श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर जोतिबाचे मंदिर वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात.

दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाब‌द्दल आणि जोतिबाच्या मंदिराब‌द्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत.

जोतिबाला कसे जाल ? How to go to Jotiba?

कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून बसेस, रिक्षा किंवा टॅक्सीने जाता येते. कोल्हापूरपासून जोतिबाचे मंदिर आंबेवाडी, केर्ली मार्गे 21 किलोमीटरवर आहे. कोल्हापूरपासून रत्नागिरी रोडवर केर्ली फाटा लागतो. तेथून उजवीकडे 10 किमी अंतरावर जोतिबा मंदिर आहे.

कोल्हापूरहून कुशिरे-पोहाळे मार्ग जोतिबाला जाता येते. या मार्गाने जोतिबा 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे.

कोल्हापूरहून दर रविवारी भल्या पहाटे कुशिऱ्याच्या डोंगरातून अनेक भाविक पायी चालत जातात. हे अंतर 12 किलोमीटर होते.

आम्ही 1982 साली डी. एड् ला असताना गारगोटीहून 11 ते 12 मित्रमंडळी सायकलने गेलो होतो. हा प्रवास खूपच रोमहर्षक होता.एका दिवसात आम्ही जोतिबा करुन पन्हाळगडावर गेलो होती.

वारणा कारखान्याहून बहिरेवाडी, जाखले मार्गे जोतिबाला जाता येते. वारणानगर ते जोतिबा मंदिर हे अंतर 14 किलोमीटर आहे.

जोतिबाचे भौगोलिक स्थान: Geographic Location of Jotiba Dongar

जोतिबा मंदिर हे कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेला एका उंच टेकडीवर वाडी रत्नागिरी गावात वसलेले आहे. या मंदिराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 950 मीटर आहे. जोतिबाच्या डोंगरावरून दक्षिण दिशेला डौलाने उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार पन्हाळगड स्पष्टपणे दिसतो. पावसाळ्यात पन्हाळ्यावरून जोतिबाचे दृश्य पाहिल्यास या डोंगरावर जणू ढगच थडकत आहेत, असे वाटते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सकाळच्या वेळी जोतिबाच्या डोंगरावर भरपूर धुके असते..

जोतिबा मंदिराचा इतिहास: History of Jotiba Temple:

जोतिबाला दख्खनचा राजा म्हणतात.या राजाचे (जोतिबाचे) वाहन आहे घोडा.ही पार्श्वभूमी पाहता बळीवंशातील महान राजांचा संदर्भ घेणे आवश्यक वाटते. बळीवंशातील सर्वात पराक्रमी, निष्कलंक आणि दातृत्वाची ख्याती असलेला राजा म्हणजे बळीराजा होय.त्याचे प्रशासन उत्तम होते; पण राजा म्हणून दिलेले वचन पाळणे ही त्याची कमजोरी होती. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी सुभे निर्माण केले होते. जेजुरीचा खंडोबा, वाडी रत्नागिरीचा जोतिबा, म्हसोबा (महासुभा) असे काही सुभे आणि सुभेदार होते. जोतिबा हा दख्खनचा सुभेदार होता.त्याच्या पराक्रमाने त्याची ओळख दख्खनचा राजा अशी निर्माण झाली. कोल्हासुराचा वध करण्यासाठी तो अंबाबाईच्या मदतीला धावून आला होता. ही पार्श्वभूमी पाहता इ.स. 2 ऱ्या, 3 ऱ्या शतकापासून जोतिबाचे डोंगरावर वास्तव्य असण्याची शक्यता आहे. वाडी रत्नागिरी हे जोतिबाच्या गादीचे ठिकाण असल्याने येथे मध्ययुगीन काळाच्या अगोदरपासून जोतिबाचे मंदिर होते.

जोतिबाचे सध्या जे मोठे मंदिर दिसते, त्याच्या शेजारीच उजवीकडे जोतिबाचे अगदी छोटे मंदिर आहे. हे मंदिर कराड जवळील किवळ गावचा भक्त नावजी साळुंखे पाटील (नावजीबुवा) याने बांधले.त्यानंतर हेमाडपंथी ढाचणीचे सध्या अस्तित्वात असलेले हे मंदिर आहे ते इ.स. 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी बांधले.ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा इतिहास आणि पराक्रम सर्वज्ञात आहेच. सध्याच्या जोतिबाच्या मंदिराच्या शिखराची उंची 77 फूट आहे. लांबी 57 फूट तर रुंदी 17 फूट आहे. या मंदिरात असलेल्या जोतिबाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट आहे.

जोति‌बाच्या मंदिराशेजारीच दौलतराव शिंद्यांनी 1808 मध्ये केदारेश्वराचे मंदिर बांधले.या मंदिराची उंची 89 फूट असून लांबी 48 फूट तर रुंदी 22 फूट आहे. या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम मालजी निकम पन्हाळकर यांनी 1780 मध्ये केले आहे. या परिसरातच असलेल्या यमाई देवीचे बांधकाम राणोजीराव शिंदे यांनी 1750 मध्येच केले आहे. डोंगरावरील मंदिरांच्या बांधकामाचा इतिहास पाहता सर्व मंदिरे अठराव्या शतकास उभारलेली आहेत. अधूनमधून जीर्णोद्‌धार झाला आहे. सर्व मंदिरासाठी वापरलेला काळा बेसॉल्ट द‌गड डोंगराच्या परिसरातीलच खाणीतून काढलेला आहे.

जोतिबाच्या मंदिरातील पुजारी: Priest of Jotiba Tample:

जोतिबाची पूजा करण्याचा मान तेथील पुजाऱ्यांचा असतो. डोंगरावर पुजाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पुजाऱ्यांनी आपापसात संगनमताने पूजा करण्याचे आठवडे ठरवले आहेत. प्रत्येक आठवड्याला पुजारी बदलतात. जोतिबाच्या मुख्य यात्रेच्या वेळी म्हणजे चैत्र यात्रेच्या वेळी सु‌द्धा फिरते पुजारी असतात.यात्रेनंतर पाच पाकाळण्या असतात. त्यावेळीही दरवर्षी पुजाऱ्यांचा क्रम बदलत असतो. जोतिबावरील संपूर्ण पुजारी हे गुरव समाजाचे असून ते मूळेचे डोंगरावरचेच आहेत. गुरव म्हणजे गुरु, गुरुजी, मार्गदर्शक. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर गुरव म्हणजे द्रविडी संस्कृतीतील मूळचे मंदिरातील देवाचे पुजारी. आर्यांच्या आक्रमणामुळे बहुतांश मोठ्या आणि संपन्न मंदिरांचे पूजारी पद ब्राह्मणांनी बळकावले आहे.

चैत्र यात्रा: जोतिबा डोंगर: Chitra Festival, Jotiba Dongar

जोतिबाच्या डोंगरावर म्ह‌णजेच वाडी रत्नागिरीला दरवर्षी मोठी चैत्र यात्रा भरते. ही यात्रा चैत्र शु‌द्ध पौर्णिमेला भरते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि देशातील कानाकोप‌ऱ्यातील लोक येतात. सुमारे पाच ते सात लाख भाविक यात्रेनिमित्त जोतिबाचे दर्शन घेतात. एप्रिल महिन्यात प्रचंड उष्णता असते. तरी सुद्‌धा भाविकांच्या गर्दीचे प्रमाण दरवर्षी वाढत असते.

चैत्र यात्रेच्या वेळी दुपारच्या सत्रात जोतिबाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गुलालाची प्रचंड उधळण होते. अनेक गावांतून मानाच्या सासनकाठ्या येतात. 60/70 फूट उंचीच्या सासनकाठ्या पालखीच्या वेळी नाचवल्या जातात. उत्सवात गुलाल खोबरे यांची उधळण होते.

पाकाळण्या उत्सव:

साधारणत: दिवाळीनंतर चैत्र पौर्णिमेच्या अगोदर येणाऱ्या पाच पौर्णिमेला पाकळण्या उत्सव असतो.या उत्सवानिमित्त भाविक जोतिबाचे दर्शन घेऊन मंदिर परिसरातील आणि मंदिरातील स्वच्छता करतात.पाकाळण्या उत्सव हा एक सामाजिक बांधिलकी जपणारी परंपरा आहे.

खेटे उत्सव:

जोतिबाची यात्रा संपन्न झाल्यावर खेटे असतात. यात्रेनंतर येणाऱ्या पाच रविवारी हे खेटे असतात. या खेटे उत्सवाला सुद्धा जोतिबा डोंगरावर गर्दी असते. खेटे उत्सव हा वेगळेपणा जोतिबा डोंगरावर पाहायला मिळतो.

जोतिबाचा नैवेद्यः

जोतिबाला अनेक भाविक रविवारी, आडवारी केव्हाही आपल्या सवडीने येतात. दूरचे लोक मुक्कामाला येतात. हे भक्त लोक पुजाऱ्यांच्या घरीच भक्तनिवासात मुक्काम करतात आणि पुजाऱ्यांकडून नैवेद्य बनवून घेतात. हा नैवेद्य पुजाऱ्यांमार्फतच जोतिबाला दाखवला जातो.

जोतिबाच्या परिसरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. जोतिबाच्या संद‌र्भाने सिनेमेही निघाले आहेत.

जोतिबाच्या नावानं चांगभलं !!

आवर्जून वाचावे असे काही

  1. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे व त्यांची प्रसिद्धी /Cities and their tourist attractions
  2. कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Best places to visit in karnataka
  3. कर्नाटकातील पर्यटन स्थळे : Places to visit in karnataka

1 thought on “श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri”

Leave a comment