अर्नाळा किल्ला : Arnala Fort

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे, गड‌कोटांचे राज्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात 350 किल्ले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात आणखी भर घातली. कल्याण, ठाणे, वसई, मुंबई या नवीन परिसरात संभाजी महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कल्याणचा अर्नाळा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला होता. या किल्ल्याबद्दल आता आपण माहिती
घेऊया —

गडाचे नाव :अर्नाळा

समुद्रसपाटीपासून उंची:00:00 मी

किल्ल्याचा प्रकार :जलदुर्ग

चढाईची श्रेणी :सोपी

ठिकाण : अर्नाळा, जिल्हा ठाणे.

जवळचे गाव : अर्नाळा,वसई.

डोंगर रांग:नाही.

सध्याची अवस्थाः चांगली

स्थापना: 1516

ठाण्याहून अंतर : 50 किमी.

अर्नाळा किल्ल्यावर कसे जाल ? How to go to Arnala fort ?

ठाण्याहून अर्नाळा किल्ला 50 किमी अंतरावर आहे.

* वसईहून अर्नाळा किल्ला 20 किमी अंतरावर आहे.

* मुंबईहून अर्नाळा किल्ला 75 किमी अंतरावर आहे.

मुंबईहून वसई किंवा विरारला गेल्यावर विरारहून किंवा वसईहून अर्नाळा गावी जाता येते. हा प्रवास बसने किंवा कारने करता येतो. येथून मोटार लाँचने थेट अर्नाळा किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला जंजिऱ्याइतका सुरक्षित आणि भक्कम नसला तरी येथे सरासरी आठ ते दहा मीटर उंचीची भक्कम तटबंदी’ ‘पाहायला मिळते.

अर्नाळा किल्ल्याचा इतिहास: History of Arnala Fort:

अर्नाळा किल्ला हा जलदुर्ग असून या किल्ल्याला जंजिरे अर्नाळा या नावाने सुद्धा ओळखले जाते. इ. स. 1516 मध्ये हा किल्ला सुलतान महमूद बेगदा याने बांधून घेतला. या किल्ल्याने सुलतानशाही, पोर्तुगीज, मराठेशाही, मुघलशाही, पेशवाई जवळून पाहिली आहे.

इ.स. 1530 च्या दरम्यान अर्नाळा किल्ला पोर्तुगीजांनी सुलतानांच्या ताब्यातून घेतला.बरीच वर्षे पोर्तुगीजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता.

छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स. 1685 च्या दरम्यान कल्याण, वसई, विरार, मुंबई बरोबरच अर्नाळा किल्ला ताब्यात घेतला होता, पण अर्नाळा अल्पकाळासाठी स्वराज्यात राहिला. पुन्हा पोर्तुगीजांनी अर्नाळा किल्ल्यावर आपले बस्तान बसवले.

इ.स. 1737 मध्ये वसईच्या किल्ल्याबरोबरच अर्नाळा किल्ला पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हिसकावून घेतला.पुढे बाजीरावाने या किल्ल्याची डागडुजी केली.

इ.स. 1817 मध्ये इंग्रजांनी अर्नाळा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातून आपल्याकडे घेतला. इ.स. 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता पूर्णतः संपुष्टात आली. त्यामुळे इंग्रजांची सत्ता असेपर्यंत अर्नाळा किल्ला इंग्रजांच्याच ताब्यात राहिला.

अर्नाळा किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular Places of Arnala fort:

तटबंदी: Embankment:

अर्नाळा किल्ल्याची रचना चौकोनी असून गडाच्या सभोवती असणारी तटबंदी आजही मजबूत अवस्थेत पाहायला मिळते, सुमारे आठ ते दहा मीटर उंचीच्या तटबंदीने अर्नाळा किल्ला घेरलेला आहे. शिसे, चुना यांचा बांधकामात वापर केल्यामुळे किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत स्थितीत आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे दहा ते बारा एकर असून संपूर्ण तटबंदीवर जागोजागी नऊ बुरुज आहेत.

गडावरील दरवाजे:

अर्नाळा किल्ल्याला एकूण तीन दरवाजे आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तरेला असून हाच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला टेहळणीसाठी दोन बुलंद बुरुज आहेत. या मुख्य दरवाजाच्या कमानी खूप सुंदर आणि नक्षीदार असून दोन्ही बाजूंना दोन सिंह कमानीवर कोरलेले आहेत. तसेच हत्ती आपल्या सोंडेत फुलांच्या माळा घेऊन स्वागतासाठी सज्ज असल्याचे शिल्प कमानीवर आहे.

येथे दरवाजावर शिलालेख असून बाजीराव पेशव्याने गडाची पुनर्बांधणी केल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.

हनुमंत बुरुज:

किल्ल्यापासून थोडा स्वतंत्र असलेला एक बुरुज आहे. या बुरुजाला हनुमंत बुरुज म्हणून ओळखले जाते.

त्र्यंबकेश्वर मंदिर :

त्र्यंबकेखर मंदिर अन्य गडावर क्वचितच पाहायला मिळते, कदाचित पेशव्यांनी हे मंदिर बांधून घेतले असावे.या मंदिरासमोरच अष्ट‌कोनी तळे आहे. तळ्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.

भवानी मंदिर:

हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता. याचा पुरावा म्हणजे भवानी मंदिर होय. या किल्ल्यावर एक छोटेसे भवानी मंदिर आहे.

महादेव मंदिर:

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर महादे‌व मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्यावरही महादे‌वाचे मंदिर आहे.

किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे.

गडावरील राहण्याची सोय :

गडावर मुक्काम करण्यासाठी अशी सुरक्षित जागा नाही. येथे मुक्काम न करणे हिताचे.अर्नाळा गावात मुक्काम करता येतो. राहण्याची व खाण्यापिण्याची सोय येथे होऊ शकते. मच्छी, खेकडी खाणाऱ्यांसाठी येथे सोय होऊ शकते.

Leave a comment