Bhavani Talwar-या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? काय आहे इतिहास ?

Bhavani Talwar

छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इतिहासात खूप गाजली आहे. खरंच शिवाजी महाराजांना भवानी मातेने ही तलवार दिली का? शिवरायांना ही भवानी तलवार इतके का आवडत होती? या तलवारीला भवानी तलवार असे नाव का बरे पडले? तर आपण जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे..

शिवरायांचे एकापेक्षा एक पराक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात खूप काही केले. स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचा विस्तार केला. स्वराज्याची घडी बसवली. रायतेला सुखाने नांदण्यासाठी स्वराज्यात चांगले आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले. हे करत असताना शिवरायांच्या जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग घडले. या सर्व प्रसंगातून ते सही सलामत सुटले. अनेक अद्भुत पराक्रम केले. अनेकजण या सर्व पराक्रमाचे श्रेय शिवरायांच्या भवानी तलवारीला आणि भवानी मातेला देतात. शिवरायांनी अफजलखानाचा वध केला.शाहिस्ताखानाची  बोटे छाटली. जावळीच्या मोर्‍यांचा बंदोबस्त केला. अफजलखानाचा वध केल्यानंतर अंगावर आलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला भवानी तलवारीने यमसदनास पाठवले. असे कितीतरी प्रसंग शिवरायांनी भवानी मातेच्या कृपेने लिलिया हाताळले असे म्हटले जाते ते साफ चुकीचे आहे. मग ही भवानी तलवार शिवरायांना कोणी दिली? पुढे सविस्तर वाचा….

भवानी तलवारीचा इतिहास

इसवी सन 1659 च्या मार्च एप्रिल च्या दरम्यान शिवरायांची कोकणातील खेम सावंत या शिलेदाराने भेट घेतली. त्यावेळी ते आपल्या बरोबर एक उत्तम तलवार घेऊन आले होते. ही तलवार अत्यंत पातळ, मजबूत आणि धारदार होती. अशी ही सुंदर आणि हाताळण्यास सुलभ तलवार शिवरायांना भेट म्हणून द्यावी, अशी इच्छा खेम सावंत यांच्या मनात आली. ही तलवार पोर्तुगीज बनावटीची अत्यंत देखणी अशी होती. या तलवारीवर पोर्तुगीज भाषेत लिहिलेला मजकूरही होता. केम सावंत याने शिवरायांना ही तलवार भेट म्हणून प्रदान केली. शिवरायांना ही तलवार पाहता क्षणीच खूप आवडली. या तलवारीला अत्यंत सुंदर असे नाव दिले. शिवरायांनी या तलवारीला कोणते बरे नाव दिले असेल? त्यासाठी पुढील मजकूर वाचा.

शिवरायांचे कुलदैवत भवानी माता

भवानी माता म्हणजेच अंबाबाई ही शिवरायांची कुलदैवत होती. तुळजापूरची तुळजाभवानी हे शिवरायांच्या भोसले घराण्याचे श्रद्धास्थान. तुळजाभवानी कुलदैवत असल्यामुळे भोसले घराण्यातील अनेक जण भवानी मातेच्या म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला जात. शिवरायांनी अनेक गडावर भवानी मातेचे मंदिरही बांधून घेतलेले होते. प्रतापगडावर सुद्धा भवानी मातेचे मंदिर आहे. यावरून शिवरायांनी ह्या तलवारीला भवानी तलवार असे नाव दिले. ही तलवार इतकी सुंदर होती आणि तिला दिलेले नाव सुद्धा इतके समर्पक होते की ते नाव सर्वांनाच आवडले. पुढे ही तलवार भवानी तलवार या नावानेच इतिहासात अमर राहिली.

भवानी मातेचा आशीर्वाद

शिवराय प्रतापगडावर असताना अफजलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी निमंत्रण दिले होते. शिवरायांची ही लाडकी तलवार नेहमीच त्यांच्याजवळ असायची. अफजलखानाच्या भेटीला जातांना शिवरायांनी भवानी तलवार हातात घेऊन भवानी मातेचे दर्शन घेतले होते व भवानी मातेचा आशीर्वाद घेतला होता.

अफजलखानाचा वध

शिवराय आणि अफजल खान यांच्या भेटीच्या दरम्यान अचानक कलाटणी मिळाली आणि खान व शिवराय यांच्यात झटापट झाली. शिवरायांनी वाघ नख्यांनी अफजलखानाचा कोथळा काढला आणि अफजलखानाला ढकलून त्याच्या मगर मिठीतून आपली सुटका करून घेतली. त्यावेळी अचानक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शिवरायांच्या आडवा उभा राहिला आणि त्याने शिवरायांवर आपल्या तलवारीने वार केला. शिवरायांनी याच भवानी तलवारीने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला यमसदनास पाठवले.

शाहिस्ताखानाची बोटे छाटली

पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटल्यावर शिवराय विशाळगडाला गेले. विशाळगडावर काही दिवस राहून शिवरायांनी राजगडाकडे प्रयाण केले. पुण्यात शाहिस्ताखान शिवरायांच्याच लाल महालात अजगरासारखा वेटोळे घालून बसला होता. ही गोष्ट जिजामातेला आणि शिवरायांना कळली होती. शाहिस्ताखानाला अद्दल घडवण्यासाठी एका अमावस्येच्या रात्री शिवरायांनी लाल महालात शिरून शाहिस्ताखानाची बोटे छाटली. त्यावेळी सुद्धा शिवरायांनी हीच भवानी तलवार वापरली होती.

शिवरायांच्या पराक्रमाचे श्रेय भवानी तलवारीला देणे चुकीचे

शिवरायांनी अफजलखानावर मात केली. शाहिस्ताखानाची खोटे छाटली,ती केवळ भवानी तलवारीमुळेच असा काही लोक इतिहास सांगतात आणि शिवरायांच्या पराक्रमाचे श्रेय भवानी तलवारीला देतात. ते साफ चुकीचे आहे.

शिवरायांची आपल्या कुलदैवतेवर प्रचंड निष्ठा होती. कोणत्याही मोहिमेवर जाताना शिवराय राजमातेचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घेत असत. पण यामुळे शिवरायांचे बुद्धिचातुर्य, युद्धकौशल्य, प्रसंगावधान, शत्रूवर छाप पाडून त्याला अर्धमेले करणे, गनिमी काव्याने शत्रूला सळोकी पळो करून सोडणे हे शिवरायांचे  गुण विसरता कामा नये. त्यामुळे कोणत्याही पराक्रमाचे श्रेय भवानी मातेला किंवा भवानी तलवारीला देऊन शिवरायांच्या पराक्रमाला दुय्यम स्थान देणे चुकीचे आहे. सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आणि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मनात न घेता शिवरायांच्या तेजस्वी पराक्रमाकडे पाहिले पाहिजे.

तर वाचकांनो ,असा आहे शिवरायांच्या भवानी तलवारीचा इतिहास. हा खरा इतिहास वाचकांना निश्चितच आवडेल. असाच शिवरायांच्या जीवनावरील आणि भारतातील अनेक घटनांवरील, सणसमारंभ बद्दलचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी माझ्या windowsofnewthoughts.com या वेबसाईटला भेट द्या आणि वाचनाचा आनंद लुटा.

Leave a comment