Chhaava :गणोजी शिर्के यांनी खरंच गद्दारी केली का?

छत्रपती संभाजी महाराज यांचे मेहुणे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यास मदत केली का? काय आहे खरा इतिहास?छावा चित्रपटातील संगमेश्वर प्रसंगावर शिर्क्यांचा काय आक्षेप आहे?जाणून घेऊया अधिक माहिती.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पिलाजी शिर्के

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिर्के यांची ताकद ओळखून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण केले. पिलाजी शिर्के हे राणी येसूबाई यांचे वडील होत. शिवरायांनी आपला पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी पिलाजी शिर्के यांच्याकडे त्यांच्या कन्येची मागणी केली. छत्रपतींच्या घराण्यात आपली मुलगी सून म्हणून वावरणार आणि भविष्यातील ती राणी होणार याचा पिलाजी शिर्के यांना अभिमान वाटला. त्यांनी शिवरायांना लगेच होकार दिला. पिलाजी शिर्के यांनी स्वराज्यासाठी अनेक वेळा मोलाचे कार्य केले आहे. त्यांना श्रृंगार्पूरची वतनदारी हवी होती. शिवरायांनी ती पुढे पाहू असे सांगून वेळ मारून नेली. पुढे येसूबाईंना शिवरायांच्या घरी दिल्यावर वतनदारीचा विषय मागे पडला.

छत्रपती संभाजी महाराज आणि पिलाजी शिर्के

पिलाजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराज यांचे सासरे होते. शिवरायांच्या मृत्यूनंतर कारभारी मंडळींनी रायगडावर उचल खाल्ली. राणी सोयराबाई यांच्यावर दबाव आणून राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा कट रचला. या कटात मोरोपंत पिंगळे ,अण्णाजी दत्तो, चिटणीस बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद आदी मंडळी होती. पण सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि पिलाजी शिर्के संभाजी राजे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे कारभाऱ्यांचा कट उद्ध्वस्त झाला. संभाजी राजांनी सर्वांना मोठ्या दिलाने माफ करून पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घेतले. शंभूराजांना रायगडावर येऊच द्यायचं नाही, असे नियोजन कारभारी मंडळींनी केले होते, पिलाजी शिर्के यांनी रायगडावर आक्रमण करून कारभाऱ्यांचा विरोध मोडीत काढला आणि संभाजी महाराज यांचा मार्ग सुकर केला.

गणोजी शिर्के आणि संभाजी महाराज

गणोजी शिर्के हे संभाजी महाराज यांचे सख्खे मेहुणे होते. राजाभिषेक झाल्यावर गणोजी शिर्के यांनी वेळोवेळी वतनदारीचा विषय काढला, पण संभाजी महाराज आणि राणी येसूबाई यांनी वतदानदारी देण्यास नकार दिला. त्यामुळे गणोजी राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नाराज होते.

पुढे कवी कलश आणि गणोजी राजे शिर्के यांच्यात वितुष्ट आले. कवी कलश यांनी गणोजी राजेंवर चाल करून युद्ध केले. यात कवी कलश यांचा पराभव निश्चित होता, पण संभाजी राजे यांनी स्वतः येऊन गणोजी राजे यांच्याविरुद्ध लढाई करून गणोजी राजे यांचा पराभव केला. त्यामुळे गणोजी राजे पुन्हा छत्रपतींवर नाराज झाले. पण त्यांनी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला असताना मुकर्रब खानास मदत केल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत.

फ्रेंच अधिकारी फ्रॅंसिस मार्टिन यांची डायरी

संगमेश्वरच्या पलीकडे फ्रेंचांचे राज्य होते. तेथेच जवळपास डचांची छावणी होती. त्या छावणीतील पहारेकरी स्वराज्यात काय घडत आहे, याची इत्यंभूत माहिती आपला अधिकारी मार्टिन याला देत होते. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. ही बातमी फ्रेंच पहारेकऱ्यांना समजल्यावर त्यांनी आपला अधिकारी मार्टिन यांना तसे कळवले. मार्टिन यांनी ही घटना त्याच महिन्यात आपल्या डायरीत लिहून ठेवली. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यास त्यांचेच कारभारी ब्राह्मण मंडळी होते, असा उल्लेख करून ठेवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी कोणी मदत केली, याचा हा एक सबळ पुरावा आहे.

छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शिर्के यांचे वंशज का चिडले?

छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडून देण्यास गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना छावा चित्रपटात खलनायक करून कारणीभूत ठरवले आहे. त्यामुळे गणोजी शिर्के यांचे वंशजांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी ठेवली आहे. गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराज यांना पकडून देण्यास कारणीभूत असलेला कोणता पुरावा चित्रपट निर्मात्याने वापरला तो आम्हाला कळवावा असे शिर्के यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे छावा चित्रपटातच्या कथानकावर टीका होत आहे. शिर्क्यांच्या छावा चित्रपटाचे कौतुक केले असले तरी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यास शिर्के यांचा हात नव्हता हे त्यांचे म्हणणे आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचेही म्हणणे असे आहे की संभाजी राजांना पकडून देण्यास शिर्के यांचा हात होता, असा कोणताही सबळ पुरावा नाही. उलट त्यांनी मार्टिन यांच्या डायरीचा आधार घेऊन शंभूराजे यांना पकडून देण्यास कोण कारणीभूत होते त्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

पुराभिलेख संचालनालयाकडे शिर्के यांची धाव

छत्रपती संभाजी राजे यांना शिर्के यांनी पकडून दिले याचा सबळ पुरावा आहे का? हे जाणून घेण्यासाठी रामकृष्ण मच्छिंद्र शिर्के यांनी 1 जुलै 2009 साली माहितीच्या अधिकाराखाली पुराभिलेख संचालनालयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाला 27 जुलै 2009 रोजी पुराभिलेख संचालनालयाने स्पष्टपणे असे उत्तर दिले की गणोजी शिर्के यांनी संभाजी राजे यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे या कार्यालयात उपलब्ध नाहीत.

थोडक्यात कोणताही पुरावा नसताना गणोजी राजे शिर्के यांना बदनाम करण्याचे थांबवावे असे शिर्के यांचे आत्ताचे वंशज यांचे म्हणणे आहे.

Leave a comment