भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील शेती पावसावर अवलंबून असते. म्हणूनच Mrug Nakshatra ला भारतीय संस्कृतीने खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. मृग नक्षत्राची माहिती घेण्यापूर्वी आपण सत्तावीस नक्षत्रांची माहिती घेऊ.
सत्तावीस नक्षत्रे :Twenty seven constellations
1. अश्विनी
2. भरणी.
3.कृत्तिका
4.रोहिणी
5. मृगशीर्ष
6. आर्दा
7.पुनर्वसु
8.पुष्य
9. आश्लेषा
10. मघा
11. पूर्वा फाल्गुनी
12. उत्तरा फाल्गुनी
13. हस्त
14. चित्रा
15. स्वाती
16. विशाखा
17. अनुराधा
18. ज्येष्ठा
19. मूळ
20. पूर्वाषाधा
21. उत्तराषाढ
22. श्रवण
23 धनिष्ठा
24. शततारका
25. पूर्वाभाद्रपद
26 उत्तराभाद्रपद
27. रेवती
नक्षत्र आणि तारकासमूह:
खगोलशास्त्रानुसार नक्षत्रे ही वेगवेगळ्या ताऱ्यांचे समूह आहेत. अवकाश निरीक्षणात हे ताऱ्यांचे समूह दिसतात प्रत्येक नक्षत्र कोणत्या ना कोणत्या तारकांच्या समूहात येते.
मेष, वृषभ, मृग, मिथुन, कर्क, वासुकी, सिंह, हस्त, कन्या, भूतप, तूळ, वृश्चिक, धनु, गरुड, धनिष्ठ, कुंभ, महाश्व, मीन हे सर्व तारकासमूह आहेत. प्रत्येक नक्षत्र कोणत्या ना कोणत्या नक्षत्रात येते.
बारा राशी:Twelve zodiac signs
खगोलात आढळणाऱ्या तारका समुहांना काही ना काही नावे दिली आहेत. त्यांतील बारा तारकासमूहांना वेगळे महत्त्व आहे. या तारकासमूहांना बारा राशी असे संबोधले जाते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक,धनु, मकर, कुंभ आणि मीन या त्या बारा राशी आहेत. या राशींची नावे खूप गमतीदार पद्धतीने पडली आहेत.राशींच्या तारका समुहात विशिष्ट प्राणी ,वस्तू यांचा आकार लपलेला आहे. म्हणजे तसा आकार त्यांना प्राप्त झाला आहे. यावरुनच त्या राशींना नावे पडली आहेत.
सत्तावीस वजा नऊ = किती ?
आमच्या लहानपणी आम्हाला जाणती माणसे नेहमी प्रश्न विचारत असत. यांतीलच हा एक प्रश्न. सत्तावीस वजा नऊ = किती? आम्ही 27-9= 18 हे उत्तर सांगितले की जाणती माणसे आमचे उत्तर कसे चुकीचे आहे हे पटवून द्यायची. 27 म्हणजे सत्तावीस नक्षत्रे आणि 9 म्हणजे यांतील पावसाची नऊ नक्षत्रे या नऊ नक्षत्रांत जर पाऊस लागला नाही तर आपले काय होईल? कल्पना करा. शेवटी शून्य राहील. म्हणजे काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून 27-9=0 हे उत्तर कसे बरोबर आहे हे जाणती माणसे पटवून दयायची.
पावसाची नऊ नक्षत्रे कोणती ?What are the nine constellations of rain?
मृगशीर्ष ,आर्दा, पुनर्वसू पुष्य, आश्लेषा ,मघा, पूर्वाफाल्गुनी उत्तराफाल्गुनी, हस्त ही पावसाची नऊ नक्षत्रे.. माझी आई मला ही नक्षत्रे तोंडपाठ सांगायची. ती स्वातंत्र्यपूर्व काळात पहिली शिकली होती. पावसाच्या नक्षत्रांना ग्रामीण बोली भाषेतून मिरग, आडदरा, तरणा, म्हातारा,आसळसा, मघा , पूर्वा, उत्तरा, हातगा ,आंधळ्शाही ,पाऊस नाही .अशी नावे आईच्या तोंडून बाहेर पडायची.
या पावसाच्या नक्षत्रांना दरवर्षी वेगळे वाहन प्राप्त होत असते. म्हणजे पाऊस या वाहनावरून येतो, अशी कल्पना केली जात असे. म्हैस, रेडा, घोडा, गाढव, बेडूक, हत्ती,कोल्हा , अशा प्राण्यांचा वाहन म्हणून कल्पना केली जात असे .प्राण्यांच्या लक्षणावरून ज्या-त्या नक्षत्रात किती पाऊस पडेल, याचा अंदाज शेतकरी बांधत असतो. 2024 साली मृग नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे.याचा अर्थ पाऊस जिथे लागेल तिथे लागेल, तर काही ठिकाणी लागणारच नाही.
मृग नक्षत्राचे शेतकऱ्याच्या जीवनातील स्थानः
मृगशीर्ष हे एकूण सत्तावीस नक्षत्रापैकी पाचवे नक्षत्र होय.हे नक्षत्र मृग, मिरग या नावाने ओळखले जाते. मृगशीर्ष हे पावसाच्या नऊ नक्षत्रापैकी पहिले नक्षत्र असून या नक्षत्रात शेतकरी जोमाने पेरणीच्या, तरवा टाकणीच्या कामाला लागतो.
भारतात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे समुद्राच्या पाण्याची वाफ घेऊन येतात. त्याचे ढग बनतात. ते ढग संपूर्ण भारतात कमी-जास्त प्रमाणात विखुरतात. त्यांना थंड हवा लागली की पाऊस पडतो. हा पाऊस चार महिने पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाळ्याचे चार महिने आहेत.
दरवर्षी नैऋत्य मोसमी वारे भारतात सर्वसाधारणपणे जोमाने वाहू लागतात. भारतात सात किंवा आठ जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होते. याच दरम्यान महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होते.
मृगाचा सण कधी साजरा केला जातो?
रोहिणीचे नक्षत्र संपले की मृग नक्षत्र चालू होते. मृग नक्षत्राचा पहिलाच दिवस मृगाचा सण म्हणून साजरा केला जातो .या दिवशी घरोघरी शेवग्याच्या पानाची भाजी केली जाते.
शेवग्याची भाजी ही बहुगुणी असते.ती खूप पौष्टिक असते. या भाजीत रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड असते. ही भाजी रक्तवर्धक आणि हाडांना बळकटी देणारी असते. डोळ्यांच्या आजारावर ही शेवग्याची भाजी गुणकारी असते. स्त्रियांच्या मासिक धर्मात तक्रार असल्यास शेवग्याची भाजी नियमित खाल्ल्यास तक्रार दूर होते. पावसाळ्यात आपण आजारी पडू नये म्हणून पावसाळा सुरु होताच शेवग्याची भाजी खातात .खरे तर शेवग्याची भाजी नियमित खाल्ली पाहिजे.
मृग नक्षत्रात शेतकऱ्यांची खूप धांदल असते. रोहिणी नक्षत्रात पेरणी केलेले बी मृगात जोमाने येते. या पिकाची खुरपण, कोळपण मृगातच केली जाते. मृगाचा पाऊस सुरु झाला की काही भागात भात, नाचणी, वरईचा तरवा टाकतात. हा तरवा पंधरा दिवसात लागणीसाठी योग्य होतो. मग रोप लागणीची घांदल उडते. मृग नक्षत्रात टाकलेला तरवा आर्द्रा नक्षत्रात लावतात. यावेळी सुद्धा शेतकऱ्यांची खूप धांदल उडते.
शेतकऱ्यांचे जीवन हे पावसावर पूर्ण अवलंबून असल्यामुळे मृग नक्षत्राचे आणि पावसाच्या नऊ नक्षत्रांचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे.
2024 साली सात जूनला मृग चालू होतो. दरवर्षी मृगाची सुरुवात आठ किंवा सात जूनला होते. 2024 साली मृगाला कोल्ह्याचे वाहन आहे.आपण सर्वजण मृगाचे स्वागत शेवग्याची भाजी भरपूर खाऊन करूया.
शब्दांकन :
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राधानगरी