Vasai Fort : वसईचा किल्ला

ठाणे जिल्ह्यातील गड

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीत जसे अनेक किल्ले आहेत, तसेच कोकण किनारपट्टीवर काही निवडक किल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला समुद्रकिनाऱ्यालगतच बांधला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. आता आपण या किल्ल्याची माहिती घेऊया.

किल्ल्याचे नाव : वसईचा किल्ला/Vasai Fort

किल्ल्याचा प्रकार : भुईकोट-डोंगरी

समुद्रसपाटीपासून उंची : 10 मीटर

चढाईची श्रेणी : सोपी

ठिकाण : वसई

जिल्हा : ठाणे

ठाण्यापासून अंतर : 44 किलोमीटर

सध्याची अवस्था : व्यवस्थित

वसईला कसे जाल ? How to go to see Vasai?

* ठाण्याहून 36 किलोमीटर अंतरावर वसई शहर आहे. वसईहून अगदी 7/8 किलोमीटर अंतरावर वसईचा किल्ला आहे.

* विरारहून वसई किल्ल्याला जाता येते. विरार ते वसईचा किल्ला हे अंतर साधारणतः 18 किलोमीटर आहे.

* मुंबईहून वसई 30 किलोमीटर अंतरावर आहे. वसईतून पुढे किल्ला पाहण्यास जाता येते.

* कल्याणहून वसईचा किल्ला 56 किलोमीटर अंतरावर आहे. कल्याणहूनही वसईचा किल्ला पाहण्यासाठी अगदी दोन तासात जाता येते.

वसईचा इतिहास :History of Vasai

इ. स. 1414 मध्ये भंडारी भेंगाळे नावाच्या सरदाराने वसईचा किल्ला उभारला. गुजरातचा सुलतान महम्मद बेगडा याने मुंबई बेटाचा ताबा घेतला. त्याने 2530 मध्ये वसईचा किल्ला ताब्यात घेतला. इ. स. 1526 मध्ये पोर्तुगिजांनी व्यापाराच्या उद्देशाने वसईत वखार काढली, पण त्यांना सुलतानाच्या सैन्याचा त्रास होऊ लागला. पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर दोन वेळा हल्ला केला. शेवटी 1534 च्या दरम्यान पोर्तुगिजांनी किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याची पुनर्बाधणी करण्यास सुरुवात केली.

पोर्तुगिजांना वसईचा किल्ला बांधायला घेतल्यावर दहा वर्षे लागली. किल्ल्याला नवीन स्वरूप आले. हा किल्ला दशकोनी आहे. या किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. किल्ल्याची तटबंदी फारच मजबूत असून ही तटबंदी 30 ते 35 फूट उंच आणि पाच फूट रुंद आहे. किल्ल्याला असलेल्या बुरुजाला बाहरी बुरूज, कल्याण बुरूज, फत्ते बुरूज, कैलास बुरूज, दर्या बुरूज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध गढी आहे. किल्ल्याला समुद्राकडून एक व जमिनीकडून एक अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. याशिवाय चोर दरवाजे पण आहेत. किल्ल्यावर मुबलक पाणी आहे. किल्ल्याची रचना पाहता हा किल्ला भुईकोट व जलदुर्ग या दोन्ही प्रकारात येतो. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे व एका बाजूला जमीन आहे.

मुंबईजवळ साष्टी म्हणजे सहासष्टी नावाचा प्रदेश होता. या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. ज्याच्या ताब्यात वसईचा किल्ला त्याच्याकडे साष्टी प्रदेश अशी अवस्था होती. इ. स. 1737 मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातून वसईचा किल्ला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. पोर्तुगिजांनी जोरदार प्रतिकार केला. मराठ्यांना पहिल्या प्रयत्नाला अपयश आले.

इ. स. 1738 मध्ये बाजीराव पेशव्याने वसईचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी बाजीराव पेशव्यांकडे सोपवली. चिमाजीने किल्ल्यावर दलदलीच्या बाजूने हल्ले चढवण्यास सुरुवात केली. मराठ्यांनी तटाच्या उत्तरेच्या बाजूला खिंडार पाडले. ‘हर हर महादेव’ चा गजर करत मराठी सैन्य किल्ल्यात घुसले. पण दुर्दैवाने सुरुंग उशिरा उडाले, त्यामुळे भरपूर मनुष्यहानी झाली. शेवटी हातघाईची लढाई झाली. 2 मे 1739 रोजी सुरू झालेली हातघाईची लढाई दोन दिवस चालली. शेवटी मराठ्यांचा विजय झाला. मराठ्यांनी गड ताब्यात घेतला. गडावर राहणाऱ्या बायका-मुलांना सुखरूप जाऊ दिले.

कोकण किनारपट्टीवर आपल्या वखारी वाढवण्याच्या उद्देशाने इंग्रजांची वक्रदृष्टी या किल्ल्यावर पडली. इंग्रजांनी हा किल्ला घेण्यासाठी इ. स. 1780 मध्ये सुरुवात केली. त्या वेळी विसाजी कृष्ण लेले हा मराठ्यांचा किल्लेदार होता. इंग्रजांच्या बाजूने कर्नल गोडार्ड हा सेनाप्रमुख म्हणून काम पाहात होता. कर्नल गोडार्डने एका वेळी जमिनीवरून आणि समुद्रामार्गे असे हल्ले सुरू केले. कर्नल हार्टले हा कल्याणहून हल्ला करणार होता, तर कर्नल गोडार्ड हा समुद्रमार्गाने हल्ला चढवणार होता.

वसईचा किल्ला धोक्यात होता. किल्ल्याला वेढा देण्याची जबाबदारी कर्नल गोडार्डने स्वतः घेतली होती. पुण्याहून शत्रूला (मराठ्यांना) कुमक पोहोचू नये, कोणत्याही प्रकारची रसद मिळू नये याची काळजी कर्नल गोडार्डने घेतली होती. नाना फडणवीस यांनी विसाजी कृष्ण लेलेच्या मदतीला आनंदराव रास्ते यास वसईपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोखरावा या गावी धाडले. 23 ऑक्टोबर 1780 रोजी चिमाजी पानसे, भवानी शिवराम यांची फौज तळेगावमार्गे तोफखाना घेऊन वसईला निघाली.

इकडे गोडार्डने वसईचा किल्ला पूर्णपणे वेढला होता. मराठ्यांची रसद कापली होती. त्यामुळे किल्ल्यावर अन्नधान्याची टंचाई भासू लागली.

28 डिसेंबर 2780 या तारखेला इंग्रजांनी तोफांचा भडिमार सुरू केला. मराठ्यांनी सुद्धा गडावरून चोख प्रत्युत्तर दिले. लढाईच्या धुमश्चक्रीत इंग्रजांनी गोखरावा ते सोपार हे दोन पूल उडवले. 7 डिसेंबर 1780 ला किल्ल्यात मोठा दारूगोळा पडला आणि मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे किल्ल्यात घबराहट पसरली. दोन्ही बाजूंनी तोफखान्यांचा मारा चालूच होता. मराठ्यांची या युद्धात कोंडी झाली होती. 10 डिसेंबर 1780 ला 200 मराठ्यांच्या तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न फसला. अखेर पुरेशी कुमक वेळेवर न मिळाल्यामुळे आणि इंग्रजांच्या नियोजनबद्ध आक्रमणामुळे 12 डिसेंबर 1780 रोजी गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1947 पर्यंत वसईचा किल्ला इंग्रजांच्याच ताब्यात राहिला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर हा किल्ला आपोआप स्वतंत्र भारतात आला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे Spectacular Places of Vasai Fort

तीन बाजूंनी समुद्र आणि दलदल तर एका बाजूला जमीन अशा पद्धतीने रचना असलेल्या या किल्ल्याचा भुईकोट आणि जलदुर्ग म्हणून लौकिक आहे. किल्ल्याला दोन प्रमुख दरवाजे आहेत. एक प्रवेशद्वार समुद्राच्या मार्गाने आहे; तर दुसरे गावाकडच्या म्हणजे वसईच्या बाजूने आहे. किल्ल्याच्या चहुबाजूने तट आहेत. तटाची उंची 30 ते 25 फूट असून रुंदी पाच फूट आहे.

बुरूज :Towers of Vasai

वसईच्या किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. जेवढे बुरूज मजबूत तेवढा किल्ला सुरक्षित असे त्या काळी मानले जात असे. बुरुजांना नोस्सा, सिन्होरा, दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रंद दिय, एलिकांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज अशी बुरुजांची नावे आहेत. मराठ्यांनी ‘सेंट सेवस्तियन कावलिरो’ हा बुरूज काबीज करून गड ताब्यात घेतला होता.

किल्ल्याच्या आतील भागात दोन मुख्य दरवाजे असून सेंट जॉन बुरुजाच्या बाजूला बंदराच्या दिशेने उघडणारा दर्या दरवाजा आहे. किल्ल्यात न्यायालय, तीन चर्च, हॉस्पिटल, कारागृह, दारूचे कोठार इत्यादी विशेष इमारती आहेत. किल्ल्यावर इतर काही इमारतींचे अवशेष आजही पाहायला मिळतात. या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्यात चोरवाटा आहेत. काळोखी चक्री जिने आहेत. भारतीय आणि पोर्तुगिजांच्या स्थापत्त्यकलेचा मिलाफ या किल्ल्याच्या आणि किल्ल्याच्या इमारतीच्या बांधकामात आपणास पाहायला मिळतो. किल्ल्यात महादेवाचे आणि वज्रेश्वराचे मंदिरही आहे.

वसईचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतल्यावर बुरुजांना नवीन नावे दिली होती. कोकणात अगदी मोक्याच्या ठिकाणी असणारा किल्ला तत्कालीन राजवटीला व्यापाराच्या भरभराटीला आणि समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयोगात येत असे. पोर्तुगिजांनी आणि इंग्रजांनी या किल्ल्याचा पुरेपूर वापर करून आपला व्यापार उद्योग वाढवला. इंग्रजांनी तर आपली सत्ता वाढवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला.

पेशव्यांच्या काळात हा किल्ला असताना पेशव्यांनी या किल्ल्याचा उपयोग केला नाही. किल्ला आणि किल्ल्याचा परिसर दीर्घकाळ आपल्या ताब्यात राहण्यासाठी काही ठोस योजना आखली नाही. त्यामुळे हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यातून निसटला.

वसईचा किल्ला इंग्रजांच्या हाती आल्यानंतर मात्र त्यांनी किल्ल्याची चोख व्यवस्था केली होती. इ. स. 1860 मध्ये इंग्रजांनी इंग्रज अधिकारी कर्नल लिटलवुड याला भाड्याने दिला होता. त्याने तेथे उसाची शेती व साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा खर्च भागवण्यासाठी किल्ल्यातील दगड लोकांना विकले होते. त्यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली होती.

स्वातंत्र्यानंतर किल्ल्याचे अवशेष व्यवस्थित राहण्यासाठी फारशी चांगली व्यवस्था ठेवली गेली नाही. त्यामुळे किल्ल्याची फारच दुर्दशा झाली. किल्ल्याकडे कोणी फारसे फिरकतही नसे.

चिमाजीआप्पाने वसईचा किल्ला मराठ्यांना जिंकून दिला होता. सध्या गडावर चिमाजी आप्पांचा पुतळा आणि स्मारक आहे. पुरातत्त्व खात्याने थोडेफार लक्ष दिले आहे.

वसईचा किल्ला मुंबईजवळच असल्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यासाठी किल्ल्याची मोठ्या प्रमाणात डागडुजी होणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड करणेही आवश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर सुंदर सुंदर बागा फुलल्या आहेत. अशीच एखादी सुंदर बाग वसईच्या किल्ल्याच्या परिसरात फुलली तर पर्यटनाला आणखी चालना मिळेल आणि वसईचा किल्ला हे कोकणातील मुख्य पर्यटनक्षेत्रांपैकी एक पर्यटन स्थळ बनेल.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय Living and eating Convenience

वसईचा किल्ला हा मुंबई, विरार, वसई, ठाणे इत्यादी प्रमुख शहरांजवळच असल्यामुळे यांपैकी कोणत्याही शहरात आपल्या सोईनुसार मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ला पाहायला जाता येते. किल्ला पाहून दिवसभरात परत येता येते.

Leave a comment