सिंगापोर – मलेशिया – थायलंड ही टूर करताना जास्त वेळ दिला जातो, तो मलेशियाला. दिल्ली ते सिंगापोर सुमारे 4200 किमी अंतर आहे;तर मुंबई ते मलेशिया अंतर सुमारे 3500 किमी आहे. Ringgit हे मलेशियन चलन आहे.साधारण: 1 रिंगिट =20 रूपये . A heaven Holiday यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही प्रथम सिंगापोर पाहिले आणि बसने मलेशियाला निघालो. मलेशिया ते सिंगापोर हा प्रवास सुमारे सहा तासांचा आहे. रात्री साडेदहा वाजता आम्ही सिंगापोर मलेशियाच्या सीमारेषेवर पोहोचलो.
तेथे आमचे स्वागत करण्यासाठी मलेशियाची गाईड कतरिना आल होती. कतरिनाने आमचे स्वागत केले. सीमारेषेवर Immigration process पूर्ण व्हायला सुमारे अर्धा-पाऊण तास लागला.आमच्या सोबत A heaven Holiday च्या वतीने वर्षा बुगडे आणि त्यांची कन्या प्रणिता बुगडे होत्या. आम्ही सिंगापोरची बॉर्डर cross केली आणि काही अंतर गेल्यावर मलेशियाच्या हद्दीत रात्रीचे जेवण घेतले. रात्री साडे अकरा वाजता निघालेली बस मलेशियाच्या क्वालालंपूर या शहरात पहाटे चार वाजता म्हणजे शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पोहोचलो.आता आपण मलेशियाबद्दल थोडी माहिती घेऊया —–
मलेशिया देश: (Malaysia country]
मलेशिया हा देश आणि भारत यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. मलेशियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खूप मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांची प्रेरणा आहे. मलेशियाचे पहिले पंतप्रधान तुंकू अब्दुल रेहमान आणि पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लंडमध्ये एकत्रच शिक्षण होत होते. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुंकू अब्दुल रेहमान सतत नेहरूंच्या संपर्कात होते. नेहरूंनी मलेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रोत्साहन दिले. शेवटी ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. 31 ऑगस्ट 1957 रोजी मलेशिया मुक्त झाला. हजारो मलेशियन एकत्र झाले आणि त्यांनी एका चौकात स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. मलेशिया स्वतंत्र झाला तेव्हा सिंगापोर मलेशियाचा एक भाग होता.
मलेशियाचे क्षेत्रफळ समारे 3,30,000 चौ. किमी असून लोकसंख्या सुमारे 3.50 कोटी (2020) आहे.
मलेशिया, सिंगापोर थायलंड यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिन्ही देशात फिक्स ऋतू नाहीत.येथे वर्षभर केव्हाही पाऊस पडतो. आठवड्यातून तीन ते चार वेळा पाऊस पडतोच.मलेशियात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात अधिक पाऊस पडतो.
मलेशियाचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम असून या देशात सुमारे 70% जंगल आहे. शहरातही रस्त्याच्या दुतर्फा नियोजनबद्ध झाडे लावली आहेत. हा देश निसर्गप्रेमी असून वृक्षतोडीला येथे बंदी आहे. अगदी विषुववृत्तावर हा देश असल्यामुळे येथील हवामान बारमाही दमट, उष्ण असते.
मलय + सिया = मलयसिया असा मलेशियाचा विग्रह होतो. मलय हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ चंदनाचे वसतिस्थान असलेला पर्वत. यावरून मला एक संस्कृत सुभाषित आठवले—
मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरू काष्ट मिंधनं कुरुते!”
या सुभाषिताचा अर्थ असा की मलय पर्वतातील भिल्ल स्त्रिया चंदनाची झाडे स्वयंपाकाच्या जळणासाठी वापरतात. यावरून मलेशियात चंदनाची किती झाडे असतील याची कल्पना करा. मलेशियात संसदीय लोकशाही असूनही राष्ट्राध्यक्ष यांच्याकडे अधिक अधिकार असतात.
मलेशियाचा इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असून या देशात 63% इस्लाम, 19% बौद्ध, 9% ख्रिश्चन, 8% हिंदू, 2% निधर्मवादी लोक राहतात.हा देश इस्लाम पुरस्कृत देश असूनही या देशात सर्व धर्मीय लोक गुण्या गोविंदाने राहतात.या देशात आंतर धर्म विवाहाला विरोध नाही. आम्हाला मलेशिया देशाची माहिती सांगणारे गाईड सुंदरराज कृष्णन् हे हिंदू धर्मीय आहेत; तर त्यांची पत्नी ख्रिश्चन धर्मीय आहे. त्यांचा संसार सुखाने चालला आहे. मलेशियन प्रथेनुसार शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर देशासाठी काहीतरी फ्री सेवा करण्याची प्रथा आहे. सुंदरराज हे गाईड सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली बारा वर्षे पर्यटकांना मार्गदर्शन करताना कोणताही मोबदला घेत नाहीत. मलेशिया या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मलेशियाचे रहिवाशी असलेल्या प्रत्येक नागरिकाने लष्करी शिक्षण घेऊन किमान दोन वर्षे सक्तीने लष्करी सेवा केली पाहिजे. मलेशियाच्या राजपुत्रांनाही यातून सवलत नाही.
मलेशियाच्या उत्पन्नाची साधने / स्रोत:
मलेशियात 70% जंगल असल्यामुळे मलेशिया मोठ्या प्रमाणात पामतेल, रबर यांचे निर्यात करतो. याशिवाय नैसर्गिक वायूचे उत्पन्नही येथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मलेशियाने पर्यटनालाही खूप चालना दिली आहे. हा देश प्रदूषणविरहित असला तरी येथे धुम्रपान’ करणारे लोक अधिक असल्यामुळे सरकारला धुम्रपान विरोधी कायदा करावा लागला आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे आम्हाला आढळून आले.
मलेशियातील प्रेक्षणीय स्थळे :
क्वालालंपूर : [Kualalumpur]
क्वालालंपुर म्हणजेच कुलालंपूर होय. क्वालालंपुर ही मलेशियाची राजधानी आहे. या शहरात प्रामुख्याने नॅशनल मोनुमेंट पॉईंट, गेट वे ऑफ किंग्ज पॉईंट, क्वालालंपूर टॉवर (KL-Tower) ट्विन टॉवर, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकी नॅशनल मोनुमेंट पॉईंट आम्हाला पाहता आला नाही. जे पाहिले त्याबद्दल थोडेसे—-
(A) गेट वे ऑफ किंग्ज पॅलेस (Gate Way of King’s Palace]
शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी अकराच्या दरम्यान आम्ही Gate Way of King’s Palace च्या प्रांगणात प्रवेश केला. मलेशियाच्या राजाच्या राजवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य प्रवेशद्वार बांधले आहे. प्रवेशद्वारापुढे भरपूर मोकळी जागा असून काही प्रमाणात वृक्ष लागवड करून सजावट केली आहे. अत्यंत सुंदर आणि देखणे असे राजवाड्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारापाशी मलेशियन पोलिस यंत्रणा अजिबात नव्हती हे विशेष. या गेट वे ची आठवण म्हणून आम्ही येथे फोटो काढले.
(B) क्वालालंपुर टॉवर[KL-Tower]:
KL Tower हा मलेशियातील सर्वांत उंच टॉवर असून संपूर्ण जगाचा विचार करता संपूर्ण जगात सर्वांत उंच इमारतीत केएल टॉवरचा सातवा क्रमांक लागतो. या टॉवरची उंची सुमारे 421 मीटर म्हणजे 1381 फूट आहे. आपल्याला 335 मी पर्यंतच जाता येते. येथेपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट आहेत. 335 मी उंचीवर जाऊन तेथील गॅलरीतून मलेशियाचे देखणे रुप कॅमेऱ्यात टिपता येते. आम्ही या गॅलरीत गेलो होतो. तेव्हा ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उंचावरून मलेशियाचे नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद लुटता आला नसला, तरी उंचावरून मलेशिया पाहण्याचा आनंद आम्ही घेतला. मलेशियात गेल्यानंतर केएल टॉवरला आवर्जुन भेट दयावी असाच हा टॉवर आहे. 1991 साली टॉवरचे बांधकाम सुरु झाले होते. 1994 साली ते पूर्ण झाले. 23 जुलै 1996 साली हा टॉवर सर्वांसाठी खुला करण्यात आला.या टॉवरला telecommunication Tower असेही संबोधले जाते.
(c) ट्विन टॉवर्स [Twin Towers] / Petronas Towers:
ट्विन टॉवर्स ही एक क्वालालंपूरमधील सर्वांत आकर्षक अशी इमारत आहे.या पेट्रोनास टॉवर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे Petronas Twin Towers ही जगातील सर्वात उंच ट्विन टॉवर्स आहे. अशा प्रकारचा जुळा मनोरा जगात यापेक्षा उंच नाही.ट्विन टॉवर्स ही एक कमर्शिअल कार्यालये असलेली इमारत असून ही इमारत म्हणजे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. जानेवारी 1992 साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; तर 1 मार्च 1996 साली ही इमारत पूर्ण झाली. प्रत्यक्ष 31 ऑगस्ट 1999 साली ही इमारत सर्वासाठी खुली करण्यात आली. या इमारतीत वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. गरमागरम खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आहेत. पर्यटक येथे इमारत पाहायला येतात आणि आपल्याला आवश्यक ती खरेदी करतात. म्हणूनच या इमारतीला commercial Building म्हटले जाते. या मनोऱ्यांची उंची 451 मीटर आहे.या इमारतीचे Architecture design फझलर रेहमान खान या बांगलादेशी- अमेरिकन Architect ने केले आहे. नक्कीच ही इमारत पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.
Chocolate Market [चॉकलेट मार्केट) के एल टॉवर पाहून ट्विन टॉवर पाहायला जाताना वाटेत चॉकलेट बाजार लागतो. येथे दर्जेदार चॉकलेट्स मिळतात. थायलंडची चॉकलेट्स आणि क्लालालंपूरची चॉकलेट्स यांत फरक आहे. दर्जेदार चॉकलेट्स घ्यायची असतील तर येथे थोडी चॉकलेट्स खरेदी करायला हरकत नाही.
बटू लेणी Batu Cave/Murugan Statue मुरूगन पुतळा
मलेशियात सुमारे 63% मुस्लिम असूनही ‘हिंदू खतरे में है।’ असे कोणीही म्हणत नाहीत.मलेशियात केवळ 8% तमिळी हिंदू असूनही ते पूर्णतः सुरक्षित आहेत.आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्यास पुतळा उभारण्यात तेथे पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणूनच सेलेंगोर येथील बटू लेण्यामध्ये मुरुगन देवाचा पुतळा, मंदिर पाहायला मिळते.
बटू याणि मुरुगन हे दोन्हीही तमिळी शब्द असून बटू म्हणजे तमिळी भाषेत दगड.एका विशाल दगडात येथे ज्यालामुखीमुळे तयार झालेली सुंदर लेणी पाहायला मिळतात. ज्यालामुखीच्या उद्रेकामुळे खडकाचा वरील भाग भव्य छिद्र रुपाने मोकळा झालेला आहे. आतील ज्वालारस वाहून गेल्यामुळे आत पोकळी निर्माण झाली आहे. ज्वालारस थंड होताना सुंदर लेण्यांचा आकार प्राप्त झाला आहे. एका विशाल खडकात लेणी तयार झाली आाहेत. म्हणून या ठिकाणाला बटू केव्ह [Batu Caves] म्हणतात.
मुरुगन या तमिळी शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य संपन्न व्यक्ती. मुरुग म्हणजे सौंदर्य. मुरुगन म्हणजे देदीप्यमान सौंदर्य.थोडक्यात मुरुगन स्टॅच्यू म्हणजे सौंदर्य देवतेचा पुतळा होय.
बटू लेण्याजवळ पोहोचताच आपल्याला मुरुगन देवतेचा भव्य पुतळा दिसतो. मलेशियातील हा सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 427 मीटर आहे. 2006 साली हा पुतळा उभारला आहे,.441 पायऱ्या चढून लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर आत मुरुगन देवतेचे मंदिर दिसते. येथे मंदिरात मुरुगन देवतेची मूर्ती आहे.
काही लोक येथील पुतळा आणि मंदिर हे कार्तिकनाथाचे असल्याचा दावा करतात; पण त्याला काहीही ऐतिहासिक आधार नाही. “प्रचंड सौंदर्य लाभलेल्या या नैसर्गिक लेण्याला अर्थात बटू केव्हला आवश्य भेट दयावी असेच हे ठिकाण आहे.
मलेशियन गाईड आणि प्राच्यविद्या अभ्यासक सुंदरराज कृष्णन यांच्याशी केलेल्या चर्चेतून सदर माहिती उपलब्ध करून दिली आहे. एक अभ्यासक गाईड दिल्याबद्दल A Heaven Holiday ला खूप खूप धन्यवाद !
जेंटिंग हायलँड [Genting Highland]
मलेशियातील पहांग राज्यातील उंच डोंगरावर असलेला जेंटिंग हायलँड (Genting Highland) हा पॉईंट म्हणजे मलेशियातील थंड हवेचे ठिकाण होय.
बटू केव्ह पाहून आम्ही जेंटिंग हायलँड पहायला निघालो. वाटेत एका मॉलवर उतरलो. काही जणांनी शॉपिंग केली आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
जेंटिंग हायलँड [Genting Highland] हे एक घनदाट अरण्यात उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. गर्द राईतून बसने प्रवास करताना येणारा सुखद अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला. Genting Highland च्या तळावर बसेस थांबल्या. आम्ही लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेलो. तेथे केबल कारने (cable car) जाण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. काढलेली तिकिटे स्कॅन करून झाल्यावर आम्ही पुढच्या टप्प्यात गेलो. प्रचंड गर्दी पाहून आम्ही रांगा मोडून पुढच्या टप्यात जात होतो. त्यामुळे इतर foreigner आम्हाला shame India असे बोलणे ऐकावे लागले. अजून भारतीयांच्यात शिस्त आणि संयम आलेला नाही. याचे ते एक प्रातिनिधिक उदाहरण होते
केबल कारमध्ये प्रत्येकी 8 ते 10 लोक बसून आम्ही प्रवास केला. एकूण 99 केबल कार्स चालू होत्या. म्हणजे एका वेळी 1000 माणसे केबल कारने प्रवास करूप शकत होती. सुमारे तीन किलोमीटर अंतर ताशी 21ने 25 किमी वेगाने आम्ही केबल कारने गेलो.केबल कारचा प्रवास म्हणजे एक sky way च होता.आकाशातून केबल कारने अशा प्रकारे अनुभव आम्ही प्रत्यक्ष घेतला अशा प्रकारचा sky way भारतात तरी अस्तित्वात नाही. केबल कारने आम्ही अक्षरश: ढगांतून प्रवास करून एका उंच तळावर पोहोचलो. तेथे प्रचंड मोठा मॉल होता.विविध प्रकारचे जुगाराचे खेळ होते. प्रचंड मोठ्या मॉलमध्ये आम्ही फिरण्याचा आणि बघण्याचा आनंद घेतला. आमचे दुपारचे जेवण येथेच झाले. सायंकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
स्वतंत्रता चौक [Independence Square]
जेंटिंग रायलँड पाहून आम्ही रात्री आठ वाजता स्वातंत्र्य चौकात पोहोचलो. याच चौकात सारे मलेशियन स्वातंत्र्यासाठी जमले होते. उठावाची तीव्रता पाहून ब्रिटिशांनी 31 ऑगस्टला 1957 रोजी मलेशियाला आपल्या बंधनातून मुक्त केले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी या चौकात येऊन सर्वांना स्वातंत्र्यासाठी प्रोत्साहित केले होते. स्वातंत्र्य जाहीर होताच अनेक नागरिक मोठ्या संख्येने स्वतंत्रता चौकात जमा झाले. आणि जल्लोष केला. म्हणूनच हा चौक Independence Square म्हणून प्रसिद्ध झाला. दरवर्षी मलेशियन या चौकात जमतात. येथील ध्वजारोहन कार्यक्रमाला उपस्थित राहतात. येथे काही प्रशासकीय इमारती आहेत. त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण घेतले आणि रूमवर विश्रांतीसाठी गेलो.
पुत्रजया [Capital of Malaysia] Putrajaya]
मलेशियाची प्रशासकीय राजधानी म्हणजे पुत्रजया (Putrajaya) होय. नवी मुंबई, नवी दिल्ली सारखीच पुत्रजया ही राजधानी रचनाबद्ध आणि नियोजनबद्ध वसवलेली आहे. येथे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांच्या इमारती आहेत.
(A) प्रधानमंत्री कार्यालय पुत्रजया [Prime Minister’s office Putrajaya]
1999 साली प्रथम पुत्रजया येथे प्रधानमंत्री कार्यालय आणले गेले. हळूहळू पुत्रजयाचा विस्तार होत गेला.2001 साली पुत्रजया ही मलेशियाची प्रशासकीय राजधानी घोषित केली. कुलालंपूर येथील वाढत्या गर्दीमुळे तेथून 25 किमी अंतरावर पुत्रजया शहर वसलेले आहे.
(B) पुत्रा मशिद [ Putra Masjit]
प्रधानमंत्री कार्यालयाला लागूनच उजव्या बाजूला पुत्रा मशिद आहे. हे मशिद भव्य आणि देखणे आहे. अनेक पर्यटक पुत्रा मशिदला भेट देतात.
(C) पुत्र + जया = पुत्रजया
Putra + Jaya = Putrajaya .पुत्र हा शब्द राजपुत्र या अर्थाने वापरला आहे. तर जया म्हणजे विजय. राजपुत्राचा विजय’ असा पुत्रजयाचा अर्थ आहे. भारतीय संस्कृतीचा प्रभाव पुत्रजया या नावात दिसून येतो. पुत्रजया येथे असलेले एक सरोवरही प्रसिद्ध आहे. हे मानवनिर्मित सरोवर आम्ही जाता-जाता बसमधून पाहिले. पुत्रजया शहर पाहिले आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी कुलालंपूर येथील सुवर्णभूमी विमानतळाच्या दिशेने प्रवास केला. सुवर्णभूमी विमानतळावरून आम्ही थायलंडच्या दिशेने विमानातून झेप घेतली. सिंगापूरपेक्षा मलेशिया आम्हा पर्यटकांना खूप आवडले.