कार्ल मार्क्सनंतर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी समाजाचे निकडीचे प्रश्न बाजूला ठेवून मूल्य व विभाजन सिद्धांतावर लक्ष केंद्रित केलं. आर्थिक संस्थांशी अनेकांना काहीच देणंघेणं नव्हतं. जॉन मेनार्ड केन्स यांनी हा प्रवाह बदलला आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं. ‘नोबेल’ विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हाच सामाजिक दृष्टिकोन आणखी विकसित केला. दारिद्र्य, दुष्काळ व भूक, आर्थिक विकास आणि कल्याणकारी अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी अधिक भर दिला. त्यांनी मांडलेल्या अनेक संकल्पना व सिद्धांतांना आता जगन्मान्यता मिळाली आहे. जगाच्या इतिहासातील नामवंत अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावळीत त्यामुळेच त्यांना स्थान प्राप्त झालं आहे.
अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1932 रोजी प. बंगालमधील शांतिनिकेतन इथे झाला. त्यांनी कलकत्ता आणि केंब्रिजमधील आपल्या शिक्षणानंतर ‘जादवपूर विद्यापीठ’, ‘दिल्ली विद्यापीठ’, ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’, ‘ऑक्सफर्ड’, ‘हार्वर्ड विद्यापीठ’ अशा नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापन केलं. ‘इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशन’, ‘डेव्हलपमेंट स्टडीज असोसिएशन’, ‘अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन’, ‘इकॉनॉमिक सोसायटी व इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन’चं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. एवढी सन्मानपदं भूषवणारे फार कमी अर्थशास्त्रज्ञ आहेत. सेन यांची 20 पुस्तकं आणि 225 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. या कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांना इ.स. 1998 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित केलं गेलं. अर्थशास्त्राची मुळं जशी तंत्रात आहेत तशीच ती तत्त्वज्ञानातही आहेत.
अशी श्रद्धा असणारे सेन यांनी 1950 च्या दशकातच केंब्रिजमध्ये अर्थशास्त्र व नीतित्तत्त्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला होता. त्यांच्या सामाजिक निवड सिद्धांतावर या अभ्यासाचा ठसा आहे. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांताबद्दल अमर्त्य सेन यांची कामगिरी, त्यांचा अभ्यास मूलगामी आहे. हे सिद्धांत मांडताना आधारभूत माहितीचा पाया विस्तारणं, स्वातंत्र्य आणि हक्क या घटकांचा विचार करणं, सामूहिक बुद्धिप्रामाण्यातून उद्भवणाऱ्या प्रश्नांचा शोध घेणं, या गोष्टी त्यांनी केल्या. सामाजिक निवड सिद्धांतात त्यांनी व्यक्तींची निवड आणि सामूहिक निर्णय यांच्यातील परस्परसंबंधांचा विचार केला. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि सामाजिक निवड सिद्धांतास डॉ. सेन यांनी नवं वळण दिलं. विवेकपूर्ण निवड आणि आर्थिक सिद्धांताचे वर्तणुकीचे आधार अधिक काळजीपूर्वक तपासण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादली. आर्थिक सिद्धांतातील उपयुक्ततावादाचे ते कठोर टीकाकार आहेत.
सामाजिक कल्याणातील उपयुक्ततावादाच्या संकल्पनांचा कल्याणशास्त्रातील हक्कविषयक संकल्पनांशी कसा संघर्ष होतो, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. 1980 च्या दशकात सेन यांनी लिहिलेल्या ‘पॉव्हर्टी अँड फेमिन्स’ ने जगाचं लक्ष वेधून घेतलं. अन्नधान्याच्या उपलब्धतेतील आकस्मित घटीमुळे दुष्काळ पडतो या समजुतीस त्यांनी आव्हान दिलं. जिथे दुष्काळ पडतो, तिथे धान्य उपलब्धता कमी होतेच असं नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. बाजारपेठेमार्फत वा अन्य यंत्रणेमार्फत धान्य वाटपातील हक्काच्या वाट्यावर संक्रांत येऊ शकते. हीच त्यांची ‘एन्टायटलमेंट थिअरी’. यात त्यांनी केवळ धान्य उपलब्धतेचाच नव्हे, तर दुष्काळ-भूक या परिस्थितीतील विरोधी पक्ष तसंच प्रसारमाध्यमांची भूमिका व प्रभाव या घटकांचा अभ्यास केला. 1989 मध्ये सेन व जीन ड्रेझ यांनी मिळून ‘हंगर अँड द पब्लिक अॅक्शन’ हा अभ्यास प्रसिद्ध केला.
1980 व 90 च्या दशकात सेन यांनी क्षमता सिद्धांताच्या (कॅपॅबिलिटीज थिअरी) चौकटीत काम केलं. क्षमता तसंच सार्वजनिक कृतीविषयीच्या माध्यमातून मानवी विकास साधण्याबाबत सेन यांनी केलेल्या विचारमंथनातून आज जगभर मान्यता पावलेला ‘मानवी विकास निर्देशांक’ आकारास आला. गरिबी व मानवी विकासाचं मापन केवळ उत्पन्नाच्या निकषावर करणं योग्य नाही, तर त्यासाठी शिक्षण, आरोग्य इ. निकषांचाही विचार करणं युक्त ठरेल, असा आग्रह सेन यांनी धरला.
‘थिअरी ऑफ हाउसहोल्ड’ या पुस्तकामध्ये अमर्त्य सेन यांनी कुटुंबाच्या एकात्म युनिट व अंतर्गत भेदाभेद असलेलं युनिट अशा दोन्ही बाजूंनी विचार करून विकासप्रक्रियेत स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जातं याकडे लक्ष वेधलं. ‘इनइक्वॅलिटी रिएक्झॅमिन्ड’ (1992) या अभ्यासात त्यांनी क्षमतेचा दृष्टिकोन व ‘थिअरी ऑफ नॉलेज’ मध्ये वस्तुनिष्ठ व निरीक्षणात्मक दृष्टिकोनातून समस्यांचा मागोवा घेतला.
अमर्त्य सेन केवळ अर्थतज्ज्ञ नसून अर्थ-तत्त्वज्ञ आहेत, हा ते व इतर यांच्यातील महत्त्वाचा फरक आहे. अर्थशास्त्र हे वास्तव जगाबद्दलचं शास्त्र आहे. सेन यांनी बाजारपेठीय मूलतत्त्ववादास विरोध केला. गरिबी, भूक, उपासमार दूर करण्यात बाजारपेठीय तत्त्वज्ञानाच्या मर्यादा ते जाणतात. सार्वजनिक, सरकारी हस्तक्षेपानेच हे प्रश्न सुटू शकतात हे त्यांना ठाऊक आहे. आर्थिक सत्तेत प्रत्येकास वाटा मिळायला हवा व त्यासाठी लहानातल्या लहान माणसाला स्वावलंबी केलं पाहिजे, असं त्याचं मत आहे. मागणी पुरवठ्याचे कठोर कायदे पाळण्यास महत्त्व देण्याऐवजी समाजातील व्यक्तींमधील सत्तासंबंध आणि आपल्या कृतींनी ते आर्थिक ‘संस्थांना’ देत असलेला आकार, या गोष्टींना अमर्त्य सेन अग्रक्रम देतात. समाजातील सर्वांत तळच्या माणसाचा विकास हा अमर्त्य सेन यांच्या अभ्यासाचा मुख्य आधार आहे, त्याचप्रमाणे भारताच्या आर्थिक प्रगतीवरही त्यांची कटाक्षाने नजर असते. अनेक अर्थतज्ज्ञ शरीराने भारतात व मनाने विदेशात असतात. त्यापेक्षा शरीराने विदेशात, पण मनाने स्वदेशात असलेला अमर्त्य सेन यांच्यासारखा अर्थशास्त्रज्ञ नक्कीच महान !