महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या पाण्यावर पोसलेले अलमट्टी हे धरण कर्नाटकातील एक विशाल धरण आहे. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या धरणाची भिंत कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात आहे, तर धरणाच्या पाण्याचा साठा बागलकोट जिल्ह्यात पसरला आहे. या विशाल धरणाचे संपूर्ण बांधकाम इसवी सन 2005 मध्ये पूर्ण झाले.
कर्नाटकातील या विशाल धरणाच्या भिंतीची लांबी 1565 मिटर असून धरणाची उंची 524 मीटर आहे. धरणात पूर्ण 524 मीटर पर्यंत पाणी भरल्यास धरणातील पाण्याचा साठा 200 टीएमसी पर्यंत जातो. जर तेच पाणी 519 मीटर पर्यंत भरल्यास धरणातील पाण्याचा साठा 123 टीएमसी पर्यंत जातो. या विशाल धरणाचे जमिनीखालील क्षेत्रही तितकेच विशाल आहे. कर्नाटकातील विजापूर जिल्हा या अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे सुजलाम- सुफलाम झाला आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर काय होईल?
गेली दहा वर्षे कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रयत्नात आहे; पण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकांनी प्रचंड विरोध केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करावा लागला. कर्नाटक सरकारने जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर पावसाळ्यात महापुराच्यावेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गावेच्या गावे पाण्याखाली गाढली जातील. त्याचे दुष्परिणाम कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला भोगावे लागतील.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा सुगावा कोल्हापूर जिल्ह्याला लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला जागे केले आणि कर्नाटक धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्याचे आवाहन केले. वास्तविक दर वर्षी पावसाळ्यापूर्वी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांना कर्नाटक सरकारच्या या उचापतीला विरोध करावा लागतो हे दुर्दैव आहे.
महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा विचार
कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात वारंवार विनवणी करूनही कर्नाटक सरकारने अद्याप उंची वाढवण्याचा आपला हट्ट सोडलेला नाही.महाराष्ट्र राज्य सरकारने यावर एक वेगळा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक बँकेचे कर्ज काढून त्या कर्जातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी कॅनलच्या द्वारे दुष्काळी भागाकडे वळवण्याचा घाट घातला आहे. ही योजना जर कार्यान्वित झाली तर निश्चितच कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसणार नाही. महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या कारणास्तव जागतिक बँकेचे आणि अन्य बँकांचे भरमसाठ कर्ज काढून महाराष्ट्र सरकारला कर्जबाजारी करून ठेवले आहे . आता पुन्हा एक अर्ज काढणे महाराष्ट्र राज्याला परवडणार आहे का? याचाही विचार राज्य सरकारने करायला हवा.
सरकारी टीम काय म्हणते?
महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील शेतीवर आणि ठिकाणावर त्याचा काय परिणाम होईल याबाबत एक संशोधन कमिटी नेमली. या कमिटीचे म्हणणे असे आहे की अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे महापुराचे प्रमाण वाढते कसे हे चुकीचे आहे .तसेच अतिवृष्टी आणि नद्यांची कमी झालेली रुंदी, अतिक्रमण हे मुख्य कारण आहे असे कमिटीचे म्हणणे आहे.पण हा मुद्दा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेला मान्य नाही.