पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणारा ‘शिवनेरी किल्ला’ प्रसिद्ध आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मामुळे ! याच गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. त्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत.
गडाचे नाव : शिवनेरी
समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1200 मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : जुन्नरजवळ, जिल्हा पुणे.
जवळचे गाव : जुन्नर
डोंगररांग : नाणेघाट, सह्याद्री
सध्याची अवस्था : चांगली. डागडुजी चालू आहे.
स्थापना : इ. स. 1170
पुण्याहून अंतर : सुमारे 105 किमी
शिवनेरी गडावर कसे जाल ?How to go to shivneri fort?
शिवनेरी गडावर जाण्याच्या दोन वाटा आहेत. त्या पुढीलप्रमाणे :—
साखळीची वाट :
ही वाट जुन्नर शहरातून जाते. स्थानिक लोकांना विचारले तरी कोणीही ही पायवाट दाखवू शकेल. साधारणतः एक ते दीड तासात गडावर जाता येते पुण्याहून जुन्नरला जाणाऱ्या बसगाड्या आहेत.
सात दरवाजांची वाट :
जुन्नर शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत गेल्यास गडाच्या पायऱ्यांपर्यंत हा रस्ता जातो. या मागनि सुद्धा किल्ल्यावर पोहोचायला एक ते दीड तास लागतो.
मुंबईहून शिवनेरी पाहायला येताना माळशेज घाट पार करून पुढे 8-9 किमी अंतर गेल्यावर ‘शिवनेरी 19 किमी’ अशी पाटी लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो.
इतिहास :History
‘जुन्नर’ हे गाव इ. स. पूर्व काळापासून अस्तित्वात आहे. जीर्णनगर- जुन्नेर-जुन्नर असा या गावाच्या नावाचा प्रवास आहे. शक राजा नहपान याची जुन्नर ही राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर आपल्या ताब्यात घेतला. नाणेघाट या पूर्वीच्या व्यापारी मार्गाने जुन्नरला मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. सातवाहन राजांनी आपली सत्ता स्थिर झाल्यानंतर अनेक ठिकाणी लेणी खोदून काढली. सातवाहन राजवटीनंतर जुन्नर परिसरावर चालुक्य व राष्ट्रकूट घराण्यांची सत्ता होती.
इ. स. 1170 ते 1308 या कालावधीत दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. यादवांच्या काळातच शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स. 1443 मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर करून आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे हा किल्ला बहमनी राजवटीत गेला. इ. स. 1446 मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. इ. स. 1470 मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने शिवनेरी किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला.
इ. स. 1493 मध्ये निजामशाहाने आपली राजधानी अहमदनगरला नेली. इ. स. 1565 मध्ये सुलतान मूर्तीजा निजामाने आपला भाऊ कासीम याला शिवनेरीवर नजरकैदेत ठेवले होते. यानंतर 1595 मध्ये जुन्नरचा परिसर आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला.
राजमाता जिजामाता गरोदर असताना त्यांना शहाजीराजे 500 स्वारांनिशी रातोरात गडावर घेऊन आले होते. जिजामातेने गडावरील शिवाईदेवीस ‘पुत्र झाल्यास तुझे नाव ठेवीन’ असे साकडे घातले होते. त्याप्रमाणे योगायोगाने जिजामातेला पुत्र झाला. त्यांनी बाळाचे नाव शिवाईदेवी वरून ‘शिवाजी’ असे ठेवले. ही घटना इ. स. 1630 मध्ये घडली.
19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म याच शिवनेरी गडावर झाला. बालपणातील त्यांचा काही काळ याच गडावर गेला. इ. स. 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवरायांसह गड सोडला. इ. स. 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पुढे 1716 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आलाच नाही.
इ. स. 1650 मध्ये महादेव कोळ्यांनी मोगलांविरुद्ध गडावर बंड केले होते; पण ते बंड मोगलांनी मोडीत काढले. या बंडात मोगलांचा विजय झाला होता.
इ. स. 1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याच्याकडून किल्ला घेण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न अयशस्वी झाला. पुढे 1678 मध्ये जुन्नर शिवरायांनी प्रांतापर्यंत मजल मारली; पण शिवनेरी हातात आला नाही.
त्यानंतर पुढे 1716 मध्ये छत्रपती शाहूने हा गड मराठेशाहीत आणला. पुढे पेशवाईच्या काळात किल्ला पेशव्यांकडे हस्तांतरित झाला.
इ. स. 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने किल्ल्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी ‘हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी गडावर शिधासामग्री आहे’ असा उल्लेख केला होता.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे :
शिवाईदेवीचे मंदिर :
शिवनेरी गडावर फार जुने शिवाईदेवीचे मंदिर आहे. मंदिरात शिवाईदेवीची मूर्ती आहे.
अंबरखाना :
गडावर सात दरवाजांपैकी शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यास अंबरखाना लागतो. अंबरखान्याची पडझड झाली असून सध्या फक्त अवशेष शिल्लक राहिले आहेत. अंबरखान्याचा उपयोग धान्य साठवून ठेवण्यासाठी केला जात असे.
कोळी चौथरा :
इ. स. 1650 मध्ये महादेव कोळ्यांनी बंड केले होते. ते बंड मोगलांनी मोडून काढले होते. त्यात कोळ्यांचा पराभव झाला. 1500 कोळ्यांना कैद करून त्यांची मुंडकी उडवली होती. तेथेच हे स्मारक बांधले आहे. हे स्मारक कोळी चौथरा नावाने ओळखले जाते.
शिवजन्म स्थान :
शिवनेरी गडावर असलेले ‘शिवजन्म स्थान’ अगदी नेटके आणि लक्षवेधक आहे. येथील परिसराचे बांधकाम दगडी आहे. वातावरण अगदी अल्हाददायक आणि परिसर स्वच्छ आहे. येथे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि जुन्या काळातील पाळणा आहे. ही इमारत दुमजली आणि मजबूत आहे.
गंगा-यमुना टाक्या :
अंबरखान्यापासून 5-10 मिनिटांच्या अंतरावर ‘गंगा-यमुना’ टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये बारमाही पाणी असते. हे पाणी पिण्यास योग्य आहे असे म्हटले जाते; पण उपसा नसल्यामुळे पाण्याला उन्हाळ्यात हिरवट रंग प्राप्त होतो.
शिव-कुंज वास्तू :
पाण्याच्या टाक्यांसमोरच ‘शिवकुंज’ नावाची वास्तू आहे. या वास्तूची कोनशिला तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते स्थापित झाली होती (27 एप्रिल 1960). येथील जिजामातेचा आणि बाल शिवाजी राजांचा पुतळा अत्यंत बोलका आहे.
कमानी मशिद :
शिवकुंजासमोरच कमानी / मशीद आहे. मशिदीच्या टपावरील आकार धनुष्यासारखा असल्यामुळे या मशिदीला कमानी मशिद असे नाव पडले.
कडेलोट टोक :
शिवजन्म स्थळापासून पाच मिनिटांच्या अंतरावर कडेलोट टोक आहे. या ठिकाणी गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी कड्यावरून ढकलून दिले जाई. म्हणून या टोकाचे नाव कडेलोट टोक असे पडले.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
गडावर राहण्यापेक्षा जुन्नरला राहणे अधिक सोईचे होईल. जुन्नरला खाण्या- पिण्याची सोय व्यवस्थित होईल.