महाबळेश्वर, वयगाव आणि भिलार पर्यटन / Mahabaleshwar bhilar tourism

महाबळेश्वर(Mahabaleshwar)

समुद्रसपाटीपासून उंची:1372 मी.

राज्य महाराष्ट्र, जिल्हा:सातारा

तालुका:महाबळेश्वर,

वैशिष्ट्य: थंड हवेचे ठिकाण

पर्वत: पश्चिम घाट (सह्याद्री)

महाबळेश्वरला कसे जाल?

पुणे ते महाबळेश्वर: वाई मार्गे 121 किमी

वाई ते महाबळेश्वर;34 किमी

सातारा ते महाबळेश्वर: 58 किमी

 

महाराष्ट्रातील एक नामवंत थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर परिसरात पाच सहा दिवस मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटला. निसर्गरम्य परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाणी या सर्व गोष्टींचा आनंद अगदी भरभरून घेता आला.

वयगाव(Vaigaon)

सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील अगदी कृष्णेच्या उगमस्थानी वयगाव हे सुंदर गाव वसलेले आहे.महाबळेश्वर येथील एलिफंट हेड म्हणजेच केट्स पॉइंटच्या पायथ्याशी वसलेल्या गावाला निसर्गाचे जणू वरदानच मिळाले आहे. वयगावपासून पश्चिमेला दोन किलोमीटर अंतरावर बलकवडी धरण आहे.हे कृष्णेवरचे पहिले धरण आहे.त्यानंतर आठ-दहा किलोमीटरवर धोम हे दुसरे धरण लागते. बलकवडी धरण परिसर म्हणजे साक्षात निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा नदीने वयगाव गोळेगाव परिसरात कड्यावरून खाली उडी मारली आहे.सह्याद्रीच्या दोन्ही रांगांमध्ये कृष्णामाईचे बाल्यावस्थेतील नटलेले सौंदर्य पाहायला मिळते.एका बाजूला महाबळेश्वर,तर दुसऱ्या बाजूला कमळगडची डोंगररांग. बलकवडी धरणाच्या बॅकवॉटरला कुरणांवर जाऊन मनसोक्त फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटायला हरकत नाही.वयगावहून एलिफंट हेडला अनेक वयगावकर सहज चालत जातात.पूर्वीच्या काळी तांदूळ विकायला वयगावकर चालतच महाबळेश्वरला जात होते.नजिकच्या काळात येथे रोप वे होईल, तेव्हा पर्यटनाला निश्चितच अधिक चालना मिळेल अशी आशा आहे.

निसर्गाने नटलेला हा परिसर पाहण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पर्यटन करायला हरकत नाही मी आमच्या सौ.शारदा पाटील, सुनबाई स्नेहल सर्वांनी वाडकर कुटुंबियांसमवेत प्रवासाचा आनंद लुटला.तसं पाहायला गेलं, तर वयगाव म्हणजे निसर्गाइतकीच आतून आणि बाहेरून स्वच्छ मनाने भरलेली माणसं होय.हजार-दीड हजार लोकवस्तीचे गाव;पणआल्या-गेलेल्यांवर ,पैपाहुण्यांवर भरभरून प्रेम करणारी माणसं मला जवळून पाहता आली.येथे शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने भात, गहू आणि तुरळक ठिकाणी स्ट्रॉबेरी इत्यादी पिके आढळतात.कमी उत्पन्नामुळे तरूणांनी मुंबईची वाट धरली असली तरी, शुद्ध हवा आणि पाणी इथल्या सारखे क्वचितच भेटेल.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेत या परिसरातीलच अनेक मावळे होते.अनेकांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले.स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास आजही या परिसरातील नागरिकांनी हृदयाशी कवटाळून ठेवला आहे.वयगावच्या पलीकडे कृष्णा नदी ओलांडली की रायरेश्वर, कमळगड,पांडवगड ही ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे पाहायला मिळतात.संभाजी कावजी,जिवा महाला याच खोऱ्यातील. मोकाशी(वाडकर), मालुसरे, शिर्के यांचे वंशज आजही या परिसरात पाहायला मिळतात.आमच्या सुनबाई स्नेहल वाडकर-पाटील वयगावच्याच!तिचे आजोबा रामचंद्र वाडकर,आजी शांताबाई वाडकर,आई शीला वाडकर, वडील मारूती वाडकर,भाऊ स्वप्नील आणि तसेच दिग्विजय, कौशिक, गणेश, अर्जुन वाडकर या मंडळींनी आमच्यावर भरभरून प्रेम केले.साधी माणसं हा सिनेमा पाहिला होता आणि वाटत होतं की इतकी साधी माणसं असू शकतात का..? पण मला वयगावात आणि खास करून वाडकर कुटुंबातील साधी माणसं जवळून पाहता आली.अनुभवता आली.सुनबाईंच्या कुटुंबियांसमवेत महाबळेश्वर, प्रतापगड, मांढरदेव परिसर हुंदडता आला.

महाबळेश्वर(Mahabaleshwar Hill Station)

खरे तर इंग्रज भारतात आले आणि त्यांनी या निसर्गरम्य ठिकाणाची जगाला ओळख करून दिली . थंड हवेचे ठिकाण म्हणून इंग्रज लोक या ठिकाणी हवापालट करण्यासाठी यायचे.त्यांनीच येथील प्रेक्षणीय स्थळे शोधून काढली आहेत.

प्रतापगड(Pratapgad Fort)

 

महाबळेश्वर ते प्रतापगड : 21 किमी

प्रतापगड हे महाबळेश्वरपासून एकवीस किलोमीटर अंतरावर असलेले ठिकाण.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला गड.या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे.10 नोव्हेंबर 1957 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते.त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती.या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण उपस्थित होते,शरद पवार,एस एम जोशी इत्यादी मंडळी काळे झेंडे दाखवून संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यासाठी आले होते.10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला होता.हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

गडावर बालेकिल्ला, भवानी मंदिर, टेहळणी बुरूज, कडेलोट इत्यादी महत्त्वाचे पॉइंट आहेत. प्रतापगडावरून महाबळेश्वरला परतताना वाटेत उजव्या बाजूला शिरवली गावाकडे जाणारा रस्ता आहे.या रस्त्याने पुढे गेल्यावर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आहे.हा पूल आजही मजबूत स्थितीत आहे.येथेच काही अंतरावर अफजलखानाच्या मामाची कबर आहे. अफजलखानाच्या मामाला जेथे मारला तेथेच कबर बांधली गेली आहे ‌.

श्री क्षेत्र महाबळेश्वर (Kshetra Mahabaleshwar)

महाबळेश्वर या शब्दाचा अर्थ आणि विग्रह केला असता आपण महाबली म्हणजेच बळीराजापर्यंत निश्चितच पोहोचतो.बळी राजाला उत्तरेत बली, महाराष्ट्रात बळी,तर दक्षिण भारतात महाबली म्हणतात.श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे असलेले महादेव मंदिर हे महाबली मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे.बळी हा महादेवाचा भक्त होता. बळीराजा हा कर्मकांडाला विरोध करणारा राजा होता. महाबलीच्या नावावरून या क्षेत्राला महाबळेश्वर असे नाव पडले आहे. बळीच्या कर्तृत्वाचे ठसे आजही अस्तित्वात आहेत,पण ते वैदिकांनी पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.

महाबलीच्या मंदिराजवळच पाच नद्यांचे( पंचगंगा) एकत्र उगमस्थान आहे.कृष्णा, वेण्णा, सावित्री कोयना आणि गायत्री या त्या पाच नद्या होत.या सर्व नद्या महाबळेश्वर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावलेल्या आहेत.पण त्या नद्या एकत्र उगम पावल्या आहेत असे चित्र निर्माण केले आहे.याठिकाणी कृष्णेचे उगमस्थान आहे.येथून पुढे गेल्यावर कृष्णामाईचे एक हजार वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर आहे.या ठिकाणाहून कृष्णेने कड्यावरून खाली उडी घेतली.खाली वयगाव, बलकवडी परिसर आहे.

ऑर्थर सीट(Arthur Seat point Mahableshwar)

ब्रिटिश अधिकारी ऑर्थर यांची नयनरम्य दृश्य पाहत बसण्याची ही जागा होय.येथील निसर्गाची अद्भुत किमया पाहिल्यानंतर ऑर्थर येथे निसर्गाचे निरीक्षण करायला तासनतास बसून राहत असेल ,असे निश्चितच वाटते.सह्याद्रीच्या रांगांचे नयनरम्य दृश्य पाहतच रहावं असं वाटतं.येथेच डाव्या बाजूला सावित्री नदीचे उगमस्थान आहे आणि पुढे सरकत जाताना खोल दरीत एखादा छोटासा पाट वाहत आहे असे वाटते.शिवरायांनी जावळीवर हल्ला करून चंद्रराव मोरे यांना मारले होते.उरलेल्या पळून गेलेल्या मोऱ्यांनी आश्रय घेतलेला डोंगर(चंद्रगड) येथून दिसतो.प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथूनच दुर्बिणीतून दिसतो.येथे माकडांपासून सावध राहावे लागते.हातातील खाद्यपदार्थ समजून माकडांनी अनेकांचे मोबाईल पळवून नेलेले आहेत.

एलिफंट हेड(Elephant Head Point )

 

एलिफंट हेड हे महाबळेश्वरमधील एक महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. येथून खाली बलकवडी धरणाचा परिसर, वयगाव परिसर,पलीकडचा कमळगड, त्यापुढे असलेला पांडवगड आपणास आरामात पाहता येतात.दुर्बीन असेल तर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आणखी जवळून पाहण्याचा आनंद निश्चितच घेता येईल.येथून खाली बलकवडी धरणाच्या दिशेने जाण्यासाठी पायवाट आहे. पायवाट उतरण्याचा थरार काही अनुभवता आला नाही.

पुस्तकाचे गाव-भिलार (Book Village Bhilar)

 

पुस्तकाचे गाव-भिलार हे महाबळेश्वरचे खास वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र शासनाने वाचन चळवळ विकसित होण्यासाठी भिलार गावातील पस्तीस घरांमध्ये खुले ग्रंथालय उभे केले आहे. या ग्रंथालयात कोणीही जाऊन कोणतेही पुस्तक वाचू शकतो.त्यासाठी कोणतीही फी द्यावी लागत नाही.प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत.एक कप्पा कॉमन आहे.कथासंग्रह, ऐतिहासिक पुस्तके,संत वाङमय, कादंबरी, विनोदी साहित्य असे साहित्याचे प्रकार पाहून प्रत्येक घराघरात पुस्तके ठेवली आहेत.

 

मोबाईल आला आणि वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे.वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हा शासनाने घेतलेला उपक्रम स्तुत्य असाच आहे.या उपक्रमामुळे भिलार गावाला महाराष्ट्राच्या नकाशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.मलाही भिलार गावचे खूप आकर्षण होते.योगायोग असा की आमच्या सुनबाईंच्या आजीचे चुलत भाऊ माजी आमदार आहेत. त्यांच्या घरी ऐतिहासिक पुस्तकांचे ग्रंथालय पाहायला मिळाले.सख्खे भाऊ लॉजिंग क्षेत्रात उतरले आहेत.आम्ही दोन दिवस रोहित भिलारे यांच्या लॉजिंगवर मुक्काम केला.सुनबाईंचा सुभाष मामाही प्रेमळ आणि कष्टाळू आहे.त्यांचाही लॉजिंग व्यवसाय खूप मोठा आहे.त्यांनी आपल्या कष्टातून अप्रतिम लॉजिंग व्यवस्था केली आहे.त्यांच्या घरी जाण्याचा व चहापान करण्याचा योग आला.सागर भिलारे आणि रोहित भिलारे यांना खास धन्यवाद ‌.भिलार गावचे लोक प्रेमळ आणि पाहुण्यांना न कंटाळणारे असेच आहेत.येथील अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीचे पीक घेतात.

महाबळेश्वरला गेल्यावर पर्यटकांनी भिलार गावाला आवश्य भेट द्यावी आणि महाबळेश्वरला मुक्काम करण्यापेक्षा भिलार गावात मुक्काम केला तर अधिक चांगल्या प्रकारे सोय होईल.

भिलारे गावचे स्वातंत्र्य सैनिक भिलारे गुरूजी यांनी महाबळेश्वर येथे महात्मा गांधीजींना वाचवले होते. ही घटना खूप कमी लोकांना माहिती आहे.

इको पॉईंट(Echo Point)

हा पॉईंट ऑर्थर सीट पॉइंटजवळच आहे.आपण इथे कुणाला तरी नावाने हाक दिली तर ती हाक प्रतिध्वनीच्या रूपात पुन्हा एकदा आपणास ऐकू येते.इको पॉइंटला गेल्यावर हा अनुभव घ्यायला हरकत नाही.

वेण्णा लेक(Venna lake)

 

सातारचे तत्कालीन छत्रपती आप्पासाहेब भोसले यांनी 1842 साली वेण्णा लेकची निर्मिती केली. आज हा परिसर सुशोभित केलेला असून नौका विहार करण्याचा, तसेच घोडेस्वारी करण्याचा आनंद या ठिकाणी येऊन घेता येतो.

याशिवाय लिंगमळा वॉटर फॉल, बॉम्बे पॉईंट,फॉकलंड पॉइंट,सनराइज पॉइंट, सनसेट पॉईंट, असे कितीतरी पॉइंट महाबळेश्वर येथे पाहण्यासारखे आहेत.जीवनात एकदा तरी काशी ला जाऊन यावे (काशीला पाखंडी लोकांच्या पावलोपावली लुटारू टोळ्या आहेत.)असे म्हणतात, पण मी म्हणेन जीवनात एकदा तरी महाबळेश्वर, भिलार, बलकवडी, वयगाव, रायरेश्वर परिसर पाहण्यासाठी जावे आणि निसर्गाच्या किमयेचा मनमुराद आनंद लुटावा.

शब्दांकन :

संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती राधानगरी 9049870674 , दिनांक 25 ते 30 ऑक्टोबर 2023

Leave a comment