बिर्ला समूह हा भारतातील खूप मोठा उद्योगसमूह आहे. घनस्याम दास बिर्ला यांनी 1910 साली हा उद्योगसमूह निर्माण केला. आज या उद्द्योगसमूहाचे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे. 1890 साली ही एक जूट उत्पादन कंपनी होती. 1998 साली बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ही कंपनी परिवर्तीत करण्यात आली .बिर्ला उद्योग समूह सिमेंट धातू, कापड, शेती व्यवसायाशी निगडीत उत्पादन, आय .टी, वित्तीय सेवा, दूरसंचार इत्यादी क्षेत्रात आपली दमदार पावले टाकलेली आहेत. बिर्ला उद्योग समूह भारतातील एक नामांकित उद्योग समूह म्हणून ओळखला जातो.
बिर्ला उद्योग समूह आणि बिर्ला मंदिर: Birla Group of Industries and Birla Mandir
* बिर्ला उद्योग समूहाने भारतात एक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य म्हणून मंदिरे उभारण्याचे काम केले आहे. दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई जशा अनेक महत्त्वाच्या शहरांत बिर्ला उद्योग समूहाने मंदिरे उभारली आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व मंदिरे ‘बिर्ला मंदिर’ या नावाने ओळखली जातात. संपूर्ण मंदिरे संगमरवरी दगडांत बांधलेली असून भारतावरील इतर मंदिरांचा विचार करता या मंदिरांतील स्वच्छता, टापटीपपणा नजरेस भरण्याइतके असते. या मंदिरांचा आता आपण परिचय करून घेणार आहेत.
1. बिर्ला मंदिर: दिल्ली: Birla Mandir: Delhi:
दिल्लीतील बिर्ला मंदिर हे लक्ष्मी-नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर बिर्ला उद्योग समुहाचे उद्योजक जुगल किशोर बिर्ला यांनी 1939 साली बांधून पूर्ण केले .या मंदिराचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक प्राचीन मंदिरे आणि आधुनिक स्थापत्यकला याचा सुंदर मिलाप झालेला पाहायला मिळतो.
तुम्ही दिल्ली मेट्रोने प्रवास करत असाल तर बिर्ला मंदिराच्या सर्वांत जवळचे मेट्रो स्टेशन म्हणजे दिल्ली मेट्रोच्या निळ्या लाईनवर रामकृष्ण आश्रममार्ग आहे .या ठिकाणी मेट्रो थांबते येथून चालत गेला तर 1.5 किलोमीटर अंतरावर बिर्ला मंदिर आहे. येथून कॅबने सुद्धा जाता येते.
तुम्ही लाल किल्ला पाहायला गेला असाल तर येथून बिर्ला मंदिर केवळ 9 किलोमीटर अंतरावर आहे येथूनही कॅबने जाता येते.
या मंदिरासाठी वापरलेला दगड दोन प्रकारचा आहे. पांढरा शुभ्र संगमरवरी दगड बाहेरील बाजूस मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय जो लाल दगड वापरलेला आहे ,तिथे मुघल शैलीचा प्रभाव जाणवतो. हे मंदिर काही ठिकाणी तीन, तर काही ठिकाणी दोन मजली आहे. मंदिराच्या मागील बाजूस सुंदर कलाकुसर केलेली, तंत्रशुद्ध रचना असलेली बाग पाहायला मिळते.
सध्या जे मंदिर आहे, याठिकाणी पूर्वीचे जुने मंदिर होते. हे मंदिर 1622 मध्ये सिंहदेवने बांधले होते. त्यानंतर पुढे 1793 मध्ये त्याचा जीर्णोद्धार पृथ्वीसिंहने केला. 1938 साली बिर्ला उद्योग समूहाने हे मंदिर पुनर्रचित करण्याचे काम हाती घेतले. 1939 खाली बिर्ला मंदिर बांधून पूर्ण झाले.त्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर सर्वासाठी खुले झाले.
उडीयन शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिरात कृष्ण जन्माष्टमी, दीपावली हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिर परिसरात शिव, गौतम बुद्ध, कृष्ण यांचीही मंदिरे आहेत.
2. बिर्ला मंदिर : हैद्राबाद: Birla Mandir, Haidrabad:
सध्या हैद्राबाद शहराचे विभाजन झाले असल्याने या शहराचा काही भाग तेलंगणा राज्यात येतो . सध्या हैद्राबाद ही आंध्रप्रदेश राज्याची तात्पुरती राजधानी आहे. हैद्राबाद हे शहर जिल्हा असून हा जिल्हा तेलंगणा राज्यात येतो .या हैद्राबाद शहरात एका उंच टेकडीवर मार्बलचे सुंदर मंदिर उभारलेले आहे. या मंदिराबद्दल आता आपण माहिती घेऊ.
तुम्ही रामोजी फिल्म सिटी पाहायला गेला असाल तर या रामोजी फिल्मसिटीपासून 35 किलोमीटर अंतरावर बिर्ला मंदिर आहे.
हैद्राबाद शहरातील बिर्ला मंदिर हे व्यंकटेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कुतुबशाही घराण्याचा पाचवा सुलतान मुहम्मद कुली कुतुब याने 1591 मध्ये स्थापन केलेल्या आणि खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला हैद्राबाद शहरात हे व्यंकटेश मंदिर आहे. हे मंदिर बांधण्यास 1966 साली सुरुवात झाली. नौबत टेकडीवर हे मंदिर बांधण्याचे काम दहा वर्षे चालले. ही टेकडी जवळजवळ 300 फूट उंचीची असून मंदिर बांधण्याचे पूर्ण काम 1976 साली झाले.हे व्यंकटेश मंदिर 1976 साली सर्वांसाठी खुले झाले. या मंदिराचे उद्घाटन रामकृष्ण मिशनचे स्वामी रंगनाथन यांच्या हस्ते झाले. बिर्ला मंदिर हे संपूर्ण मार्बलचे आहे. मंदिरातील संकटेश्वराची मूर्ती ग्रॅनाइटची आहे. या मूर्तीची उंची 11 फूट आहे. या मंदिरात शिव, शक्ती, गणेश, हनुमान ब्रह्मा, सरस्वती, लक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत .या मंदिराजवळच हुसेन सागर सरोवर आहे.
3. बिर्ला मंदिर: उल्लासनगर/शहाड: Birla Mandir Ulhasnagar /Shahad.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर तालुक्यात याच शहराजवळ शहाड येथे आहे. हे बिर्ला मंदिर विठोबा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.या मंदिरात विठोबा आणि रखुमाई यांच्या मूर्ती आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
बिर्ला मंदिर: (विठोबा मंदिर) शहाड हे मुंबईपासून 54 किलोमीटर अंतरावर आहे. श्री रामेश्वर दास बिर्ला यांच्या पुढाकाराने 2 फेब्रुवारी 1961 मध्ये या मंदिराती स्थापना झाली. प्राचीन आणि आधुनिक कलेचा संगम या विठोबा मंदिरात पाहायला मिळतो. 1967 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पत्नी वत्सलाताई नाईक यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून हे मंदिर सर्वांसाठी खुले झाले.
(4) बिर्ला मंदिर [राधाकृष्ण मंदिर) गोवा. Birla Mandir [Radha Krishna Mandir] Goa.
गोवा या पर्यटनस्थळी अगदी अलीकडे म्हणजे 2021 साली बांधकाम सुरु करुन 2023 साली पूर्ण झालेले बिर्ला मंदिर म्हणजेच राधाकृष्ण मंदिर लोकप्रिय आहे.
हे राधाकृष्ण मंदिर BITS पिलानी गोव्याच्या सांकोले येथील कॅम्पसमध्ये आहे .बिर्ला उद्योग समुहाने सर्वत्रच पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात मंदिरे बांधली आहेत. हे राधाकृष्ण मंदिर सुद्धा संगमरवरी दगडातच बांधले आहे. मकराना प्रकारच्या संगमरवरी दगडांपासून बांधलेले राधाकृष्ण मंदिर आकर्षक आणि सौंदर्यसंपन्न आहे.
बिर्ला उद्योग समुहाने भारतात जवळ जवळ 30 हूनअधिक मंदिरे बांधलेली आहेत. त्या सर्व मंदिरांचाही परिचय या वेबसाइटद्वारे पुढील लेखातून निश्चितपणे करून दिला जाईल.