कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळे / kolhapur tourist places

कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे. तसा सांस्कृतिक आणि कला क्षेत्राचाही मोठा वारसा आहे. कोल्हापूर हे पुरागामी चळवळीचे केंद्र आहे. कोल्हापुरी भाषेचा रंग आणि ढंग काही वेगळाच आहे. मागील दोन लेखात आपण कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेतली. याही लेखात आपण कोल्हापुरातील उर्वरित प्रेक्षणीय स्थळांची माहिती होणार आहोत.——-

1. महाराणी ताराबाईचा पुतळा : Statue of Maharani Tarabai

कोल्हापूरची गादी निर्माण करणारी कर्तबगार महाराणी म्हणजे ताराबाई होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या म्हणजेच महाराणी ताराबाई होय.छत्रपती संभाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर चहुबाजूंनी संकट आले होते. राणी येसूबाई आणि त्यांचा पुत्र शाहू यांना औरंगजेबने कैद केले होते. स्वराज्याचे वारसदार राजाराम महाराज जिंजीला सुरक्षित होते. औरंगजेब तर स्वराज्य गिळंकृत करण्यास टपला होता. एका पाठोपाठ एक किल्ले ताब्यात घेत होता. अशा वेळी धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या खंबीर साथीदारांच्या मदतीने स्वराज्याची ठिणगी जिवंत ठेवण्याचे काम महाराणी ताराबाईने केले.12 डिसेंबर 1707 मध्ये शाहू (शिवाजी महाराजांचे नातू, संभाजी महाराजांचे पुत्र) आणि ताराबाई यांच्यात खेड येथे लढाई झाली.


त्यात ताराबाईचा पराभव झाला. पुढे वारणा येथे शाहू आणि ताराबाई यांच्यात करार झाला. या करारानुसार स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या. कोल्हापूरच्या गादीचा हक्क ताराबाईना मिळाला. तर सातारचे छत्रपती शाहू झाले.

अशा या कर्तबगार महाराणी ताराबाईचा भव्य पुतळा CBS[मध्यवर्ती बस स्थानक] जवळच ताराबाई पार्कात डौलाने उभा आहे.

ताराबाई पार्कात केवळ मागील दोन पायांवर उभा असलेल्या घोड्यावर ताराबाई हातात नंगी तलवार घेऊन लढाईच्या आवेशात बसलेल्या आहेत. असा हा ताराबाईचा रूबाबदार पुतळा वैशिष्ट्यपूर्ण आहे.कोल्हापुरातील रवींद्र मेस्त्री यांनी हा पुतळा तयार केला. दोन टन वजन असलेल्या महाराणी ताराबाईचा पुतळा 18 फूट उंचीचा आणि मजबूत आहे.

17 फेब्रुवारी 1981 रोजी विजयमाला राणीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली मेहरा यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. आज हा पुतळा ताराबाई चौकात डौलाने उभा आहे.

ताराबाई यांचा पुत्र दुसरा शिवाजी कोल्हापूरच्या गादीवर बसला होता. तर सातारच्या गादीला-शाहूंना वारस नसल्याने ताराबाईचा नातू दुसरा संभाजी याला दत्तक घेऊन गादीवर बसवले.

2. टाऊन हॉल म्युझिअम Townhall Museum:

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (CPR) अगदी समोरच गर्द राईत टाऊनहॉल म्युझिअम आहे.हे म्युझिअम CBS पासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 26 जून 1974 पासून या संग्रहालयाचा टाऊन हॉलच्या मोठ्या जागेत विस्तार करण्यात आला. राजवाड्याच्या एका मोठ्या भागात हे म्युझियम वसलेले आहे. हे म्युझिअम म्हणजे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारे अनमोल संग्रहालय आहे. या संग्रहालयात दुर्मिळ शस्त्रास्त्रे, ऐतिहासिक वस्तू, परंपरागत राजचिन्हे, कलात्मक वस्तू, दुर्मिळ पेंटिंग्ज, सोन्या चांदीच्या अनमोल दुर्मिळ वस्तू यांचा संग्रह आहे. याशिवाय शिकारीचे प्राणी भूसा भरून ठेवलेले आहेत. तसेच दरबारची सुबक मांडणी केलेली आहे. 1872 ते 1876 या काळात इंग्रजांनी बांधलेली ही इमारत तत्कालीन प्रशासकीय काम‌काजासाठी वापरली जात असे, सध्या ही इमारत पुरातत्त्व खात्याकडे असून 1947मध्ये येथे शासकीय वस्तुसंग्रहालय सुरु झाले. या म्युझिअममध्ये सध्या सात विभाग आहेत. ताम्रपट, उत्खननातील नाणी, वस्तू, कलाकृती, शस्त्रास्त्रे, बाबुराव पेंटर, आबालाल रेहमान यांनी साकारलेली पेंटिंग्ज यांचा संग्रह आहे. नाममात्र प्रवेश फी देऊन सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:30 या वेळेत या म्युझिअमचा आनंद लुटता येतो.

3. शिवाजी वि‌द्यापीठ: Shivaji University:

कोल्हापूरच्या सेंट्रल बसस्थानकापासून 3.3 किलोमीटरवर पूर्वेला शिवाजी विद्यापीठ वसलेले आहे. या विद्यापीठाची स्थापना 1962 साली झाली असून तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते या वि‌द्यापीठाचे उद्‌घाटन झाले. सध्या या वि‌द्यापीठ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा हे तीन जिल्हे येतात. सध्या या वि‌द्यापीठात आर्टस, कॉमर्स, सायन्स या तीन शाखांचे आणि त्यांच्या उपशाखांचे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाच्या विविध शाखा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचे काम केले जाते. संशोधनात्मक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वि‌द्यार्थ्यांना वि‌द्यापीठ शिष्यवृत्ती देते. विद्यापीठात विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. वि‌द्यापीठाच्या भव्य लायब्ररीचा उपयोग विद्यार्थ्यांना करता येतो.

मध्यंतरी या वि‌द्यापीठाचे नामकरण शिवाजी विद्यापीठ असे न करता छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यापीठ असे करावे असा आवाज उठला होता; पण स्थानिक बुजुर्ग नेत्यांनी असे झाले तर JNU (जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी) सारखे शिवाजी विद्यापीठाचे CSMU असे नामकरण होईल म्हणून विरोध केला. तो योग्यच होता.

4. टेंबलाई देवी मंदिर : Tembalai Devi Temple:

कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्थानकापासून पूर्वेला एका टेकडीवर टेंबलाई देवीचे मंदिर आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात टेंबलाई देवीचे स्थान महत्त्वाचे आहे. श्री अंबाबाईची धाकटी बहीण म्हणून टेंबलाई देवीला मान दिला जातो. कामाक्षाचा वध करून कोल्हापूरकरांची कामाक्षापासून सुटका करायाचे काम टेंबलाई देवीने केले आहे.पुढे यथाकाल कोणत्या तरी कारणास्तव टेंबलाईदेवी अंबाबाईवर रुसून येऊन टेंबलाईच्या टेकडीवर येऊन राहू लागली. अंबाबाईने स्वतः जाऊन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण टेंबलाईचा रुसवा काही गेला नाही.असे असले तरी अंबाबाई आणि टेंबलाई यांचा जिव्हाळा काही कमी झाला नाही.

दरवर्षी नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध पंचमीला टेंबलाई देवीची टेंबलाईच्या माळावर यात्रा भरते. या दिवशी अंबाबाई पालखीतून टेबलाईला भेटायला जाते. अशा प्रकारे दरवर्षी अंबाबाई आणि टेंबलाई देवी यांची भेट घड‌वून आणली जाते.टेंबलाई देवीचे मंदिर हे हेमांडपंथी धाटणीचे आहे.

5. पंचगंगा घाट: Panchaganga – Ghat, Kolhapur:

कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्थानकापासून 4.5 किलोमीटर अंतरावर कोल्हापूरच्या वायव्य दिशेला पंचगंगा नदीवर हा पंचगंगा घाट बांधलेला आहे.

तुळशी, कासारी, कुंभी आणि भोगावती या चार नद्या मिळून पाचवी नदी बनली आहे. तिलाच आपण पंचगंगा नदी म्हणतो. या चार नद्यांशिवाय सरस्वती ही गुप्त नदी ही पंचगंगेची उपनदी मानली जाते.पण ते भूगर्भशास्त्रात बसत नाही. सरस्वती ही काल्पनिक नदी आहे.

पंचगंगा घाटावर 1890 साली बांधलेला ब्रिटिशकालीन पूल आहे. हा पूल पाच कमानींचा आहे. सध्या या पुलाची मुदत संपल्यामुळे तो बंद आहे. या पुलाला शिवाजी पूल असे नाव दिले आहे. येथे नवीन पूल बांधला आहे. तोही शिवाजीपूल या नावाने ओळखला जातो. येथे जवळच ब्रह्मपुरी नावाची टेकडी आहे. येथील उत्खननात अनेक प्राचीन अवशेष सापडले आहेत. या घाटाच्या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. परकोटातील देवळात छत्रपती दुसरे संभाजी, तिसरे शिवाजी, आबासाहेब महाराज (शंभू), बाबासाहेब (शहाजी) महाराज यांच्या छत्र्या आहेत. 1815 मध्ये बांधलेली तिसऱ्या शिवाजीची छत्री सर्वांत मोठी आहे.

6. जैन मंदिरे Jain Temples:

शुक्रवार पेठेत कद्रे गल्लीत 11 व्या शतकातील पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. हे जैन मंदिर प्रसिद्ध आहे.

महाद्वार रोडने जिरणे गल्लीत गेल्यास तेथे दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. येथे इ.स. 1136 आणि
1146 सालातील कानडी भाषेतील शिलालेख आहेत.

शुक्रवार पेठेत गंगावेशजवळ लक्ष्मीसेन जैन मठ आहे. हा मठ खूप प्राचीन आहे.

मंगळवार पेठेतील रंकभैरवाच्या प्राचीन मंदिराशेजारीच त्रिकुट जैन चौथालय आहे.

कोल्हापूरच्या मातीने सर्व धर्मीयांची अस्मिता जपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण कोल्हापूरकरांनी आत्मसात केली आहे. पर्यटकांनी आणि भाविकांनी कोल्हापूरच्या संस्कृतीचा आदर्श जरून पाहून जावा.

आवर्जून वाचावे असे काही

  1. कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे /Places to visit in kolhapur
  2. कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur
  3. किल्ले पन्हाळागड/ Panhala Fort information in marathi

Leave a comment