‘सातारचा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा ‘अजिंक्यतारा गड’ सातारा शहराला लागूनच आहे. सातारची ओळख म्हणून पाहिला जाणाऱ्या या अजिंक्यताऱ्याची आता आपण माहिती घेणार आहोत.
गडाचे नाव : अजिंक्यतारा
समुद्रसपाटीपासून : सुमारे 300 मीटर
गडाचा प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी: सोपी
ठिकाण : सातारा, जिल्हा : सातारा
जवळचे गाव : सातारा. साताऱ्यापासून अंतर : 3.8 किमी
डोंगररांग: बामणोली डोंगररांग सातारा, सह्याद्री
सध्याची अवस्था : डागडुजी करणे आवश्यक.
स्थापना: इ. स. 1190
गडावर कसे जाल ?
सातारा जिल्ह्यातील सातारा शहरानजीक पोवई नाक्याच्या दक्षिणेला साधारणतः साडेतीन किलोमीटर अंतरावर ‘अजिंक्यतारा’ किल्ला वसलेला आहे. साताऱ्यातून खासगी चारचाकी वाहन किंवा भाडोत्री वाहन घेऊन आपण थेट गडावर जाऊ शकतो.
सातारा शहरातून गडावर जाण्यास अनेक वाटा आहेत. गाडी, रस्ता, पायवाटा यांपैकी कोणत्याही वाटेने जाता येते.
* अजिंक्य तारा गडाचा इतिहास :
सातारा येथील ‘अजिंक्यतारा’ किल्ला शिलाहार राजघराण्यातील दुसरा भोजराजा याने इ. स. 1190 साली बांधला. पुढे हा किल्ला बहमनी सत्तेकडे गेला. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यावर ‘अजिंक्यतारा’ विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ. स. 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा अजिंक्यताऱ्यावरच कैदेत होते.
‘अजिंक्यतारा’ हा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय. पहिली राजगड, दुसरी रायगड, तिसरी जिंजी, चौथी सातारा ( अजिंक्यतारा) आणि कोल्हापूर होय. वारणा येथे छत्रपती संभाजीपुत्र शाहू आणि महाराणी ताराबाई यांच्यात जो करार झाला त्या करारानुसार मराठ्यांच्या गादीचे विभाजन झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 जुलै 1673 मध्ये अजिंक्यतारा स्वराज्यात आणला. शिवराज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज आजारी पडले होते. हवा पालट व्हावी या उद्देशाने महाराज दोन महिने अजिंक्यताऱ्यावर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वराज्यात घुसला. तब्बल 27 वर्षे तो महाराष्ट्रात तळ ठोकून होता. त्याला मराठ्यांचे राज्य उद्ध्वस्त करायचे होते; पण ते जमले नाही. शेवटी याच मातीत गाडून घ्यावे लागले. इ. स. 1682 साली औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ. स. 1699 मध्ये औरंगजेबने अजिंक्यताऱ्याला वेढा दिला. त्या वेळी गडावर प्रयागजी प्रभू किल्लेदार होता.
13 एप्रिल 1700 रोजी भल्या पहाटे मोगलांनी सुरूंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली. बत्ती देताच मंगळाईचा बुरूज ढासळला. बुरुजावरील मराठे मावळे दगावले. किल्लेदार प्रयागजी प्रभू या स्फोटात सापडला; पण काही इजा न होता वाचला.
दुसरा स्फोट झाला. हा स्फोट मोगलांच्याच अंगी आला. तट मोंगल सैन्यावर ढासळला. जवळजवळ दीड हजार मोंगल सैन्य मारले गेले. युद्धाचे पारडे फिरले होते; पण किल्ल्यावरील दारूगोळा संपला होता. दाणागोटाही संपला होता. अखेर चार महिन्यांनी हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबने या किल्ल्याचे नामकरण ‘आझमतारा’ असे केले.
महाराणी ताराबाईंनी या गडावर आक्रमण करून गड ताब्यात घेतला. गडाचे नाव पुन्हा ‘अजिंक्यतारा’ असे ठेवले; पण हा किल्ला दीर्घकाळ त्यांच्याकडे राहिला नाही. ताराबाईंना नाइलाजाने किल्ला मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला.
इ. स. 1708 मध्ये संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू यांनी हा किल्ला मोठ्या चातुर्याने जिंकला आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. इ. स. 1719 मध्ये शाहू महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना गडावर आणण्यात आले. पुढे पेशवाईच्या काळात या गडाचा ताबा पेशव्यांकडे गेला. दुसन्या शाहूंच्या निधनानंतर अजिंक्यतारा इंग्रजांच्या ताब्यात गेला. 11 फेब्रुवारी 1818 रोजी इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावरील पेशव्यांची सत्ता संपुष्टात आणली.
गडावरील प्रेक्षणीय स्थळे :
प्रवेशद्वार :
अजिंक्यतारा गडावर प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे लागतात. त्यांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. या दरवाजाचे दोन्ही बुरूज आजही अस्तित्वात असल्याचे जाणवतात.
हनुमान मंदिर :
प्रवेशद्वार ओलांडून गडावर जाताच आपल्या दृष्टिक्षेपात येते ते हनुमान मंदिर होय. या मंदिरात आपणास मुक्काम करता येतो. गडावर पाण्याची सोय नसल्याने मुक्काम करणे त्रासाचे ठरू शकते.
महादेव मंदिर :
हनुमान मंदिर पाहून पुढे गेल्यावर महादेव मंदिर लागते. मंदिराच्या समोरच प्रसारभारती केंद्राचे कार्यालय आहे व मागे दोन टॉवर्स आहेत.
ताराबाई मंदिर :
हनुमान मंदिर पाहून पुढे गेल्यावर महादेव मंदिर लागते. मंदिराच्या समोरचे प्रसारभारती केंद्राचे कार्यालय आहे व मागे दोन टॉवर्स आहेत.
ताराबाई निवास :
महाराणी ताराबाई यांनी हा गड मोगलांकडून जिंकून घेतला होता. मंगळाईदेवी मंदिराकडे जाताना वाटेत ढासळलेल्या अवस्थेत असलेला राजवाडा आहे. हेच ते महाराणी ताराबाई यांचे निवासस्थान !
मंगळाई देवीचे मंदिर :
महाराणी ताराबाई यांचा भग्न अवस्थेत असलेला वाडा पाहिल्यानंतर पुढे गेल्यावर मंगळाईदेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच एक बुरूज आहे. तो बुरूज ‘मंगळाई बुरूज’ या नावाने ओळखला जातो. मंदिराच्या आवारात एक शिल्प आहे.
उत्तरेकडील भाग :
गडाच्या उत्तरेलाही दोन दरवाजे आहेत. गडावरील सर्व प्रेक्षणीय स्थळे
पाहिल्यानंतर आपली जवळजवळ गडाला एक प्रदक्षिणा पूर्ण होते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गड पाहून पूर्ण होतो.
गडाचे क्षेत्रफळ फारसे नसल्यामुळे अर्ध्या-पाऊण तासातच गड पाहून पूर्ण होतो.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
गडावर पाण्याची वानवा असल्यामुळे राहण्यासाठी सातारा शहर उत्तम आहे. सातारा शहरात अनेक लॉज आहेत. हॉटेल्स आहेत. खाणावळी आहेत. त्यामुळे सातारा शहरात मुक्काम करून सकाळी गड पाहण्यास जाता येते.