Buddha Part 6 : गौतम बुद्ध भाग 6

महामायेचा मृत्यू- Death of Mahamaya

राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांना बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर पुत्रसंतान झाले होते. महामायेला पडलेले स्वप्न आणि ज्योतिषांनी सांगितलेला स्वप्नाचा अर्थ यामुळे सिद्धार्थाला जन्मतःच नावलौकिक प्राप्त झाला होता. कपिलवस्तु नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पाचव्या दिवशी बाळाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांनी विचारपूर्वक अर्थपूर्ण नाव ठेवले होते. सिद्ध म्हणजे निष्णात, निपुण, परिपक्व, अर्थ म्हणजे बोध, आशय, समज, धन, द्रव्य, फल, थोडक्यात एखाद्या गोष्टीत निपुण, पारंगत झालेला आहे, असा तो सि‌द्धार्थ. सर्व प्रकारची सिद्धी (विद्या) प्राप्त झालेला आहे , असा तो सि‌द्धार्थ. सि‌द्धार्थाचे कुळनाव म्हणजे गोत्रनाम होते गौतम. यावरूनच या बाळाला लहानपणापासून सिद्धार्थ गौतम असे म्ह‌णू लागले. पुढे हाच सिद्धार्थ ‘बुद्ध’ या नावाने प्रसिद्ध झाला. नुसता प्रसिद्ध झाला नाही, तर त्याने जगभर आपल्या विचाराचा, आचाराचा ठसा उमटवला. बुद्ध कुणाला म्हणतात ? जो सर्वज्ञ आहे, असा तो बुद्ध. म्हणजेच ज्ञाता. जागरुक असलेला. म्हणूनच जन्मापूर्वी हे बाळ बुद्ध होणार असे ज्योतिषांनी सांगितले होते.ते पुढे खरे झाले.

वाचकांनी याचा अर्थ असा घेऊ नये की माझा ज्योतिष विद्येवर विश्वास आहे. भरमसाठ पैसा उकळून आपले भविष्य सांगणाऱ्याकडे न जाता’ लोकांनी स्वतःचे भविष्य स्वत्तः घडवावं. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. सिद्धार्थ गौतमाचा नामकरण सोहळा संपन्न झाला. इकडे-तिकडे दोन दिवस गेले आणि सिद्घार्थाची आई महामाया आजारी पडली. महामाया अचानक आजारी पडल्यामुळे सगळेजण गोंधळून गेले. औषधोपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. तिचे दुखणे वाढतच गेले. महामायाला जाणीव झाली की आपला अंतकाळ आता जवळ आला आहे. तिने शुद्धोदन आणि त्याची दुसरी पत्नी (राणी) महाप्रजापती यांना बोलावून घेतले आणि आपल्या मनातील गोष्ट महामायेने बोलून दाखवली. ती अशी-

” मी काही आता या आजारपणातून बरी होईन असे वाटत नाही. माझा अंतकाळ आता जवळ आला आहे. सिद्धार्थ गौतमाच्या बाबतीत मला पडलेले स्वप्न सत्यात उतरलेले पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही. लवकरच माझे बाळ मातृहीन होईल; परंतु माझ्या माघारी तुम्ही बाळाचा चांगला सांभाळ कराल याची मला खात्री आहे. माझी बहीण महाप्रजापती सिद्धार्थ गौतमाला आईचे प्रेम देईल, याचीही मला खात्री आहे. त्यामुळे मी दुःखीकष्टी होत नाही. तुम्हीही दुःखीकष्टी होऊ नका. मला ईहलोक सोडण्याची आज्ञा द्या.मला मृत्यूचे बोलावणे आले आहे. असे म्हणून महामायाने आपला प्राण सोडला. त्यावेळी सिद्धार्थ केवळ सात दिवसांचा होता. शुद्धोदन आणि महाप्रजापती यांना महामायेच्या मृत्यूमुळे असह्य वेदना झाल्या. त्यांनी रडून रडून आक्रोश केला.

महाप्रजापती ही महामायाची सख्खी बहीण आणि सख्खी जाऊ होय. महाप्रजापतीला एक मुलगा झाला. त्याच नाव नंद असे होते. नंद हा सि‌द्धार्थचा धाकटा भाऊ होता. याशिवाय महानाम, अनुरु‌द्ध, आनंद, हे त्याचे चुलतभाऊ होते. तर देवदत्त हा त्याच्या अमिता आत्याचा पुत्र होता. या सर्व भावंडांच्या सोबतीत सि‌द्धार्थ लहानाचा मोठा झाला.

Leave a comment