोमीटर आहे, हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावाजवळ भगवान बाहुबलीची मूर्ती आणि प्राचीन जैन मंदिरे आहेत. येथील जहाज मंदिरही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जैन धर्मातील 24 तीर्थकरांचे तपस्वी स्थितीतील पुतळे आहेत. येथे सर्व 24 तीर्थकरांची माहिती मिळते.त्यांची नावे कळतात. येथे सर्वांचे आकर्षण ठरले आहे ते ठिकाण म्हणजे बाहुबलीची 28 फुटी संगमरवरी मूर्ती. एकाच संगमरवरी दगडात एवढी मोठी सुबक आंणि सुंदर मूर्ती घडवलेली आहे. उत्सवाच्या वेळी या भगवान बाहुबलीच्या मूर्तीला अभिषेक घातला जातो. ही मूर्ती पूर्ण उभ्या स्थितीत आहे. ही मूर्ती बाहुबली विद्यापीठाने 1963 साली स्थापित केली आहे.
याठिकाणी श्वेतांबर समाजाचे 254 फूट लांब, 122 फूट रुंद, 25 फूट उंच असे अतिविशाल जहाज मंदिर आहे .जहाज मंदिरात 108 फूट उंचीची उभी जटायुक्त मूर्ती आहे.
3. दाजीपूर अभयारण्य – Dajipur Sanctuary
कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यांसाठी राखीव असलेले हे अभयारण्य राधानगरी तालुक्यात पश्चिमेकडे आहे. या अभयारण्याचे अधिकृत दप्तरी नाव राधानगरी अभयारण्य असे आहे. या अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी दाजीपूर येथे जावे लागते. म्हणून या अभयारण्याला दाजीपूर अभयारण्य असे म्हणतात.
कोल्हापूरहून दाजीपूर 80 किलोमीटर आहे. फोंड्याहून दाजीपूर 13 किलोमीटर आहे. राधानगरी बसस्थानकापासून दाजीपूर 30 किलोमीटर आहे. दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी राखीव असले तरी या जंगलात अस्वले, बिबट्या, ब्लॅक पँथर खवल्या मांजर, अजगर, सांबर, हरिण, ससे, गेळा, फटकुऱ्या, शेखरु, मोर असे कितीतरी प्राणी आढळतात. यासाठी दाजीपूर येथे जावे लागते .तेथे अभयारण्यातून फिरवून आणण्यासाठी कमांडर गाड्या आहेत. खासगी गाड्या अभयारण्यात जात नाहीत. त्यामुळे भाड्याच्या कमांडर गाड्यांतून जावे लागते. या गाड्यांचे भाडे 1800 ते 2200 रुपयांपर्यंत असते. अभयारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 50 रुपये प्रवेश फी आाहे. 1 नोव्हेंबर ते 31 मे अखेर अभयारण्य चालू असते. हे अभयारण्य 1958 साली स्थापन झाले असून 351.16 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. जवळ जवळ 35 प्रकारचे प्राणी अभयारण्यात पाहायला मिळतात.
फुलपाखरु महोत्सव: Butterfly festival, Dajipur.
दाजीपूर अभयारण्यात जवळ जवळ 45 हून अधिक प्रकारची फुलपाखरे आढळतात. साधारणतः जुलै, ऑगस्ट महिन्यात अभयारण्यात फुलपाखरांचे थवेच्या थवे आढळतात. हा महोत्सव पाहण्यासारखा असतो.
काजवा महोत्सव: Firefly Festival:
काजवा महोत्सव हे दाजीपूर अभयारण्यातील खास वैशिष्ट्य आहे. साधारणपणे 20 जून ते 30 जूनच्या दरम्यान कमी पाऊस असेल तर काजवा महोत्सव पाहण्याचा आनंद लुटता येतो. यावेळी एकेका झाडावर हजारो काजवे बसतात आणि हे दृश्य पाहण्यासारखे असते.