होळीचा सण- Holi Festival.
भारतातील हवामान आणि निसर्गातील बदलानुसार भारतात सहा ऋतू मानले जातात. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ते सहा ऋतू होत. वसंत ऋतूला ऋतुराज’ असे संबोधले जाते. भारतीय सौर वर्षाप्रमाणे वसंत ऋतू हा पहिला ऋतू मानला जातो; तर ‘चैत्र हा पहिला महिना मानला जातो. वसंत ऋतूचे आणि होळी सणाचे एक घट्ट नाते आहे. तेच नाते आपण या लेखातून उलगडणार आहोत . विशेष म्हणजे हा सण सर्व धर्मीय लोक साजरा करतात. हे या सणाचे खास वैशिष्ट्य आहे.
* होळी या सणाची विविध नावे:[Various names of the festival Holi]
महाराष्ट्रात होळी हा सण होळी पौर्णिमा, होळीचा सण, हुताशनी पौर्णिमा, शिमगा, धुळवड या नावाने ओळखला जातो. याशिवाय फाल्गुनोत्सव, वसंतोत्सव, कामदहन उत्सव या नावांनीही होळी हा सण परिचित आहे. होळी म्हणजे पेटवणे, दहन करणे, सर्वनाश करणे होय. हुताश म्हणजे अग्नी.हुताशनी म्हणजे अग्नी प्रज्वलित करणे. धुळवड किंवा धुलिवंदन हे शब्द कृषीशी (शेती) संबंधित असून धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी केले जाते. उत्तर भारतात होळी सणाला होली असे संबोधतात. गुजरातीत होळीला ‘डोजी’ म्हणतात. आसाम मध्ये फागु’ म्हणतात, गोव्यात होळीला ‘सिग्मो’ म्हणतात; तर ओडिशात फगुआ म्हणतात.झारखंडमध्ये होळीला फगवाह म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये बसोबतो असे म्हणतात.
भारतात होळीचा सण कधी/केव्हा साजरा करतात ? आणि तो का साजरा केला जातो ? [When is Holi festival celebrated in India? And why is it celebrated?
भारतीय सौर वर्षा प्रमाणे चैत्र हा पहिला महिना येतो; तर फाल्गुन हा शेवटचा महिना असतो. या फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला म्हणजे फाल्गुन शुद्ध १४/१५ ला होळी पौर्णिमा – सण येतो. हा सण- पाच दिवस साजरा केला जातो.पहिल्या दिवशी होळी पौर्णिमा साजरी करतात. या दिवशी रात्री होळी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते. यालाच धुळवड असेही म्हणतात. या दिवसापासून शेतकरी आपल्या खरीप हंगामाची सुरुवात करतात. शेत नांगरायला सुरुवात करतात. धुळवड हा शब्द शेतातील धुळीशीच संबंधित आहे. फाल्गुन कृष्ण-1 ला वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो; तर फाल्गुन कृष्ण-5 ला रंगपंचमी साजरी करतात. उत्तर भारतात होळीच्या पहिल्या दिवशीच रंगांची उधळण करून, सर्वजण एकमकोना रंग लावून होळीचा हा सण साजरा करतात.दक्षिण भारतात काही ठिकाणी आणि महाराष्ट्रातही रंगपंचमी दिवशी रंगांची उधळण करून, एकमेकाला रंग लावून हा आनंदोत्सव म्हणजेच वसंतोत्सव साजरा करतात.
भारतात होळी हा सण साजरा करण्यामागे सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गात होणारा चैतन्यमय बदल या दोन्ही कारणांचा मिलाप झाला आहे. निसर्ग आपली कात टाकतो. झाडांना, वेलींना नवीन पालवी, फुले, फळे येण्यास प्रारंभ होतो. या वसंत ऋतूत निसर्गात विविध रंगांच्या फुलांची उधळण झालेली पाहायला मिळते.अर्थात नटलेल्या निसर्गाला दाद देण्यासाठी माणूसही रंगांची उधळण करू लागला. निसर्ग ज्याप्रमाणे वटलेली पाने टाकून देतो, त्याप्रमाणेच माणसाने आपल्या मनातील कुविचार जाळून टाकले पाहिजेत.माणसा-माणसातील वैरभाव संपवले पाहिजे.हाच बोध आपण होळी सणातून घ्यायला हवा.
निसर्ग ज्याप्रमाणे जीर्ण झालेली पाने टाकून देतो. त्याच प्रमाणे माणसानेही आपल्या मनातील अभिनिवेश काढून टाकून नवीन जीवनाला सुरुवात केली पाहिजे. निसर्गातील बदलामुळे मानवी जीवनातही बदल घडून आला पाहिजे. हेच हा सण साजरा करण्यामागील गुपित आहे.
* होळी सण साजरा करण्याची परंपरा – [The tradition of celebrating Holi festival]
ग्रामीण भागात आणि शहरी भागात होळी सण साजरा करण्याची परंपरा थोडी भिन्न आहे. ग्रामीण भागात होळी पौर्णिमेदिवशी वनात जाऊन किंवा शेतात जाऊन सावर, बच्चा या सारखी झाडे निवडून त्यातील एक झाड तोडून वाजत- गाजत आणले जाते. गावातील नेहमीच्या ठिकाणी ते झाड उभे करून त्याचा बुंधा जमिनीत पुरला जातो. झाडाला डहाळ्यांनीसजवले जाते. संध्याकाळी गतवर्षीच्या होळीनिमित्त तोडलेल्या झाडाभोवती शेणी वगैरे रचून पोळीचा नैवेद्य दाखवला आतो. होळीचे दहन झाल्यावर रात्री काही वेळ जागरणाचा कार्यक्रम असतो. होळीचे दहन झाल्यावर खेड्यापाड्यात हरभऱ्याचा हुरडा करतात. काही ठिकाणी ज्वारीचा हुरडा करतात.आता हळूहळू हुरडा करण्याची प्रथा बंद होत आहे.दुसर्या दिवशी धुलिवंदन असते. या दिवशी शेतीच्या कामाला सुरुवात केली जाते.
* होळीच्या सणाशी संबंधित आख्यायिका: [The legends related to the festival of Holi
(अ) कृष्ण-बलरामाची कथा
बलरामाचे शस्र हल होते. हल म्हणजे नांगर .म्हणून बलरामाला हलधर असे संघोधले जाते. बलराम हा कृषिप्रधान राजा होता. पावसाच्या पाण्यावर आधारित जी शेती केली जाते, तिला खरीप शेती म्हटली जाते. ही शेती करण्यापूर्वी पूर्वमशागत करावी लागते. जमिनीची मशागत करावी लागते.या मशागतीची सुरुवात धुळवडी दिवशी केली जात असे. आजही ग्रामीण भागात काही ठिकाणी ही प्रथा पाहायला मिळते. बलरामाच्या काळात ही प्रथा अस्तित्वात असावी असे वाटते .म्हणूनच आजही शेतकऱ्याला ‘हलधर’ असे म्हणतात.
(ब)बळीराजा आणि होळी सण
बळीवंशातील अनेक राजे हे कृषिप्रधान होते. बळीराजा हा कृषिप्रधान राजा होता. आजही शेतकऱ्याला उद्देशून बळीराजा असे म्हटले जाते.इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य परत येऊदे.ही म्हण तर सर्वांच्या मुखात आहेच.त्या काळी शेतीला खूप महत्त्व असल्याने धुळवडी दिवशी शेतीच्या मशागतीचा शुभारंभ केला जात असे.
(क) राधाकृष्ण आणि होळीचा सण :
पुराणकथांत राधाकृष्ण यांच्या अनेक कथा आहेत. होळी संदर्भातही राधाकृष्ण यांच्या कथा आहेत. मुळात कृष्णजन्म काळात ‘राधा’ ही व्यक्तिरेखाच अस्तित्वात नव्हती. इ स. बाराव्या शतकाच्या सुमारास राधेचा संबंध कृष्णेशी जोडला गेला. पुढे त्याचे इतके विकृतीकरण झाले की राधाकृष्ण यांच्या लीला कथांमधून आल्या. लहानपणी कृष्ण गोकुळात राहत होता. तिथे तो नंदराजा आणि देवकीच्या छायाछत्राखाली वाढत होता. बालसवंगड्यांसोबत खेळत होता .गोप-गोपी एकत्रच खेळत असत. हा धागा पकडून अनेकांनी राधा कृष्ण यांच्यात प्रेमकथा लिहिल्या. सिनेमात, नाटकात गीते लिहिली. राधाकृष्ण म्हणजे जणू प्रेमाचे प्रतीकच मानले जाऊ लागले. पण हे सत्य नाही. (श्रीकृष्ण जन्माष्टमी या माझ्या लेखात मी सविस्तर लिहिले आहे). त्यामुळे राधा कृष्ण आणि होळी याचा काडीचाही संबंध नाही, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
(ई) हिरण्यकश्यिपूला आणि विष्णूची कथा
बळीवंशातील अनेक राजांनी आपल्या म्हणजे बहुजन समाजातील परंपरेच्या आणि बहुजन समाजाच्या अस्तित्वासाठी खूप संघर्ष केला. हिरण्यकश्यिपूला हा त्यातीलच एक पराक्रमी राजा होता. त्याचे सिंहासन सोन्याचे होते. [ हिरण्य म्हणजे सोने, कश्यपू म्हणजे आसन) हिरण्यकश्यिपूला हा प्रल्हादाचा वडील. त्याला ठार मारण्यासाठी विष्णूने म्हणे नरसिंहाचा अवतार घेतला होता. प्रल्हाद हा कधीच विष्णुभक्त नव्हता. [अधिक माहिती साठी माझा इडा पिडा टळू दे. बळीचे राज्य पुन्हा येऊ दे’ हा लेख वाचा. विष्णूने हिरण्यकश्यिपूला फसवून दगाबाजीने ठार केले, हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी होळीचा सण साजरा केला जातो, विष्णूने हिरण्यकश्यिपूला ठार केले, हे सत्य आहे, पण विजयोत्सव म्हणून होळीचा सण साजरा केला जातो ,हे असत्य आहे. त्यामुळे या कथेकडे केवळ दंतकथा म्हणून पाहण्यास हरकत नाही .सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, होळी किंवा रंगपंचमी खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा. आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी,
* होळी पौर्णिमेशी संबंधित विचारले जाणारे प्रश्नः
(अ) किती देश होळी साजरी करतात?How many countries celebrate Holi?
होळी हा सण भारतीय संस्कृतीशी निगडीत असल्याने भारत आणि नेपाळमध्ये हा सण साजरा केला जातो. जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. शिक्षणाच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने भारतीय लोक ज्या-ज्या देशात स्थायिक झाले आहेत, त्या-त्या देशात भारतीय लोक एकत्र येऊन होळीचा सण साजरा करतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया या देशांत भारतीय लोक होळी साजरी करतात. काही परदेशी पाहुणे भारतात येऊन होळीचा सण साजरा करतात.
(B) होळी किती दिवस साजती केली जाते ?Holi is celebrated for how many days?
→ होळीचा सण पाच दिवस साजरा करतात. पहिला दिवस-होळी पूजन, दुसरा दिवस – धुलिवंदन, तिसरा दिवस- वसंतोत्सव, चौथा दिवस – काही नाही, पाचवा दिवस-रंगपंचमी
(c) आपण रंगांनी होळी का खेळतो ?Why do we play Holi with colours?
होळी पौर्णिमेनंतर वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत ऋतूत निसर्गात विविध रंगांची फुले बहरतात. फळांचा मोसम सुरु होतो. निसर्गातील रंगांची किमया पाहून आपणही रंगांची उधळण करून निसर्गाला दाद देतो .
(D) आपण होळी कशी साजरी करू ?How will we celebrate Holi?
→ परिस्थिती प्रमाणे आपण बदलले पाहिजे.या दिवशी वृक्षतोड न करता औपचारिक रित्या एखाद्या फांदीची होळी करून हा सण साजरा करू शकतो. रंग वापरताना नैसर्गिक रंगांचा उपयोग केला तर आपल्या त्वचेला हानिकारक असे काही होणार नाही.
(E) होळी हा सण कसा साजरा केला जातो?How is Holi celebrated?
वेगवेगळ्या प्रदेशात होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. सध्या झाडे न तोडता, झाडाची फांदी, वाळलेल्या काड्या आणि थोडे शेण वापरून होळी साजरी केली जाते. याशिवाय अनेक ठिकाणी रंगांची होळी खेळली जाते.
(F) भारतात होळीचा सण केव्हा येतो ? किती तारखेला साजरा करतात ?When does the festival of Holi come in India?
होळीचा सण हा तारखेवर येत नसून, तिथीवर येतो. दरवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा सण येतो. ग्रेगेरियन वर्षाप्रमाणे होळीचा सण मार्च महिन्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवडयात येतो.
(G) होळीच्या सणामागील सत्य कथा काय आहे? What is the real story of Holi ?
→ खरे तर निसर्गाच्या बदलाचे स्वागत करण्यासाठी होळीचा सण साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली. पुराणकथांचा आणि होळीच्या सणाचा काहीही संबंध नाही.
(H) होळी म्हणजे काय ? आपण तो का साजरा करतो ? What is Holi? Why is it celebrated?
→ होळी म्हणजे दहन करणे, जाळणे, नष्ट करणे.निसर्गात जे बदल होतात, त्या बदलाचा स्वीकार करण्यासाठी आपण होळी हा सण साजरा करतो. झाडांची पानगळती झालेली असते. काही झाडांच्या फांद्या वाळलेल्या असतात. हे वाळलेले,जीर्ण पूर्णपणे नष्ट करणे म्हणजे होळी करणे होय.माणसानेही असेच आपल्याला नको असलेल्या गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत, म्हणजेच वाईट विचारांची होळी केली पाहिजे. अभिनिवेश जाळून टाकला पाहिजे. शिवाय निसर्गाने केलेल्या रंगांच्या किमयेला दाद देण्यासाठी आपणही रंगांची होळी खेळली पाहिजे.
शब्दांकन :
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विकार अधिकारी, राधानगरी.