सिद्धार्थ गौतमाने परिव्रजेचा निर्णय घेतला होता. मातापित्याने खूप आक्रोश केला . आढेवेढे घेतले; पण सिद्धार्थ आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटला नाही. आता शेवटची एकच आशा उरली होती. ती म्हणजे यशोदरा! यशोदरा काहीतरी करून, आक्रोश करून सिद्धार्थला रोखेल अशी आशा होती. आई वडिलांना आपली बाजू समजून देऊन सिद्धार्थ आपल्या पत्नीकडे गेला. म्हणजे यशोदरेला भेटायला तिच्या महालात गेला.
सिद्धार्थ यशोदरेच्या महालात गेला. तिला पाहून तो निःशब्दच झाला. काय बोलावे आणि कुठून सुरुवात करावी, हेच त्याला सुचेना. महालात क्षणभर स्मशान शांतता पसरली होती.शेवटी यशोदरेनेच बोलायला सुरुवात केली.
” कपिलवस्तू येथील संघाच्या सभेतील मला सर्व वृत्तांत समजला आहे”
सिद्धार्थला वाटले की यशोदा मूर्च्छित होऊन पडेल; पण तसे काही घडले नाही.
सिद्धार्थ म्हणाला,” यशोदरे, तू सांग, माझ्या परिव्रज्येच्या निर्णयाबाबत तुला काय वाटते ?”
यशोदरने आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. ती अगदी शांतपणे आणि धीराने म्हणाली,
“मी तुमच्या जागी असते, तर तुम्ही जे केले तेच मी केले असते. कोलियांविरुद्धच्या युद्धाला मी विरोधच केला असता. तुमचा निर्णय योग्य आहे. तुमच्या या निर्णयात कोणताही स्वार्थ लपलेला नाही. माझी तुमच्या या परिव्रज्येच्या निर्णयाला अनुमती आहे. आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा तुमच्याबरोबर संन्यास घेतला असता, पण राहूल अजून लहान आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी माझी आहे.जे काही घडले , असे व्हायला नको होते. पण आलेल्या परिस्थितीला तुम्ही आणि मी सुद्धा धीराने आणि शौर्याने तोंड दिले पाहिजे. तुमच्या मातापित्याची आणि पुत्र राहुलची तुम्ही काळजी करू नका .त्यांना मी चांगले सांभाळेन असे मी तुम्हाला वचन देते.”
यशोदरा किती धैर्यवान आहे, उदात्त आहे आणि शौर्यवान आहे, याची प्रचिती प्रथमच सिद्धार्थला आली होती. गौतम बुद्ध महान बनला. यात यशोदरेने दाखवलेल्या कणखर भूमिकेचे यश आहे. कोणत्याही सर्वसामान्य पत्नीला शक्य नाही ते तिने केले होते. म्हणूनच ती महान ठरली.
सिद्धार्थ गौतमावर नेहमी असा आरोप ठेवला जातो की पत्नीला वाऱ्यावर सोडून, पुत्राच्या संगोपनाची जबाबदारी सोडून सिद्धार्थ रात्री अचानक घरातून निघून गेला. जगाला न्यायाचा आणि सुखाचा मार्ग दाखवणार्या गौतम बुद्धाने पत्नीला आणि राहुलला न्याय दिला नाही की सुखही दिले नाही.
खरे तर गौतम बुद्धाच्या पत्नीनेच त्याला धीर दिला. त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि सल्ला दिला. तो असा-
तुम्ही असा जीवनमार्ग शोधून काढा की तो मार्ग संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरेल.
यशोदरेने दिलेला हा सल्ला सिद्घार्थ गौतमाने कायमचा हृदयात कोरून ठेवला.
गृहत्याग करताना पुढे काय घडते, ते भाग क्रमांक 21 मध्ये पाहू.