चावंड किल्ला/प्रसन्नगड /Chavand

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणारा ‘चावंड हा किल्ला नाणेघाटचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. ‘चामुंडा’ या शब्दाचा अपभ्रंश ‘चावंड असा झाला आहे. आपटाळ गावानजीक असलेल्या या ‘चावंड किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.

गडाचे नाव : चावंड

समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1150 मीटर

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

ठिकाण : तालुका : जुन्नर

जिल्हा : पुणे.

जवळचे गाव : आपटाळ, माहुली

पुण्याहून अंतर : 109 किमी.

डोंगररांग: नाणेघाट, सह्याद्री

चावंडगडला कसे जाल?How to go to chavand fort?

जुन्नर शहरापासून 17 किमी अंतरावर चावंड हे गाव आहे. चावंड गावात आणि आसपासच्या गावात महादेव कोळ्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. चावंड गावातून आश्रम शाळेपासून मळलेली एक वाट आहे. ती सरळ गडावर जाते. साधारणतः तासाभरातच आपण गडावर जाऊ शकतो.

इतिहास :History

बहमनी सत्तेचा अस्त झाला आणि त्यातून अनेक सत्ता अस्तित्वात आल्या. त्यातीलच एक निजामशाही होय. इ. स. 1485 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला उत्तर कोकण आणि पुणे प्रांतातील किल्ले मिळाले. चावंड किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला. दुसरा बुऱ्हाण निजामशाह हा सातवा निजाम. त्याचा नातू बहादूरशाह 1594 साली याच चावंड किल्ल्यात कैदेत होता.

इ. स. 1636 मध्ये निजामशाही मोगलांपासून आणि आदिलशाहीपासून वाचवण्यासाठी चावंड किल्ला मोगलांना दिला.

इ. स. 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले ताब्यात घेतले. चावंडगडही स्वराज्यात आला. शिवाजी महाराजांनी चावंडगडाचे ‘प्रसन्नगड’ असे नामकरण केले होते.

अहमदनगरच्या मलिक अहमदने चावंडबरोबरच चावंड परिसरातील अनेक किल्ले घेऊन आपला राज्यविस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे चावंड किल्ला आणि निजामशाही यांचा इतिहास या किल्ल्यातील अवशेषात लपलेला आहे. शहाजीराजेंच्या नंतर निजामशाही खिळखिळी झाली होती.

‘चामुंडा’ ही रुद्रावतार धारण करणारी देवी होती. तिच्या नावावरूनच या किल्ल्याला ‘चावंड’ असे नाव पडले आहे.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :

गडावरील दरवाजातून प्रवास केल्यानंतर दोन वाटा लागतात. उजवीकडील वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते; तर डावीकडील वाट गडाच्या तटबंदीकडे जाते. गडावर आज जे काही आहे ते उद्ध्वस्त अवशेषांच्या रूपात आहे. उजवीकडील वाटेने पुढे पायऱ्या चढून गेल्यावर एका वास्तूचा चौथरा लागतो. तेथेच एक मोठे गोल उखळ आहे. त्याला खालील बाजूस एक छिद्र आहे. बाजूलाच दोन संलग्न टाक्या आहेत. येथून पुढे गेल्यानंतर आणखी एक पडझड झालेली वास्तू दिसते. बांधकाम पाहिल्यानंतर ही वास्तू मंदिराची असावी असे वाटते. येथून आजूबाजूला पाहिले असता साधारणतः 10 ते 15 इमारतींचे उद्ध्वस्त बांधकाम दृष्टिक्षेपात येते. या

इमारती पाहिल्यानंतर गडावरून बरीच वर्षे कामकाज चालत असावे असे वाटते. गडाच्या वायव्येस एकमेकांना लागून सात टाकी आहेत. या टाकींचा संबंध सप्त मातृकांशी जोडला जातो. सप्त मातृका म्हणजे – ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडा आणि वैष्णवी होय. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी आहे. गड प्राचीन आहेच; पण अति दुर्गम असल्यामुळेच बहादूरशाह निजामाला कैदेत ठेवण्यासाठी हा गड निवडला असावा असे वाटते.

तटबंदी असलेल्या भागातून आपल्याला फिरता येते. तेथून पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. शिल्पकामही पाहायला मिळते. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळ कोरीव गुहा आहेत. येथे पहारेकऱ्यांच्या चौक्या आहेत. एक गुहा आजही सुस्थितीत आढळते. गुहेलगतच तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे.

गडाच्या पूर्वेस आल्यानंतर आपल्याला कोणतेही अवशेष दृष्टीस पडत नाहीत. कातळकड्यांनी हा भाग व्यापून गेला आहे. त्यामुळे येथे तटबंदी आढळत नाही. येथील बराच भाग विस्तीर्ण आणि ओसाड आहे. गडाच्या दक्षिणेला आणि नैर्ऋत्य भागामध्ये तुरळक ठिकाणी तटबंदी अस्तित्वात आहे. इथे पाण्याच्या दोन टाक्या आहेत.

गड पाहात असताना पश्चिमेला आल्यानंतर आपणास मजबूत तटबंदी जाणवते. या ठिकाणी दोन बुरूज आढळतात. इथून टेकडीकडे मंदिर पाहायला जाता येते. गडाच्या सर्वांत उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरी मूर्ती प्राचीन आहे. आजूबाजूला प्राचीन मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. या देवीच्या मंदिरासमोर नंदी आहे. पूर्वी येथे शिवमंदिर असावे, याचा हा पुरावा आहे. शेजारी दीपमाळही आहे. चावंड गडाचा घेर खूप विस्तीर्ण आहे. गडाचा व्यास निश्चितपणे पाच- सहा किमीचा आहे.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :

गडावर मुक्काम करणे सध्या तरी धोकादायक दिसते. काही हौशी पर्यटक स्वतःचे तंबू घेऊन व जेवणाचे साहित्य बरोबर घेऊन येथे मुक्काम करतात. चावंड गावात राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. चावंड गावातून गडावर जाण्यासाठी किमान एक तास लागतो. गड फिरण्यासाठी सहज अडीच- तीन तास लागतात.

चावंड गडाला एक दिवस भेट देऊन जावे, असाच हा किल्ला आहे.

Leave a comment